दयाळ (पक्षी)

एक पक्षी
(दयाळ या पानावरून पुनर्निर्देशित)

दयाळ हा भारतीय उपखंडात व अशियाच्या बहुतांशी भागात आढळणारा पक्षी आहे. (शास्त्रीय नाव : Copsychus saularis ). ह्या पक्ष्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा सुरेख आवाज. पावसाळ्याच्या महिन्यात झाडीतून सुरेख आवाजात हा पक्षी गात असतो. एखादी सुरेख शीळ वाजवल्याप्रमाणे तो आवाज काढतो. तसेच शिळींमध्ये विविधता असते. याचे मुख्य खाद्य विविध प्रकारचे किडे व अळ्या हे आहे.

दयाळ

दयाळ पक्षी हा बांग्लादेशचा राष्ट्रीय पक्षी आहे. दयाळ (Oriental Magpie-Robin) या पक्ष्याचा म्युझिकापिडी (Musicapidae) या पक्षिकुलात आणि टर्डिडी या उपकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव कॉप्सिकस सॉलॅरिस (Copsychus saularis) असे आहे. kopsukhos या ग्रीक शब्दाचा अर्थ कृष्णपक्षी आणि सोलॅरिस या लॅटिन शब्दाचा अर्थ सूर्याशी संबंधित.

दयाळ पक्षाची महाराष्ट्रात वापरली जाणारी मराठी पुल्लिंगी नावे :- उसळी/हजोर उसळी (गोडी भाषेत); काबरो (भिल्लांच्या भाषेत); कालाचिडी; कालो करालो (पारध्यांच्या भाषेत); काळचिडी (नाशिक); खापऱ्या चोर; डोमिगा; दयाळ (पुणे), दहीगोल (चंद्रपूर), दहेंडी; पद‍उसीर (माडिया भाषेत), बडा चिविंच (कोरकू भाषेत); मडवळ (सिंधुदुर्ग), सुई (भंडारा),

स्त्रीलिंगी नावे :- गवळण, गुमदडी (गोवा), सुईन (चंद्रपूर).न

अन्य भाषांतील नावे :- काली सुई चिडिया, ग्वालिन, दयाल, दहंगल, दहिंगल, दहियर, दहियल, दोयल, महरी (सर्व हिंदी); अश्वक, अश्वकश्रीवद्‌, अश्वाख्य, करेटु, कालकंठ कलविंग, दध्यंक, दाधिक, नीलकंठ, भारत दध्यंक, श्रीवद्‌ पक्षी (सर्व संस्कृत); दैयड (गुजराती); पेद्द नलंचि, सरल गाडु (दोन्ही तेलुगू); उब्बेकुळ्ळ सुव्वि, मडिवाळ सुव्वि, मडिवाळ हक्कि (सर्व कानडी); गुंडू करिच्चान्‌, राबिन्‌ (दोन्ही तामीळ).

दाधिक या संस्कृत शब्द अर्थ दही विकणारा. अंगावर दही सांडल्यासारखे डाग असलेला हा पक्षी, म्हणून याचे नाव दाधिक किंवा दध्यंक. दयाळ, दहीगोल, दहेंडी हे शब्द दधीवरून आले. अश्व म्हणजे घोडा. हा पक्षी घोड्यासारखी शेपटी उडवतो, म्हणून याचे नाव अश्वक, अश्वाख्य वगैरे. काळ्या रंगाचा असल्याने कॉप्सिकस, काबरो, कालाचिडी, कालो करालो, काळचिडी ही नावे.


राजस्थानचा रखरखीत प्रदेश सोडून भारतात दयाळ सगळीकडे आढळतो. डोंगराळ भागात १,२२० मीटर उंचीपर्यंत तो सापडतो. झाडीत राहणारा असल्यामुळे तो झाडांच्या राईत आणि बागांत असतो. गावात आणि खेड्यापाड्यांत तो नेहमी दिसतो.

दयाळ आकाराने बुलबुल पक्ष्याएवढा असतो. नर काळा-पांढरा असतो, तर मादी नरासारखीच पण काळ्या रंगाऐवजी गर्द राखी रंगाची असते. दोघेही नेहमी शेपटी हलविताना दिसतात.

दयाळ हा गाणारा पक्षी आहे. मधुर आणि लांबलचक शीळ घातल्यासारखे याचे गाणे असते. सकाळी व तिसऱ्या प्रहरी एखाद्या झाडावर उंच ठिकाणी बसून हा गात असतो व मधूनमधून शेपटी उभारीत असतो. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही हा नक्कल करतो.

पहा : प्राण्यांचे आवाज

बाह्य दुवे

संपादन