भीमसेन जोशी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
पंडित भीमसेन जोशी (जन्म :गदग, फेब्रुवारी ४, १९२२ - पुणे, २४ जानेवारी, २०११) हे 'भारतरत्न' या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.
भीमसेन जोशी | |
---|---|
स्वरभास्कर पं भीमसेन जोशी | |
उपाख्य | पंडितजी |
टोपणनावे | अण्णा |
आयुष्य | |
जन्म | फेब्रुवारी ४, इ.स. १९२२ |
जन्म स्थान | रोण, गदग जिल्हा, कर्नाटक |
मृत्यू | २४ जानेवारी, २०११ (वय ८८) |
मृत्यू स्थान | पुणे |
मृत्यूचे कारण | वृद्धापकाळ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
वांशिकत्व | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी, कन्नड |
पारिवारिक माहिती | |
वडील | गुरूराज जोशी |
जोडीदार | सौ .सुनंदा भीमसेन जोशी (प्रथम पत्नी - संदर्भ गाणाऱ्याचे पोर लेखक राघवेंद्र भीमसेन जोशी पान क्र .११ )
सौ वत्सला जोशी (द्वितीय पत्नी ) |
संगीत साधना | |
गुरू | • सवाई गंधर्व, • गाण्यातील आदर्श - बालगंधर्व, • सूरश्री केसरबाई केरकर |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, काही कन्नड, मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन. |
घराणे | किराणा घराणे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
कारकिर्दीचा काळ | १९४१ - २०११ |
गौरव | |
गौरव | डी. लिट. |
पुरस्कार | • भारतरत्न पुरस्कार • पद्मश्री पुरस्कार • संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार • पद्मभूषण पुरस्कार • पद्मविभूषण पुरस्कार • संगीताचार्य • पुण्यभूषण पुरस्कार • स्वरभास्कर पुरस्कार • तानसेन पुरस्कार |
अधिक माहिती | |
संकीर्ण | त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. |
तळटिप | गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. |
बाह्य दुवे | |
संकेतस्थळ |
संगीतशिक्षण
संपादनभीमसेन जोशींचे वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले.
त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खॉं, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खॉं यांचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खॉं यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खॉं यांच्याकडे काही काळ शिकले. अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.
भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.
कारकीर्द
संपादनभीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.
त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गंमतीने 'हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.
भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत.
भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.
अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक २४ जानेवारी २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता, पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.
वैशिष्ट्ये
संपादनमराठी अभंग
संपादन’संतवाणी’ आणि ’अभंगवाणी’ हे संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे ह्यांनी अनुक्रमे स्वरबद्ध आणि पंडितजींनी स्वरसाज चढवलेले अल्बम खूप गाजले. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे :
- अगा वैकुंठीच्या राया
- अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा
- अधिक देखणे तरी
- आता कोठे धावे मन
- आरंभी वंदीन, अयोध्येचा राजा
- इंद्रायणी काठी
- कान्होबा, तुझी घोंगडी चांगली
- काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल
- तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल
- नामाचा गजर, गर्जे भीमातीर
- पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान
- पंढरी निवास सख्या पांडुरंगा
- मन, रामरंगी रंगले
- माझे माहेर पंढरी
- याचसाठी केला होता अट्टाहास
- रूप पाहता लोचनी
- सावळे सुंदर, रूप मनोहर
- ज्ञानियांचा राजा, गुरू महाराव
गौरव
संपादनभीमसेन जोशींना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही :-
- इ.स. १९७२साली मिळालेलापद्मश्री पुरस्कार
- इ.स. १९७६ सालचा संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
- इ.स. १९८५ सालचा पद्मभूषण पुरस्कार हे आहेत.
- जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने त्यांना संगीताचार्य ही पदवी दिली.
- पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डी. लिट्. ही पदवी दिली.
- इतर पुरस्कारांमध्ये पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.
- पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ने सन्मानित केले आहे.
- त्यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे.
- त्यांनी केलेल्या संगीतसेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा ’भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार’ देते. आतापर्यंत हा पुरस्कार किशोरी आमोणकर, पंडित जसराज, सतारवादक अरविंद पारीख यांना मिळाला आहे.
- पुणे महानगरपालिका दरवर्षी भीमसेन जोशींच्या जन्मदिनी म्हणजे ४ फेब्रुवारीला त्यांच्या स्मरणार्थ, स्वरभास्कर पुरस्कार या नावाचा पुरस्कार देते. पहिल्या वर्षी हा पुरस्कार [[लता मंगेशकर यांना, दुसऱ्या वर्षी बिरजू महाराज यांना आणि तिसऱ्या वर्षी शिवकुमार शर्मा यांना देण्यात आला. ४थ्या वर्षीचा, म्हणजे ४-२-२०१४ला देय असलेला पुरस्कार २२-२-२०१४पर्यंत जाहीर झालेला नाही. या पुरस्कारासोबतच तीन दिवसांचा संगीत महोत्सवही असतो. १,११,१११ रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- भीमसेन जोशींच्या पत्नीच्या नावाने ’वत्सलाबाई जोशी’ पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अजय पोहणकर (२०१२), नाना मुळे (२०१७) यांना मिळाला आहे.
- भीमसेन जोशी यांच्या गायकीचा आणि संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा वेध लेखिका डॉ. सुचेता बिडकर यांनी त्यांच्या ’स्वरसुरभीचा राजा’ या पुस्तकात घेतला आहे.
- मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सरकारी रुग्णालयाला पंडित भीमसेन जोशी यांचे नाव दिले आहे.
भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र ’गाणाऱ्याचे पोर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
कौटुंबिक माहिती
संपादनभीमसेन जोशी हे ६४ चुलत भावंडांपैकी एक होते.[१]
भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि मुले राघवेंद्र आणि श्रीनिवास हे सर्वच गायक आहेत/होते.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- धारवाडच्या संकेतस्थळावरील भीमसेन जोशींची माहिती Archived 2004-12-04 at the Wayback Machine.
- म्युझिकल निर्वाण संकेतस्थळावरील भीमसेन जोशींवरील लेख
- Bhimsen Joshi Archived 2004-12-04 at the Wayback Machine.
- Bhimsen Joshi Picture Album
- Bhimsen Joshi: List of Classical Vocal Recordings Archived 2009-10-06 at the Wayback Machine.
- A Films division documentary on Bhimsen Joshi Archived 2010-04-13 at the Wayback Machine.