विकिपीडिया:सदर/२०२३०४१५
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.
आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते. मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.