गणेश दामोदर सावरकर

मराठी क्रांतिकारक


गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर (जून १३, १८७९, मार्च १६, १९४५) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.[]

गणेश दामोदर सावरकर

टोपणनाव: बाबाराव
जन्म: जून १३, १८७९
भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: मार्च १६, १९४५
सांगली,महाराष्ट्र
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अभिनव भारत
मित्रमेळा
धर्म: हिंदू
प्रभाव: शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक
वडील: दामोदर सावरकर
आई: राधाबाई सावरकर
पत्नी: यशोदा उर्फ येसूताई
अपत्ये: नाहीत.

सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकरचे सावरकर झाले. पुढे कामानिमित्त काही मंडळी कोकण सोडून घाटावर स्थाईक झाली. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळात केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) आणि त्यांचे स्नेही धोपावकर यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाच्या जवळ असलेल्या राहुरी गावाची जहागीर दिली. घाटावर स्थाईक झालेल्या सावरकर घराण्यातील नारायण दीक्षित (सावरकर) यांच्यापासून दामोदरपंत सावरकर हे सातव्या पिढीतील वंशज होते. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता. पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते.

दामोदरपंत सावरकर यांचा विवाह मनोहर घराण्यातील राधाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली पण ती वाचली नाहीत. त्यानंतर या जोडप्याला तीन मुले व एक मुलगी अशी चार अपत्ये झाली. दि. १३-जून-१८७९ रोजी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबा यांचा जन्म झाला, दि. २८-मे-१८८३ रोजी विनायक उर्फ तात्या आणि नंतर साधारण तीन तीन वर्षांनी माई (नंतरच्या माई काळे) आणि नारायण उर्फ बाळ सावरकर यांचा जन्म झाला.

बालपण

संपादन

बाबारावांचे बालपण भगूर गावात गेले. लहानपणापासून बाबाराव हुशार, अभ्यासू, संघटनकुशल, सततोद्योगी होते. तसेच बुद्धिबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्य-बाण चालविणे वगैरे विविध खेळातही ते पटाईत होते. लहानपणी बाबांना विविध प्रकारच्या रोगांनी सताविले. त्यात २०-२१ दिवस मुदतीचा ताप (विषमज्वर) हा नित्याचाच असे आणि बाबांना विंचू दंशही खूपदा (सुमारे २०० वेळा) झाला. थोडे मोठे झाल्यावर वडील दामोदरपंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले. वडील, मामा आणि तात्याराव कविता करीत असत पण बाबांना कवितेची आवड नव्हती. वडिलांना आवड असल्याने त्यांनी घरी गाय-बैल, कुत्रा पाळलेले होते. तसेच घरी फुलझाडेही खूप लावली होती. बाबारावांनी वडिलांकडून टापटीप, अभ्यास, सगळ्यांशी मिळून राहणे, हे गुण घेतले. तर आईकडून स्वयंपाक करायला ते शिकले. आईच्या अकाली निधनानंतर बाबाराव काही काळ आपल्या घरी स्वतःच स्वयंपाक करीत असत.

शिक्षण / व्यासंग

संपादन

घरच्या परिस्थितीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आतच उरकले पण योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. फलज्योतिष्य, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ते स्वतः चांगले गात असत तसेच तबला आणि सतार वाजवू शकत असत. त्यांच्या संग्रहात इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र, कला, इ. अनेक विषयांची हजारो पुस्तके होती, त्यांचा सखोल अभ्यास बाबारावांनी केला होता.

  • राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप, दुर्गातनय या टोपणनावाने काशी येथे लिहिले, १९३४ साली प्रकाशन.
  • हिंदुराष्ट्र - पूर्वी-आता-पुढे
  • शिवरायांची आग्ऱ्यावरील गरुडझेप
  • वीरा-रत्‍न-मंजुषा
  • ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
  • धर्म कशाला हवा ?
  • मोपल्यांचे बंड[]
  • वीर बैरागी, मूळ हिंदी भाषेतील पुस्तकावरून भाषांतरित केलेले पुस्तक
  • पत्रलेखन
  • १८५७चा स्वतंत्र्यसंग्रम

प्रकाशन

संपादन
  • नेपाळी आंदोलनाचा उपक्रम
  • संघटन संजीवनी
  • भयसूचक घंटा

स्फुट लेख

संपादन

केसरी (पुणे), लोकमान्य (मुंबई), महाराष्ट्र (नागपूर), सकाळ (मुंबई), आदेश (नागपूर), वंदे भारतम्‌ (मुंबई), मराठा (इंग्रजी, पुणे), श्रद्धानंद (पुणे), प्रजापक्ष (अकोला), विक्रम (सांगली) इ. वृत्तपत्रात बाबारावांनी वेळोवेळी, विविध विषयांवर लेख लिहिले.

बाबाराव सावरकरांचे गाजलेले पुस्तक - ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

संपादन

‘येशू ख्रिस्त हे तामिळी हिंदू होते. तसेच ते जन्माने विश्‍वकर्मा ब्राह्मण होते. ख्रिश्‍चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे‘, असे विचार स्वातंत्र्यवीर विनायक दामोर सावरकर यांचे बंधू गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर यांनी "ख्रिस्त परिचय‘ नावाच्या १९४६ साली प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात मांडले होते. हे पुस्तक २६-२-२०१६ रोजी पुनःप्रकाशित करण्यात आले. ‘ओल इंडिया ट्रू ख्रिश्चन काउ या संस्थेने या पुस्तकाविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुस्तकाची प्रत्येक प्रत जप्त करण्याची मागणी केली आहे.[ संदर्भ हवा ]

आईच्या अकाली निधनानंतर १८९६ साली बाबारावांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी पत्‍नीचे नाव यशोदा ठेवले. तात्यारावांसह अनेकजण त्यांना येसू वहिनी म्हणत. येसूवहिनी तात्यारावांच्या आणि नारायणरावांच्या प्रेरणास्थान होत्या. बाबारावांना दोन मुले झाली पण दोघेही फार काळ राहू शकली नाही.

क्रांतिकार्य

संपादन

तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. सुरुवातीला बाबारावांना या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले. गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी दि. १-जानेवारी-१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते.[] मित्रमेळा संस्थेतर्फे गणेश उत्सव, शिवजयंतीसह इतर थोरांच्या जयंत्या साजऱ्या करणे, सार्वजनिक (प्रकट) भाषणांचे आयोजन करणे, कविता, पोवाडे म्हणणे आदी प्रकारे तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेण्यात आले. बाबारावांनी संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांसह अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले.

बाबांच्या प्रयत्‍नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले. १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. त्यातील लोकांचा पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास होता आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या तरुणांनाच त्यात प्रवेश दिला जात असे. या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली. या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे.

२०-जुलै-१९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार - होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला. बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला.[]

अभियोग

संपादन

सरकारी यंत्रणा बाबारावांच्या पाळतीवर होतीच. त्यातच बाबाराव मुंबईला गेले आणि क्षुल्लक वादात सापडले. त्यावरून चौकशी करून बाबांना दि. २८-फेब्रुवारी-१९०९ रोजी मुंबईत अटक करण्यात आली. नंतर त्यांना नाशिकला नेण्यात आले. सखोल चौकशीअंती बाबांच्या घरी आक्षेपार्ह बऱ्याच गोष्टी आढळल्याने त्यांच्यावर तत्कालीन दंडविधानाच्या कलम १२१ आणि १२४ अ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. दि.०८ जून इ.स. १९०९ रोजी बाबारावांना जन्मठेपेची - काळ्यापाण्याची शिक्षा आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगावयाची होती. ही शिक्षा सुनाविल्यावर थोड्याच काळात बाबारावांनी उच्च न्यायालयात फेर निर्णयासाठी याचिका दाखल केली. पण यथावकाश त्याचाही निकाल बाबांच्या विरुद्धच लागला आणि जुनी शिक्षा कायम करण्यात आली.

परिणाम

संपादन

बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे लंडन मध्ये असलेल्या भारतीयांना समजले. तात्याराव आणि सहकारी ब्रिटिश सरकारला कशी अद्दल घडवावी यावर विचार करीत होते. तोच एकीकडे मदनलाल धिंग्रा याने वंगभंगसाठी जबाबदार असलेल्या कर्झन वायलीवर दि. ०१ जुलै इ.स. १९०९ रोजी गोळ्या झाडून त्याचा वध केला. तर दुसरीकडे नाशिकमधील अभिनव भारतचे सदस्य गुप्तपणे एकत्र आले आणि अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांनी बाबारावांना शिक्षा होण्यास जबाबदार असलेला मुख्य अधिकारी म्हणून जॅक्सनचा वध दि. २१ डिसेंबर इ.स. १९०९ रोजी केला. याशिवाय देशभर हरेक मार्गाने निषेध झाले.

अंदमान

संपादन

काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी इ.स. १९११ साली अंदमानला पाठविण्यात आले. अंदमान येथील शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती. बाबाराव रोज मरण यातना भोगत. त्यातच तात्यारावांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांचीही रवानगी अंदमानला करण्यात आली. बाबारावांचे धाकटे बंधू नारायणराव यांनी आपल्या दोन्ही वडील बंधूंची सुटका व्हावी म्हणून अनेकांना भेटून, निवेदने देऊन प्रयत्‍न चालविले. अखेर इ.स. १९२१ साली दोन्ही सावरकर बंधूंची अंदमान मधून सुटका झाली पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील विविध ठिकाणच्या तुरुंगात पाठविण्यात आले. बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून इ.स. १९२२ साली त्यांची शिक्षा संपल्याचे घाईने कळविण्यात आले.

शिक्षा संपल्यानंतर बाबांची प्रकृती साथ देत नसतांनाही त्यांनी आपले पूर्वीचे कार्य नव्या जोमाने सुरू केले. त्यांचे लिखाण, वाचन, प्रकाशनाचे कामही वाढले. अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना पटवून दिले. क्रांतिकार्य अव्याहतपणे सुरू असतांनाच दि. १६-मार्च-१९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे सांगली(महाराष्ट्र) येथे निधन झाले.

स्मारक

संपादन

सांगली शहरातील गावभाग सांगली येथे नदी किनारी एका इमारतीत बाबाराव सावरकर यांचे एक स्मारक आहे. स्मारका मध्ये क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांची भव्य पंच धातूने बनलेली मूर्ती आहे.या वास्तूचे उदघाटन तत्कालीन खासदार मा.अटल बिहारी वाजपेयजी यांच्या हस्ते झाले होते.शिवभक्त भालजी पेंढारकर हे या समितीचे पहिले अध्यक्ष होते.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रमाणे अनेक मान्यवरांनी या स्मारकाला भेटी दिल्या आहेत.प्रत्येक सावरकर प्रेमींनी दर्शन घ्यावे असे हे स्मारक आहे.

बाबाराव सावरकरांसंबंधी पुस्तके

संपादन
  • क्रांतिकारक बाबाराव सावरकर (लेखक दुर्गेश परुळकर)
  • क्रांतिवीर बाबाराव सावरकर, लेखक द. न. गोखले
  • त्या तिघी (सावरकर बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी (बाई), यमुना(माई) आणि शांता(ताई) यांच्यावरील कादंबरी (लेखिका डॉ. शुभा साठे)

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ यशपाल, पुनर्मूल्यांकन (हिंदी भाषेत). शिल्पायन. 2004. ISBN 978-81-87302-41-4.
  2. ^ Gopāla (1968). Hindī upanyāsa kośa: 1917-1936 (हिंदी भाषेत). Grantha Niketana.
  3. ^ Gupta, Manmath Nath (1966). Bhāratīya krāntikārī āndolana kā itihāsa (हिंदी भाषेत). Ātmārāma.
  4. ^ "गणेश सावरकर क्या सचमुच मौलाना आज़ाद को मारना चाहते थे?". News18 India. 2021-06-13 रोजी पाहिले.