कुणाचाही आधार नसताना, कोणताही गुरू अथवा गॉडफादर नसताना गेली ३६ वर्षे मी मराठी रंगभूमीची निःस्वार्थीपणे सेवा केली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनुभवाचा एक-एक गुरू मला भेटत गेला. अशा शब्दांत आपले भवविश्व उलगडतानाच तरुण कलावंतांनीही स्वतःच गुरू बनून कलेची सेवा केली पाहिजे, असे आवाहन वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी केले.
एकता कल्चरल अकादमी या संस्थेचा एकता सांस्कृतिक महोत्सव व एकता पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या वेळी गवाणकर यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांच्या हस्ते एकता कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव होते.
आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे आदींचा आशीर्वाद लाभल्यामुळे माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून आलेल्या कलाकाराला हुरूप आला. नामवंतांकडून प्रेरणा व शाब्बासकी मिळत गेली, असेही गवाणकर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
एकता सांस्कृतिक महोत्सवाचे आनंद पटवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार, अभिनेते राजा मयेकर, कवी व पत्रकार भगवान निळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर कवी भाऊ पंचभाई, पत्रकार हर्षल मळेकर, क्रीडापटू लता पांचाळ, अभिनेता संदेश जाधव, नृत्यांगना किशू पाल, उद्योजक रुजारिओ पिंटो, शाहीर दत्ताराम म्हात्रे, समाजसेवक मोहन पवार, ज्योती ठाकरे, सिद्धार्थ कासारे, धनेश रुके, सुधा पवार, संजय भावसार, चंद्रकिरण सतपाळ, दशरथ पवार आदींना एकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
|