अजय विश्वास सरपोतदार (१६ ऑक्टोबर, इ.स. १९५९ - ३ जून, इ.स. २०१०)[१] हे मराठी चित्रपटसृष्टीतील संघटक होते. त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद सांभाळले होते. [२]

अजय सरपोतदार
जन्म १६ ऑक्टोबर, इ.स. १९५९
मृत्यू ३ जून, इ.स. २०१०
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठा
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू

बालपण

संपादन

अजय सरपोतदार यांचा जन्म चित्रपट निर्मात्यांच्या घरात १६ ऑक्टोबर, इ.स. १९५९ मध्ये झाला. त्यांचे वडील विश्वास सरपोतदार व आजोबा नानासाहेब सरपोतदार हे मराठीतील नामांकित चित्रपट निर्माते होते. अजयचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये झाले. त्यांनी बीएमसीसी कॉलेजमधून बी. कॉमची पदवी घेतली व त्यांनी मुंबईच्या के.सी. कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतले. तसेच जाहिरात आणि जनसंपर्क विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या सरपोतदार यांनी आपल्या कॉलेज जीवनात नाटकांत व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमां आवर्जून भाग घेतला. ते खेळाडू होते. ते क्रिकेट, बास्केटबॉल खेळतआणिपोहण्यातही चांगले तयार होते.

कारकीर्द

संपादन

इ.स. १९७६ पासून चित्रपट क्षेत्रात सहायक निर्मिती व्यवस्थापक म्हणून ते काम करू लागले. त्यानंतर ते हॉलिवूड तसेच बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी जाहिरात आणि प्रसिद्धीच्या कामाकडे वळले. प्रसिद्धी प्रमुख म्हणून "वो सात दिन ' या चित्रपटासाठी काम पहिले . त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम केले. याशिवाय २०० जाहिरातपट , कॉर्पोरेट फिल्म्स आणि माहितीपट तयार केले. टाटा मोटर्स लिमिटेड या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्‍युमेंटरी) तयार केले.

आजोबा नानासाहेब सरपोतदार यांनी इ.स. १९१९ मध्ये स्थापन केलेल्या आर्यन फिल्म कंपनीचे त्यांनी पुनरूज्जीवन केले. या कंपनीच्या बॅनरखाली सरपोतदार यांनी ‘उलाढाल’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. सरपोतदार यांनी इ.स. १९९५ मध्ये पैंजण ’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तोडीसतोड असे तांत्रिक पाठबळ वापरून हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याचे चित्रीकरण मॉरिशसमध्ये करण्यात आले.

त्यांनी हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत जानेवारी इ.स. १९९८ ते सप्टेंबर, इ.स. २००० या कालावधीत वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली. मराठीबरोबरच प्रादेशिक वाहिन्यांचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांची जुलै इ.स. २००५ मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी यशवंत भालकर यांनी राजीनामा दिल्यानंतर एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर जानेवारी इ.स. २००९ मध्ये फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या खजिनदारपदी सरपोतदार यांची फेरनिवड करण्यात आली. सरपोतदार यांनी चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, वितरण, जाहिरात, व्यवस्थापन, प्रसिद्धीप्रमुख अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. चित्रपट निर्मितीशी संबंधित असलेली विविध अंगे त्यांनी सक्षमपणे सांभाळली आहेत. मॉरिशस सरकारच्या मॉरिशस फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेचे व्यावसायिक राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. अजय सरपोतदार यांनी मॉरिशसमध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले.

मुंबई आणि हैदराबादच्या धर्तीवर पुण्यातही फिल्मसिटी असावी अशी त्यांची इच्छा असल्याने अजय सरपोतदार यांनी हडपसर परिसरात फिल्मसिटीसाठी जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

बाह्य दुवे

संपादन
  • "अजय सरपोतदार यांचे पुण्यात निधन". २६ फेब्रुवारी २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  • "अजय सरपोतदार यांचे निधन". 2010-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  1. ^ https://www.hindustantimes.com/india/filmmaker-ajay-sarpotdar-passes-away/story-QPrJZpYrcURwly4xERoCCM.html
  2. ^ http://archive.indianexpress.com/news/filmmaker-ajay-sarpotdar-passes-away/629364/