मधुमेह (इंग्रजी : डायबेटिस मेलिटस) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही (टाईप वन); किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही (टाईप टू). या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, आणि/किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे.यासोबतच दररोज व्यायाम करणे हा देखील एक महत्त्वपूर्ण उपचार आहे. यासाठी Physiotherapists कडे जाऊन आपल्या वयानुसार किंवा आपल्या जीवनशैली अनुसार व्यायामाचे प्रकार समजावून घेऊन व्यायाम केला तर मधुमेह बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवला जाऊ शकतो.

वर्णन

संपादन

मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले म्हणजे मूत्रपिंड अर्धनिकामी वा पूर्ण निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, कायमस्वरूपी वा तात्पुरते अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, जखमेमध्ये संसर्ग, जखमा लवकर बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे असे परिणाम होतात.[]

पार्श्वभूमी

संपादन

शरीरातील प्रत्येक पेशीस ऊर्जेची गरज आहे. शरीराचा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लूकोज आहे. अन्नामधील कर्बोदकांचे ( साखर आणि स्टार्च) अन्ननलिकेमध्ये पचनाअंती ग्लूकोजमध्ये रूपांतर होते. ग्लूकोज रक्तामधून शरीराच्या सर्व पेशीपर्यंत गरजेप्रमाणे उपलब्ध असते. इन्शुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडामधील पेशीमध्ये तयार होते. स्वादुपिंड जठराच्या मागील बाजूस असते. स्वादुपिंड अन्नपचनासाठी आवश्यक विकरे तयार करते. ती स्वादुपिंड नलिकेद्वारे लहान आतड्यात येतात. पण स्वादुपिंडातील विशिष्ट पेशी समूहामध्ये इन्शुलिन आणि ग्लूकॅगॉन ही दोन संप्रेरके तयार होतात. ही दोन्ही संप्रेरके सरळ रक्तामध्ये मिसळतात. इन्शुलिनचा पेशीआवरणावरील ग्राहक प्रथिनाबरोबर संयोग झाल्याशिवाय पेशी आवरणामधून ग्लूकोज पेशीमध्ये जाऊ शकत नाही. रक्तामधील काहीं ग्लूकोजचे ग्लायकोजेनमध्ये आणि मेदाम्लामध्ये रूपांतर होते. ग्लायकोजेन आणि मेदाम्ले शरीराचे अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा ऊर्जा साठा आहे. शरीरात पुरेसे इन्शुलिन नसल्यास रक्तामधील उपलब्ध ग्लूकोज पेशींना न मिळता रक्तामध्येच राहते.

रक्तामधील ग्लूकोजच्या आधिक्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. याला हायपरग्लायसेमिया (हायपर - अधिक , ग्लासेमिया - ग्लूकोज असणे) रक्तातील अधिक पातळीच्या ग्लूकोजमुळे रक्तामधील पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात अधिक ग्लूकोज रक्तामध्ये अधिक पाणी. रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे आणि सारखे मूत्रविसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लूकोज बाहेर टाकण्याची शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लूकोज आढळून येते.

ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लूकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्‍न करीत असते पेशीना ग्लूकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लूकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मेंदूस मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशीना ग्लूकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लूकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन उपपदार्थ बनतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात. अशा स्थितीस कीटोॲसिडॉसिस या नावाने ओळखले जाते. कीटोॲसिडॉसिस ही गंभीर स्थिति आहे. वेळीच उपचारना केल्यास कीटोॲसिडॉसिस झालेली व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मरण स्थितीकडे जाऊ शकते.

मधुमेहाचे प्रकार

संपादन

प्रकार १

संपादन

या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किवा अजिबातच तयार होत नाही. नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलंड, स्कॉटलंड, स्कॅन्डेनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. या मधुमेहास 'इन्शुलिन आवश्यक मधुमेह' असेही म्हणतात; कारण या रुग्णाना दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे. या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी यांमध्ये हेलकावे खात असते. अशा रुग्णांना एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून त्यांची रक्तशर्करा नियंत्रित करावी लागते.

प्रकार २

संपादन

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाल / व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगिकार केलेले, जपान लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावीच लागतात.

आणखी एक प्रकारचा मधुमेह 'गरोदरपणातील मधुमेह' या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. २००४ मध्ये अमेरिकेतील ३५ टक्के महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. दहा वर्षामध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लूकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शन द्यावी लागतात. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झाला असेल त्याना पाच ते दहा वर्षात दुसऱ्या प्रकारच्या आजारास सामोरे जावे लागते.

स्वादुपिंडाचे आजार, अति मद्यपान, कुपोषण आणि शरीरावर ताण पडेल अशा कारणांमुळे मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत.

कारणे आणि लक्षणे

संपादन

मधुमेहाचे नेमके कारण (किंवा कारणे) अज्ञात आहे. आनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होत असावा. यावर झालेल्या संशोधनातून मधुमेही व्यक्तीमध्ये जनुकीय खुणा असाव्यात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा विषाणू किंवा जीवाणूच्या प्रतिकारासाठी कार्यान्वित होऊन स्वतःच्या स्वादुपिंड पेशी नष्ट झाल्या असल्याची शक्यता अधिक. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये कौटुंबिक इतिहास आणि स्थूलपणा, यांचा सहभाग असावा.

दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते. पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही. मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान आणि मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. इतर लक्षणांमध्ये एकाएकी होणारी वजनातील घट, जखमा बऱ्या होण्यास लागणारा वेळ, मूत्रमार्गाचा संसर्ग, हिरड्यांचे विकार, किंवा दृष्टी अंधुक होत जाणे ही आहेत. अन्य तक्रारींसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसऱ्या प्रकारचा मधुमेह उघडकीस आल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता खालील व्यक्तींमध्ये असते- • सरासरी वजनापेक्षा २०% किंवा अधिक वजन असणे (स्थूल) • जवळच्या नातेवाईकांमधे मधुमेह असणे. • आफ्रिकन अमेरिकन, स्थानिक अमेरिकन, हिस्पनिक, स्थानिक हवाई बेटावरील. भारतीय व्यक्तींमध्ये स्थूल आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, जंक फूड खाण्यामुळे आणि पुरेसा व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाईप २चा मधुमेह वाढतो आहे. • गरोदरपणात मधुमेह झालेल्या ज्या स्त्रियांना चार किलोहून अधिक वजनाचे बाळ झाले आहे अशा स्त्रिया. • १४०/९० आणि यापेक्षा उच्च रक्तदाब • एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि • जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे. अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितीवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक ॲशटिडिप्रेसंट (?) आणि ॲड्रेनलजिक ॲंन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे. मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाने क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले.

हायपरग्लेसेमिया

संपादन

हायपरग्लेसेमिया हा रक्तातील साखरेची एक असाधारण उच्च पातळी आहे. हायपरग्लेसेमिया हे मधुमेहाचे एक लक्षण आहे (प्रकार १ मधुमेह आणि प्रकार २ मधुमेह) , हायपरग्लेसेमियाची मुख्य लक्षणे तहान वाढते आणि वारंवार लघवी करण्याची आवश्यकता भासते.

लक्षणे

संपादन

एरवी सामान्य असणाऱ्या व्यक्तीना मधुमेहाची लक्षणे एकाएकी, काही आठवड्यांत किंवा दिवसांत दिसायला लागतात. प्रौढ व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काहीं वर्षे लागू शकतात. सर्वसामान्यपणे मधुमेहाची लक्षणे म्हणजे गळून गेल्यासारखे वाटणे, बरे नसल्याची जाणीव, मूत्रविसर्नाची वारंवारता वाढणे, तीव्र तहान, तीव्र भूक आणि वजनातील घट.

आम्ल मूत्रता

संपादन

कीटोॲसिडॉसिस किंवा आम्लमूत्रता ही मधुमेहीची अवस्था उपासमारीमुळे किंवा आटोक्यात नसलेल्या मधुमेहामुळे येते. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये अशा रुग्णांची अधिक काळजी घ्यावे लागते. शरीरातील प्रथिने आणि मेदाम्लाचे विघटन व्हायला लागले म्हणजे रक्तामध्ये कीटोन संयुगे साठतात. कीटोन संयुगे असल्याची लक्षणे पोटदुखी, उलट्या, श्वसनाचा वेग वाढणे, आणि गुंगी येणे. कीटोन मूत्रता असलेल्या रुग्णांच्या श्वासास गोडसर गंध येतो. पुरेशी काळजी घेतली नाही तर मधुमेही रुग्ण बेशुद्धावस्थेत आणि कदाचित कोमामध्ये जाऊन मृत्यू ओढवू शकतो.

बहुतांश वेळेस द्वितीय प्रकारचा मधुमेह जोपर्यंत रुग्ण डॉक्टरचा सल्ला घेत नाही तोपर्यंत उघडकीस येत नाही. हृदयविकार, जुनाट हिरड्यांचा विकार, मूत्रमार्ग संसर्ग, अंधुक दृष्टी, हातापायाची संवेदना कमी होणे, जखम बरी न होणे अशा तक्रारींमधून आणि योग्य त्या तपासण्या मधून मधुमेह उघडकीस येतो.

निदान

संपादन

मधुमेहाचे निदान करण्यासाठी लक्षणे, मूत्र परीक्षण आणि रक्त तपासण्या करून मधुमेह असल्याची खात्री करून घेतली जाते. मूत्रपरीक्षणामधून कीटोन चाचणी आणि मूत्रातील प्रथिने यावरून वृक्क नीट कार्य करीत आहेत की नाही याचे निदान होते. रुग्णास ठरवून दिलेला आहार, तोंडाने घ्यावयाची औषधे आणि इन्शुलिन उपचार यांचा सल्ला दिल्यानंतर नियमित चाचण्या घ्याव्या लागतात.

मूत्र परीक्षण

संपादन

क्लिनिस्टिक आणि डायस्टिक या कागद पट्ट्या मूत्रामध्ये बुडविल्यानंतर त्यांचा मूत्रातील ग्लूकोज पातळीप्रमाणे रंग बदलतो. मूत्रातील ग्लूकोजची पातळी रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण दर्शवते. मूत्र परीक्षणावरून केलेले निदान रक्त परीक्षणाएवढे अचूक नसते. तरीही ग्लूकोजचे रक्तातील प्रमाण ठरविण्याचे ही सोपी आणि जलद पद्धत आहे.

मूत्रामधील कीटोन घटकांचे परीक्षण करण्यासाठी असिटेस्ट लिंवा कीटोस्टिक्सचा उपयोग केला जातो. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये कीटोन आम्लता जीवधेणा ठरू शकते. त्यामुळे तात्काळ आणि सोपी परीक्षण पद्धत कीटोन घटकांचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक ठरते.

मधुमेहीसाठी आणखी एक मूत्रपरीक्षण करावे लागते ते म्हणजे मूत्रामधील अल्ब्युमिन किंवा प्रथिनांचे. एरवी मूत्रामध्ये अल्ब्युमिनचे प्रमाण नगण्य असते. पण मधुमेही रुग्णामध्ये वृक्काचे कार्य नीटसे होत नसेल किंवा वृकाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असेल तर त्याचा अंदाज घेण्यासाठी मूत्रामध्ये बुडविण्याच्या पट्ट्या उपलब्ध आहेत. अधिक संवेदनक्षम चाचणी म्हणजे रेडियोभारित रसायनाच्या सहाय्याने मायक्रोअल्ब्युमिन परीक्षण करवून घेणे.

रक्त परीक्षण

संपादन

उपाशी पोटी रक्तातील ग्लूकोज पाहणे. रुग्णाच्या शिरेमधून दोन ते पाच मिलि रक्त रुग्णाने आठ तासापूर्वी अन्न ग्रहण केले असेल (न्याहरीच्या आधी) या वेळी परीक्षणासाठी घेतले जाते. रक्तातील तांबड्या पेशी बाजूस करून रक्तरसातील ग्लूकोजची पातळी मोजण्याची ही पद्धत आहे. याचे सामान्य प्रमाण ४.४ मिलिमोल / लिटर किंवा ८० मिग्रॅ./१०० मिलि असते. या पातळीच्या वर ग्लूकोजची रक्तातील पातळी उपाशी पोटी असल्यास मधुमेहाचे निदान होते.

जेवल्यानंतर रक्तामधील ग्लूकोज परीक्षण

संपादन

सामान्य व्यक्तीच्या रक्तातील ग्लूकोज भोजनानंतर दोन तासानी १२०मिग्रॅ./१०० मिलि या पातळीस येते. मधुमेही रुग्णाच्या रक्त परीक्षणामध्ये रक्तातील ग्लूकोज भोजनोत्तर दोन तासानी १५० मिग़्रॅ / १०० मिलिहून अधिक असेल तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. जेवल्यानंतर दोन तासांच्या रक्तामधील पातळी किती असावी याचे आकडे थोडे वेगवेगळे आहेत. पण तो आकडा १५०हून अधिक नसावा.

जीटीटी (ग्लूकोज टॉलरन्स टेस्ट)

संपादन

मधुमेह आहे की नाही यासाठी केली जाणारी ही परीक्षा शक्यतो ऐंशी ग्रॅम ग्लूकोज १००-१५० मिलि पाण्यात विरघळवून ते व्यक्तीस दिले जाते. ही चाचणी उपाशी पोटी करावयाची आहे. सामान्य व्यक्तीमध्ये ग्लूकोज पिण्यात आल्यानंतर रक्तातील साखर त्वरित वाढते. रक्तरसातील ग्लूकोज पातळी ११.१ मिलिमोलर/लि किंवा २००मिग्रॅ /१०० मिलि दोन तासानी असल्यास व्यक्तीस मधुमेह आहे असे निदान केले जाते. अचूक निदान होण्यासाठी दर अर्ध्या तासानी रक्तातील ग्लूकोजच्या पातळीवरून आलेख काढला जातो. ग्लूकोज द्रावण घेतल्यापासून तीन तासांच्या रक्तातील ग्लूकोज पातळीवरून रक्तातील ग्लूकोज पातळी कशी बदलते हे समजते. ही मधुमेहाचे निदान करण्याची विश्वासार्ह चाचणी आहे.

घरी रक्तातील ग्लूकोजची चाचणी करणारी उपकरणे उपलब्ध झाल्यापासून रुग्णाना स्वतःच्या रक्तातील ग्लूकोजची पाहणी करणे सोपे झाले आहे. रक्त बोटाच्या टोकामधून काढण्यात येते. रक्त तपासण्यासाठी एक लहान सुई असलेले उपकरण, रक्त तपासण्यासाठी कागदी पट्ट्या आणि हे मोजण्यासाठी बॅटरीवर चालणारे डिजिटल उपकरण यावर रक्तातील ग्लूकोजची पातळी दररोज किंवा आवश्यकतेनुसार मोजता येते. त्यातल्या त्यात नवीन मधुमेह रुग्ण आणि इन्शुलिन घेणारे रुग्ण यांच्यासाठी हे उपकरण आवश्यक आहे. आपला मधुमेह आटोक्यात आहे की नाही यासाठी एचबी ए१सी- ग्लायकॉसिलेटेड हीमोग्लोबिन नावाची एक चाचणी दर सहा महिन्यानी करावी. मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्त परीक्षणाची एचबीए१सी पातळी ६.४ असते. मधुमेह झालेल्या व्यक्तीने त्याच्या एचबीए१सीची पातळी शक्यतो ६.५ पर्यंत राखण्याचा प्रयत्‍न करावा असे मधुमेहतज्ज्ञ सांगतात. या चाचणीसाठी दिवसभरात केंव्हाही रक्त दिले तरी चालते.

उपचार

संपादन

सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल असे एकही औषध उपलब्ध नाही. पण मधुमेह आटोक्यात ठेवला म्हणजे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. मधुमेह उपचाराची दोन लक्ष्य आहेत. पहिले रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर ठेवणे आणि दुसरे मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी टाळणे. योग्य आहार , व्यायाम, इन्शुलिन किंवा तोंडाने घ्यावयाची औषधे नियमित घेऊन मधुमेहावर चांगलेच नियंत्रण ठेवता येते. २००३ मध्ये अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेने मधुमेहाची काळजी घेण्यासाठी काहीं पद्धती सुचवलेल्या आहेत. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.

आहारातील बदल योग्य तो आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. बहुतेक दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहींचे वजन कमी करण्याने मधुमेह आटोक्यात येतो. आहारामध्ये ५०-६०% उष्मांक कर्बोदकामधून, १०-२०% प्रथिनामधून आणि ३०% मेदाम्लामधून घेणे श्रेयस्कर. प्रत्येकाच्या शरीरास आवश्यक उष्मांक वय, वजन आणि दररोज करण्यात येणारे काम यावर अवलंबून आहेत. घेण्यात येणारे उष्मांक दिवसभर विभागले गेले म्हणजे एका वेळी शरीरातील ग्लूकोजची पातळी वाढत नाही.

प्रत्येक अन्न घटकामध्ये असणाऱ्या उष्मांकाची नोंद ठेवणे हे किचकट काम आहे. त्यासाठी आहारतज्‍ज्ञाची मदत घ्यावी लागते. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि अमेरिकन डायेटिक असोसिएशनने अन्न घटकांची बदलती यादी प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक यादीमध्ये प्रथिने, मेदाम्ले आणि कर्बोदके यांमधून किती उष्मांक हे दिलेले आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थाऐवजी काय खायचे याचा अंदाज घेता येतो. प्रथिने, फळे, स्टार्च, भाज्या आणि लोणी, बटर तेले जेवण्यामध्ये किती घ्यावीत आणि ब्रेकफास्ट किती घ्यावा हे समजण्यासाठी उपयोगी आहे.

दुसऱ्या प्रकारच्या अनेक मधुमेहीमध्ये वजन कमी करणे हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. अन्नघटक वरचेवर बदलणे उष्मांक नियंत्रित ठेवणे आणि माफक व्यायाम याने वजन कमी होते.

फुटाणे खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणाऱ्या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.[]

मधुमेह आहार काय असावा

संपादन

मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहार वर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे.

मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही.

  • तुरट, कडू आणि तिखट पदार्थ जास्त खावेत.
  • मधुमेहाच्या रुग्णांनी पचन होण्यास हलका असलेला त्याच सोबत सहज मिसळणारे फायबर असलेले आहार घ्यावेत.
  • लवकर पचणारे फळे उदा. टरबूज, पपई, बोर इत्यादी फळे. जे लवकर पचतात आणि आतड्याना साफ ठेवण्यास मदत करतात.
  • मधुमेह आहार नियंत्रण ठेवण्याचे पदार्थ मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुका मेवा, चिक्कू, सीताफळ इत्यादी खाऊ नये.
  • मधुमेह झाल्यास तरल पदार्थ घ्यावेत. उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी. यामुळे देखील मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल.
  • डॉक्टर कडून सल्ला घेऊन मधुमेह रोगी पौष्टिक आहारासाठी एक 'मधुमेह आहार तक्ता' बनवून घेऊ शकतात.
  • मधुमेह आणि झोप यांचा काय संबंध आहे हे पहा.

मधुमेह नसलेल्या व्यक्तीसाठी, उपवासाने उपवास करणारा रक्त शर्करा 100 मिलीग्राम / डीएल पर्यंत असावा. पूर्वी सामान्य जेवण साधारण 70 ते 99 एमजी / डीएल आहेत. जेवणानंतर दोन तासांनी घेतलेल्या "पोस्टप्रेंडियल" शर्करा 140 एमजी / डीएल पेक्षा कमी असावेत. हे लोक मधुमेहाशिवाय सामान्य संख्या आहेत.

मधुमेहींसाठी खाद्यतक्ता

संपादन

गहू - मधुमेहींसाठी गहू कोरडे भाजून पीठ करतात. त्याच्या पोळ्या किंवा फुलके करतात.
तांदूळ - तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करतात किंवा त्याचे पीठ करून भाकरी करतात. मसाले भात देखील बनविल्यास उत्तम असते.
ज्वारी - कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरतात. जर बद्धकोष्ट होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात देतात व द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळतात.
डाळ - मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करतात. डाळींचा वापर सालासकट केल्यास उत्तम असते. फळे - संत्री मोसंबी जांभूळ आवळा इत्यादी खाणे.

इन्शुलिन

संपादन

प्रथम प्रकारच्या मधुमेही रुग्णांना दररोज इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घ्यावे लागते. त्याशिवाय शरीरातील ग्लूकोजचा वापर होत नाही. इन्शुलिनचा प्रकार, आणि डोस रुग्णाचे वजन, वय, उंची, आहार ग्रहण आणि कामाचे स्वरूप यावर अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकारच्या काही रुग्णांमध्ये आहार, व्यायाम आणि तोंडाने घ्यावयाच्या औषधावर मधुमेह नियंत्रित राहू नाही; अशा रुग्णाना बाह्य इन्शुलिनची गरज भासते. इंजेक्शन त्वचेखाली घ्यावे लागते. इंजेक्शनची सुई लहान असते. शक्यतो ज्या ठिकाणी त्वचा सैल असते अशा ठिकाणी इंजेक्शन घेण्यात येते. उदाहरणार्थ पोटाची आणि मांडीची त्वचा.

शुद्ध मानवी इन्शुलिन सध्या सर्वत्र सामान्यपणे वापरात आहे. गाय बैल आणि डुकराच्या स्वादुपिंडातून मिळवलेले इन्शुलिनसुद्धा उपलब्ध आहे. शक्यतो एकदा देता येईल एवढे एका प्रकारचे इन्शुलिन रुग्णास दिले जाते. एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून रुग्णास द्यायची पद्धत आहे. मधुमेहाच्या तीव्रतेप्रमाणे एकदा किंवा दोनदा इन्शुलिन देणे शक्य आहे. एकापेक्षा अधिक वेळा इन्शुलिन घ्यावे लागणाऱ्या रुग्णाना इन्शुलिन पंप अधिक योग्य ठरतो. शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे हा पंप इन्शुलिन पुरवतो. बॅटरीवर चालणारा हा पंप शरीराबाहेर असून इंजेक्शनची सुई पोटात खुपसलेली असते. पंपाला आवश्यक त्या सूचना दिल्यास थोड्या थोड्या प्रमाणात शरीरास इन्शुलिन मिळत राहते. व्यायाम आणि जेवण यांच्या वेळेप्रमाणे इन्शुलिनच्या वेळा रुग्णास ठरवता येतात. नेहमीचे इन्शुलिन त्वरित परिणाम करते. इंजेक्शन दिल्यापासून १५-३० मिनिटात त्याचा परिणाम सुरू होतो. जेवल्यानंतर दोन तासात नेहमीचे इन्शुलिन जसे कार्य करते, तसे त्वरित परिणाम करणारे एक इन्शुलिनही परिणामकारक आहे. त्याचा प्रभाव चार ते सहा तासापासून १८-२६ तास टिकतो. दीर्घ काळ परिणाम करणारे एका प्रकारचे इन्शुलिन चार ते सहा तासात आपला पारिणाम चालू करते आणि त्याची परिणामकारकता २८-३६ तास टिकते.

प्रमाणापेक्षा अधिक इन्शुलिन घेतल्यानंतर कमी अन्न खाणे, खूप वेळाने काळाने अन्न खाणे, अधिक व्यायाम करणे, मद्यपान करणे अशा प्रकारांमुळे ग्लूकोजची कमतरता निर्माण होते. वैद्यकीय परिभाषेमध्ये या प्रकारास हायपोग्लायसेमिया म्हणतात. प्रमाणापेक्षा अधिक भूक लागणे, गोंधळल्यासारखे वाटणे, आणि दमून जाणे अशी हायपोग्लायसेमियाची लक्षणे आहेत. काही रुग्णांना घाम अधिक येतो, शरीरास कंप सुटतो. वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्ण बेशुद्धावस्थेत जाऊन त्याल फिट्स येण्याची शक्यता असते. या प्रकारास इन्शुलिन प्रतिक्रिया असेही म्हणतात. वेळीच लक्षात आल्यानंतर ग्लूकोज, साखर युक्त सरबते, फळांचा रस, किंवा अधिक शर्करायुक्त पदार्थ त्याला द्यावेत.

शस्त्रक्रिया

संपादन

निरोगी व्यक्तीच्या स्वादुपिंडाचे रोपण मधुमेही व्यक्तीमध्ये यशस्वी झाले आहे. अर्थात एकाच वेळी वृक्करोपण आणि स्वादुपिंड रोपण केले तर ही शस्त्रक्रिया यशस्वी होते. स्वादुपिंड शस्त्रक्रिया शक्य असली तरी शस्त्रक्रियेमधील धोक्याचा विचार केल्यास रुग्णावरील औषधोपचार अधिक योग्य ठरतात.

लठ्ठपणा साठी जर शस्त्रक्रिया केली तर त्याने लठ्ठपणा कमी होऊन मधुमेह निघून जातो असे पुरावे उपलब्ध आहेत.

पर्यायी उपचार : सल्ला

संपादन

मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. योग्य त्या प्रशिक्षित तज्‍ज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत. प्रत्यक्षात इन्शुलिनला वनस्पतिज पर्याय नाही.[ संदर्भ हवा ] काहीं खाद्यपदार्थांमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते. काही पर्याय खालील प्रमाणे –

  • मेथी- मेथीच्या बिया आणि पूड - एका अभ्यासात रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण मेथीमुळे कमी होते, कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवते, ग्लूकोज नियंत्रणात ठेवते असे आढळून आले.[ संदर्भ हवा ]
  • [बिलबेरी]] - नावाचे (इंग्लंडमधे मिळणारे) फळ ग्लूकोज नियंत्रणामध्ये ठेवते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे आजार दूर करते.[ संदर्भ हवा ]
  • लसूण - ग्लूकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवते.[ संदर्भ हवा ]
  • कांदा - ग्लूकोजची पातळी कमी ठेवत असावा. शरीरातील इन्शुलिन कांद्यामुळे उपलब्ध होते.[ संदर्भ हवा ]
  • आफ्रिकन मिरची - मिरचीचा रंग टोकाकडे पिवळा आणि दांड्याकडे तांबडा. ही मिरची खाण्यात आल्याने ग्लूकोज पातळी कमी होते.[ संदर्भ हवा ]

मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैलीमधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे.

नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान या संस्थेने अनेक प्रकारे संशोधन केले आहे.

आयुर्वेदिक औषधे

संपादन

'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारू हळद, गुळवेल, विजयसार, गुडमार, मजीठा आणि मेथिका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली.

सहा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधींच्या मदतीने तयार केलेले 'बीजीआर-३४' हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड ॲरोमटिक प्लॅंट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्‍नांनंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणाऱ्यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी साधारणपणे पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे.

ॲलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करणारे असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.[ संदर्भ हवा ]

गुंतागुंत

संपादन

अनियंत्रित मधुमेहामुळे अंधत्व, वृक्कसंबंधी आजार आणि अवयव शत्रक्रियेने काढून टाकणे याची पाळी येते. हृदयविकाराची आणि पक्षाघाताची शक्यता दुप्पट होते. मोतीबिंदु, ग्लौकोमा, आणि मधुमेह संबंधी रेटिनाचे विकार यांची शक्यता वाढते. परिघीय चेता शोथ म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी-मधुमेहामध्ये हातापायाची चेताअग्रे संवेदहीन होतात. डायबेटिक फूट नावाच्या आजारात रुग्णास हाता पायांच्या बोटास किंवा पायास झालेले व्रण, गळू, जखमा यांचे ज्ञान होत नाही. हातापायांच्या रक्तवाहिन्या संकुचित झाल्याने रक्तपुरवठा नीट्सा होत नाही. अशामुळे जखमा बऱ्या होण्यास अधिक वेळ लागतो. साध्या साध्या जखमेमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास त्या दूषित होतात. वेदनाना झाल्याने रुग्णाचे नेमके आपल्याला काय झाले आहे याकडे दुर्लक्ष होते. जखम अतिदूषित झाल्यास जंतुविषे शरीरभर पसरून सेप्टिमिया होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी डॉक्टर पायाचा दूषित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकण्याचा निर्णय घेतात.

हृदयविकार आणि वृक्क विकार हे मधुमेही रुग्णाच्या गुंतागुंतीमुळे होणारे विकार आहेत. दीर्घकालीन आजारामध्ये अपोहन – डायलिसिस, वृक्करोपण किंवा वृक्क कामना करणे उद्भवू शकते.

मधुमेही मातांना झालेल्या मुलामध्ये जन्मजात दोष असल्याने यातना होणे हा अनिवार्य भाग आहे.

प्रतिबंध

संपादन

मधुमेहाचा प्रतिबंध आणि मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीचा वेळ निघून जाण्याआधी शोध हे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये योग्य ते वजन राखणे, पुरेसा दररोज व्यायाम करणे, यामुळे मधुमेह लवकर होत नाही. शस्त्रक्रिया, मद्यपान, गर्भारपण, धूम्रपान अशामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. निरोगी सवयी आत्मसात केल्याने मधुमेह आणि मधुमेहासंबंधी गुंतागुंत टळते.

जागतिक मधुमेह दिवस

संपादन

१४ नोव्हेंबर हा दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो.

बाह्य दुवे

संपादन

मधुमेहावरील मराठी पुस्तके

संपादन
  • आहार : मधुमेह आणि स्थूलपणा (डॉ. अरविंद गोडबोले आणि डॉ. सौ. अनुराधा गोडबोले)
  • गुडबाय डायबेटीस (डॉ. कैलास कमोद)
  • चला जाणून घ्या मधुमेह (प्रशांत तळणीकर)
  • मधुमेह - आजवर ६हून अधिक आवृत्त्या. पहिली आवृत्ती - १९६४ - (डॉ. अरविंद गोडबोले)
  • मधुमेह आणि सुखी समृद्ध जीवन (डॉ. प्रदीप तळवलकर)
  • मधुमेह नियंत्रणासाठी व्यायाम (डॉ. जयश्री गोडसे)
  • मधुमेह विरुद्ध आपण (डॉ. अश्विन सावंत)
  • मधुमेह, स्त्रिया व हृदयविकार (डॉ. सुहास एरंडे) - नोव्हेंबर २०१७
  • मधुमेही खुशीत : अत्याधुनिक मार्गदर्शनातून मधुमेह ठेवा मुठीत (डॉ. प्रदीप तळवलकर)
  • सुरक्षा किडणीची (डॉ.ज्योत्स्ना झोपे आणि डॉ.संजय पंड्या)

संदर्भ

संपादन
  1. ^ "Symptoms | Basics | Diabetes | CDC". www.cdc.gov (इंग्रजी भाषेत). 2019-05-19 रोजी पाहिले.
  2. ^ तरुण भारत, नागपूर (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)