केसरबाई केरकर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सूरश्री केसरबाई केरकर (जुलै १३, इ.स. १८९२ - सप्टेंबर १६, इ.स. १९७७) या हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रख्यात गायिका होत्या. हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत त्या गायन करत. इ.स.च्या २०व्या शतकातील प्रभावी हिंदुस्तानी संगीत गायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते.
केसरबाई केरकर | |
---|---|
केसरबाई केरकर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद याच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार स्वीकारताना | |
आयुष्य | |
जन्म | जुलै १३, इ.स. १८९२ |
जन्म स्थान | केरी, गोवा, भारत |
मृत्यू | सप्टेंबर १६, इ.स. १९७७ |
मृत्यूचे कारण | वृद्धापकाळ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
संगीत साधना | |
गुरू | उस्ताद अब्दुल करीम खॉं बर्कतुल्ला खाँ (सारंगीये) पं.भास्करबुवा बखलेरामकृष्णबुवा वझे उस्ताद अल्लादिया खॉं |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
घराणे | जयपूर घराणे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
विशेष उपाधी | सूरश्री |
पुरस्कार | पद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार, इ.स. १९६९ राज्य गायिका पुरस्कार, महाराष्ट्र राज्य, इ.स. १९६९ संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
जीवन
संपादनगोव्याच्या उत्तर भागातील फोंडा तालुक्यातील केरी नामक खेड्यात गोमंतक मराठा समाजात केसरबाईंचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कोल्हापुरास प्रयाण करून आठ महिने उस्ताद अब्दुल करीम खॉं यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. गोव्याला परत आल्यावर त्यांनी प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे (इ.स. १८७१ -इ.स. १९४५) यांच्याकडे आपले संगीत शिक्षण चालू ठेवले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत स्थलांतर केले व तिथे अनेक संगीतगुरूंकडून त्या प्रशिक्षण घेत राहिल्या. सरतेशेवटी इ.स. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खॉं (इ.स. १८५५ - १९४६) यांचे शिष्यत्व पत्करले.
सांगीतिक कारकीर्द
संपादनकेसरबाईंच्या गायनाची कीर्ती लवकरच चहूं दिशांना पसरली. त्या राजे - सरदार मंडळींसाठीही नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही दिली. नोबेल पुरस्कारविजेते कवी रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते. कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने इ.स. १९४८ साली केसरबाईंना 'सूरश्री अशी पदवी बहाल केली.
पुरस्कार
संपादन- पद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार, इ.स. १९६९.
- पहिला राज्य गायिका पुरस्कार, महाराष्ट्र राज्य, इ.स. १९६९.
- कोलकात्यात रवींद्रनाथ टागोरांनी 'सूरश्री' किताब बहाल केला. रवींद्रनाथांनी दिलेले गौरवपत्र चांदीच्या चौकटीत घालून केसरबाईंनी शेवटपर्यंत जतन करून ठेवले.
- संगीत नाटक अकादमीने १९५३ साली 'प्रमुख आचार्या' ही सनद त्यांना बहाल केली.
वारसा
संपादनकेसरबाईंच्या जन्मगावी ज्या घरी त्यांचे बालपण गेले, तिथे आता सूरश्री केसरबाई केरकर हायस्कुलाची इमारत आहे. त्यांचा जन्म जिथे झाला, ते त्यांचे पूर्वीचे घर तिथून थोड्याच अंतरावर आहे. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते.
पुस्तक
संपादन- गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे. तर त्यांच्या बंधूंनी "सूरश्री " हे चरित्र लिहिले आहे.