कर्नाळा पक्षी अभयारण्य

(कर्नाळा अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)

पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याआसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून सरंक्षित आहे.

कर्नाळयाला एका वर्षात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस कि.मी. परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई -चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट, कोतवाल,पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे,ससे इत्यादी प्राणीही आढळतात.

हे अभयारण्य रायगड जिल्हयात पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६२ कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.[ संदर्भ हवा ] कर्नाळा येथे निरनिराळया प्रकारचे वृक्ष असून येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात.

कर्नाळा किल्ला

संपादन

पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर ट्रेल) पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती आहेत.

कर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर आहे. दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढताना तटबंदी लागते. त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठय़ासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता जाणवते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. नजरेच्या टप्प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचेच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.