१० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१३ दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ १ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामना व ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौयावर आला. पाठीच्या दुखण्यामुळे मायकेल क्लार्क ऐवजी कॅलम फर्ग्युसनची तर जॉर्ज बेली याची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकाविले. असे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडले. याच सामन्यात भारतीय संघाने ३६० धावांचा यशस्वी पाठलाग केला. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. यानंतर सहाव्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या ३५० धावांचा पाठलाग केला. हा एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. सातव्या व शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा या भारतीय फलंदाजाने द्विशतक झळकाविले. असे करणारा तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला. त्याने १५८ चेंडूंत २०९ धावा केल्या. त्याने ह्या डावात १६ षट्कार खेचून ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा एका डावातील १५ षट्कारांचा विक्रम मोडीत काढला.[१]