मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी
दूरचित्रवाणी हा आज प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. जगातील अनेक भाषांमध्ये आज घडीला अनेक नानाविध प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आज अनेक प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत. परंतु मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा दूरचित्रवाणी कधी सुरू झाली आणि मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची प्रगती कशी होत गेली याचा मागोवा या लेखामध्ये घेतला आहे.
इतिहास
संपादनभारतामध्ये इ.स. १९६५ पासून दूरचित्रवाणीच्या नियमित प्रसारणाची सुरुवात झाली. भारत सरकार अंगीकृत प्रसार भारती अर्थात दूरदर्शनच्या दिल्ली केंद्रातून हिंदी भाषेतील दूरचित्रवाणीची सुरुवात झाली. दूरदर्शनने मराठी भाषेतील कार्यक्रमाची प्रसारण सेवा २ ऑक्टोबर १९७२ अर्थात महात्मा गांधी जयंती पासून मुंबई दूरदर्शन केंद्राद्वारे सुरू केली. प्रथमतः दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून मराठी भाषेतील कार्यक्रमांचे केवळ २ तासांचे तेही कृष्ण-धवल प्रसारण होत असे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रसारणाचा कालावधी वाढवून इ.स. १९९४ पर्यंत ६ तासांपर्यंत मराठी कार्यक्रमांचे प्रसारण केले जाई. ५ काड्यांच्या / १० काड्यांच्या अँटिनाद्वारे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील स्थित दूरदर्शनच्या लघु तसेच उच्चशक्ती उपकेंद्रांद्वारे हे प्रसारण होत असे. त्या ६ तासांच्या कालावधीमध्ये देखील बातम्या, नाट्य, संगीत, शेतीविषयक, सामाजिक, राजकीय, क्रीडा अशा विविध अंगी कार्यक्रमांद्वारे मनोरंजनातून प्रबोधन या दूरदर्शनच्या बोधवाक्याला जपत दूरदर्शनने कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना दिली होती.
वर्ष १९९४
संपादन२४ तास प्रसारित होणारी पहिली मराठी वाहिनी दूरदर्शन मराठीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९४ ला झाली. ही पहिली मराठी उपग्रह वाहिनी होय. ही वाहिनी प्रथम डीडी-१० या नावाने लोकप्रिय होती, त्यानंतर या वाहिनीचे ५ एप्रिल २०२० ला दूरदर्शन सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. दामिनी, घरकुल, हॅलो सह्याद्री, हॅलो इन्स्पेक्टर, गजरा, किलबिल, आमची माती आमची माणसं, ताक धिना धिन यासारखे त्यावेळचे दूरदर्शनवरील कार्यक्रम जनमानसात लोकप्रिय होते.
वर्ष १९९९
संपादनवर्ष १९९९ हे मराठी दूरचित्रवाणी प्रेक्षकांसाठी विशेष ठरले कारण १५ ऑगस्ट १९९९ अर्थात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईस्थित झी नेटवर्क उद्योग समूहाने मराठी भाषेतील पहिली खाजगी उपग्रह वाहिनी अल्फा टीव्ही मराठी प्रेक्षकांच्या सेवेत रुजू केली. कालांतराने २७ मार्च २००५ रोजी नामकरण झी मराठी असे करण्यात आले. झी मराठीच्या रूपाने मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात एक नवी क्रांती झाली कारण, झी मराठी म्हणजे आजच्या विस्तृत मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची नांदीच. नानाविध दैनंदिन मालिका, चित्रपट, नृत्य, नाट्य, गायन, हास्य इ. विविधांगी कलाप्रकारांना चालना देण्याच्या उद्देशाने नानाविध प्रकारच्या स्पर्धा झी मराठीने सुरू केल्या.
वर्ष २०००
संपादनझी मराठी नंतर वर्ष २००० मध्ये आणखी एक मराठी मनोरंजन वाहिनी प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाली ती ई टीव्ही मराठी. हैद्राबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती म्हणजेच रामोजीराव यांच्या ई टीव्ही नेटवर्कने ९ जुलै २००० रोजी ई टीव्ही मराठीची स्थापना केली. या वाहिनीने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. कालांतराने २२ मार्च २०१५ रोजी ई टीव्ही समूहाने त्यांच्या तेलुगू वाहिनी खेरीज मराठी सह कन्नड, बांग्ला, गुजराती व ओडिया भाषेतील वाहिन्या मुंबईस्थित वियकोम 18 (viacom18) नेटवर्क कडे सुपूर्त केल्या व ई टीव्ही मराठी या वाहिनीचे कलर्स मराठी असे नामकरण करण्यात आले. या वाहिनीच्या चार दिवस सासूचे, ह्या गोजिरवाण्या घरात, बिग बॉस मराठी, सूर नवा ध्यास नवा, कॉमेडी एक्सप्रेस, कोण होणार करोडपती अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. याच काळात इतर दोन मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या तारा मराठी आणि प्रभात मराठी देखील सुरू झाल्या परंतु दुर्दैवाने त्या अल्पायुषी ठरल्या व कालांतराने बंद झाल्या.
त्यानंतर वर्ष 2007 मध्ये मी मराठी, 2008 मध्ये स्टार प्रवाह, 2018 मध्ये सोनी मराठी, 2021 मध्ये सन मराठी व 2022 मध्ये क्यु मराठी या मनोरंजन वाहिन्या मराठी मनोरंजन विश्वात दाखल झाल्या.
वृत्त वाहिनी
संपादनएकेकाळी टीव्हीवरून मराठी भाषेत केवळ १ किंवा २ तास बातम्या दाखविल्या जायच्या, तेथे आता संपूर्ण २४ तास वृत्तप्रसारण करणाऱ्या अनेक वृत्त वाहिन्या सुरू झाल्या आहेत.
पहिली वृत्तवाहिनी : झी 24 तास
वर्ष 2007 पर्यंत हिन्दी व इंग्रजी सोबत इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये खाजगी वृत्तवाहिन्या सुरू झाल्या होत्या परंतु मराठीमध्ये 24 तास वृत्तवाहिनी ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास वर्ष 2007 उजाडावे लागले. मराठी भाषेतील पहिली वृत्तवाहिनी सुरू करण्याचे काम झी नेटवर्क नेच केले. आणि झी 24 तास ही पहिली मराठी वृत्तवाहिनी वर्ष 2007 ला मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आली. आजच्या मराठी टीव्ही वृत्तपत्रकारीतेची मुहूर्तमणी म्हणून झी 24 तास चे नांव घ्यावे लागेल.
झी 24 तास या वाहिनीनंतर वर्ष 2007 मध्येच स्टार माझा, व वर्ष 2008 मध्ये आयबीएन लोकमत या दोन नव्या वृत्तवाहिन्या सुरू झाल्या.
जून 2007 मध्ये स्टार इंडिया व कोलकाता स्थित वृत्तपत्रसमूह आनंद बझार पत्रिका यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एमसीसीएस या समूहाने स्टार माझा ही मराठी वृत्तवाहिनी सुरू केली. परंतु एमसीसीएस समूहातून स्टार इंडिया ने त्यांचा हिस्सा काढून घेतल्यानंतर एमसीसीएस समूहाचे एबीपी न्यूज नेटवर्क असे नामांतर करण्यात आले व त्यासोबतच दि 01 जून 2012 पासून स्टार माझा सह एबीपी ग्रुपच्या तीनही वृत्तवाहिन्या जसे की स्टार न्यूज, स्टार माझा व स्टार आनंद (बंगाली वृत्तवाहिनी) या वाहिन्यांचे अनुक्रमे एबीपी न्यूज, एबीपी माझा, व एबीपी आनंद असे नामांतर करण्यात आले.
नेटवर्क 18 आणि लोकमत या दोन कंपन्यांनी मिळून आयबीएन लोकमत ही वृत्तवाहिनी २००८ साली सुरू केली आणि नंतर या वाहिनीचे नाव न्यूझ१८ लोकमत करण्यात आले.
यानंतर वर्ष 2008 मध्ये सकाळ माध्यम समूहाची साम टीव्ही, वर्ष 2009 मध्ये एबीसीपीएल ग्रुप ची टीव्ही 9 मराठी, वर्ष 2011 मध्ये महाराष्ट्र 1, वर्ष 2013 मध्ये जय महाराष्ट्र, वर्ष 2018 मध्ये ए एम न्यूज, वर्ष 2020 मध्ये लोकशाही व वर्ष 2022 मध्ये न्यूज स्टेट महाराष्ट्र/गोवा या वृत्तवाहिन्या सुरू झाल्या.
चित्रपट वाहिनी
संपादनदूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात आठवड्यातून एकच दिवस टीव्हीवरून चित्रपट प्रसारित होत असे. पण आज अनेक भाषांमधून अनेक वाहिन्यांद्वारे दिवसाकाठी 3-4 चित्रपट प्रसारित होत आहेत. मराठीमध्ये पहिली 24 तास चित्रपट प्रसारण करणारी वाहिनी अर्थात झी टॉकीज वर्ष 2007 ला सुरू झाली. अल्पावधीतच झी टॉकीज ने जनमानसात आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी चित्रसृष्टीचा गौरव करणारे लख लख चंदेरी हे झी टॉकीज ने सादर केलेले गाणे खूपच लोकप्रिय आहे.
झी टॉकीज सोबतच प्रवाह पिक्चर, शेमारू मराठीबाणा, फक्त मराठी या अशा वाहिन्यांमुळे आज मराठी प्रेक्षकांना एकाचवेळी अनेकविध चित्रपट पाहण्याची सोय निर्माण झाली आहे.
संगीत वाहिनी
संपादनसंगीत ही प्रत्येक जीवाला सुखावणारी गोष्ट. ज्यावेळेस टीव्ही/दुरचित्रवाणीची सुविधा उपलब्ध नव्हती त्यावेळेस लोक आकाशवाणी वरून संगीत ऐकत असत व आपली गानतृषा भागवत असत, कालांतराने दूरचित्रवाणीचे आगमन झाले आणि केवळ कानाला आनंद देणारे गाणे डोळ्यांनाही आनंद देवू लागले. दुरचित्रवाणीच्या सुरुवातीच्या काळात सुर संगम, चित्रहार, रंगोली, छायागीत, चित्रगीत या सारख्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि बघता बघता 24 तास संगीत प्रसारण करणाऱ्या संगीत वाहिन्या अर्थात म्युझिक चॅनेल ची सुरुवात झाली.
मराठीमध्ये तसे हे वारे थोडे उशिरानेच आले. वर्ष 2008 या वर्षी 9x मीडिया या आघाडीच्या टीव्ही समूहाने 9x झकास ह्या वाहिनीच्या निमित्ताने मराठी संगीत प्रेमींसाठी एक पर्वणीच निर्माण केली.
HD वाहिन्यांची सुरुवात
संपादनस्थापनेपासूनच भारतीय दूरचित्रवाणी विश्वामध्ये नानाविध बदल घडत आले आहेत. प्रथम अंशकालीन प्रसारण ते 24 तास प्रसारण, सरकारी ते खाजगी वाहिन्यांचा विस्तार, कृष्णधवल ते रंगीत टीव्ही चा बदल असो. भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्र सातत्याने स्वतःमध्ये बदल करत आले आहे. मग ते बदल साहित्यिक, वैचारिक, सामाजिक, भौगोलिक असोत अथवा तांत्रिक असोत प्रत्येक ठिकाणी भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्र स्वतःला अद्यतनीत करत आले आहे. मग त्यात मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या तर कशा मागे राहतील. काळाच्या याच प्रवाहात पोहत काळानुरूप आलेले नवे तंत्रज्ञान म्हणजेच HD प्रसारण. अत्युच्च दर्शकता व सुस्पष्ट आवाज असे हे तंत्रज्ञान मराठी वाहिन्यांनीही अंगिकारले आणि साकारली पहिली मराठी HD वाहिनी. 1 मे 2016 अर्थात महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मराठी टेलीविजन चे नवे पाऊल पडले ते स्टार प्रवाह HD च्या रूपाने.
त्यानंतर अनुक्रमे कलर्स मराठी HD, झी टॉकीज HD व झी मराठी HD ह्या वाहिन्यांची एचडी सेवा सुरू झाली व वर्ष 2022 मध्ये सुरू झालेली चित्रपट वाहिनी प्रवाह पिक्चर ही देखील सुरुवातीपासून HD स्वरूपात उपलब्ध झाली आहे.
मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा प्रकारानुसार संक्षिप्त आढावा पुढे दिला आहे.
वाहिन्यांची यादी
संपादनमनोरंजन वाहिन्या
संपादनसरकारी सेवा
संपादनवाहिनीचे नाव | संचालन समूह | स्थापना वर्ष | चित्र प्रकार | ध्वनि प्रकार |
---|---|---|---|---|
दूरदर्शन सह्याद्री | प्रसारभारती, दूरदर्शन | १९९४ | SD | स्टेरिओ 2.0 |
खाजगी सेवा
संपादनवाहिनीचे नाव | संचालन समूह | स्थापना वर्ष | चित्र प्रकार | ध्वनि प्रकार | सेवा प्रकार |
---|---|---|---|---|---|
झी मराठी | झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेड | १९९९ | SD+HD | स्टेरिओ| 2.0 | सशुल्क |
कलर्स मराठी | वायाकॉम१८ इंडिया लिमिटेड | २००० | स्टेरिओ| 2.0 + Dolby|5.0 | ||
स्टार प्रवाह | डिस्ने स्टार इंडिया लिमिटेड | २००८ | |||
झी युवा | झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेड | २०१६ | SD | स्टेरिओ| 2.0 | |
सोनी मराठी | कल्वर मॅक्स इंडिया लिमिटेड | २०१८ | 16.9 | ||
सन मराठी | सन टेलिविजन नेटवर्क लिमिटेड | २०२१ | निःशुल्क |
वृत्त वाहिन्या
संपादनवाहिनीचे नाव | संचालन समूह | स्थापना वर्ष | चित्र प्रकार | ध्वनि प्रकार | सेवा प्रकार |
---|---|---|---|---|---|
झी २४ तास | झी मीडिया कार्पोरेशन | २००७ | SD | स्टेरिओ| 2.0 | सशुल्क |
न्यूझ १८ लोकमत | नेटवर्क १८ | २००८ | |||
एबीपी माझा | एबीपी न्यूझ नेटवर्क | २००७ | निःशुल्क | ||
साम टीव्ही | सकाळ माध्यम समूह | २००८ | |||
टीव्ही ९ मराठी | असोसिएटेड ब्रॉडकास्टिंग कंपनी प्रा.लि. | २००९ | |||
जय महाराष्ट्र | साहना ग्रुप | २०१३ | |||
लोकशाही मराठी | स्वराज मराठी ब्रॉडकास्टिंग एल एल पी | २०२० | |||
न्यूज स्टेट महाराष्ट्र-गोवा | न्यूज नेशन नेटवर्क प्रा. ली. | २०२२ | SD | ||
पुढारी न्यूझ | पुढारी पब्लिकेशन्स | २०२४ | SD | ||
एनडीटीव्ही मराठी | अडाणी ग्रुप | २०२४ | SD |
चित्रपट वाहिन्या
संपादनवाहिनीचे नांव | संचालन समूह | स्थापना वर्ष | चित्र प्रकार | ध्वनि प्रकार | सेवा प्रकार |
---|---|---|---|---|---|
झी टॉकीज | झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेड | २००७ | SD+HD | स्टेरिओ| 2.0 | सशुल्क |
प्रवाह पिक्चर | डिस्ने स्टार इंडिया लिमिटेड | २०२२ | स्टेरिओ| 2.0 + Dolby|5.0 | ||
फक्त मराठी | एंटर १० टेलीविजन नेटवर्क | २०११ | SD | स्टेरिओ| 2.0 | निःशुल्क |
झी चित्रमंदिर | झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेड | २०२१ | |||
शेमारू मराठीबाणा | शेमारू एंटरटेनमेंट | २०१९ | 16.9 |
संगीत वाहिन्या
संपादनअ. क्र. | वाहिनीचे नाव | नेटवर्क नाव | स्थापना वर्ष |
०१ | ९एक्स झकास | आयएनएक्स नेटवर्क | २०११ |
०२ | संगीत मराठी | त्रिवेणी मीडिया | २०१५ |
०३ | झी वाजवा | झी नेटवर्क | २०२० |
०४ | मायबोली | नेटवर्क | २०१४ |
एचडी वाहिन्या
संपादनअ. क्र. | वाहिनीचे नाव | नेटवर्क नाव | स्थापना वर्ष |
०१ | स्टार प्रवाह HD | डिझ्नी स्टार | २०१६ |
०२ | कलर्स मराठी HD | व्हायाकॉम १८ | २०१५ |
०३ | झी टॉकीज HD | झी नेटवर्क | २०१६ |
०४ | झी मराठी HD | झी नेटवर्क | २०१६ |
०५ | प्रवाह पिक्चर HD | डिझ्नी स्टार | २०२२ |