जगदीश खेबुडकर

मराठी गीतकार
(जगदीश खेबूडकर या पानावरून पुनर्निर्देशित)

जगदीश खेबुडकर (मे १०, इ.स. १९३२ - मे ३, इ.स. २०११) हे मराठी गीतकार होते.

जगदीश खेबुडकर
जन्म नाव जगदीश खेबुडकर
जन्म मे १०, इ.स. १९३२
खेबवडे, हळदी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू मे ३, इ.स. २०११
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र गीतकार, कविता, साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतरचना,
प्रसिद्ध साहित्यकृती पिंजरा या मराठी चित्रपटातील गीते
अपत्ये अभंग, मुक्तछंद ही मुले, कविता पडळकर, अंगाई महाजनी या मुली
पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित

जीवन

खेबुडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस.. हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

त्यांचे पहिले गीत इ.स. १९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी मला हो म्हणत्यात लवंगी मिरची प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना वसंत पवार, संगीतकार यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]

त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.

त्यांच्या कारकिर्दीत भालजीं पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६ दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे ४४ संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले.[१]

संस्था

इ.स. १९७४ साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर इ.स. १९८० मध्ये रंगतरंग व इ.स. १९८२ मध्ये रसिक कला केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि इ.स. १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

जगदीश खेबुडकर यांना ६०हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.[ संदर्भ हवा ]

 • राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एकः सवाल माझा ऐका इ.स. १९६४ साठी)
 • गदिमा पुरस्कार
 • कोल्हापूरभूषण पुरस्कार
 • फाय फाउंडेशन पुरस्कार
 • साहित्य सम्राट पुरस्कार
 • रसरंग फाळके पुरस्कार
 • व्ही.शांताराम स्मृति जीवनगौरव पुरस्कार
 • शिवाजी सावंत पुरस्कार [२]
 • बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार
 • जीवनगौरव पुरस्कार
 • शाहू पुरस्कार
 • करवीर भूषण
 • दूरदर्शन जीवनगौरव
 • कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार
 • शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे दिलेला राम कदम कलागौरव पुरस्कार (२००६)

बाह्य दुवे

 • "जगदीश खेबुडकर यांची गीते".

संदर्भ

 1. ^ "जगदीश खेबुडकर यांचे निधन -Maharashtra Times". Maharashtra Times. 2011-05-03. 2018-07-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
 2. ^ "जगदीश खेबुडकर -Maharashtra Times". Maharashtra Times. 2004-09-17. 2018-07-03 रोजी पाहिले.[permanent dead link]