विकिपीडिया:मासिक सदर/जून २०१२
दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर फ्रांस, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपान व इटलीने जर्मनीच्या बाजुने युद्धाप पदार्पण केले. डिसेंबर १९४१मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये फ्रांस, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.
आढावा - युरोप: सप्टेंबर १, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. जर्मनीचा नेता एडॉल्फ हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने सोवियेत संघाशी त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोवियेत संघाने सप्टेंबर १७च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंग्डम व फ्रांसने सप्टेंबर ३ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्त्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर १९४०मध्ये जर्मन सैन्याने नॉर्वे, नेदरलँड्स, बेल्जियम व फ्रांस पादाक्रांत केले व १९४१मध्ये युगोस्लाव्हिया आणि ग्रीसचा पाडाव केला. इटलीने उत्तर आफ्रिकेतील ब्रिटीश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली. १९४१च्या मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश पश्चिम युरोप आपल्या टाचेखाली आणले होते परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते रॉयल एर फोर्स व रॉयल नेव्हीने दिलेली कडवी झुंज.