बद्रुद्दीन तय्यबजी

इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले पहिले भारतीय


बद्रुद्दीन तय्यबजी (१० ऑक्टोबर, इ.स. १८४४१८ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे ब्रिटिश राजवटीतील एक भारतीय वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि राजकारणी होते. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले ते पहिले भारतीय होते.[१] ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.[२]

बद्रुद्दीन तय्यबजी

जन्म: १० ऑक्टोबर, इ.स. १८४४
मुंबई, मुंबई इलाखा, ब्रिटिश भारत
मृत्यू: १८ नोव्हेंबर, इ.स. १९३९
लंडन, युनायटेड किंग्डम
चळवळ: भारतीय स्वातंत्र्य चळवळ
शिक्षण: बॅरिस्टर
अवगत भाषा: हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, उर्दू, फार्सी, अरबी
कार्यक्षेत्र: कायदा, स्वातंत्र्य चळवळ
धर्म: इस्लाम
वडील: तय्यब अली भाईमिया
आई: अमीना
पत्नी: रहत–उन–नफ्स

जीवन संपादन

बद्रुद्दीन तय्यबजी यांचा जन्म १० ऑक्टोबर, इ.स. १८४४ रोजी मुंबईच्या एका सुस्थितीतील सुलेमानी बोहरा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तय्यब अली भाईमिया व आईचे नाव अमीना होते. त्यांचे पूर्वज पूर्वी अरब देशातून येऊन गुजरातमधील खंबायत येथे व्यापार करू लागले आणि नंतर तेथून मुंबईला येऊन स्थायिक झाले. [१]

ज्याकाळी भारतातील मुसलमानांमध्ये इंग्रजी शिक्षण शाप मानले जात असे. अशा वेळी बद्रुद्दीन यांच्या वडिलांनी त्यांच्या सर्व सातही मुलांना पुढील अभ्यासासाठी युरोपमध्ये पाठवले होते. बद्रुद्दीन यांचे मोठे भाऊ कमरुद्दीन हे इंग्लंड आणि वेल्समध्ये प्रवेश घेतलेले पहिले भारतीय वकील होते यामुळे बद्रुद्दीन यांना वकिली व्यवसायात प्रवेश घेण्याची प्रेरणा मिळाली.[३]

शिक्षण संपादन

लहानपणी त्यांनी दादा मखराच्या मदरशामध्ये उर्दू व फार्सी भाषेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन शाळेत (आताचे एल्फिन्सटन महाविद्यालय) प्रवेश घेतला. इ.स. १८६० मध्ये ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले व लंडनमधील न्यूबरी हाय पार्क कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.[४]

न्यूबरी येथील शिक्षणानंतर इ.स. १८६३मध्ये तय्यबजी यांनी लंडनमधील मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि ते लंडन विद्यापीठ व मिडल टेम्पलमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले.[३] दृष्टी अधू झाल्यामुळे इ.स. १८६४च्या शेवटी त्यांना भारतात परतावे लागले. भारतात त्यांनी जवळजवळ वर्षभर विश्रांती घेतली. पण इ.स. १८६५मध्ये ते लंडनला परतले व मिडल टेम्पलमध्ये त्यांनी पुन्हा आपले शिक्षण सुरू केले आणि इ.स. १८६७मध्ये बद्रुद्दीन तय्यबजी बॅरिस्टर झाले.[१]

कारकीर्द संपादन

भारतात पुनरागमन संपादन

१ डिसेंबर, इ.स. १८६७रोजी तय्यबजी मुंबईत परतले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला. तोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेतील सर्व बॅरिस्टर वकील इंग्रज होते. मुंबई उच्च न्यायालयात ते पहिले भारतीय बॅरिस्टर होते.[३] अगदी कमी काळात बद्रुद्दीन तय्यबजी यशस्वी वकील झाले. सुरुवातीपासूनच निष्णात वकील म्हणून त्यांचे नाव झाले.

वकिलीबरोबरच तय्यबजी यांनी मुंबईच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. इ.स. १८७३मध्ये त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली. पण या निवडणुकीत जमशेदजी जिजीभाय, जमशेदजी कपाडिया, थॉमस ब्लेने, नौरोजी फर्दूनजी व बद्रुद्दीन तय्यबजी यांसारख्या मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींना केवळ एक मत मिळाले. इ.स. १८७५मध्ये तय्यबजी मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले व त्यात ते निवडून आले. यानंतरच्या पुढील चारही निवडणुकांमध्ये ते निवडून आले.[५]

इ.स. १८७५ ते इ.स. १९०५ याकाळात ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य होते. इ.स. १८८२ साली मुंबई कायदे मंडळामध्ये त्यांची नेमणूक झाली, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे इ.स. १८८६ मध्ये त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.[३]

मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी प्रयत्न संपादन

इ.स. १८७६मध्ये स्थापन झालेल्या अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेचे बद्रुद्दीन संस्थापक सदस्य होते. बद्रुद्दीन यांचे मोठे भाऊ कमरुद्दीन, नाखोदा महम्मद अली रोगे, मुनशी हिदायतुल्ला, मुन्शी गुलाम महम्मद हे या संस्थेचे इतर संस्थापक सदस्य होते. अंजुमन-ए-इस्लामची 'मजलिस-ए-मुनसरिम' ही एक कार्यकारी समिती होती. त्यावर बद्रुद्दीन तय्यबजी व इतर सात सदस्य होते. [६]

अंजुमन-ए-इस्लाम संस्थेने मुंबादेवी भागातील गोकुळदास तेजपाल शाळेत 'ॲंग्लो-हिंदी' भाषेचा एक स्वतंत्र वर्ग सुरू केला. त्यांना लवकरच कळले की आपण स्वतःची एक शाळा सुरू करणे आवश्यक आहे. त्या शाळेसाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन २८ मार्च, इ.स. १८८० रोजी मुंबई शहरातील मुस्लिम समाजाची बैठक बोलावली. २० सप्टेंबर,इ.स. १८८० रोजी या शाळेचे वर्ग सुरू झाले. शाळेविषयी इतर व्यक्तींचा विश्वास वाटावा म्हणून बद्रुद्दीन तय्यबजी यांनी आपल्या दोन मुलांना याच शाळेत पाठवले. मुंबई सरकारने या शाळेला ६००० रुपये वार्षिक अनुदान दिले. पण हे अनुदान आणि जमा केलेला निधी शाळेसाठी अपुरा पडत होता. म्हणून त्यानंतर बद्रुद्दीन यांनी मुंबई नगरपालिकेला या शाळेसाठी दरवर्षी ६००० रुपये मंजूर करण्यासाठी प्रवृत्त केले.[७]

मुंबईतील मुसलमानांमध्ये सामाजिक विषयांच्या संवादाला चालना मिळावी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या 'इस्लाम क्लब' आणि 'इस्लाम जिमखाना' या दोन्ही संस्थांच्या स्थापनेत तय्यबजी यांचे मोलाचे योगदान होते.[३]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील सहभाग संपादन

'बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन' स्थापन करण्यात फिरोजशहा मेहता, काशिनाथ त्र्यंबक तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांचा विशेष सहभाग होता. जमशेदजी जीजीभाय या संघटनेचे अध्यक्ष होते व बद्रुद्दीन तय्यबजी सभापती होते.[८] बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याच संघटनेने इ.स. १८८५च्या शेवटी मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक आयोजित केली होती.[३]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत बद्रुद्दीन आणि त्यांचे मोठे भाऊ कमरुद्दीन यांचा मोठा सहभाग होता. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांचे समर्थन मिळवून काँग्रेसची राष्ट्रीय व्याप्ती वाढविण्यात तय्यबजी यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.[९] इ.स. १८८७मध्ये मद्रास येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून तय्यबजी यांची निवड झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.[२] मुसलमानांनी काँग्रेसवर बहिष्कार टाकावा या टीकेला उत्तर देताना, तय्यबजींनी सर्व जातीय आणि सांप्रदायिक पूर्व समजुतींचा निषेध केला.[१०]

जीवनाच्या उत्तरार्धात संपादन

जून इ.स. १८९५ साली तय्यबजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय बॅरिस्टर न्यायाधीश होते. मुंबई उच्च न्यायालयाचे ते तिसरे भारतीय व पहिले मुस्लिम न्यायाधीश होते.[११]

इ.स. १९०६मध्ये लंडन येथे रजेवर गेले असता त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

संदर्भ संपादन

 1. ^ a b c पानसे, न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण खंड- ४, २०११ पृ. ६६.
 2. ^ a b पानसे, न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण खंड- ४, २०११ पृ. ६७.
 3. ^ a b c d e f "Badruddin-Tyabji profile". The Open University website.
 4. ^ वाच्छा, दिनशा; गोखले, गोपाळ कृष्ण (१९९०). Three departed patriots : Sketches of the lives and careers of the late Ananda Mohun Bose, Badruddin Tyabji, W. C. Bonnerjee with their portraits and copious extracts from their speeches and with appreciations. मद्रास: G. A. Natesan and Company. pp. १९.
 5. ^ नुरानी, Badruddin Tyabji, २००९ पृ.१७.
 6. ^ नुरानी, Badruddin Tyabji, २००९ पृ.२१.
 7. ^ नुरानी, Badruddin Tyabji, २००९ पृ.२२.
 8. ^ नुरानी, Badruddin Tyabji, २००९ पृ.५१-५२.
 9. ^ Karlitzky, Maren (२००४-१-१). "Continuity and Change in the Relationship between Congress and the Muslim Élite: A Case Study of the Tyabji Family". Oriente Moderno. 23 (84): १६१–१७५. JSTOR 25817923. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 10. ^ "Past Presidents Badruddin Tyabji". www.congress.org.in. Archived from the original on 2011-09-28. 27 डिसेंबर 2019 रोजी पाहिले.
 11. ^ "Mr. Badruddin Tyabji". www.bombayhighcourt.nic.in. 27 डिसेंबर 2019 रोजी पाहिले.

संदर्भयादी संपादन

 • पानसे, (संपा.)शरदचंद्र. न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण खंड- ४.
 • गोपाळ कृष्ण गोखले, वाच्छा दिनशा. Three departed patriots : Sketches of the lives and careers of the late Ananda Mohun Bose, Badruddin Tyabji, W. C. Bonnerjee with their portraits and copious extracts from their speeches and with appreciations (इंग्रजी भाषेत).
 • नुरानी, ए.जी. Badruddin Tyabji (इंग्रजी भाषेत).