राज ठाकरे
राज श्रीकांत ठाकरे उर्फ स्वरराज श्रीकांत ठाकरे (जन्म:१४ जून, १९६८ - हयात) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा व "हिंदुत्व' यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. ठाकरे यांनी इ.स. २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या मोठ्या संख्येने येण्याला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. याला ते "येणारे लोंढे" असा शब्द वापरत. या भूमिकेमुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.
राज ठाकरे | |
---|---|
राज ठाकरे | |
टोपणनाव: | स्वरराज |
जन्म: | १४ जून, १९६८ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
संघटना: | महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
धर्म: | हिंदू |
प्रभावित: | बाळासाहेब ठाकरे |
वडील: | श्रीकांत केशव ठाकरे |
आई: | मधुवंती श्रीकांत ठाकरे |
पत्नी: | शर्मिला ठाकरे |
अपत्ये: | अमित व उर्वशी |
वैयक्तिक
संपादनराज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून इ.स. १९६८ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई मधुवंती ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी कै. मीना ठाकरे यांची बहीण लागतात. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. राजचे वडील कै. श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंगचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.
ठाकरे यांचे लग्न मराठी सिनेमा छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांची कन्या शर्मिला वाघ यांच्याशी झाले आहे. त्यांना एक मुलगा अमित ठाकरे,आणि एक मुलगी उर्वशी ठाकरे आहे.त्यांची मुले बॉम्बे स्कॉटिश स्कूल ह्या स्कॉटिश ख्रिश्चन मिशनऱ्यांनी स्थापित केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या एक प्रसिद्ध शाळेत शिकली. [१][२][३]
राजकीय वाटचाल
संपादनठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो.[ संदर्भ हवा ] बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एकेकाळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे.[ संदर्भ हवा ] शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. २००६ च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिची उन्नती करण्याचे प्रयत्न करीन, अशा प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.[ संदर्भ हवा ]
उत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवरील टीका
संपादनराज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला. त्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भरावा? असा प्रश्न करत तेथील राजकारण्यांवर टीका केली. लालूप्रसाद यादव व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत, त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांचा अनुभव आहे, असे सांगत त्यांनी मराठी भाषकांची भाषिक अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत, ह्या देशांत तसेच राज्यात बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. फक्त, उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत सामील होत नाहीत व उलट मराठीला हीन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अशा प्रकारची आरोपवजा टीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतींतून स्पष्टपणे केली.[ संदर्भ हवा ]
मनसे व उत्तर भारतीयांविरुद्ध दंगे
संपादन३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी चिकटवलेली भित्तीपत्रे (यूपी बिहार तो हमारा है| अब कि बारी बम्बई है|)[ संदर्भ हवा ] व समाजवादी पक्षाची प्रक्षोभक भाषणे हे कारण ठरले.[ संदर्भ हवा ] राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकीर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात आखडता घेतात. या वेळेस मुंबईतील अनेक टॅक्सींची तोडफोड करण्यात आली.
१३ फेब्रुवारी २००८ रोजी राज्य सरकारला या प्रकरणी ढिलाई दाखवल्याची टीका सहन करावी लागली व काहीतरी करायचे म्हणून राज ठाकरे व समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना अटक करण्यात आली. जरी दोघांना त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास बंदी घालण्यात आली. या अटकेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली. उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिकांवरील रोष अजून वाढला व अनेक ठिकाणी मारहाण करण्यात आली. परिणामी महाराष्ट्राच्या अनेक गावांतून उत्तर प्रदेशी व बिहारी कामगार आपापल्या गावी पळून गेले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला.[४][५][६] या घटनेनंतरही लहान सहान घटना घडत राहिल्या. कामगारांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मनसेने कामगार भरतीसाठी बेरोजगार मराठी तरुणांना कामास ठेवावे अशी विनंती अनेक उद्योग व बांधकाम व्यावसायिकांना केली.[ संदर्भ हवा ] अनेक जिल्ह्यात मराठी तरुणांसाठी अर्ज नोंदणी मेळावे आयोजित करण्यात आले.[ संदर्भ हवा ]
ऑक्टोबर २००८ मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले.[ संदर्भ हवा ] या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती परीक्षा. पश्चिम रेल्वेच्या परीक्षा मनसे व शिवसेनेने उधळून लावल्या व आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना पळवून लावण्यात आले. मनसे व शिवसेनेने या पश्चिम रेल्वेच्या भरतीसाठी बिहारी परीक्षार्थींचीच का निवड करण्यात आली, तसेच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परीक्षेची जाहिरात न देण्यास कारण काय?[ व्यक्तिगतमत ] "महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांतून जाहिराती न देण्याचे धोरण फार पूर्वीपासून आहे” असे लालूप्रसाद यादव यांनी ठणकावून सांगितले. या घटनेनंतर प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईस आणण्यात आले. परंतु या काळात उत्तर भारतीयांविरुद्ध होणारा दंगा बळावला व मुंबईनंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पसरला. या काळात हिंदी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.[ व्यक्तिगतमत ] [ संदर्भ हवा ] लालूप्रसाद यादव व नितीशकुमार या बिहारी नेत्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली.[ संदर्भ हवा ] त्याप्रमाणे मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सांगितले. राज ठाकरे यांच्यावर एकूण ८४ विविध प्रकारचे गुन्हे दाखले करण्यात आले.[ संदर्भ हवा ] मनसेच्या कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी धरपकड करण्यात आली.[ संदर्भ हवा ] बिहारमध्येही यावर प्रतिक्रिया म्हणून काही ठिकाणी रेल्वे डबे जाळण्यात आले, व एक आगगाडी पळवून नेण्यात आली.[ संदर्भ हवा ] दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाच्या कार्यालयावर हल्ला करून मोडतोड करण्यात आली.[ संदर्भ हवा ]
या घटनेनंतर नारायण राणे, छगन भुजबळ यासारखे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर टीका केली.[ संदर्भ हवा ] शोभा डे या मान्यवर लेखिकेने देखील आय.बी.एन. या वाहिनीवर डेव्हिल्स ॲडव्होकेट या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले.[७]. प्रसारमाध्यमांनी देखील राज ठाकऱ्यांची भूमिका व मराठी भाषकांचे मत समजून न घेता पक्षपाती टीका करण्याचा बेजवाबदारपणा दाखवला असे त्यांचे मत होते.[ संदर्भ हवा ] बिहारमधील रेल्वे जाळणारे ते विद्यार्थी आणि व महाराष्ट्रात आंदोलन करणारे करणारे ते मनसेचे गुंड असा पक्षपाती प्रचार बिहारी आणि उत्तरप्रदेशी नेत्यांनी केला.[ संदर्भ हवा ])
राज ठाकरे हे नेहमीच जनतेसाठी शेवटचा पर्याय म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचे प्रचारसभेत मुद्दे हे नेहमीच विकासाचे असतात. भारतातील सर्वात सुंदर असा विकासाचा आराखडा निर्माण करण्याचे कामही त्यांच्याच नावावर नमूद आहे. त्यांच्या महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटमधील अनंत निर्णय मोदी सरकारने अस्तित्वात आणले व त्यावर कामही सुरू केले आहे.
आझाद मैदानावरील दंगल
संपादनआझाद मैदानावरील शहीद स्मारकाची मोडतोड करून बिहारमार्गे नेपाळला पळून जात असलेल्या गुन्हेगाराला महाराष्ट्राच्या पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन पकडून आणले. ही बिहारमध्ये मराठी पोलिसांनी केलेली घुसखोरी आहे असा आरोप करून, या घटनेचा निषेध म्हणून बिहारच्या मुख्य सचिवाने महाराष्ट्र सरकारला खडसावून पत्र लिहिले. यावर उत्तर म्हणून राज ठाकऱ्यांनी ‘यापु्ढे महाराष्ट्रातील पोलिसांना कर्तव्य बजावताना बिहारमध्ये अडवलेत तर महाराष्ट्रातल्या एकेक बिहारी माणसाला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकलवून लावू’, अशी घोषणा केली.[८]
ठाकरेंवरील पुस्तके
संपादनराज ठाकरे यांच्यावरील पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्य
- मराठी मनाचा राजा (लेखक - मनोज आवाळे)
- ही राजभाषा असे (राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा हा संग्रह, संपादक - ज्ञानेश महाराव आणि प्रवीण टोकेकर).
- मुक्त पत्रकार कीर्तिकुमार शिंदे यांनी संपादित केलेले ‘दगलबाज राज’ हे पुस्तक
- ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर - डॉ. सदानंद बोरसे , शिरीष सहस्रबुद्धे)
जेट एअरवेजमधून जेव्हा अनेक मराठी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तेव्हा हे सगळे कामगार राज ठाकरे यांना भेटले व राज ठाकरेंनी पुन्हा त्या कामगारांना कामावर रुजू करून घ्यायला लावले.
रेल्वे भरतीतील परप्रांतीय आंदोलन तर राज ठाकरेंच्या यशस्वी आंदोलनांपकी एक आहे.या आंदोलनामुळे महाराष्ट्र रेल्वेत अनेक तरुणांना नोकरी मिळाली.
अनेक राजकीय व ज्योतिष विश्लेषकांच्या अंदाजानुसार राज ठाकरे यांचा पक्ष २०२० या वर्षी सत्तेत असेल.
अनेक शेतकऱ्यांना नेहमी वाटत आले आहे की राज ठाकरेंनी शहरांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ग्रामीण भागावर लक्ष ठेवून काम केल्यास त्यांच्या बाजूने शेतकरीवर्गाची मोठी ताकद तयार होईल.
राज ठाकरे हे आजतागायत महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आहे.त्यांच्या सभेला जमणारी गर्दी व इंटरनेटवर त्यांना सर्च करणारा सर्वात मोठा वर्ग त्यांचाच चाहता आहे.
२०१६ या वर्षी तर नेत्यांमध्ये गुगलवर सर्च ज्यांना सर्वात जास्त करण्यात आले त्यात राज ठाकरे हे अव्वल स्थानी आहेत.
संदर्भ
संपादन- ^ "Mumbai Scottish just doesn't sound nice". DNA (12 May 2008). Diligent Media Corporation, an Essel Group company. 2008. 29 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Now, miscreants target Thackeray kids' school". Times of India (12 May 2008). Times of India. 2008. 24 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "From wife Sharmila to daughter-in-law Mitali Bourde, know all about Raj Thackeray's family tree". Times Now (इंग्रजी भाषेत). 22 August 2019. 18 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "25000 North Indians leave, Pune realty projects hit". 2008-04-04 रोजी पाहिले.
- ^ "Maha exodus: 10,000 north Indians flee in fear". 2008-02-14. 2008-04-06 रोजी पाहिले.
- ^ "MNS violence: North Indians flee Nashik, industries hit". 2008-02-13. 2008-04-06 रोजी पाहिले.
- ^ "सौ शोभा डे यांची मुलाखत". 2009-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-08-25 रोजी पाहिले.
- ^ "मुंबई: आझाद मैदान दंगल".
बाह्य दुवा
संपादन- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वेबसाईट Archived 2018-12-12 at the Wayback Machine.