मार्जार कुळ

(मार्जार जाती या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्जार कूळ हे घरगुती मांजर व त्या सदृश दिसणाऱ्या प्राण्यांचे जैविक कुळ आहे. या मध्ये घरगुती मांजरापासून ते वाघ सिंहासारख्या मोठ्या शिकारी प्राण्यांचाही समावेश होतो. या सर्वांचे दिसण्यातील सारखेपणा तसेच शिकारीच्या व इतर सवयी बहुतांशी घरगुती मांजराप्रमाणेच असतात. ह्यांमधील सर्वच उपजाती अत्यंत कुशल शिकारी असून सर्वजण मांसभक्षक आहेत. निसर्गात त्यांच्यापेक्षा कुशल शिकारी नसल्याने अन्नसाखळीत त्यांचे स्थान सर्वात वरचे आहे.

मार्जार कुळ

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ
उपकुळ: पँथेरिने

फेलिने

मार्जार कुळात दोन प्रमुख उपकुळे आहेत. एक पँथेरा ( वाघ सिंह, व बिबट्या). यामध्ये ज्या प्राण्यांना डरकाळी फोडता येते अशांचा समावेश आहे. दुसरे उपकुळ आहे फेलिने. या उपकुळात बहुतांश मार्जार कुळातील प्रजातींचा समावेश होतो. उदा: चित्ता, लिंक्स, रानमांजरी व घरगुती मांजर. मार्जार कुळाची उत्पत्ती साधारणपणे अडीच कोटी वर्षांपूर्वी ओलिगोसिन कालखंडात झाली.

मार्जार कुळातील सर्व मांजरे ही मांसभक्षक आहेत व कुठल्याही पृष्ठवंशी प्राण्याची शिकार करून खाण्यास समर्थ आहेत. सिंहाचा अपवाद वगळता सर्वच मांजरे एकटे रहाणे पसंत करतात व बहुतेक जाती निशाचर आहेत. कुठल्याही वातावरणासाठी आपल्या शरीरात योग्य ते बदल घडवून आणून जगातील कानाकोपऱ्यात त्यांनी आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे. फक्त ऑस्ट्रेलिया व अंटार्टिकाचा तसेच खंडापासून अतिदूरची बेटे यांचा अपवाद वगळता जंगली मांजरे पृथ्वीच्या सर्व भागात आहेत.

शारीरिक रचना

संपादन

मार्जार कुळातील सर्व प्राण्यांचा आकारात मोठा फरक आहे. दीड- पावणे दोन किलोच्या घरगुती मांजरापासून ते २५० किलोच्या वाघापर्यंत सर्व स्तरातील प्रजाती आहेत. आपपल्या आकारमानाप्रमाणे सर्व प्रजातींने आपले भक्ष्य ठरवले आहे. मार्जार कुळाच्या प्राण्यांच्या शरीराच्या मानाने त्यांचा चेहरा लहान असतो. परंतु त्यांची दृष्टी मात्र तीक्ष्ण असते. त्यांचे शरीरावरील पॅटर्न सर्वच प्रजातींमध्ये एकसारखा नाही. तरीपण बहुतेक प्रजातींमध्ये ठिपके मात्र आढळून येतात. उदा: बिबट्या, चित्ता, जॅग्वार, बिबटेमांजर, सिंह इत्यादी. लहानपणी सिंहाच्याही अंगावर ठिपके आढळतात, वाघाच्या अंगावर पट्टे आहेत तर प्युमाच्या अंगावर कोणतीही चिन्हे नाहीत. सर्वच मार्जार कुळातील प्राण्यांची जीभ अतिशय खरखरीत असते. त्याचा उपयोग त्यांना हाडावरील मांस साफ करायला होतो.

मांजराच्या सर्वच जाती पोहण्यात कुशल असतात. परंतु सर्वानाच पाणी आवडते असे नाही. वाघ तासनतास पाण्यात डुंबत राहतो तर बिबट्या पाणी फक्त पिण्यासाठी म्हणून वापरतो. घरगुती मांजराचा पाणीद्वेष आपण पाहतोच. तसेच सर्व मांजरे झाडावर चढण्यात कुशल असतात. ढगाळ बिबट्या सारख्या प्रजाती आयुष्यात कधीतरी जमिनीवर उतरतात. एकूण, बिबट्या हा झाडावर चढण्यात अतिशय कुशल आहे. वाघही त्याच्या बालपणात झाडावर चढण्यात पटाईत असतो. परंतु पूर्ण वाढ झालेल्या वाघाला वजनामुळे झाडावर चढण्यास अडचण होते. मांजरे फावला वेळ तासनतास आपले शरीर जिभांनी चाटून स्वच्छ करण्यात घालवतात.

संवेदने

संपादन

मांजरांचे डोळे त्यांच्या शरीराच्या आकारमानाप्रमाणे मोठे असतात व बहुतेक सर्वच मांजरे निशाचर असल्याने त्यांची काळोखात पाहाण्याची क्षमता इतरांच्या वरचढ असते. काळोखात मांजरांचे डोळ्यांवर प्रकाशझोत टाकल्यास ते चमकतात. तसेच सर्वच मांजरांची ऐ.कण्याची क्षमता अचाट असते. बहुतेक प्रजाती दाट जंगलात वास्तव्य करून असतात त्यामुळे आवाज टिपण्यावर जास्ती भर द्यावा लागतो. त्यामुळेच त्यांचे कान अतिशय संवेदनशील असतात. मांजरांचे नाक मात्र श्वानकुळातील किंवा अस्वलांपेक्षा कमी विकसित आहे. काही मांजरांचे गंधज्ञान जास्त असते तर काहींचे कमी. मांजरांचे स्वतःच विकसित केलेले इंद्रिय म्हणजे त्यांच्या मिश्या. या मिशा मांजरांना इतर शिकारी प्राण्यांपेक्षा उजवे ठरवतात. मिश्यांचे मूळ त्वचेत खोलवर असते व आजूबाजूच्या हालचाली टिपण्यात मिशांचा उपयोग होतो. मिश्यांचा उपयोग ते अतिशय काळोख्या जागेत मार्गक्रमण करण्यासाठीही करतात. मांजरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुठल्याही ठिकाणावरून उडी मारली तरी ते त्यांच्या पायावरच पडतात. परंतु मोठी मांजरे या बाबतीत कमी पडतात.

दंताळी

संपादन
 
सिंहाची कवटी

फक्त लिंक्स या मांजराचा अपवाद सोडल्यास इतर सर्व मांजरांची दंताळी सारखीच असते.

3.1.3.1
3.1.2.1

.

मांजरांचे सुळे अतिशय विकसित आहेत. शिकार साधताना सुळ्यांचा सर्वाधिक उपयोग होतो. उत्क्रांती मध्ये काही मांजरांना प्रचंड मोठे सुळे होते, परंतु ते काही कारणाने नामशेष झाले. मांजरांच्या दाढा ह्या कात्रीप्रमाणे असतात. त्यांचा उपयोग ते मांस चावण्यासाठी व हाडे फोडण्यासाठी करतात. शिकार साधण्यासाठीच मांजरांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मार्जार कुळातील प्रजाती

संपादन

मार्जार कुळात खालील प्राण्यांचा समावेश होतो.

 
चित्ता
 
सिंह
 
जॅग्वार
 
लिंक्स
 
रानमांजर

नोंद- उपलब्ध नावे मराठीतून दिलेली आहेत. जी उपलब्ध नाहीत त्यांचे इंग्रजी नाव तसेच ठेवले आहे. वाचकांना गोंधळ झाल्यास शास्त्रीय नावे इंग्रजीत आहेत त्यांचा वापर करावा.जर मराठी नाव उपलब्ध असेल तर जरूर चर्चापानावर नोंदवावे.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ Wozencraft, W. C. (16 November 2005). in Wilson, D. E., and Reeder, D. M. (eds): Mammal Species of the World, 3rd edition, Johns Hopkins University Press, 532-548. ISBN 0-8018-8221-4.
  • द बुक ऑफ इंडियन ऍनिमल्स: बी.एन्.एच.एस. ऑक्सफर्ड प्रेस
  • आपली सृष्टी आपले धनः निसर्ग प्रकाशन भाग ४ ले.मिलिंद वाटवे