जांभूळ
जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. प्राचीन साहित्यामधील वर्णनाप्रमाणे भारतात हा वृक्ष सहज दिसे,म्हणुनच भारताला जंबुद्विप असेे नाव आहें.याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. या वनस्पतीला संस्कृतमध्ये फलेन्द्रा, सुरभीपत्रा व जम्बु अशी नावे आहेेत .शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी(syzygium cumini) असे आहे.
उपयोग
संपादनऔषधी गुणधर्मांचा उपयोग
संपादनजांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे [१]. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे[२]. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते.
याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते. अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे.
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. महाभारतातल्या भीष्म पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे (हिंदुस्थानचे) नाव नाव जम्बू द्वीप असे पडले'. रामायणात, बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. कालीदासांना मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा पोपट वैशंपायन कोकिळाच्या डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. लवंगाची व निलगिरीची झाडे याची कुलबंधू असल्याने हे कूल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
स्थान
संपादनमूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सापाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते. माफक तापमान, उत्तम निचरा होणारी जमीन, ३०० इंचापर्यंत वार्षिक पर्जन्यमान या झाडास चालते.
जाती व आकारमान
संपादननैसर्गिक लागवड बियांपासून होते. तर संकरित जातींची लागवड कलम पद्धतीने करतात. मुख्य जाती म्हणजे मधुर फळाचा वृक्ष उर्फ ‘राजजम्बू’ व लहान आकाराच्या, कमी गराच्या फळांचा वृक्ष म्हणजे ‘क्षुद्रजम्बू’ किंवा ‘काष्ठजांभूळ’. माथेरानला सर्वत्र वाढणारी ‘लेंडीजांभूळ’ दुसऱ्या प्रकारात मोडते. मुख्यत: उष्ण कटिबंधीय देशांतून वास्तव्य असलेला हा वृक्ष सरळसोट १५० फुटांपर्यंतसुद्धा वाढतो, खडकाळ भूमीत मात्र यास ठेंगणे रूप प्राप्त होते. पाने सुवासिक ग्रंथियुक्त असतात. ती चकचकीत चामड्यासारखी दिसतात. या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या कडेने स्पष्ट असणारी शीर पानाच्या खालपासून टोकापर्यंत जाते व इतर सर्व शिरांशी संयोग करते. या शिरेस ‘इंट्रामार्जिनल व्हेन’ अशी संज्ञा शास्त्रज्ञांनी दिलेली आहे व टी शीर या कुलांतील वनस्पतीचे ‘कुलभूषण’ ठरली आहे. जांभळाच्या झाडाची फुले नाजूक हिरवट, पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो व अंती फळ तयार होते. फळे अंडाकृती, प्रथम परिपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची तर अतिपक्व झाल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. या फळाची गणना ‘मृदुफळांत’ होते व ते साधारण २-२ १/२ इंच लांबीचे, लांबोड्या आकाराचे असते. फळात एकच बी असते.
जांभूळ वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असून ते पाण्यात कुजत नाही, रंग साधारण भुरकट तपकिरी असून त्याच्या प्रत्येक घन फुटाचे वजन २०-२२ किलो भरते. लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी, छोटी अवजारे बनविण्यासाठी करतात. फांद्या,खोड यांचा उपयोग जळणासाठी व पाल्याचा उपयोग गुरांच्या चारासाठी होतो. चांगली वाढलेली जांभूळ शेतकऱ्यास वर्षात ५० किलो उत्पन्न देते. फळमाशा व खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करावे लागते.
उपयोग
संपादनहा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तसेच पाने ठेचून लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र करून ६ महिने ठेवल्यास उत्तम लोहक्षार मिळतो. जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी केला असल्यास नवल नाही. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी, पोटात घेण्यास जांभूळ फळ तर बाहेरून केसाला लावण्यास अर्क, याविषयी जुन्या ग्रंथातून उल्लेख आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू व बौद्ध धर्मीय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलेला आहे. त्यामुळे हा वृक्ष जरी वन्य असला तरी बऱ्ऱ्याशा उद्यानातून, उपवनातून, देवळाभोवती व देवरायांतून लावलेला आहे. गणेश ,शिव, कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय असतात असा समज आहे. काही ठीकाणी जांभळाच्या पानाचे तोरण मंगल समयी दाराला लावण्याची प्रथा आहे. ढगांचा राजा ‘वरून’ पृथ्वीवर जांभूळ वृक्षाच्या स्वरूपात अवतरला आणि म्हणूनच त्याच्या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला असाही लोकसमज आहे. सुसर आणि जांभूळ वृक्षावरील माकडाचे काळीज ही एक लोकप्रिय नीतिकथा आहे. जांभूळ व माकडे यांचे अतूट नाते दिसते, ते या पूर्वापार चालत आलेल्या कथेचे बीज असावे. तिरूचिरापल्ली शहरानजीकच्या महादेव मंदिरात एक अजस्र डेरेदार जांभूळ वृक्ष आहे. हा महादेव ‘जम्बुकेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे.
जांभूळ वृक्ष हा समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णीय वृक्षगटाचा अविभाज्य घटक आहे. अजनी, पिसा, हिरडा, आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, वासोटा, कोयना परिसर, सावंतवाडी-आंबोली परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचा हा आवडता वृक्ष आहे. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन या गोष्टी बहुधा त्यांच्यामुळेच होतात. जंगलातील मसण्या उद व कोल्हे हे प्राणी जांभळे खातात. पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांना हे फळ फार आवडते. या झाडाचा फुलोरा मधमाश्या, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्या माशा यांना आकर्षित करतो. या वृक्षाच्या पानावर रेशमाचे किडे (टसर सिल्क वर्म) उत्तमरीत्या पोसले जातात.
तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लगडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठालगतच्या ओव्हल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणाऱ्यांच्या पायाखाली येऊन जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाडे आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत एकटाच उभा आहे. वांद्त्याच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाचे दर्शन ठिकठिकाणी होते. राणीचा बाग, हॅंगिंग गार्डन, बोरीवलीचे राष्ट्रीय उद्यान, पवईचे उद्यान ही अनेक छोटी उद्याने जांभूळ वृक्षाचे संवर्धन करीत आहेत.
जांभूळ :
संपादनजांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.
जांभूळ हा अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करतात व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घेतात. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाचा रस काढून बरणीत भरून ठेवून एक वर्ष जाऊ देतात. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव एका वेळेस अर्धा तोळा पण चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळाया बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.जम्भूलामुळे दात घट्ट होतात
जाती
संपादनकृष्णगिरी ही जांभळाची जात कोइंबतूर भागात प्रसिद्ध आहे.
जांभळापासून तयार झालेली औषधे
संपादन- करेला + जामुन ज्युस
- करेला + जामुन पावडर
- जम्बवासव
- जम्ब्वासव
- DIABIT Capiules
- DIABNEX Tablets
- DIABOHILLS Tablets
- DIACONT Tablets
- मधुनाशिनी चूर्ण
- Syziginium Jambolicum (होमिओपथिक औषध)
सांस्कृतिक संदर्भ
संपादनहिंदू संस्कॄतीतील संदर्भ
संपादनजांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
संदर्भ
संपादन- ^ डॉ. रश्मी पाटील, डॉ. पी. एम. हळदणकर, डॉ. पी. सी. हळदवणेकर. "जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ". 2012-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. पौष कृ. १० शके १९३४ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "फळांचे औषधी उपयोग". पौष कृ. १० शके १९३४ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
संपादन- जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ Archived 2012-06-04 at the Wayback Machine.
- "सायझिजियम क्युमिनी (जांभूळ)" (इंग्लिश भाषेत). 2020-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)