हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. परंतु शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानले जाते. नवचैतन्य , उत्कर्षाचा प्रतिक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो. वसंत ऋतूचा कृषी संस्कृतीशी एक विशेष नाते आहे. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतू येणारे हिन्दू महिने वेगळेवेगळे आहेत. वसंत ऋतू मधे झाडाला पालवी फूटते मात्र, वसंत पंचमी पासून वसंतोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते.

वसन्त ऋतूत फुललेली फुले
वसंत ऋतुत पळसाला आलेला बहर
आनंद, ऊर्जा आणि आशावादाचे प्रतीक म्हणून वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या दिवशी पिवळी फुले देण्याची अर्जेंटिनाची प्रथा अनेक देशांमध्ये पसरली आहे.

इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात. वसंत ऋतू मध्य झाडाला पालवी फूटते. युरोपात मार्च-एप्रिल हे महिने वसंत ऋतूचे आगमन होते, तर ऑस्ट्रेलियातील वसंत ऋतू हा सप्टेंबर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत येतो.

अवान्तर

संपादन

वसन्त हे वासुदेव बळवन्त पटवर्धन या मराठी कवीने घेतलेले टोपणनाव आहे. 'वसन्त' हे दत्तप्रसन्न काटदरे यांनी चालवलेले मराठीतील एक दर्जेदार मासिक होते.

वसन्त पंचमी (माघ शुद्ध पंचमी)

संपादन

वसन्ताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो ह्या दिवसापासून सुरू होतो. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसन्त ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌ कुसुमाकरः' असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे. कवीश्वर जयदेव तर वसंत ऋतूचे वर्णन करताना थकलाच नाही.

सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौन्दर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे.

मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्ग एक अशी अजब जादू आहे की, तो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तात्काळ पुरेसे विस्मरण करवितो. जर ह्या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो.

निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो.

निसर्ग सुखदुःखाच्या द्वन्द्वापासुन दूर आहे. वसन्त असो अथवा वर्षा, वेगवेगळ्या रूपात प्रभूचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि समग्र निसर्ग प्रभुस्पर्श प्राप्त करून फुलून उठतो. जीवनातही जर प्रभूचा स्पर्श झाला, प्रभूचा हात फिरला तर सम्पूर्ण जीवनच बदलून जाईल, जीवनात वसन्त फुलून उठेल आणि जीवनातून दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणभरात दूर होईल.

प्रभुस्पर्शी जीवनात नेहमी एकच ऋतू असतो आणि तो म्हणजे वसन्त! त्याच्या जीवनात एकच अवस्था कायम राहाते आणि ती म्हणजे यौवन!

परन्तु निसर्गाची सुन्दरता व मानवाची रसिकता ह्यांच्यात जर प्रभूचा सूर मिळाला नाही तर ही सुन्दरता व रसिकता विलासाचा मृदुल पन्थ निर्माण करून मानवाला विनाशाच्या गर्तेतदेखील ढकलून देईल. म्हणूनच वसन्ताच्या संगीतांत गीतेचा सूर मिसळला पाहिजे.

 
शिशिर ऋतूतील पानगळ-झाडाची खाली पडलेली वाळलेली पाने.

वसन्ताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो.

वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. खर्‌या महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणा‍र्‌या साधनांचे फारच महत्त्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरादेखील वर पाहू नये इतका जडही असत नाही.

जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त!

यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव्य, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन व विसर्जन ह्या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौन्दर्य, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसन्त आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण वसन्ताच्या वैभवाला जाणले, अनुभवले व पचवले असे म्हणता येईल.


हे सुद्धा पहा

संपादन


ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर