ओशो

भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक
(रजनीश या पानावरून पुनर्निर्देशित)

चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून, आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते.

ओशो

पूर्ण नावचंद्र मोहन जैन
कार्यक्षेत्र अध्यात्म
राष्ट्रीयत्व भारतीय
विकिक्वोट
विकिक्वोट
ओशो हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय (आणि नंतर आंतरराष्ट्रीय) माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली. सन १९७० मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले. शिष्य जमविण्यास आणि (नवसंन्यासी) आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४ मध्ये त्यांनी आश्रम स्थापला. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते.

१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगाॅन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्यूनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या. १९८५ मध्ये कम्यूनच्या नेतृत्वाने जैवदहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ओशोंनी उघड केल्यावर ऑरेगाॅन कम्यून कोसळले. लवकरच ओशोंना अटक झाली आणि देशागमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादादरम्यानच्या तडजोडीनुसार ओशोंना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि जगभ्रमंतीनंतर ते पुण्यात आले. १९९० मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. आज त्यांचा आश्रम ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र म्हणून ओळखला जातो. ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितिशील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेलीच दिसते आहे.

चरित्र

संपादन

बालपण आणि किशोरावस्था : १९३१-१९५०

संपादन

मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात असलेल्या कुचवाडा नावाच्या खेड्यात (आईच्या आजोळी) तारणपंथी जैन कुटुंबात चंद्र मोहन जैन ऊर्फ ओशो यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाबुलाल जैन हे कापडाचे व्यापारी होते. ओशोंनंतर त्यांना आणखी दहा अपत्ये झाली. ओशोंच्या आईचे नाव सरस्वती होते. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ओशो आजोळीच राहिले. खुद्द ओशोंच्या म्हणण्यानुसार आजीने दिलेल्या मोकळिकीचा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झाला. सातव्या वर्षी आजोबांचे निधन झाल्यानंतर ओशो गदरवारा येथे आपल्या आईवडिलांसोबत राहावयास गेले. आपल्या आजोबांच्या निधनाचा ओशोंच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ओशो १५ वर्षांचे असताना त्यांची बालपणातील मैत्रीण आणि चुलतबहीण शशी हिचा विषमज्वर होऊन मृत्यू झाला. मृत्यूच्या या दर्शनाने ते बालपणात आणि तारुण्यावस्थेत मृत्यूविषयी अधिक चिंतन करू लागले.[] शाळेत असताना ते बंडखोरपणे वागत असले तरी त्यांच्यातील प्रतिभा आणि दर्जेदार वाद-प्रतिवाद करण्याची त्यांची क्षमता लपून राहिली नाही.

विद्यापीठातील वर्षे आणि सार्वजनिक वक्ते : १९५१-१९७०

संपादन

इ.स. १९५१ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जबलपूरमधील हितकारिणी कॉलेजमध्ये ओशो महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले. निदेशकाशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर ओशोंना कॉलेज सोडावे लागले आणि जबलपूरमध्येच डी. एन. जैन कॉलेजात ते स्थलांतरित झाले. अध्यापकांशी निरंतर वाद घालण्याच्या सवयीमुळे कॉलेजमधील उपस्थितीतून त्यांना सूट मिळाली. केवळ परीक्षेसाठीच कॉलेजमध्ये यावे अशा सूचना मिळाल्याने रिकाम्या वेळात ओशो एका स्थानिक वृत्तपत्रात सहायक संपादक म्हणून काम पाहू लागले. जबलपूरमध्ये दरवर्षी तारणपंथी जैन समुदायाचे सर्व धर्म संमेलन आयोजिले जाते. या संमेलनात भाषणे करण्यास ओशोंनी सुरुवात केली. इ.स. १९५१ ते १९६८ या काळातील संमेलनांमध्ये ते सहभागी झाले. विवाहासाठी माता-पित्यांनी टाकलेल्या दबावास ते बळी पडले नाहीत. नंतरच्या काळात ओशोंनी दिलेल्या माहितीनुसार २१ मार्च १९५३ रोजी वयाच्या एकविसाव्या वर्षी जबलपूरमधील भंवरताल गार्डनमध्ये एका वृक्षाखाली बसले असताना त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले.

डी. एन. जैन कॉलेजात सन १९५५ मध्ये ओशो बी. ए. (तत्त्वज्ञान) झाले. सागर विद्यापीठातून सन १९५७ मध्ये ते विशेष प्रावीण्यासह एम. ए. (तत्त्वज्ञान) झाले. रायपूर संस्कृत कॉलेजमध्ये लागलीच त्यांना अध्यापकाचे पद मिळाले पण विद्यार्थ्यांच्या नैतिकतेला, चारित्र्याला आणि धर्माला ओशोंमुळे धोका आहे असे वाटल्याने उपकुलगुरूंनी ओशोंना बदली करवून घेण्याचा सल्ला दिला. सन १९५८ पासून ओशो जबलपूर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करू लागले, १९६० मध्ये त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. विद्यापीठातील कर्तव्ये सांभाळून ओशोंनी समांतरपणे आचार्य रजनीश (आचार्य म्हणजे गुरू, रजनीश हे त्यांचे बालपणातील टोपणनाव होते) म्हणून भारतभर प्रवास करून समाजवाद आणि महात्मा गांधी यांचे परीक्षण करणारी व्याख्याने दिली. समाजवादाने केवळ दारिद्ऱ्याचेच समाजीकरण होईल आणि गांधी हे दारिद्ऱ्याची पूजा करणारे आत्मपीडक प्रतिक्रियावादी आहेत, असे मत ओशो मांडू लागले. मागासलेपणातून बाहेर पडण्यासाठी भारताला भांडवलवाद, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे, असे ओशोंचे मत होते. पारंपरिक भारतीय धर्म मृतवत् आहेत, त्यांच्यात पोकळ धर्मकांडे आहेत, अनुयायांचे ते शोषण करतात अशी जहरी टीका ओशो करू लागले. अशा वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले, मात्र ओशोंना काही निष्ठावान अनुयायीही मिळाले. अशा अनुयायांमध्ये बरेच श्रीमंत व्यापारी आणि उद्योगपती होते. अशा अनुयायांनी देणग्या देऊन ओशोंकडून आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि दैनंदिन जीवनासाठी सल्ले घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू हे लोण देशभर पसरले. इ.स. १९६२ पासून ओशोंनी ३ ते १० दिवसांची ध्यान शिबिरे घेण्यास प्रारंभ केला आणि नंतर जीवन जागृती आंदोलन म्हणून विख्यात झालेली ध्यानकेंद्रे उदयास येऊ लागली. सन १९६६ मधील एका वादग्रस्त व्याख्यानसत्रानंतर विद्यापीठाच्या विनंतीनुसार त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

"सेक्स गुरू"

संपादन

अठ्ठावीस ऑगस्ट १९६८ मध्ये मुंबईच्या भारतीय विद्या भवन सभागृहात 'प्रेम' या विषयावरील पाच व्याख्यानांच्या मालिकेतील पहिले व्याख्यान ओशोंनी दिले. लैंगिक ऊर्जेच्या रूपांतरणातूनच प्रेम आणि ध्यान निर्माण होतात, असे त्यांनी म्हणले. लोकांमधून या मतावर संतप्त प्रतिक्रिया आल्या. आयोजकांनी व्याख्यानमाला रद्द केली. बरोबर एका महिन्यानंतर मुंबईतच गवालिया टॅॅंक मैदानावर प्रचंड श्रोतृसमुदायासमोर ओशोंनी व्याख्याने देऊन मालिका पूर्ण केली.[] नंतर संभोगातून समाधीकडे या नावाने प्रकाशित झालेल्या या व्याख्यानमालेमुळे भारतीय माध्यमांनी ओशोंना "सेक्स गुरू" अशी उपाधी दिली.

सन १९६९ मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत त्यांनी धर्मगुरूंवर स्वार्थीपणाचा आरोप केला आणि 'धर्म म्हणजे जीवनाचा आस्वाद कसा लुटावा हे शिकवणारी कला आहे' असे मत मांडले. त्यांच्या भाषणादरम्यान संतप्त झालेल्या पुरीच्या शंकराचार्यांनी भाषण थांबविण्याचा असफल प्रयत्न केला.

मुंबई : १९७०-१९७४

संपादन

सन १९७० मधील एका वसंतकालीन ध्यान शिबिरात ओशोंनी डायनॅमिक मेडिटेशन पद्धत प्रथम सादर केली. जूनच्या अखेरीस मुंबई सोडून ते जबलपूरला निघाले. सव्वीस सप्टेंबर १९७० रोजी त्यांनी नवसंन्यासींचा पहिला गट स्थापन केला.

ओशोंचे शिष्य अर्थात्‌ नवसंन्यासी होणे याचा अर्थ नवे नाव स्वीकारणे, विरागी हिंदू साधूंप्रमाणे नारिंगी वस्त्रे परिधान करणे असा होता. वैराग्यापेक्षा उत्सवपूर्ण जीवनशैली स्वीकारण्यास या नवसंन्यासींना प्रोत्साहन दिले जाई. स्वतः संन्याशाची पूजा होणे अभिप्रेत नव्हते, तर "फुलाला उमलण्यास उत्तेजन देणारा सूर्य" अशी भूमिका त्याने बजवावयाची होती.

इथवरच्या काळात ओशोंच्या सचिव म्हणून कार्य करणाऱ्या लक्ष्मी ठाकरसी कुरुवा त्यांच्या पहिल्या शिष्या ठरल्या आणि त्यांनी मा योग लक्ष्मी हे नाव घेतले. लक्ष्मींचे वडील धनवान होते आणि ओशोंचे अनुयायी होते. लक्ष्मींनीच पैसे उभे करून ओशोंचे प्रवास थांबविले. डिसेंबर १९७० मध्ये ओशो मुंबईतील वुडलॅंड्स अपार्टमेंटमध्ये निवासास गेले आणि व्याख्याने देत अभ्यागतांना भेटू लागले. इथेच त्यांना प्रथम पाश्चात्त्य श्रोते लाभले. यानंतर ओशोंचा प्रवास आणि सार्वजनिक सभांमधील व्याख्याने जवळजवळ बंद झाली. सन १९७१ मध्ये त्यांनी "भगवान श्री रजनीश" ही उपाधी स्वीकारली. "श्री" हा सन्मानसूचक शब्द आहे तर भारतीय परंपरेमध्ये ज्या व्यक्तीमधील देवत्व लपून राहिलेले नाही, स्पष्ट दिसू लागलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे "भगवान" ठरते.

मुंबई निवासस्थानी ओशोंचा वाढदिवस : ११ डिसेंबर १९७२

पुणे आश्रम : १९७४-१९८१

संपादन

मुंबईच्या दमट जलवायुमानामुळे ओशोंना मधुमेह, दमा आणि विविध प्रतिक्रियात्मक आजार अशा व्याधी जडल्या. सन १९७४ मध्ये ओशो पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये निवासास आले. मा योग मुक्ता (कॅथरीन व्हेनिझिलोस) हिच्या मदतीने त्यांनी ही जागा विकत घेतली होती. इथे सन १९८१ पर्यंत ओशो शिकवीत राहिले. ही जागा आजच्या ओशो आंतरराष्ट्रीय ध्यानकेंद्राच्या मध्यभागी आहे. या जागेवरच ध्वनिमुद्रण आणि नंतर ध्वनिचित्रमुद्रण सुरू झाले. ओशोंच्या व्याख्यानांचे मुद्रणही इथे सुरू झाले आणि त्यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार वाढला. पाश्चिमात्य अभ्यागतांची संख्या खूप वाढली. या जागेवर नंतर कपडे, दागदागिने, मृत्तिकाशिल्पे व सेंद्रिय सौंदर्यप्रसाधने बनविणारे केंद्र उभे राहिले; रंगमंच, संगीत व मूकाभिनयाचे कार्यक्रम इथे होऊ लागले. सन १९७५ नंतर पुण्यात ह्युमन पोटेन्शिअल मूव्हमेंटमधील मानसोपचारक आले आणि ध्यानासोबतच अशा उपचारपद्धती हा आश्रमाच्या मिळकतीचा मोठा स्रोत ठरला.

ओशोंचा पुण्यातील आश्रम ही एक गजबजलेली जागा होती. सकाळी ध्यान, मग 'बुद्ध हॉल'मध्ये एक ते दीड तासांची ओशोंची विविध विषयांवरील व्याख्याने आणि प्रश्नोत्तरे; दिवसभर विविध उपचार आणि रात्री ओशोंचा शिष्यांशी आणि श्रोत्यांशी वैयक्तिक संवाद, नव्या शिष्यांना दीक्षा देणे असा दिवसभराचा कार्यक्रम असे.

कोणत्या मानसोपचारांमध्ये सहभागी व्हावे याबाबत लोक ओशोंचा सल्ला घेत किंवा स्वतःच निवड करीत. आश्रमातील प्रारंभीचे काही उपचारगट हे प्रयोगात्म होते. काही गटांमध्ये शारीरिक आक्रमकतेला तसेच लैंगिक आक्रमकतेलाही थोडीफार मुभा होती. अशा काही गटांच्या उपचारांदरम्यान झालेल्या जखमांचे उलटसुलट तपशील वृत्तपत्रांमध्ये येऊ लागले. जानेवारी १९७९ मध्ये उपचारगटांमधील हिंसा संपुष्टात आली.

नंतरच्या काळातही आश्रमातील रहिवाशांकडून मादक द्रव्यांचा वापर, वेश्याव्यवसायासारखे प्रकार यांमुळे हा आश्रम वादग्रस्तच राहिला.

सत्तरीच्या दशकाच्या अखेरीस हा आश्रम ओशोंना अपुरा वाटू लागला आणि पर्यायी जागेसाठी चाचपणी सुरू झाली. आश्रम हलविण्याचे त्यांचा मानस कधीच प्रत्यक्षात उतरू शकला नाही. मोरारजी देसाई यांचे जनता पक्ष सरकार आणि आश्रमातील तणावाचे संबंध त्यासाठी कारणीभूत ठरले. भूमी-वापराची मान्यता रद्द केली गेली आणि पूना आश्रम हे मुख्य गंतव्यस्थान दाखविणाऱ्या परदेशी अभ्यागतांना प्रवेशपत्र देणे सरकारने बंद केले. देसाई सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने आश्रमाची कर-सवलत रद्द केली आणि अंदाजे पन्नास लाख रुपयांचा बोजा आश्रमावर पडला. विविध धार्मिक नेत्यांशी ओशोंचे असलेले मतभेदही आश्रम-स्थलांतराच्या आड आले. बावीस मे १९८० रोजी सकाळच्या व्याख्यानादरम्यान विलास तुपे नावाच्या हिंदू मूलतत्त्ववाद्याने ओशोंच्या दिशेने चाकू फेकला. स्थानिक पोलिसांना आधीच सुगावा लागलेला असल्याने ते सभागृहात हजर होते. पोलिसांनी तुपेला ताब्यात घेतल्यानंतर ओशोंनी व्याख्यान सुरूच ठेवले.[]

सन १९८१ पर्यंत ओशो आश्रमास दरवर्षी सुमारे ३०,००० पाहुणे भेट देत होते. रोजच्या व्याख्यानांमध्ये तेव्हा मोठ्या संख्येने युरोपीय आणि अमेरिकी असत. सत्तरीच्या अखेरीस ओशोंची व्याख्यानशैलीही बदलल्याचे निरीक्षण अनेकांनी मांडले आहे. बौद्धिक बाबींवर कमी भर आणि श्रोत्यांना धक्का देण्यासाठी किंवा त्यांच्या रंजनासाठी अनौपचारिक विनोद जास्त भर असे व्याख्यानांचे स्वरूप झाले होते. सुमारे १५ वर्षांच्या व्याख्यानांनंतर १० एप्रिल १९८१ रोजी ओशोंनी सार्वजनिक मौन स्वीकारले. ते सुमारे साडेतीन वर्षे कायम राहिले. व्याख्यानांची जागा सत्संगाने घेतली. त्यात संगीतमय वातावरणात शांतपणे बसणे आणि खलिल जिब्रानचे द प्रॉफेट किंवा ईशोपनिषद वाचणे अशा बाबींचा समावेश होता. याच काळात मा आनंद शीला (शीला सिल्व्हरमन) ह्या ओशोंच्या सचिव बनल्या.

अमेरिका आणि ऑरेगाॅन कम्यून : १९८१-१९८५

संपादन

इ.स. १९८१ मध्ये पूना आश्रम त्याच्या कार्यविधींमुळे संशयास्पद झाला होता. भारतीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आश्रम अमेरिकेला हलविण्याचा विचार पुढे आला. जून १९८१ मध्ये वैद्यकीय हेतू दाखवीत ओशो पर्यटकाच्या प्रवेशपत्रावर अमेरिकेत दाखल झाले. न्यू जर्सीमधील रजनीशी रिट्रीट सेंटरमध्ये (नवसंन्यासींना रजनीशी अशीही संज्ञा आहे) काही महिने ते राहिले. सन १९८१ च्या वसंतात ओशोंना चक्रभ्रंश (पाठीच्या कण्याचा एक आजार) झाल्याचे निदान करण्यात आले होते. अनेक नामांकित डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. परिस्थिती कथितरीत्या गंभीर असूनही कोणताही बाह्य उपचार करवून घेण्याचा प्रयत्न या काळात ओशोंनी केला नाही. त्यामुळे अमेरिकेच्या आप्रवास व नैसर्गिकरण सेवेला याच देशात राहण्याचा ओशोंचा हेतू आहे, अशी शंका आली. नंतर ओशोंनी आपल्या प्रारंभीच्या प्रवेशपत्र अर्जावर खोटी विधाने केल्याची कबुली दिली.

जून १९८१ मध्येच मा शीलाचे पती स्वामी प्रेम चिन्मय यांनी ऑरेगाॅन राज्यात एक रॅंच (मुख्यत: कुरण म्हणून वापरले जाणारे विस्तीर्ण क्षेत्र) विकत घेतले. त्याचे "रॅंचो रजनीश" असे नामकरण झाले आणि ऑगस्ट अखेरीस ओशो तिथे निवासास आले. वर्षभरातच या जमिनीच्या वापरावरून कायदेशीर खटले सुरू झाले. स्थानिक रहिवाशांशीही या कम्यूनचे संबंध सलोख्याचे नव्हते. रजनीशपूरम या नावाने शहराला अधिकृत मान्यता मिळावी अशा रजनिशींचा मानसही प्रत्यक्षात आला नाही. या घडामोडींदरम्यान नोव्हेंबर १९८४ पर्यंत हे सार्वजनिक मौन टिकले. या काळात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या शिष्यांना ओशो कारमधून दर्शन देत. तब्बल ९३ रोल्स-रॉयस त्यांच्याकडे जमा झाल्या. सन १९८३ मध्ये ओशो फक्त आपल्याशीच बोलतील अशी घोषणा शीलाने केली. अनेक संन्याशांच्या मनात शीला ही ओशोंची अधिकृत प्रतिनिधी असण्याबद्दल संदेह निर्माण झाला. या काळात शीलाच्या नेतृत्वाचा निषेध म्हणून अनेक संन्याशांनी आश्रम सोडला.

 
१९८२ च्या सुमारास रजनीशपूरममध्ये एका दैनिक फेरीदरम्यान ओशोंचे स्वागत करणारे नवंसन्यासी

नोव्हेंबर १९८१ मध्ये धर्मसेवक म्हणून आणि रजनीशवाद या धर्माचे प्रणेते म्हणून ओशोंनी रहिवासासाठी अर्ज दाखल केला. आजारी असणारा आणि मौन बाळगणारा माणूस धार्मिक नेता असू शकत नाही, असे कारण दाखवून हा अर्ज फेटाळण्यात आला. तीन वर्षांनंतर मात्र हा अर्ज स्वीकारण्यात आला आणि धार्मिक नेता म्हणून राहण्यास ओशोंना परवानगी देण्यात आली.

ऑरेगाॅनमधील वास्तव्यात ओशो आण्विक युद्धाबद्दल भविष्यवाणी करीत होते. सन १९६४ पूर्वीच त्यांनी "तिसरे आणि अंतिम युद्ध येते आहे" असे म्हणले होते. जागतिक संहार टाळण्यासाठी "नवमानवतेची" गरज ते प्रतिपादित करीत होते. मार्च १९८४ मध्ये शीलाने अशी घोषणा केली, की दोन-तृतीयांशाहून अधिक लोक एड्सने मरण पावतील असे ओशोंचे भाकित आहे. संन्याशींना संभोगादरम्यान रबराचे मोजे व निरोध वापरण्याची आणि चुंबनापासून दूर राहण्याची सूचना करण्यात आली. त्या काळात एड्सच्या प्रतिबंधासाठी निरोधचा वापर सार्वत्रिक नसल्याने माध्यमांनी याकडे अतिरंजितता म्हणून पाहिले.

या काळात खाजगी दंतवैद्याने दिलेल्या नायट्रस ऑक्साईडच्या प्रभावाखाली ओशोंनी तीन पुस्तके सांगून लिहविली : ग्लिम्प्सेस ऑफ अ गोल्डन चाईल्डहूड (सोनेरी बालपणाच्या दृष्टिभेटी), नोट्स ऑफ अ मॅडमॅन (वेड्या मनुष्याची टिपणे) आणि बुक्स आय हॅव लव्ह्ड (मला आवडलेली पुस्तके).

शीलाचे गैरप्रकार

संपादन

तीस ऑक्टोबर १९८४ रोजी ओशोंनी सार्वजनिक वक्तव्ये देणे सुरू केले. त्यांच्या सार्वजनिक मौनाच्या काळात शीला आणि तिच्या गटाच्या व्यवस्थानपनाविरुद्ध अनेक वाद झाले होते. एका बैठकीत सर्वांदेखत ओशोंनी शीलाला ताकीद दिली होती. शीलाच्या इच्छेविरुद्ध जाऊन जुलै १९८५ मध्ये त्यांनी दैनिक व्याख्याने सुरू केली. शीला व तिच्या संपूर्ण व्यवस्थापन चमूने अचानक कम्यून सोडून युरोपचा रस्ता धरला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओशोंनी शीला व तिच्या सहकाऱ्यांना 'हुकूमशहांचे टोळके' म्हणले. या टोळक्याने अनेक गंभीर गुन्हे केल्याचे सांगून ओशोंनी प्राधिकारी संस्थांना चौकशीसाठी आमंत्रित केले. आपल्या डॉक्टरचा जीव घेण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांना विषबाधा करविण्याचा प्रयत्न, दूरध्वनी संभाषणांवर नजर ठेवणे, छुप्या पद्धतीने कम्यूनमधील व ओशोंच्या निवासातील माहिती मिळविणे असे अनेक प्रकार शीला व तिच्या सहकाऱ्यांनी आपल्या संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय केल्याचे ओशोंनी म्हणले. साल्मोनेला नावाच्या जिवाणूचा वापर करून ऑरेगाॅनमध्ये जैवदहशत पसरविण्याचा गंभीर प्रकारही शीलाने केल्याचे त्यांनी म्हणले. चौकशीनंतर शीला व तिचे सहकारी दोषी आढळले आणि त्यांना शिक्षाही झाल्या.

तीस सप्टेंबर १९८५ रोजी "आपण धार्मिक शिक्षक नाही" असे ओशोंनी म्हणले. बुक ऑफ रजनीशिझम ह्या पुस्तिकेच्या ५,००० प्रती त्यांच्या अनुयायांनी जाळल्या. या पुस्तिकेत रजनीशवादाचे "धर्मरहित धर्म" असे वर्णन केले होते. शीलाचा आपल्या अनुयायांवरील अखेरचा प्रभाव दूर करण्यासाठी आपण पुस्तिका जाळण्याचा आदेश दिला, असे त्यांनी म्हणले. शीलाचे पोशाखही जाळण्यात आले.

तेवीस ऑक्टोबर १९८५ रोजी अमेरिकेच्या संघ न्यायालयाने ओशो व त्यांच्या काही शिष्यांवर आप्रवासाचे नियम टाळण्याचा कट रचल्याबद्दल कायदेशीर आरोप लावला. अधिपत्र निघण्याची वेळ आल्यास पोर्टलॅंडमधील प्राधिकाऱ्यांसमोर ओशोंना शरण जाण्याची परवानगी मागणाऱ्या ओशोंच्या वकिलांच्या वाटाघाटी फिसकटल्या. अठ्ठावीस ऑक्टोबरला नॉर्थ कॅरोलिना धावपट्टीवरील एका भाड्याच्या विमानात ओशो व काही संन्याशांना अटक करण्यात आले. खटला टाळण्यासाठी हा गट बर्म्युडाकडे निघाला होता, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. जाहीर दोषारोपणानंतर आपण निर्दोष असल्याचे ओशोंनी प्रारंभी सांगितले. नंतर मात्र जामीन मिळाल्यानंतर वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी काही आरोप कबूल केले. मूळ प्रवेशपत्राच्या अर्जात अमेरिकेत कायम राहण्याचा हेतू आपण उघड केला नव्हता हे त्यांनी कबूल केले. या खटल्याच्या सोडवणुकीसाठी झालेल्या तडजोडीनुसार ओशोंनी अमेरिका सोडून जावे आणि किमान पाच वर्षे अमेरिकेच्या महाधिवक्त्याच्या परवानगीशिवाय परत येऊ नये असे सुनावण्यात आले.

जगभ्रमंती आणि पुण्यात पुनरागमन : १९८५-१९९०

संपादन

सतरा नोव्हेंबर १९८५ रोजी ओशो दिल्लीत दाखल झाले. भारतीय अनुयायांनी त्यांचे स्वागत केले. सहा आठवड्यांसाठी ते हिमाचल प्रदेशात राहिले. त्यांच्या पथकातील अ-भारतीयांची प्रवेशपत्रे काढून घेण्यात आल्यावर ते नेपाळमधील काठमांडूला गेले. काही आठवड्यांनी ते क्रीटला गेले. ग्रीसच्या गुप्तहेर संघटनेच्या अटकेत काही काळ राहिल्यानंतर ते जिनिव्हाला पळाले, तिथून स्टॉकहोम आणि मग हिथ्रोला; पण प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आयर्लंड, स्पेन, सेनेगल, उरुग्वे, जमैका अशा भ्रमंतीनंतर ३० जुलै १९८६ रोजी ते मुंबईत परतले.

जानेवारी १९८७ मध्ये ते पुण्यातील आश्रमात परतले. आजारपण सांभाळून संध्याकाळची व्याख्याने त्यांनी सुरू केली. प्रकाशन आणि उपचारपद्धती पुन्हा सुरू झाल्या. सन १९८८ च्या प्रारंभापासून झेन मतावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. डिसेंबरमध्ये त्यांनी आपल्याला "भगवान" असे संबोधू नये अशी इच्छा व्यक्त केली आणि "ओशो रजनीश" हे नाव घेतले. सप्टेंबर १९८९ मध्ये "ओशो" असे ते सुटसुटीत करण्यात आले.

एकोणीस जानेवारी १९९० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची रक्षा आश्रमातील त्यांच्या नव्याने बांधलेल्या शयनकक्षात ठेवण्यात आली. तेथील समाधिलेख असा आहे : "ओशो. कधीही जन्मले नाहीत, कधीही मेले नाहीत. फक्त ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० या काळात त्यांनी या पृथ्वीग्रहाला भेट दिली."[]

शिकवण

संपादन

ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली. असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रूपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले.

ओशो यांनी अनेक बुद्ध पुरूषांवर प्रवचन दिले गौतम बुद्ध,लाओत्से,कबीर, रामकृष्ण परमहंस, अष्टावक्र, महावीर , मीराबाई, कृष्ण हे प्रमुख होते. त्यांची भाषा शैली आणि तर्क करण्याची पद्धत प्रभावशाली होती.त्यांचे प्रवचन ऐकणारे व्यक्ति त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत होते. एका प्रमुख पत्रकाने भारताला प्रभावित करणारे दहा महान पुरुषांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे.

जैन धर्म, हिंदू धर्म, हसिदी मत, तंत्र मार्ग, ताओ मत, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म अशा प्रमुख आध्यात्मिक परंपरांवर; विविध पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रहस्यवाद्यांवर आणि उपनिषदांसारख्या धार्मिक पवित्र ग्रंथांवर तसेच गुरू ग्रंथ साहिबवर ओशोंनी भाष्य केले. लुईस कार्टर या समाजशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हिंदू अद्वैत सिद्धांतात ओशोंच्या कल्पनांचा उगम आहे. ओशोंचे समकालीन असणाऱ्या जिद्दू कृष्णमूर्तींनी ओशोमताशी सहमती दर्शविलेली नसली तरी दोहोंच्या उपदेशांमध्ये स्पष्ट साम्य आहे.

अनेक पाश्चात्त्य कल्पनांचाही ओशोंनी वापर केला. विरोधांचे ऐक्य ही त्यांची कल्पना हेराक्लिटसची आठवण करून देते, तर मानवाचे यंत्र म्हणून त्यांनी केलेले वर्णन सिग्मंड फ्राईड आणि गुर्जेफ यांच्यासारखे आहे. पारंपरिक संकेतांच्या पलीकडे जाणाऱ्या "नवमानवा"ची त्यांची कल्पना नित्शेच्या बियॉंड गुड अन्ड ईव्हिलची आठवण जागवते. लैंगिक मुक्ततेवरील त्यांचे विचार डी. एच. लॉरेन्ससशी तुलना करण्याजोगे आहेत तर गतिशील ध्यानपद्धती विल्हेल्म राइखच्या पद्धतीवर आधारलेली आहे.

अहंकार आणि मन

संपादन

ओशोंच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मनुष्य हा उद्बोधनाची क्षमता असणारा, बिनशर्त प्रेमाची क्षमता असणारा, आयुष्याला प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देऊ शकणारा बुद्ध आहे. अहंकारामुळे मनुष्याची क्षमता प्रत्यक्षात उतरत नाही. सामाजिक बंधनांमुळे मनुष्य जखडलेला राहतो. अन्यथा मनुष्य त्याच्या आंतरिक सामर्थ्याने एका झटक्यात परिघातून निघून केंद्रात शिरू शकतो आणि फुलाप्रमाणे फुलू शकतो.

ओशोंच्या "दहा आज्ञा"

संपादन

आचार्य रजनीश म्हणून वावरत असताना एका संवाददात्याने ख्रिश्चन धर्मातील "टेन कमांडमेंट्स"च्या धर्तीवर ओशोंना त्यांच्या आज्ञा विचारल्या होत्या. प्रतिसादादाखल ओशोंनी आपण कसल्याही प्रकारच्या आज्ञेच्या विरोधात असल्याचे सांगितले. "फक्त गमतीसाठी" त्यांनी पुढील दहा आज्ञा सांगितल्या :

  1. तुमच्या आतूनही येत असल्याशिवाय कुणाचाही हुकूम मानू नका.
  2. खुद्द जीवनापलीकडे वेगळा परमेश्वर नाही.
  3. सत्य तुमच्यामध्येच आहे, त्याचा इतरत्र शोध घेऊ नका.
  4. प्रेम ही प्रार्थना आहे.
  5. शून्यत्व हे सत्याचे द्वार आहे. शून्यत्व हे स्वतःतच माध्यम, ध्येय आणि मिळकत आहे.
  6. जीवन इथे आणि आता आहे.
  7. जागृततेने जगा.
  8. पोहू नका - तरंगत रहा.
  9. नवा प्रत्येक क्षण स्वतःच बनण्यासाठी प्रत्येक क्षणात नष्ट व्हा.
  10. शोधू नका. जे आहे ते, आहे. थांबा आणि पहा.

क्रमांक ३, ७, ९ व १० या आज्ञा ओशोंनी अधोरेखित केल्या. ओशोंच्या चळवळीत ह्या आज्ञा निरंतर मार्गदर्शक ठरल्या आहेत.

निवडक साहित्यकृती

संपादन

येशूच्या शिकवणीवर

  • द मस्टर्ड सीड (द गॉस्पेल ऑफ टॉमस)
  • कम फॉलो टू यू

ताओ मतावर

  • ताओ : द थ्री ट्रेझर्स
  • दी एम्प्टी बोट
  • व्हेन द शू फिट्स

गौतम बुद्धावर

  • द धम्मपद
  • द डिसिप्लिन ऑफ ट्रान्सेंडन्स
  • द हार्ट सूत्र
  • द डायमंड सूत्र

झेन मतावर

वॉटर,नो मून
  • रिटर्निंग टू द सोर्स
  • अँड द फ्लॉवर्स शॉवर्ड
  • द ग्रास ग्रोज बाय इटसेल्फ
  • निर्वाणा : द लास्ट नाईटमेअर
  • द सर्च
  • डॅंग डॅंग डोको डॅंग
  • एन्शंट म्युझिक इन द पाईन्स
  • अ सडन क्लॅश ऑफ थंडर
  • झेन : द पाथ ऑफ पॅराडॉक्स
  • धिस व्हेरी बॉडी द बुद्धा

बाऊल फकिरांवर

  • द बिलव्हेड

सुफींवर

  • अन्टिल यू डाय
  • जस्ट लाईक दॅट
  • उनियो मिस्टिका

हसिडी मतावर

  • द ट्रू सेज
  • दी आर्ट ऑफ डायिंग

उपनिषदांवर

  • आय अ‍ॅम दॅट
  • द सुप्रीम डॉक्ट्रिन
  • द अल्टिमेट अल्केमी
  • वेदान्त : सेव्हन स्टेप्स टू समाधी

हिराक्लिटसवर

  • द हिडन हार्मनी

कबीरावर

  • एक्स्टसी : द फरगॉटन लॅंग्विज
  • द डिवाईन मेलडी
  • द पाथ ऑफ लव्ह

तंत्रावर

  • तंत्रा : द सुप्रीम अंडरस्टॅंडिंग
  • द तंत्रा व्हिजन

पतंजली व योगावर

  • योगा : दी अल्फा अँड दी ओमेगा

ध्यानावर

  • द बुक ऑफ सिक्रेट्स
  • मेडिटेशन : दी आर्ट ऑफ इनर एक्स्टसी
  • दी ऑरेंज बुक
  • मेडिटेशन : द फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम
  • लर्निंग टू सायलेंस द माइन्ड
  • आय अ‍ॅम द गेट
  • द वे ऑफ द व्हाईट क्लाऊड्स
  • द सायलेंट एक्स्प्लोजन
  • डायमेंशंस बियॉंड द नोन
  • रूट्स अँड विंग्ज
  • द रिबेल

दर्शन मुलाखती

  • हॅमर ऑन द रॉक
  • अबव ऑल, डोंट वॉबल
  • नथिंग टू लूज बट योर हेड
  • बी रिअलिस्टिक : प्लॅन फॉर अ मिरॅकल
  • द सायप्रस इन द कोर्टयार्ड
  • गेट आऊट ऑफ योर ओन वे
  • अ रोज इज अ रोज इज अ रोज
  • डांस योर वे टू गॉड
  • द पॅशन फॉर दी इम्पॉसिबल
  • द ग्रेट नथिंग
  • गॉड इज नॉट फॉर सेल
  • द शॅडो ऑफ द व्हिप
  • ब्लेस्ड आर दी इग्नरंट
  • द बुद्धा डिसीज
  • बिइंग इन लव्ह

चित्रपट

संपादन
  • नेटफ्लिक्स या दूरचित्रवाणीवर ओशोंवरची 'Wild Wild Country' नावाची ६ भागातली डाॅक्युमेंटरी आहे.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • ओशोवर्ल्ड.कॉम [१]
  • ओशो.कॉम [२]