अजित कडकडे

मराठी हिन्दुस्तानी गायक, पर्श्वगायक
अजितकुमार सदानंद कडकडे

अजित कडकडे
आयुष्य
जन्म ११ जानेवारी, १९५१ (1951-01-11) (वय: ७३)
जन्म स्थान डिचोली (Bicholim), गोवा
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व भारतभारतीय
नागरिकत्व भारतभारतीय
मूळ_गाव डिचोली (Bicholim), गोवा
देश भारत ध्वज भारत
भाषा कोंकणी, मराठी
पारिवारिक माहिती
आई प्रेमा कडकडे
वडील सदानंद कडकडे
जोडीदार सौ.छाया अजितकुमार कडकडे
अपत्ये सरिन कडकडे
संगीत साधना
गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
नाट्यसंगीत
अभंग
संगीत कारकीर्द
कार्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक, संगीतकार
पेशा गायकी
विशेष कार्य मराठी भक्तिसंगीतात असंख्य विक्रम
कारकिर्दीचा काळ १९७८ पासून आजतागायत कार्यरत
गौरव
विशेष उपाधी गानसमर्थ, भक्तिरसगंधर्व,

साधारण परिचय

संपादन

श्री.अजित कडकडे अर्थात श्री.अजितकुमार सदानंद कडकडे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक व संगीतकार असून शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, नाट्यसंगीत, गौळणी, भावगीत, कबीर आणि मीराभजने, इत्यादी गायन प्रकारांमध्ये त्यांचा कमालीचा हातखंडा आहे. पहाडी खणखणीत आवाज, भावपूर्ण सादरीकरण, विशिष्ट प्रकारचा स्वर लगाव, कडाडणाऱ्या विजेसारख्या ताना, अशा वैशिष्ट्यांनी युक्त अशी त्यांची गायकी प्रचंड ताकदीची आहे. गंभीर-आक्रमक-हळुवार-भक्तिमय अशा सर्व प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले हे त्यांचे दोन गुरु. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांकडे सुमारे एक तप (१२ वर्षे) ते पूर्णपणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकले. तर पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे ते कबीर, सूरदास, मीराबाई यांची भजने आणि थोडेसे लाईट म्युझिक शिकले. आपल्या अमोघ गायकीच्या जोरावर त्यांनी आपली लोकप्रियता प्रस्थापित केली आहे. याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी भारतात सर्वत्र आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये गायन मैफिली केल्या आहेत.

बालपण (Early life) : -

संपादन

अजितजी मूळचे गोव्याचे.. डिचोली हे त्यांचं गाव. सौ. प्रेमा आणि श्री. सदानंद कडकडे हे अजितजींचे आई-वडील. ११ जानेवारी १९५१ रोजी त्यांचा जन्म झाला.  आज आपण भक्तिगीत आणि अभंग गायक म्हणून ज्या 'गानसमर्था'स पाहतोय तो लहानपणी एकदम वेगळा होता. लहानपणी त्यांना संगीताची आवड नव्हती.  एकदम मनस्वी आणि स्वच्छंदी मुलगा. क्रिकेट खेळण्याची विशेष आवड.. मोठेपणी खूप शिकून डॉक्टर आणि त्यातही सर्जन बनायचं उराशी बाळगलेलं छान स्वप्न आणि त्या दृष्टीने आयुष्याची वाटचाल सुरू.

वयाच्या आठव्या वर्षी अजित कडकडेंची त्यांच्या आई वडिलांनी नरसोबाची वाडी इथे मुंज केली. यावेळी कृष्णा नदीच्या पात्रात उतरलेला तो आठ वर्षांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊ लागला. त्याला पाहणाऱ्या तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला. वडील पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीने महत्प्रयासाने अजित कडकडेंना पाण्याबाहेर काढले. अशा प्रकारे श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी इथे अजित कडकडेंचा वयाच्या आठव्या वर्षी एका अर्थाने पुनर्जन्मच झाला असे म्हणावयास हवे.

आपल्या वडिलांचा आग्रह म्हणून त्यांनी गोव्यातील माडये गुरुजींकडे गाणं शिकण्यास सुरुवात केली. खरंतर तेव्हा अजितजींची गाणं शिकायची इच्छा नव्हती, त्यांच्या मूळ आवडीनिवडी वेगळ्या असल्याने त्यांचं मन संगीत शिक्षणात रमेना. अशातच एकदा गाण्याची परीक्षा असताना घरातून "परीक्षेला जातो" असं सांगून बाहेर पडलेला अजित मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला. मनसोक्त खेळून घरी आल्यावर बघतो तर काय, त्याचे संगीत शिक्षक माडये गुरुजी त्याच्या आधीच घरी हजर !! आज आपली करामत घरी कळली असणार असं लक्षात आल्याने वडिलांचा ओरडा खाण्याची शक्य तेवढी मानसिक तयारी करूनच अजितने घरात पाऊल टाकले. परीक्षेलाही न बसण्याइतकी गाण्याप्रतीची नावड पाहून अजितच्या वडिलांनी आपल्या मुलाला गाणं शिकवण्याचा विचारच सोडून दिला..

डिचोली गावात पं.जितेंद्र अभिषेकी बुवांची मैफिल

संपादन

दिवसांमागून दिवस जात होते. एके दिवशी अजित कडकडेंच्या डिचोली गावात प्रसिद्ध गायक, संगीतकार पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या गाण्याची मैफिल होती. ती मैफिल बघायला अजित कडकडेही गेले. तेव्हा त्या मैफिलीत बुवांचे शास्त्रीय संगीत गायन, तानपुरे लावणे, बसण्याची आणि गायची शैली, सूर-भाव-ताल-लय हे सगळं बघून तो तरुण अजित एकदम भारावून गेला. आयुष्यात एखाद्या गोष्टीचं क्षणार्धात आपल्याही नकळत आपल्याला वेड लागावं आणि तेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय बनावं असं काहीसं अजितचं त्या मैफिलीनंतर झालं. घरी आल्यानंतर आपल्या वडिलांना अजित कडकडेंनी सांगितलं, "बाबा मला गाणं शिकायचंय.." हे ऐकून त्यांच्या वडिलांना आनंद झाला खरा, पण आपल्या मुलाचं पुढचं वाक्य ऐकून मात्र त्यांना धक्का बसला.. अजित पुढे म्हणाला, "हो बाबा, मला गाणं शिकायचंय आणि तेही फक्त पं.जितेंद्र अभिषेकी बुवांकडेच..!!" वडिलांना आधी वाटलं, आपला मुलगा आत्ताच ती दैवी मैफिल बघून आलाय, त्या तात्पुरत्या प्रभावाखाली जाऊन असं बोलत असेल असं समजून त्यांनी आधी दुर्लक्ष केलं. पण नंतर एक दिवस झाला-दोन दिवस झाले-आठवडा झाला, पण मुलाचा हट्ट तस्साच !! "बाबा मला अभिषेकी बुवांकडे घेऊन चला, मला त्यांच्याकडेच गाणं शिकायचंय.."

आता मात्र वडिलांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आपल्या मुलाला सोबत घेऊन पं.जितेंद्र अभिषेकी बुवांचं घर गाठलं.. तेव्हा अजितचं वय होतं जेमतेम १८.

बुवांच्या घरी आलेल्या अजित कडकडेंकडे बघून बुवा म्हणाले, "मला तुझ्या गळ्याची परीक्षा बघायची आहे. थोडंसं काहीतरी गाऊन दाखव पाहू." बुवांच्या या वाक्यावर अजित काहीतरी गायला खरा, पण त्या आधी गळ्यावर संगीत संस्कार जवळपास काहीच झालेले नसल्याने तो अत्यंत बेसूर गायला. त्याची ती गाण्याची अजिबात नसलेली तयारी पाहून बुवा म्हणाले, "माझ्याकडे एवढ्या प्राथमिकतेपासून शिकणारे लोक नाहीयेत, माझ्याकडे अलंकार-विशारद झालेले लोक गाणं शिकायला येतात. आणि याला तर साधा षड्जही लावता येत नाहीये, तुम्ही असं करा, याला वर्ष-दोन वर्षं कुणाकडेतरी संगीताचे प्राथमिक धडे घेऊद्या आणि नंतर माझ्याकडे घेऊन या. मग मी याला शिकवेन."

बुवांचा तो प्रस्ताव अजितला बिलकुल मान्य झाला नाही. त्याने तिथेच बाणेदारपणे उत्तर दिलं, "बुवा, मी गाणं शिकेन तर तुमच्याकडेच शिकेन अन्यथा अजिबात शिकणार नाही.."

त्याचा तो बाणेदारपणा, धीटपणा आणि दृढनिश्चय बघून बुवांना कौतुक वाटलं आणि त्यांनी त्याला गाणं शिकवायला होकार दिला. झालं. यावेळी अजितचं वय होतं जेमतेम १८. गाणं शिकण्यासाठी म्हणून अजित दररोज भल्या सकाळी बुवांच्या घरी येऊ लागला. बुवा त्यांच्या बाकीच्या शिष्यांना जे काही शिकवत ते अजित तिथे बसूनच ऐके. बुवा सांगतील ती त्यांच्या घरातली छोटी-मोठी कामं करे. आणि संध्याकाळी बुवांनी जायला सांगितल्यावर आपल्या घरी निघून येई.. हा दिनक्रम थोडेथोडके दिवस नाही तर तब्बल दोन वर्षं चालला. या दोन वर्षांत बुवांनी अजितला साधा षड्ज लावायलाही शिकवलं नाही. पण अजितने आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नव्हती. बुवा त्यांच्या इतर शिष्यांना शिकवत असताना अजितच्या कानावर जे संगीत पडत होतं ते अजित अगदी मनापासून श्रवण करीत असे आणि त्याचेच सतत मनन चिंतन करीत असे...

आणि तो दिवस उजाडला ज्या दिवसाने अजितच्या संगीत तपश्चर्येला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. नेहमीप्रमाणे अजित सकाळी बुवांच्या घरी आला. योगायोगाने तेव्हा बुवांचे इतर कोणीच शिष्य घरात नव्हते. आणि बुवांनाही काही कामानिमित्त घराबाहेर जायचे होते. ते अजितला म्हणाले, "हे पहा, मी जरा काही कामासाठी बाहेर जाऊन येतोय. तासाभराने मी परत येईन. तोपर्यंत तू इथेच थांब आणि घराकडे नीट लक्ष ठेव.." अजितने "बरं" असं म्हणून होकार दिला. बुवा बाहेर निघून गेले. घरात अजित एकटाच.. घरात कुणीच नसल्याने अजित गाऊ लागला. गेली २ वर्षे बुवा त्यांच्या बाकीच्या शिष्यांना जे शिकवीत ते अजितच्या कानावर पडत असे. त्यातलंच काहीतरी तो गाऊ लागला.

इकडे कामानिमित्त बाहेर गेलेले बुवा काही वस्तू विसरले म्हणून त्या घ्यायला परत आले. दारापाशी आले ते आतून कुणाचातरी गातानाचा आवाज ऐकून बुवा दारातच थबकले. हे गातंय कोण असा विचार त्यांच्या मनात क्षणभर चमकून गेला, पण पुढच्याच क्षणी त्यांच्या लक्षात आलं की हे गाणारा दुसरा तिसरा कुणीच नसून आपलाच 'अजित' आहे. थोडा वेळ तसेच दरवाजात थांबून नंतर ते आत गेले. त्यांना असं अचानक आलेलं पाहून अजितची थोडीशी धावपळ उडाली. त्याने गाणं थांबवलं. बुवांनी त्याला कौतुकाने विचारलं, "अरे तू हे सगळं कधी शिकलास?" अजित म्हणाला, "छे हो बुवा मी कुठलं शिकलोय? तुम्ही तुमच्या बाकीच्या शिष्यांना शिकवताना जे काही आजवर कानावर पडत आलं ते थोडंफार गुणगुणायचा प्रयत्न केला इतकंच. माझी चूक झाली, पुन्हा मी तुमच्या परवानगीशिवाय तानपुऱ्याला हात लावणार नाही.."

आपल्या शिष्याचं हे उत्तर ऐकून बुवा अतिशय प्रेमाने म्हणाले, "अरे, तुझी बिलकुल चूक झालेली नाही.. तू योग्यच केलंयस. खरंतर याच दिवसाची गेली दोन वर्षं मी वाट बघत होतो.. आजपासून मी तुला गाणं शिकवणार आहे.." असं म्हणून बुवांनी त्यांना यमन रागाची पहिली बंदिश शिकवली. इथून पुढे सलग दहा वर्षे अजित कडकडे बुवांच्याच घरी राहून 'गुरुकुल’ पद्धतीने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकले.

संगीत नाटकांतील भूमिका

संपादन

अर्वाचीन काळात संगीत नाटक परंपरा जिवंत ठेवण्यातही अजितजींचा मोलाचा वाटा आहे. आपले गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या इच्छेखातर १९७८ साली संत गोरा कुंभार या नाटकात अजितजींनी संत नामदेव ही भूमिका साकारली आणि याच नाटकाद्वारे त्यांचे संगीत नाटक रंगभूमीवर पदार्पण झाले. त्यानंतर संगीत संशयकल्लोळ (अश्विन शेठ), सौभद्र (श्रीकृष्ण), संगीत शारदा (कोदंड), कधीतरी कुठेतरी, संगीत महानंदा, अमृतमोहिनी, कुलवधू, यांसारख्या अनेक संगीत नाटकांत त्यांनी गायक + अभिनेता भूमिका साकारून सुमारे ८ ते १० वर्षे त्यांनी संगीत नाटकांमधून काम केले. त्यानंतर अभिषेकी बुवांच्याच परवानगीने अजित कडकडेंनी संगीत नाटकांत काम करणे थांबवले. कारण त्यांची आवड मैफिलीत गायन सादर करण्याची होती.

अजित कडकडे यांची भूमिका असलेली संगीत नाटके

संपादन
 • अमृतमोहिनी
 • कधीतरी कोठेतरी
 • कुलवधू
 • महानंदा
 • शारदा
 • संत गोरा कुंभार
 • संशयकल्लोळ
 • सौभद्र

अजित कडकडे यांची नाट्यगीते आणि स्वतंत्रपणे गायलेली काही भक्तिगीते

संपादन
 • ईश चिंता निवारील सारी (नाट्यगीत, नाटक शारदा)
 • कांता मजसि तूचि (नाट्यगीत, संगीत नाटक स्वयंवर)
 • गुरुविण नाही दुजा आधार (चित्रपटगीत, चित्रपट गोष्ट धमाल नाम्याची)
 • छत आकाशाचे आपुल्या (नाट्यगीत, नाटक कधीतरी कुठेतरी)
 • तारूं लागले बंदरीं (संतवाणी)
 • तुझ्या वरदाना जीव (नाट्यगीत, नाटक सोन्याचा कळस)
 • निघालो घेऊन दत्ताची पालखी (भक्तिगीत, संगीतकार नंदू होनप)
 • सजल नयन नीत धार बरसती (भक्तिगीत, संगीतकार अशोक पत्की)
 • परम गहन ईशकाम (नाट्यगीत, नाटक एकच प्याला)
 • पाहू द्या रे मज विठोबाचे (नाट्यगीत, नाटक गोरा कुंभार)
 • प्रेमा तिच्या उपमा नोहे (नाट्यगीत, नाटक वधूपरीक्षा)
 • मैफिलीचे गीत माझे (भावगीत)
 • या झोपडीत माझ्या (कविता)
 • वसुधातलरमणीयसुधाकर (नाट्यगीत, नाटक एकच प्याला)
 • वृंदावनी वेणू (संतवाणी)
 • सजल नयन नित धार (भावगीत)
 • सुकांत चंद्रानना पातली (नाट्यगीत, नाटक स्शयकल्लोळ)

प्रसिद्ध संगीतकार श्री. अशोकजी पत्कींशी निर्माण झालेली ओळख.

संपादन

बुवांच्या घरी अजितजींचे संगीत शिक्षण चालू असताना मराठी संगीतातले अनेक मोठमोठे गायक-संगीतकार बुवांना भेटायला येत असत. अशाच एका मोठ्या संगीतकारांपैकी एक मुख्य नाव म्हणजे श्री. अशोक पत्की. यांचे आणि बुवांचे फार सलोख्याचे संबंध असल्याने अशोकजींचे बुवांच्या घरी सतत येणं-जाणं असे. याचवेळी तिथे बुवांच्या घरी गुरुकुल पद्धतीने शिकणाऱ्या अजितजींची कडकडीत तालीम अशोकजी अनेकदा ऐकत. अजितजींचा तो पहाडी आणि वजनदार आवाज अशोकजींना फार भावला. एकदा बुवांच्या परवानगीने अशोकजींनी अजित कडकडेंकडून काही भावगीते गाऊन घ्यायचे ठरवले आणि त्याप्रमाणे कृतीही केली. ती भावगीते खूप लोकप्रिय झाली. अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल या दोघांनी अशोकजींच्या संगीत नियोजनाने नटलेली अनेक भावगीते गायली. पैकी अजितजींनी गायलेली "भक्तीवांचूनि मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी" आणि "सजल नयन नित धार बरसती" ही दोन भावगीते प्रचंड लोकप्रिय झाली. इतकी की खुल्या मैफिलींमध्ये ही दोन गाणी गाऊन घेतल्याशिवाय लोक अजितजींना मैफिल संपवूच देत नसत. बुवांच्या सक्त कडक शिस्तीत बहरात आलेल्या अजितजींच्या गायकीला न्याय देणारी निष्णात संगीतकार किमया या अशोकजींनी साधून अजितजींच्या आवाजाला साजेशी अनेक गाणी विशेषतः भावगीते अजितजींकडून गाऊन घेतली, आणि ती इतकी प्रचंड लोकप्रिय बनली की "सजल नयन" म्हणजे अजित कडकडे हे जणू समीकरणच बनलं. या गाण्यांना अगदी आजतागायत दुसऱ्या कुठल्याही गायकाचा चेहरा लाभला नाही. या दोन गाण्यांव्यतिरिक्त "नभ भरले घनमालांनी", "मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकिले"यांसारखी गाणीही अशोकजींनी संगीतबद्ध केली आणि अजित कडकडेंनी गायली जी अमाप लोकप्रिय झाली.

पं. गोविंदप्रसाद जयपुरवाले या दुसऱ्या गुरूंचे शिष्यत्व

संपादन

एकदा अजितजींची मैफिल संपल्यावर एक गृहस्थ त्यांना व्यासपीठाजवळ भेटायला आले आणि म्हणाले, "बेटा, कभी मेरे यहां आया करो, तुम्हारे गले में ऐसी चिजें भर दूंगा की तुम्हारी गायकी और उभर जाएगी ।"

ते गृहस्थ होते जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले. अजितजींनी त्यांचेही शिष्यत्व पत्करले. त्यांना पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून संत कबीर, संत मीराबाई, ब्रह्मानंद यांचे हिंदी अभंग गायची अतिशय सुंदर तालीम मिळाली. शिवाय अनेक गझलाही त्यांनी अजितजींना शिकवल्या. हे सगळे गीतप्रकार तेव्हा अजितजींसाठी नवीन होते आणि या सगळ्या प्रकारांचे सादरीकरण मूळ शास्त्रीय संगीत अथवा नाट्यगीते यांच्या सादरीकरणाहून कमालीचे भिन्न होते. त्यासाठी आवश्यक ते सौम्य आणि दिलखेचक गायकीचे संस्कार त्यांनी अजितजींच्या गळ्यावर अगदी पुरेपूर उतरवले. शास्त्रीय संगीत सुद्धा कायम ताकदीने न गाता शक्य तिथे हळुवारपणे गाऊन त्यातले सौंदर्य आणि नजाकत जपता आणि साधता आली पाहिजे ही नवी आणि महत्वाची शिकवण त्यांनी अजितजींना दिली. पं. गोविंदप्रसादजींचे शिष्यत्व पत्करल्याने अजितजींच्या गळ्यावर या माधुर्याने नटलेल्या दिलखेचक, सौम्य व हळुवार गायकीची एक वेगळीच नजाकत उतरली. या सगळ्या संस्कारांची आणि शिकवणींची शिदोरी एकत्र बांधून अजितजींनी संगीत साधनेच्या मार्गावर आपलं मार्गक्रमण अविरतपणे चालूच ठेवलं...

सहज योगाच्या सर्वेसर्वा माताजी श्री.निर्मला देवी यांच्यासमोर १९८५ साली प्रथम गायन मैफिल सादर करण्याचे सद्भाग्य अजितजींना लाभले. अजितजींचे गायन यावेळी सहज योग्यांच्या कमालीच्या पसंतीस उतरले. तेव्हापासून आजतागायत अजितजी सहज योगाच्या खूप कार्यक्रमांत गायले आहेत / गातात..

'देवाचिये द्वारी' कॅसेटची निर्मिती आणि अजितजींनी विविध संगीतकारांसोबत साकारलेले शेकडो अल्बम

संपादन

एकंदरीत पहायला गेलं तर १९८५ हे साल अजितजींच्या गायक म्हणून संगीत साधनेच्या प्रवासातील लोकप्रियतेचा आणि प्रसिद्धीचा एक अतिशय महत्वाचा टप्पाच ठरलं असं म्हणायला हरकत नाही. या विधानामागची कारणं दोन. एक म्हणजे माताजी श्री. निर्मला देवींसमोर सहज योगा शिबिरात पहिली मैफिल अजितजींनी १९८५ मध्येच साकारली ज्यामुळे त्यांना 'सहजयोग' या देशात आणि देशाबाहेरही चालणाऱ्या एका अतिशय मोठ्या संघटनेचं - योग परिवाराचं प्रचंड मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अजितजींची अगदी पहिलीच रिलीज झालेली स्वतंत्र कॅसेट.. 'देवाचिये द्वारी..'

१९८५ पूर्वी अशोकजी पत्कींनी संगीतबद्ध केलेली विविध भावगीतं, तसंच शास्त्रीय संगीत आणि नाट्यगीतं, अभंग, भक्तिगीतं अजितजी गात होतेच. पण सर्वार्थाने त्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र चेहरा असलेल्या अजरामर कलाकृतीने जन्म घेतला नव्हता. टेपरेकॉर्डर आणि कॅसेटचा जमाना तो. त्या जमान्यात सर्वसामान्य लोकांच्या अगदी मनामनांत आणि प्रत्येक घराघरांत पोहोचण्यासाठी एक जबरदस्त सांगीतिक अविष्कार कॅसेट्च्या माध्यमातून निर्माण होऊन तो सर्वसामान्य लोकांच्या हाती पडण्याची नितांत आवश्यकता होती. आणि ती पूर्ण केली 'देवाचिये द्वारी' या अल्बमने.

'देवाचिये द्वारी' या अल्बममधील एकूण आठपैकी सहा अभंग प्रभाकरजी पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आहेत, तर दोन अभंग ("आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा" आणि "अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आता") हे प्रभाकरजींचेच सुपुत्र केदारजी पंडित यांनी संगीतबद्ध केले आहेत. "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या" या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाने या कॅसेटची सुरुवात होते. प्रत्येक अभंगाच्या सुरुवातीला मिनिटभर श्री. वसंत बापट यांचे प्रास्ताविक निरूपणही आहे. जे आपल्याला त्या अभंगातील भावार्थाचा थोडक्यात परिचय करून देतं.

'देवाचिये द्वारी' हा पहिलाच अल्बम अमाप लोकप्रिय झाल्यानंतर जवळपास वर्षभरातच १९८६ साली अजितजींचे अजून दोन स्वतंत्र अल्बम आले. त्यातला एक म्हणजे 'भक्ती समर्पण' जो ११ मार्च १९८६ साली रिलीज झाला. या अल्बममध्ये अजितजींनी वेगळ्या ढंगाची श्रीकृष्णाची भजनं गायली आहेत. "भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी", "गोकुळात मनमोहन दिसला", "कसा कळेना तुला विसरलो कुणी साथीला दावा नंदलाला घुमव कृपेचा पावा", "तुजविण कोण हरि मज तारी" अशी एकापेक्षा एक सुंदर ठायलयीत गायलेली भजनं यात आहेत जी अजितजींनी गायली आहेत. या संपूर्ण अल्बमला संगीतबद्ध केलंय केदार प्रभाकर पंडित यांनी.

यानंतर २२ सप्टेंबर १९८६ साली 'साईंची पालखी' हा अल्बम आला ज्यात साईबाबांची भजनं आहेत. या अल्बमला पांडुरंग दीक्षित यांचं संगीत आहे आणि यातली चार भजनं अजितजींनी गायली आहेत.

यानंतर २२ डिसेंबर १९८६ रोजी अजितजींचा अजून एक अल्बम आला तो म्हणजे "वाट ती चालावी पंढरीची.." या अल्बममध्ये आठ विठ्ठल-अभंग आहेत. सगळे अजितजींनीच गायलेले आहेत आणि हे अभंगही संगीतबद्ध केलेत पांडुरंग दीक्षित यांनी. हाही अतिशय गाजलेला अल्बम आहे. "वचन ऐका हो कमलापती", "सकळ तीर्थांहूनि पंढरी मुकुट मणी", "टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची", "पायी खडावा गर्जती वाजती", "पैल आले हरि शंख चक्र गदा पद्म शोभे करि", "येई गा तू येई गा पंढरीच्या राया" "राम कृष्ण गोविंद" असे एकाहून एक भावपूर्ण अभंग आहेत या अल्बममध्ये. हे चारही अल्बम (देवाचिये द्वारी, साईंची पालखी, भक्ती समर्पण, आणि वाट ती चालावी पंढरीची) VENUS music कंपनीने निर्माण केले आहेत.

१९८६ साल संपेपर्यंत अजितजींच्या आयुष्यात आलेले प्रसिद्ध संगीतकार होते अशोकजी पत्की, पांडुरंग दीक्षित, प्रभाकर पंडित आणि केदार प्रभाकर पंडित. या चारही संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या चाली अजितजींनी स्वरबद्ध करून महाराष्ट्रातील भक्तिसंगीत गायन क्षेत्रावर आपली भक्कम पायाभरणी केली होती. या भक्कम पायावर कळस चढवणारे संगीतकार ठरले नंदूजी होनप, शांक-नील, विलासबुवा पाटील, अनिल मोहिले, प्रदीप वर्तक आणि स्वतः अजित कडकडे..... अजित कडकडेंनी स्वतः देखील अनेक अल्बम संगीतबद्ध करून गायले आणि ते जबरदस्त लोकप्रिय झाले.

अजितजींच्या संगीत प्रवासात त्यांना सर्वाधिक साथ देऊन विविध सांगीतिक रचनांचा मेरुमणी रचणारे संगीतकार ठरले ते नंदूजी होनप... प्रवीण दवणेंच्या रचनांना नंदू होनप यांच्या संगीताचा आणि अजित कडकडेंच्या सुरांचा परिसस्पर्श झाल्यावर काय चमत्कार होऊ शकतो याचा दिव्य अनुभव महाराष्ट्राने १९८७ साली घेतला. निमित्त होतं 'दत्ताची पालखी' अल्बम रिलीज होण्याचं. १२ फेब्रुवारी १९८७ रोजी 'दत्ताची पालखी' हा अल्बम रिलीज झाला. T series म्युझिक कंपनीने हा अल्बम काढला.  यात एकूण आठ दत्तभजनं आहेत, पैकी चार अजितजींनी गायली आहेत तर चार अनुराधा पौडवाल यांनी गायली आहेत. या आठही रचना शब्दबद्ध केल्या आहेत प्रसिद्ध कवी, लेखक प्राध्यापक प्रवीणजी दवणे यांनी तर संगीतबद्ध केल्या आहेत नंदूजी होनप यांनी. हा अल्बम इतका प्रचंड गाजला की भक्तीगीत गायक म्हणून प्रसिद्ध झालेले अजितजी भक्तीगीत गायनात सुद्धा ‘दत्त आणि स्वामी समर्थांची भजनं' गाणारे म्हणून सर्वमान्यता पावले. अजितजींना सर्वाधिक लोकप्रियता दत्तभजनांनीच मिळवून दिली.

प्रवीणजी दवणे गीतकार, नंदूजी होनप संगीतकार आणि अजित कडकडे गायक असं हे 'दत्ताची पालखी' अल्बमच्या निमित्ताने एकत्र आलेलं त्रिकुट. या त्रिकुटाने 'दत्ताची पालखी' अल्बम नंतर जवळपास ३०-३२ वर्षे एकत्र काम करून इतके अचाट सांगीतिक विक्रम केले की त्यांची तोडच नाही. दत्तप्रभू, गणपती, शेगावचे श्री. गजानन महाराज, शिर्डीचे साई बाबा, अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ या आणि अशा कित्येक देव-देवता-संतांवर या त्रिकुटाने रचना लिहून-संगीतबद्ध आणि सुरबद्ध करून त्या अल्बमच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या. अजितजींचे विविध संगीतकारांनी संगीतबद्ध केलेले सर्व अल्बम जवळपास साडेतीनशेच्या आसपास जातील. आणि नंदू होनप (संगीतकार), प्रवीण दवणे (गीतकार) आणि स्वतः अजितजी (गायक) असे तिघांनी निर्मिलेले अल्बमच जवळपास अडीचशे च्या घरात पोचतील.

याशिवाय विलासबुवा पाटील यांनीही त्यांच्या उत्कृष्ट सांगीतिक नियोजनाने अजितजींकडून अनेक अभंग आणि गौळणी गाऊन घेतल्या. विलासबुवा पाटील हेही उत्तम संगीतकार होते. "लंगडा गं लंगडा लंगडा गं लंगडा देव एका पायाने लंगडा, असा कसा असा कसा असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठकडा" ही अजितजींनी 'तोडी' रागावर आधारित गायलेली गौळण सुद्धा विलासबुवांनीच संगीतबद्ध केलेली आहे. याशिवाय "डोळे मोडीत राधा चाले", "झोली भरकर लाना", "बोलो हरि बोलो", "खेती करो हरि नाम की", "जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं", "वेढा रे पंढरी", "मुरली मनोहर रे", "भुलविले वेणू नादे", "पाहिला सखा पांडुरंग", "पंढरीचा निळा लावण्ण्याचा पुतळा", "खायेबा साखर लोणी माझ्या बाळा", "ओम गणनाथ गणपती", "नमोस्तुते नारायणी नमोस्तुते", "अवधूत म्हणजे आकाशासारिखा", हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी", "कैसे वेड लाविले या हरि ने", "नाम तुझे बरवें गा शंकरा", "जे शंभूने धरिले मानसी तेचि उपदेशिले गिरिजेसी", "धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा", "किती बेलाची आवडी", "पावला प्रसाद आता उठोनि जावें" यांसारख्या असंख्य गौळणी-अभंग-कबीर भजनं विलासबुवांनी संगीतबद्ध केली आहेत जी अजित कडकडेंनी गायली.

विलासबुवा पाटील यांनी संगीतबद्ध केलेले आणि अजितजींनी गायलेले 'अष्टस्तुती सुमनांजली', 'पांडुरंग श्रीरंग', 'बोलो हरि बोलो', आणि 'शिव माझा भोळा' हे अल्बम प्रचंड लोकप्रिय झाले. अजितजींच्या भक्तिसंगीत गायनात विलासबुवा पाटील या आगळ्यावेगळ्या संगीतकाराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक नियोजनाने विशेषतः गौळणींना दिलेल्या संगीताने काहीशी नटखट शैली आणली हेच खरं आहे.

प्रदीप वर्तक यांनी संगीतबद्ध केलेली काही भावगीते सुद्धा अजितजींनी गायली आहेत. घनमेघ बरसती धारा हे अजितजींचं अत्यंत गाजलेलं भावगीत 'प्रदीप वर्तक' यांनीच संगीतबद्ध केलेलं आहे.

अजित कडकडेंनी स्वतः संगीतबद्ध केलेली गाणी

संपादन

१९८७ साली अजित कडकडे यांनी कवयित्री सौ.स्मिता म्हात्रे यांच्या ७ पद्यरचना घेऊन त्यांना स्वतःच संगीत देऊन त्या गायल्या. हा त्यांनी स्वतः संगीतबद्ध करून गायलेला पहिलाच अल्बम होता. 'भक्ती सुरसंगम' असे त्या अल्बमचे नाव होय. त्यानंतर पाठोपाठ १९८९ साली 'तुझे नाम आले ओठी' हा अल्बम निघाला. या अल्बममध्येही ८ गाणी असून ती सर्व सौ.स्मिता म्हात्रे यांनी लिहिलेली आणि अजित कडकडेंनी स्वतः संगीतबद्ध करून गायलेली आहेत. त्यानंतर थोर दत्तभक्त विनायकबुवा साठे यांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंम्ब्ये स्वामी महाराजांवर लिहिलेल्या ८ पदांना अजितजींनी स्वतः चाली देऊन 'नमो गुरवे वासुदेवाय' हा अल्बम १९९० मध्ये निघाला. त्याचवर्षी अजित कडकडेंनी संत कैकाडी बुवांचे ८ अभंग स्वतः संगीतबद्ध करून गायले.. (अल्बम संत दर्शन महिमा). यासोबत विठुराया माझा नामक कैकाडी बुवांच्या रचना असलेला आणि अजितजींनी स्वतः संगीत देऊन गायलेला अल्बमही फार गाजला. ही सर्व गाणी ऐकल्यावर अजित कडकडे हे केवळ उत्कृष्ट गायक नसून एक उत्तम संगीतकार सुद्धा आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

पुरस्कार

संपादन

१५. डिसेंबर २०१७ मध्ये करवीर पिठाचे शंकराचार्य यांचेकडून अजितजींचा 'गानसमर्थ' हा पुरस्कार देऊन गौरव

अजितजींचं गेल्या जवळपास ४० वर्षांमधलं भक्तिसंगीत, अभंग आणि एकूणातच संगीत क्षेत्रातलं योगदान पाहून २०१७ साली त्यांचा करवीर पिठाचे शंकराचार्य यांनी 'गानसमर्थ' हा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला.

मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. यासोबतच यापूर्वी अजितजींना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या मराठी चित्रपट महोत्सवात अजितजींना 'आई पाहिजे' या चित्रपटातील पार्शवगायनासाठी 'उत्कृष्ट पार्श्वगायक' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे (१९८८-८९)

२०१७ सालीच त्यांना 'स्वरभास्कर' ही पदवी सुद्धा मठाधीश श्री. सुखानंद स्वामी यांनी प्रदान केली आहे.

परमपूज्य श्री. सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळातर्फे त्यांना 'भक्ति रसगंधर्व' ही पदवी बहाल करण्यात आली आहे.

२०१४ साली त्यांना तराणा संगीत महोत्सवात 'तराणा सन्मान' पुरस्कारही मिळाला आहे.

'मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' सुद्धा अजितजींना मिळालेला आहे.

संगीतातील योगदानाबद्दल गोवा सरकारकडून सन्मानपत्र देऊनही त्यांना गौरवण्यात आलं आहे.

असे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, यादी करावी तितकी कमीच आहे.

वर्तमानकाळातले जीवन

संपादन

अजितजींचे सध्या मुंबईत सांताक्रूझ येथे वास्तव्य आहे. कार्यक्रमासाठी जिथून बोलावणे येईल तिथे कार्यक्रम करायचे, एरवी घरात संगीत साधना, अध्यात्म साधना करायची, विविध धार्मिक ठिकाणी जाऊन संत महापुरुषांच्या आश्रमांना भेटी द्यायच्या त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, आपल्या चाहत्यांसाठी वेळ द्यायचा आणि एकूणातच सर्वांना प्रेम वाटायचे असे अजितजींचे अत्यंत सुखी समाधानी जीवन चालू आहे.

"तुमच्या आयुष्यावर तुम्ही सुखी आहेत का? आजपर्यंत काय मिळवलेत आणि अजून काय मिळवायची इच्छा आहे?" असं विचारल्यावर अजितजी म्हणतात,

"माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी माझ्या इच्छेने घडल्याच नाहीत. मला गायक व्हायचं नव्हतं, पण मी गायक झालो. मला गायक झाल्यानंतरही अभंग भक्तिगीतं गायची विशेष आवड नव्हती, पण आज मी 'भक्तीगीत गायक' म्हणूनच प्रसिद्ध आहे. माझं आयुष्य ईश्वरी नियोजनानेच सुरू आहे. माझ्या इच्छेला त्यात काहीच महत्व नाही. जे आहे त्यात मी सुखी आहे. जे मिळालं त्याचा आनंद आहे, जे नाही मिळालं त्याचं दुःख बाळगणं मी केव्हाच सोडून दिलं आहे. आपल्यावर प्रेम करणारी असंख्य माणसं या कलेने मला दिली आणि मलाही सर्वांवर प्रेम करायला शिकवलं. त्यामुळे मी अतिशय सुखी आहे.."

गोव्यासारख्या ठिकाणी जन्मून सुद्धा अजितजी लहानपणापासून पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यांना प्राणिमात्रांबद्दल, पशुपक्षांबद्दल अतिशय प्रेम आहे. भूतदया त्यांच्या ठायी ठायी भरलेली आहे. अजितजी जेवढ्या प्रेमाने प्राणिमात्रांवर प्रेम करतात तितक्याच प्रेमाने प्राणीही त्यांच्याजवळ जातात. अजितजींना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांच्या घरी अक्षरशः ग्रंथभांडार म्हणावे इतकी पुस्तके आहेत.

अजितजींच्या एकूणच स्वभावात कुठलाही बडेजाव नाही.एकदम साधी सरळ राहणी. मनात ईश्वराप्रती, गुरुंप्रती प्रचंड भक्तिभाव, संतांप्रती विलक्षण आदर, गरिबांप्रती कणव, घरी आलेल्याला कुणालाही जेऊ घालण्याची प्रचंड आवड.

शिस्तप्रिय, पण तरीही अतिशय नम्र स्वभाव.. अशी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील.

काही विशेष ठळक बाबी.

संपादन

१) अजित कडकडेंचे अभंग-गौळणी-भक्तिगीते-भावगीते यांसोबतच नाट्यगीतांचेही अनेक अल्बम आहेत. 'नाट्यबंधातली ठेव ही', 'नाट्य-धनराशी', 'टॉप-१० नाट्यसंगीत मैफिल', 'नॉन-स्टॉप २० सुगंधित नाट्यपुष्पे' 'नाट्य-स्वरधारा' यांसारख्या अनेक अल्बम मधून अजितजींच्या पहाडी आवाजातली नाट्यगीते आपण ऐकू शकतो. अभंग-भक्तिगीते अतिशय भावूकपणे गाणारा हा अवलिया गायक नाट्यगीते मात्र जबरदस्त जोरकसपणे आणि आपल्या खास आक्रमक शैलीत गातो.

२) अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अजितजींनी पार्श्वगायक म्हणून काम केले आहे. 'तोचि एक समर्थ', 'आई पाहिजे', 'गोष्ट धमाल नाम्याची' यांसारख्या चित्रपटांमध्ये अजितजींनी गायलेली गाणी खूप गाजली आहेत. "गुरुविण नाही दुजा आधार", "अलौकिक दत्तात्रेय अवतार", यांसारखी त्यांची अनेक गाणी गाजली.

३) दूरदर्शनवर (DD.National) लागणाऱ्या 'भारत एक खोज' नामक कार्यक्रमात 'महाकवी कालिदासाच्या' भागांमध्ये अजितजींनी पार्श्वगायन केले आहे. यात महाकवी कालिदासाच्या तोंडी असलेली पदे अजितजींनी गायली आहेत. किंबहुना कालिदासाचा गातानाचा आवाज अजित कडकडेंचाच आहे. "ये कँधेपर कसा मैल कान्होबा ना वल्कल", "दूर जाकर भी न तुम मेरे हृदय से दूर हो सकती", "मदिरनयनी" यांसारखी एकापेक्षा एक दर्जेदार पदे अजितजींनी गायली आहेत.

४) संत कबीर, संत मीराबाई, संत ब्रह्मानंद यांची हिंदी भजनं सुद्धा अजितजींनी अगदी शास्त्रीय पद्धतीने गायलेली आहेत. त्यांच्या चलचित्रफिती युट्युबवर उपलब्ध आहेत. एकूण आठ भजनं युट्युबवर अजितजींच्या आवाजातली आहेत. युट्युबवर 'Bhaktimala Bhajan by Ajit Kadkade' असं शोधल्यास या भजनांच्या चलचित्रफिती आपल्यासमोर येतील. एक एक भजन दहा दहा मिनिटे सुंदर आळवून स्वरबद्ध केलं आहे.

५) अनेक मराठी मालिकांची शीर्षकगीतेही गायली आहेत अजितजींनी. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर लागणाऱ्या स्वामी समर्थांच्या 'कृपासिंधू' मालिकेचे शीर्षकगीत "कृपासिंधू स्वामी समर्थ महाराज" हे अजितजींनीच गायलेले आहे.

बाह्य दुवे

संपादन