प्रफुल्ल केशवराव घाणेकर

(प्र.के. घाणेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

प्र.के. घाणेकर (जन्म : आवास-कुलाबा जिल्हा, ७ मे १९४८) हे एक लोकप्रिय मराठी लेखक आहेत. यांचे लेखन मुख्यत्वे पर्यटन, महाराष्ट्रातील किल्ले व त्यांच्याशी संलग्न अशा विषयांवर आहे.

प्र. के. घाणेकर
जन्म मे ७, इ.स. १९४८
आवास, रायगड जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता
साहित्य प्रकार विज्ञानाधिष्ठित निसर्गलेखन
गड किल्यांवरील लेखन
पर्यटन
विषय निसर्ग
प्रसिद्ध साहित्यकृती 'साद सह्यादीची, १०० किल्ल्यांची'
'दुर्गविज्ञान
'भटकंती लेह लडाखची, अल्पपरिचित हिमालयाची'
'विज्ञानाचं नवलतीर्थ'
'दुर्गदुर्गेश्वर रायगड'
पुरस्कार स्नेहांजली पुरस्कार

घाणेकरांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील आवास या गावी झाला. त्यांनी वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते पुणे शहरातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख होते. तब्बल ३८ वर्षांच्या नोकरीनंतर ते निवृत्त झाले.

 • प्र.के.घाणेकर यांनी हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ’वेस्टर्न हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट’चा गिर्यारोहणाचा प्राथमिक अभ्यासक्रम ’ए ग्रेड’मध्ये पुरा केला(१९७४).
 • माउंट एव्हरेस्ट विजयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पुण्यातील ’भारत आउटवर्ड-बाउंड पायोनिअर्स’तर्फे एव्हरेस्ट परिसरातील १८४७१ फूट/५६३० मीटर उंचीच्या अनामिक शिखर मोहिमेचा नेता व निसर्ग अभ्यास सहलीचा यशस्वी विजेता (१९७८).
 • महाराष्ट्र शासनाचा बेसिक कोर्स इन्‌ फोटोग्राफी पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण(१९७९). पुढे काही वर्षे त्याच परीक्षांचा महाराष्ट्र सरकारतर्फे परीक्षक.
 • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स इन्‌ इंडॉलॉजी (भारतविद्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम) पहिल्या वर्गात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण(१९८६).
 • महाराष्ट्र सरकारचा मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पहिल्या वर्गात प्रथम क्रमांकाने पूर्ण(१९८७).
 • सोसायटी फॉर एथनोबॉटनी (लखनौ)तर्फे एफ.ई.एस. हा किताब बहाल(१९९२).


साहित्य लेखन

संपादन

विज्ञानाधिष्ठित निसर्गलेखन या साहित्यप्रकाराला स्वतंत्र स्थान निर्माण करून देण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. घाणेकर हे जीवशास्त्राचे अभ्यासक आहेत. चार भिंतींच्या आड जीवशास्त्र शिकता येत नाही, या भावनेतून त्यांची भटकंती सुरू झाली. 'पर्यटन' या मासिकातून किल्ले, लेणींमधील झाडे, वनस्पती, फुले पाहता पाहता किल्ल्यांच्या अनघड वाटांवर लिहिण्याची सुरुवात झाली. त्यांचे पहिले पुस्तक ’इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ हे १९८२ साली प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी वनस्पतींबरोबरच इतिहासाकडे आपला मोर्चा वळवला. शिवशाहीचा गौरवशाली इतिहास ज्या गडांवर घडला त्यातील अनेक किल्ले तोपर्यंत अनोळखी होते. घाणेकर यांनी या किल्ल्यांना प्रकाशात आणले. 'जो किल्ला पाहिला नाही, त्याबद्दल लिहायचे नाही,' हा त्यांचा दंडक आजही कायम आहे. त्या काळात किल्ल्यांवर लिहिणारे लेखक होते; पण ते लेखन इतिहासाच्या अंगाने जाणारे ललित होते. मात्र, घाणेकर यांची धाटणी वेगळी होती. किल्ल्यावर कसे आणि कधी जायचे, जाताना कोणती पथ्ये पाळायची, तेथे गेल्यावर पर्यावरणाची जपणूक कशी करायची, तेथील शिल्प यांची माहिती ते त्यांच्या लेखनातून देऊ लागले. त्यामुळे त्यांचे लेखन अल्पावधीतच लोकांना आपलेसे वाटू लागले. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील सुमारे ३०० किल्ले प्र.के. घाणेकरांनी पायी हिंडून पाहिले आहेत. 'साद सह्यादीची, १०० किल्ल्यांची' या त्यांच्या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. 'दुर्गविज्ञाना'सारखा विषय त्यांनी मराठीत आणला. 'भटकंती लेह लडाखची, अल्पपरिचित हिमालयाची' या पुस्तकांत निसर्ग वाचताना माणसांचेही दर्शन त्यांनी घडविले. विज्ञानाच्या आवडीतून 'विज्ञानाचं नवलतीर्थ'चा जन्म झाला. कोणत्याही विषयाची शास्त्रीय माहिती, संशोधन, व्यवहारातील नावे आणि त्याची उपयुक्तता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.


लेखन आणि प्राध्यापकीव्यतिरिक्त

संपादन

किल्ले-हिमालय-निसर्ग-गिर्यारोहण-विज्ञान-भटकंती-पर्यटन या विषयांवर ८००हून अधिक लेख व ५००हून अधिक व्याख्याने घाणेकरांनी दिली आहेत. त्यांनी या विषयांवरील लेखांचे कात्रण संग्रह व पुस्तके जमा केली आहेत.

विविध संस्थांच्या विज्ञान तसेच निसर्ग निरीक्षण शिबिरांमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून त्यांचा सहभाग असतो.

आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर त्यांनी अनेक कार्यक्रमांत भाग घेतला आहे.

प्र.के. घाणेकर यांनी हिमालय, वृक्ष, निसर्ग, किल्ले या विषयांवर सादर केलेल्या ‘स्लाईड शो’चे किमान पाचशे कार्यक्रम झाले आहेत. देशभरात हजारांहून अधिक ठिकाणी त्यांनी या अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि हा वाग्यज्ञ अजूनही तेवढ्याच दमदार रीतीने सुरू आहे. त्यांच्याकडे सातवाहन कालापासूनच्या नाण्यांचा अमूल्य संग्रह आहे. अनेक प्रकारच्या जीवाश्मांचे, शंख-शिंपल्यांचे एक उत्तम संग्रहालयच त्यांच्या घरी आहे. त्याशिवाय त्यांच्या आवडीच्या विषयांवरील किमान पंधरा हजार कात्रणांचा संग्रहही त्यांनी तयार केला आहे.

आगामी लेखन

संपादन

हिमालयावरील 'उंच आणि उत्तुंग', भारतात आलेल्या परदेशी वनस्पतींवरील 'पाहुणे म्हणून आले आणि इथलेच झाले' ही पुस्तके लवकरच प्रकाशित होतील. 'रानातून पानात' या कोकणातील भाज्यांवरील आगामी पुस्तकात त्यांच्या खाद्यसंस्कृती प्रेमाची झलक दिसेल.

प्र.के. घाणेकर यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
पुस्तक प्रकाशन महिना व वर्ष
चला जरा भटकायला (पुस्तक) ऑक्टो. १९८४
कोकणचा मानबिंदू – सिंधुदुर्ग (पुस्तक) मार्च १९८५
समर्थांचा सज्जनगड (पुस्तक) मार्च १९८५
शिवतीर्थाच्या आख्यायिका (पुस्तक) मार्च १९८५
साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची (पुस्तक) ऑगस्ट १९८५
महाराष्ट्र स्थलदर्शन (पुस्तक) मार्च १९८६
महाराष्ट्र निसर्गदर्शन (पुस्तक) मार्च १९८६
पर्यावरण (पुस्तक) एप्रिल १९८६
एव्हरेस्ट - राजा हिमशिखरांचा (पुस्तक) जानेवारी १९८७
जलदुर्गांच्या सहवासात (पुस्तक) नोव्हेंबर १९८७
काळाच्या उदरात (पुस्तक) नोव्हेंबर १९८८
संभाजी (पुस्तक) एप्रिल १९८९
आडवाटेवरचा महाराष्ट्र (पुस्तक) एप्रिल १९८९
सहली आणि संस्कार शिबिरे (पुस्तक) जानेवारी १९९०
'तो' रायगड (पुस्तक) मार्च १९९१
अथातो दुर्गजिज्ञासा (पुस्तक) जुलै १९९१
लोणार (पुस्तक) ऑक्टोबर १९९१
हिमाईच्या कुशीत (पुस्तक) जानेवारी १९९३
गडदर्शन (पुस्तक) ऑगस्ट १९९३
किल्ले पाहू या (पुस्तक) ऑगस्ट १९९३
गड आणि कोट (पुस्तक) ऑगस्ट १९९३
सोबत दुर्गांची (पुस्तक) ऑगस्ट १९९३
मैत्री सागरदुर्गांची (पुस्तक) ऑगस्ट १९९३
इये महाराष्ट्र देशी (पुस्तक) जानेवारी १९९४
पर्वणी सूर्यग्रहणाची (पुस्तक) नोव्हेंबर १९९४
गड किल्ले गती जयगाथा (पुस्तक) जानेवारी १९९५
भटकंतीतून विज्ञान (पुस्तक) जून १९९५
लोणार - एक वैज्ञानिक चमत्कार (पुस्तक) नोव्हेंबर १९९६
कोकणातील पर्यटन (पुस्तक) जानेवारी १९९७
लेणी महाराष्ट्राची (पुस्तक) मार्च १९९७
इतिहास घडवणाऱ्या वनस्पती (पुस्तक) एप्रिल १९९९
जंजिरा एप्रिल १९९९
सिंहगड एप्रिल १९९९
ग्रासिले सूर्यमंडळा (पुस्तक) मे १९९९
विज्ञानाची नवलतीर्थे (पुस्तक) जून १९९९
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या (पुस्तक) एप्रिल २०००
योद्धा जनरल झोरावरसिंग (पुस्तक) जुलै २०००
सफर दिवेआगरची.... निसर्गराज श्रीवर्धन परिसराची (पुस्तक) नोव्हेंबर २०००
गडांचा राजा - राजगड (पुस्तक) सप्टेंबर २००२
गोष्टी शिवकालाच्या (पुस्तक) जानेवारी २००३
ओळख किल्ल्यांची भाग १ (पुस्तक) जानेवारी २००३
ओळख किल्ल्यांची भाग २ (पुस्तक) जानेवारी २००३
ओळख किल्ल्यांची भाग ३ (पुस्तक) जानेवारी २००३
प्रतापगड परिसरातील परिसरदर्शन (पुस्तक) एप्रिल २००३
प्रतापसूर्य बाजीराव (पुस्तक) डिसेंबर २००३
सहली मौजेच्या, पावसाळ्यात भिजायच्या (पुस्तक) जून २००३
शिवनेरी-नाणेघाट-हरिश्चंद्रगड व परिसर एप्रिल २००५
भटकंती, रायगड जिल्ह्याची (पुस्तक) एप्रिल २००७
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. (पुस्तक) एप्रिल २०१२

पुरस्कार

संपादन
 • कुलाबा जिल्हा विज्ञानशिक्षक महासंघातर्फे, शालेय विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पनवेलच्या संमेलनासाठी निवड - इ.स. १९७४.
 • गिर्यारोहण क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे इ.स. १९९० मध्ये सन्मान चिन्ह.
 • भटकंती आणि निसर्ग शिक्षण कार्यासाठी फ्रेंड्ज ऑफ ॲनिमल्स पुणे, या संस्थेतर्फे इ.स. १९९१मध्ये पुरस्कार देण्यात आला.
 • 'अथातो दुर्गजिज्ञासा' पुस्तकाच्या लेखनाबद्दल, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे रा.ना.नातू पुरस्कार इ.स. १९९२ मध्ये देण्यात आला.
 • 'अथातो दुर्गजिज्ञासा' पुस्तकाच्या लेखनाबद्दल, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्र, नगर यांचे तर्फे 'प्रा.जिन्सीवाले पुरस्कार' इ.स. १९९२मध्ये देण्यात आला.
 • मराठीतून विज्ञान प्रसार कार्यासाठी 'कै. डॉ. मो. वा. चिपलोणकर पारितोषिक इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे यांचेकडून इ.स. १९९३मध्ये देण्यात आले.
 • पर्यटनविषयक उत्कृष्ट लिखाणाबद्दल 'कै. यशवंतराव काळे स्मृती पुरस्कार', श्रीमती मेधा काळे व काळे कुटुंबीयांकडून इ.स. १९९३मध्ये देण्यात आला.
 • निवृत्त माध्यमिक शिक्षक संघातर्फे सामाजिक कार्याबद्दल १९९५ मध्ये पुरस्कार देण्यात आला.
 • सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे 'कै. मुरलीधर बलवंत यंदे स्मृती पुरस्कार' 'इये महाराष्ट्र देशी' या पुस्तकाबद्दल इ.स. १९९५मध्ये देण्यात आला.
 • साहस आणि गिर्यारोहण विषयक पुस्तक लेखनाबद्दल 'कै. श्रीकृष्ण भिडे स्मृती पुरस्कार' भिडे कुटुंबीयांकडून इ.स. १९९५मध्ये देण्यात आला.
 • बॉटनी फ्रेंड्स सर्कल, पुणे यांचेकडून वनस्पतीशास्त्रविषयक कार्याबद्दल पुरस्कार (१९९७)
 • ’जिऑलॉजिकल वंडर्स इन्‌ डेक्कन प्लॅटो’ या शैक्षणिक चित्रफीत निर्मितीमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून सहभागाबद्दल अखिल भारतीय पातळीवर युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनकडून प्रथम पुरस्कार (१९९९)
 • गुरुवर्य कै.ल.ग.देशपांडे स्मृती पुरस्कार (२००२)
 • स्नेहल प्रकाशनचा २०११ सालचा स्नेहांजली पुरस्कार.
 • छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कार (मे २०१२).