बैलगाडा शर्यत
बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी दुभत्या जनावरांतील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापुढे खिल्लार गाई असायची, त्याला कारणही तसंच होतं. खिल्लार या गाईच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले असून, बैल आणि शेतकरी नात्यात बैलगाडा शर्यतीच्या आडून भेद निर्माण करण्याचे काम पेटा सारख्या परदेशी संस्थेनी केले आहे. बैलगाडा शर्यतीमुळे बैलांचा छळ होतो असे भासवून न्यायालयातून बैलगाडा शर्तीवर बंदी आणली आणि त्यामुळे शेतीत ट्रॅक्टरच्या आगमनाने आधीच हद्दपार झालेला बैल हा फक्त बैलगाडा शर्यतीमुळे बैल हा शेतकऱ्यांकडे टिकून होता. पण शर्यत बंदीनंतर बैलही विकले गेले. आणि शेतकऱ्याच्या दावणीला दिसणारी बैलजोडी फक्त चित्रातच दिसू लागली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
महाराष्ट्रातील खिल्लार बैलांच्या शर्यतीचे विविध प्रकार
संपादनमहाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पहिले जाते. बैलगाडा शर्यतीमुळे देशी जनावरांचे (गाय-बैल) संगोपन चांगल्या पद्धतीने होते. महाराष्ट्रात विविध भागात बैलांच्या शर्यतीचे विविध प्रकार असून, त्या भागात वेगवगळ्या नावाने ही शर्यत साजरी केली जाते.
- बैलगाडा शर्यत: पुणे आणि अहमदनगर जिल्हातील सर्वात प्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास ४०० वर्षाची जुनी परंपरा आहे. हा एकमेव शर्यतीचा असा प्रकार आहे कि ज्यामध्ये शर्यती दरम्यान बैलांना सोडून दिले जाते, कि ज्यामध्ये बैलांची गाडी चालवणारा कोणीही चालक त्यांच्या सोबत नसतो. त्यामुळे ही शर्यत बैल त्यांच्या अंगभूत गुणांमुळे, ताकतीनुसार पळली जातात. पावसाळा झाल्यानंतर गावोगावी चालू होणाऱ्या यात्रा-जत्रांना या शर्यतीचे आयोजन केले जाते. या शर्यतीमध्ये ४ बैल असणे बंधनकारक असते आणि एक घोडीचा वापर केला जातो. सर्वात पुढे घोडी पळते (घोडी वर कधी माणूस देखील बसलेला असतो किंवा कधी नसतो देखील) त्यानंतर जी २ बैल असतात त्यांना "कांड" असं म्हंटले जाते आणि त्यानंतर बैलगाड्याला जुंपलेली २ बैल असतात त्यांना "जोकाट" असे संबोधले जाते. या बैलगाड्याचे वजन २५ ते ३० किलो असते. या बैलांना ४५० फूट अंतर हे सेकंदावर पार करायचे असते. सर्वात कमी सेकंदामध्ये जो बैलगाडा येईल त्याला घाटाचा राजा असा किताब दिला जातो. बैलांना पळण्यासाठी एक ठराविक प्रकारचा मऊ मातीचा घाट बनवलेला असतो. कि ज्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे असतात. त्या कठड्यांच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था देखील असते. घाटामध्ये अंतिम सीमारेषेजवळ एक झेंडा घेऊन माणूस उभा असतो, कि ज्याच्या इशाऱ्यावर सेकंद मोजले जातात. जर घाट सपाट असेल तर ४५० फूट अंतर आणि जर घाटात चढ असेल तर ४३० फूट असे अंतर हे या बैलगाडा शर्यतीसाठी असते. शर्यतीच्या ४ बैलांनी अंतिम सीमारेषा पार केल्यानांतर त्यांच्या पुढे घोडी चालवत असलेला चालक या बैलांना कंट्रोल करून थांबवतो. घोडी चालकाचे प्रमुख काम हे बैलांना योग्य दिशा आणि नेतृत्व करण्याचे असते. या शर्यती पुणे जिल्ह्यामध्ये गावोगावी होणाऱ्या वार्षिक यात्रांना आवर्जून भरल्या जायच्या. या शर्यतीच्या प्रकारात प्रत्येक शेतकरी ही स्वतःची ४ बैल आणि घोडी पळवत असतो. शेतकऱ्यांच्या दावणीला कमीत कमी ८ ते १० बैल किंवा त्यापेक्षा जास्त सांभाळली जात होती, पण आता बैलगाडा शर्यत बंदीमुळे हे चित्र पूर्ण पणे मोडकळीस आलेले दिसून येत आहे. शर्यतीचा एकमेव हा प्रकार असा आहे, कि जिथे स्पर्धकांना (शेतकऱ्यांना) ४ बैल सांभाळावे लागतात, त्यामुळे हा देशी खिल्लार गोवंश चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे खिल्लार गाय-बैलांची संख्या वाढण्यास मदत होत आहे. फळीफोड म्हणजे काय? : जसा घाट असेल, तस त्या घाटाचे १, २, ३ नंबरसाठी विशिष्ठ सेकंद ठरलेले असतात. १ नंबर साठी: १२ सेकंद, २ नंबरसाठी: १३ सेकंद, ३ नंबरसाठी १४ सेकंद.(प्रत्येक घाटाचे वेगवगेळे असू शकतात) या फळीफोडचा इनाम, एकूण इनामापेक्षा वेगळा असतो. तर दिवसभरात ज्यांची बारी सर्वात प्रथम, द्वितीय, तृतीय या ठरलेल्या सेकंदामध्ये येईल त्यांची बारी फळीफोडसाठी मानकरी ठरली जाते.
- छकडी शर्यत(पश्चिम महाराष्ट्र): बैलगाडा शर्यती नंतर सर्वात जास्त प्रसिद्ध, सर्वांच्या पसंतीचा आणि चुरशीचा खेळ म्हणजे छकडी शर्यत कि जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळाला जातो. याच शर्यतीच्या प्रकाराला विदर्भात शंकरपट असे देखील म्हंटले जाते. कारण या खेळामध्ये एकाच वेळेस ५/७/९ अशा गाड्या सोडल्या जातात आणि जवळपास १२०० फूटाचे अंतर हे सर्वात पहिल्यांदा जी छकडी गाडी पार करेल, त्या बैलांना प्रथम क्रमांक दिला जात असे. या बैलजोडीने ओढल्या जाणाऱ्या या छकडी गाडीचे वजन अंन्दाझे ७० ते ८० किलो असते. या सर्व छकडी बैलगाडयांना पळण्यासाठी माळरानात मोकळ्या मैदानावर गरजेनुसार प्रत्येक गाडीसाठी मातीचे ८ ते १० वेगवेगळे ट्रॅक बनवलेले असतात. या खेळामध्ये छकडी गाडीमध्ये एक माणूस बसलेला असतो, कि जो बैलाचा चालक असतो. सातारा, पुसेगाव, सांगली, कराड, मुंबई, पुणे जिल्यातील काही भागात हा खेळ वार्षिक यात्रांना मोठ्या आनंदाने खेळला जातो. ग्रामीण भागातील अर्थकारण हे या खिल्लार बैलांच्या शर्यतींवरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या शर्यतीच्या प्रकारामध्ये २ बैल हे स्पर्धकाकडे (शेतकऱ्यांकडे) असणे गरजेचे आहे, ज्यामुळे चांगल्या प्रकारचा बैलांचे संगोपन केले जात आहे.
- शंकरपट (विदर्भ): य३०० वर्षाची परंपरा असलेला विदर्भातील पारंपरिक स्पर्धा म्हणजे शंकरपट. बैल जोडीची शर्यत म्हणजे शंकरपट. या खेळामध्ये काही भागात एका वेळेस एक गाडी किंवा काही भागात २ बैलगाड्या सहभागी असतात. यामध्ये गाडीवर बसलेला चालक हा गाडी चालवत असतो. अंतिम सीमारेषेजवळ पंच कमिटी बसलेली असते. जी बैलजोडी सर्वात कमी वेळेत ४५० फूट अंतर पार पाडेल. त्यांना प्रथम क्रमांक दिला जातो. ही स्पर्धा सेकंदावर चालते. विदर्भातील उमरखेड,अमरावती,यवतमाळ,वर्धा,बुलढाणा जिल्हातील बरेचसे शेतकरी या खेळासाठी आपली बैलजोडी मोठ्या उत्सहात तयार करत असतात. हंगामातील वार्षिक यात्रांना शंकरपट ही स्पर्धा भरवली जात होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळला जाणारा छकडी शर्यत आणि शंकरपट मधील गाडी मध्ये एकच फरक आहे. दोन्हीही शर्यतीच्या प्रकारामध्ये शर्यती मध्ये गाडीवर माणूस बसलेला असतो आणि बैलांना चालवत असतो. छकडी शर्यती मध्ये चालक हा गुडघ्यावर तोल सांभाळून गाडीमध्ये बसत असतो, पण शंकरपटामध्ये चालकाला बसायला वेगळी जागा असते, जस कि दोन चाकांना जोडणारा जो “आक”(दोन चाकाला जोडणारा मधला लोखंडी रॉड) असतो, त्यावर बसण्यासाठी चालकाला खास व्यवस्था असते.
- घोडा-बैल शर्यत (शेम्बी गोंडा): नाशिक, अहमदनगर, राहुरी, सिन्नर या भागात घोडा आणि बैल यांची स्पर्धा होते. या खेळामध्ये छकडी गाडीला बैल व घोडा जुंपला जातो. या स्पर्धेमध्ये गाडीवर चालक बसलेला असतो. एका वेळेस फक्त २ गाड्या या स्पर्धेमध्ये सोडल्या जातात. जी गाडी सर्वात प्रथम येईल त्यांना क्रमांक दिला जातो. मोकळ्या माळरानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी १००० फूट अंतर पळण्यासाठी असते. ही एकमेव स्पर्धा अशी आहे कि ज्यामध्ये दोन वेगवगेळे विभिन्न प्रजातीचे प्राणी म्हणजे घोडा आणि बैल एकत्र जुंपणी करून ही स्पर्धा खेळली जाते. वेगवगेळे प्रजातीचे प्राणी एकत्र पळवले जातात, त्यामुळे पेटा संघटनेचा या शर्यतीच्या प्रकाराला जास्त विरोध आहे. या शर्यतीच्या प्रकारामध्ये स्पर्धकाला २ वेळा स्पर्धा खेळावी लागते. कि ज्यामध्ये पहिल्या फेऱ्यांमध्ये एक बैल आतून पळतो आणि दुसरा फेऱ्याला दुसरा बैल बाहेरून पळवला जातो. या शर्यती मध्ये दोन्ही फेऱ्यांच्या वेळेस घोडा मात्र एकच असतो, पण बैल मात्र वेगवेगळे पळवले जातात. (कधी कधी एकच बैल देखील आतून बाहेरून पळवला जातो)
- लाकूड ओढण्याच्या बैलांच्या शर्यती इचलकरंजीचे शिल्पकार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकारांच्या काळापासून लाकूड शर्यती या चालू झालेलया आहेत. पारंपरिक शेतीमध्ये बदल झाला पाहिजे, म्हणूंन आधुनिक शेतीसाठी पाठपुरवठा श्रीमंत जहागिरदार "श्री नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार" यांनी केला. शेतीबरोबरच पशुपालनाच्या व्यवसायाला त्यांनी प्रेरणा दिली. दरवर्षी लाकूड ओढण्याच्या बैलांच्या शर्यती इचलकरंजी शहरात खेळल्या जायच्या. मोठ्या गटासाठी ४०० किलो वजनाचे लाकूड वापरले जाते, तर लहान गटासाठी २०० किलो वजनाचे लाकूड वापरले जाते. जो बैल मोठ्या गटात सलग ३ वर्ष पहिला क्रमांक पटकावतो. त्या बैलाला हिंदकेसरी हा मानाचा किताब दिला जातो. दिवाळी किंवा दसरा सणा पेक्षा मोठ्या प्रमाणात बेंदूर सणाला लाकूड शर्यती मोठ्या थाटामाटात साजऱ्या केल्या जातात. शर्यती साठी बैलाबरोबर ४ माणसं हे बैलाबरोबर पळत असतात. बैलाला ३० सेकंदामध्ये, ३०० फूट अंतर जाऊन परत ३०० फूट मूळ जागेवर यायचे असते. सगळ्यात कमी वेळेत जो बैल हे अंतर पार पाडेल, त्याला पारितोषिक दिले जातो. ही एकमेव स्पर्धा अशी आहे की जी फक्त इचलकरंजी शहरामध्येच खेळली जाते.
- आरत परत शर्यत महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर भागात आणि (कर्नाटकातील विजापूर,अथणी, कागवाड भागात) आरत परत शर्यत खेळल्या जातात. (या खेळाला जनरल शर्यत असे देखील बोलले जाते) महाराष्ट्रातील ही एकमेव शर्यत आहे, कि ज्यामध्ये सर्वात जास्त ५ ते ६ किलोमीटर अंतर हे बैलांना पार करावे लागते. या शर्यतीच्या प्रकारामध्ये एकाच वेळेस १०/१५/२० किंवा त्यापेक्षा जास्त गाड्या एकाच वेळेस सोडल्या जातात. या शर्यतीच्या प्रकारामध्ये २ चालक हे गाडी मध्ये बसलेले असतात. या गाडीचे वजन अंन्दाझे ८० ते १०० किलो असते. या शर्यती मध्ये एकूण ३ गट असतात, ते पुढीलप्रमाणे; अ गट, ब गट, बिनदाती गट. अ गटामध्ये कड दाती, दाताला संपलेली बैल पळतात. ब गटात २, ४, ६ दाती बैल पळवले जातात. बिनदाती गटामध्ये फक्त पळण्यासाठी अंतर (अंन्दाझे ५ किलोमीटर) हे बाकीच्या गटापेक्षा कमी असते. या शर्यतीच्या प्रकारामध्ये खुप मोठ्या किंमतीची बक्षिसे असतात. काही बैलांनी या शर्यतीमध्ये सलग ३ ते ५ वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हिंदकेसरी 'किताब देखील मिळवलेला आहे. एकसम्बा, आडी, विजापूर डांबरी ही या शर्यतीचे प्रसिद्ध मैदान आहेत. या शर्यतीच्या प्रकारामध्ये मोठ्या दमाची जास्त पळणारी खिल्लार बैल वापरली जातात, त्यामुळे शेतकरी त्यांच्या संगोपनात कुठलीही कमी पडू देत नाही.
- चिखल गुट्टा: कोल्हापूर जिल्हातील आजरा, गारगोटी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, या तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात भात शेतीची कामे संपली कि ऑगस्ट महिन्यात चिख्खल गुट्टा शर्यत हा पारंपरिक खेळ आवर्जून खेळल्या जात होता. या खेळामध्ये बैलांना पळण्यासाठी ५०० फूट लांबीचा चरी मारलेला एक मातीचा ट्रॅक बनवला जातो, कि ज्यामध्ये गुडघाभर पाणी असते. त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि कमी प्रमाणात चिख्खल असतो. बैलांना चालवण्यासाठी एक चालक कि ज्याला गुट्टेकरीं म्हंटले जाते, जो गुट्या वर बसलेला असतो. गुट्टा हा लाकडापासून बनवलेला असतो. जो गुट्टेकरी(चालक) असतो, त्याचा पायाचा अंगठा हा गुट्या मध्ये एका दोरीच्या गाठीमध्ये अडकवलेला असतो. बैलजोडीने अंतिम सीमारेषा पार केली कि, गुट्टेकरीं आपला पायाचा अंगठा त्यातून सोडून बाजूला उडी मारत असतो. अंतिमसीमारेषा पार केली कि निशाण दाखवले जाते. त्यावरून बैलजोडीने किती सेकंदामध्ये अंतर पार केले हे पंच कमिटी ठरवत असतात. बैलांना या खेळामध्ये कमीत कमी वेळेत ५०० फूट अंतर पूर्ण करावे लागते. जर कोणती बैलजोडी नीट पळाली नाही, तर बैलमालकाच्या इच्छेप्रमाणे त्यांना अजून एक संधी कमिटीतर्फे देण्याची प्रथा या शर्यतीच्या प्रकारात आहे. शर्यत चालू होण्याअगोदर सर्व बैलजोड्या या ट्रॅक मधून(पाण्यामधून) अंतिम सीमारेषेकढून, जिथून शर्यतीला सुरुवात होते त्या ठिकाणी चालवत नेल्या जातात, जेणेकरून बैलांना पळण्याअगोदर ट्रॅकची माहिती असावी, कुठून पाळायचे आहे याची पाहणी करता यावी, यासाठी ही शक्कल बैलमालक गेले कित्तेक वर्षांपासून सांभाळून आहेत.
- किनारा शर्यत हा शर्यत प्रकार महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर म्हणजेच समुद्रकिनारी खेळला जातो. यामध्ये बैल गाडीला दोन बैल जुंपले जातात व समुद्रकिनारी रेती वर एकाच वेळेस अनेक गाड्या सोडल्या जातात. जी बैलगाडी पुढे निघेल, त्या बैलगाडीला प्रथम क्रमांक दिला जातो. कोकणामध्ये शर्यतीसाठी सपाट मैदानांची संख्या अपुरी असल्यामुळे ही शर्यत समुद्रकिनारी खेळले जाते. अलिबाग, किहिम, रायगड, अशा किनारपट्टीच्या भागात या शर्यती होतात.
- बैलांची टक्कर महाराष्ट्रातील कोकण भाग सिंधुदुर्ग जिथे बैलांची टक्कर खेळण्याची प्रथा होती. गोवा राज्यात देखील अशा प्रकारच्या बैलांच्या टक्कर खेळल्या जायच्या. पण कालांतराने आता टक्कर जवळपास बंद झालेली आहे. यामध्ये २ बैलांना एकमेकांसमोर आणून सोडून दिले जायचे आणि त्यानंतर त्या दोन बैलांमध्ये शिंग आणि कपाळाच्या साहाय्याने टक्करीचा खेळ हा त्यांच्या ताकतीप्रमाणे काही वेळ चालायचा(अंन्दाझे १०/१५/२० मिनिटे हा खेळ रंगायचा). जो बैल सर्वात पहिले माघार घेऊन पळून जाईल, तो बाद होत असे. या खेळामध्ये कधी कधी बैल हे स्पर्धा सुरू होण्याअगोदर देखील लांबूनच एकमेकांच्या ताकतीचा अंदाज घेत आणि जर कोणत्या बैलाला वाटले कि समोरचा बैल हा आपल्यापेक्षा जास्त ताकतीचा आहे, तर खेळ चालू होण्याअगोदरच बैल माघार घेताना देखील दिसतो. पण बैलांची टक्कर हा प्रकार आता दिवसेंदिवस हद्दपार झाला आहे.
राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत केलेला कायदा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने अद्याप या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. याबाबत तात्काळ निर्णय होऊन अस्तित्वात आल्यास देशी गोवंश जतन संवर्धन होण्यास निश्चित मदत होणार आहे. मात्र, त्यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन राज्यसरकारच्या मदतीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
घरात मल्ल व दारात वळू हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या शेतकऱ्याचा बैल न्यायालयीन व क्लिष्ट कायदे प्रक्रियेत अडकल्याने,शेतकऱ्यांच्या आयुष्यातील बैल व बैलांच्या शर्यतीना असलेले सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व वादात अडकले आहे. बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षाची परंपरा आहे. देशपातळीवर पंजाब मध्ये किल्ला रायपूर येथेही प्राचीन काळापासून मिनी ऑलंपिक म्हणून बैलांच्या शर्यती बाबतचे उल्लेख सापडतात. पारंपरिक संस्कृतीचा वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते.केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने जुलै 2011 मध्ये प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960चा आधार घेऊन, अध्यादेश काढून, बैलांचा समावेश राजपत्रात( गॅझेट) केल्यामुळे बैलांचे मनोरंजनाचे खेळ करण्यास बंदी आलेली आहे. याच गॅझेटचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मे 2014 मध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यतीवर संपूर्ण देशांमध्ये बंदी घातली आहे.
काय आहे हे (गॅझेट) राजपत्र
संपादनसन 1960च्या प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 22 (2) नुसार केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाला ज्या प्राण्यांचा माणसाकडून विविध प्रकारे छळ होतो किंवा जे अल्पसंख्यांक आहेत त्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांचा गॅझेटमध्ये समावेश करण्याचा अधिकार आहे.यापूर्वी केंद्र सरकारने वाघ अस्वल, चित्ता, माकड आणि सिंह या प्राण्यांचा समावेश गॅझेटमध्ये केल्यामुळे या प्राण्यांचे सर्कस मध्ये खेळ घेण्यास बंदी घातली होती. 11 जुलै 2011 रोजी तत्कालीन वन व पर्यावरण मंत्री श्री जयराम रमेश यांच्या सूचनेवरून या मंत्रालयाने बैलाचा समावेश गॅझेटमध्ये केला आहे.विशेष म्हणजे बैलाचा समावेश करताना त्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकरी बांधवांचे मत याबाबत विचारात घेतले गेले नाही हे विशेष..शेतकऱ्यांना याबाबत कोणतीच कल्पना दिली नसल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमुळे समोर आले आहे. अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना पुणे यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून वरील माहिती मागवली होती.
कायद्याबाबत वस्तुस्थिती
संपादनप्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960च्या कलम 22(2) नुसार भारत सरकार ज्या प्राण्यांचा समावेश अधिसूचनेद्वारे राजपत्रात (गॅझेटमध्ये) करेल त्या प्राण्यांचे मनोरंजनाचे खेळ घेता येणार नाहीत असा नियम आहे, बैलाचा समावेश या गॅझेटमध्ये झाल्यामुळे मे 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली परंतु त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब व इतरही राज्यातून बैलगाडा शर्यती चालू करण्याबाबतची मागणी जोर धरू लागली,जानेवारी 2017 मध्ये तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू शर्यतीसाठी मोठे आंदोलनही झाले त्यामुळे तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना सुद्धा तामिळनाडू विधानसभेमध्ये जल्लीकटू चालू करण्याच्या संदर्भात कायदापास केला .याच धर्तीवर कर्नाटक सरकारने व त्यानंतर महाराष्ट्र सरकारने एप्रिल 2017 मध्ये बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात सभागृहात कायदा पास केला व या कायद्यास राष्ट्रपतींची मंजूरी ही मिळाली. परंतु महाराष्ट्र शासनाच्या या कायद्यास काही प्राणी प्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होऊन न्यायालयाने राज्य सरकारला सदर विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी साठी घेऊन जाण्याबाबत सुचवले.. यानुसार महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2017 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करून बैलगाडा शर्यतीस परवानगी द्यावी अशी विनंती केली. तत्पूर्वी तामिळनाडू ,कर्नाटक राज्यातील प्राणी मित्रांनीही त्या राज्यातील शर्यती बंद कराव्यात म्हणून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2018 मध्ये या सर्व राज्यांच्या याचिका एकत्र करून त्या (पाच सदस्यांचे विस्तारित खंडपीठ) घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. यानंतर फेब्रुवारी 2018 पासून हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील अडीच वर्षापासून या विषयांमध्ये कोणतीच सुनावणी झालेली नाही.
देशी गोवंशाच्या संख्येत प्रचंड घट
संपादननुकत्याच झालेल्या 20 व्या पशु गणना मध्ये भारतातील देशी गोवंश मध्ये तसेच प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये बैलांच्या संख्येत 32 टक्के घट आढळून आलेली आहे ही देशी गोवंश बाबत धोक्याची घंटा मानली जाते. एकीकडे गो हत्या बंदी कायदा करू न सुद्धा देशी गाय-बैलांचे संकेत घट थांबू शकलेली नाही तसेच बैलगाडा शर्यत बंदी मुळे राज्यातील खिल्लार बैलांची संख्या प्रचंड कमी झालेली आहे असे पशु तज्ञांचे म्हणणे आहे.. म्हणून याबाबत राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने ही तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.
एकाच देशात शर्यती बाबत विरोधाभास
संपादनसध्या तामिळनाडू व कर्नाटक राज्यामध्ये त्या राज्य सरकारांनी केलेल्या कायद्यानुसार बैलगाडा शर्यती चालू आहेत परंतु त्या राज्यांप्रमाणे कायदा करून सुद्धा मागील अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत बंद आहेत.. हा एक विरोधाभास पहावयास मिळतो. म्हणून न्यायालयाने ही सुनावणी तात्काळ द्यावी अन्यथा इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही शर्यतींना परवानगी मिळावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
बैलांची धावण्याची क्षमता
संपादनबैलाची धावण्याची क्षमता आहे किंवा नाही याबाबत यापूर्वी अनेक वेळा न्यायालयांमध्ये दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद प्रतिवाद होत असत. परंतु डिसेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने बैलांची धावण्याची क्षमता तपासण्या बाबत राज्यातील पशु तज्ञांची एक समिती नेमून याबाबत अभ्यास केला गेला.. व या समितीने प्रत्येक बैल आपल्या क्षमतेप्रमाणे धावू शकतो अशा निष्कर्षासह आपला अहवाल माननीय सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला आहे. संपूर्ण जगामध्ये बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत अद्याप पर्यंत कोठेच समिती नेमली गेली नव्हती किंवा याबाबतचे निष्कर्ष उपलब्ध नव्हते.. असा अभ्यास गट नेमून याबाबतचा अहवाल तयार करणारे महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील पहिले राज्य ठरले आहे... त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत या समितीचा अहवालच निर्णायक ठरणार असे तज्ञांचे मत आहे.
ग्रामीण अर्थकारणाला फटका
संपादनबैलगाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे. गावच्या ग्रामदेवतेचे यात्रेमध्ये धार्मिक व संस्कृती परंपरा म्हणून बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी आर्थिक उलाढाल होते. शर्यत बंदी मुळे बैलांच्या संख्येत व किमतीत होणारी घट तसेच शर्यतीचे साहित्य तयार करणारे ग्रामीण कारागीर, शर्यती उपयोगी साहित्य तसेच तसेच वाहतूक व्यवस्थेचे सहित सर्वांचेच शर्यत बंदी मुळे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण कारागीर बेरोजगार झाले आहेत.. राज्यात जवळपास 65 हजार नोंदणीकृत बैलगाडा मालक आहेत प्रत्येकाकडे किमान चार बैल गृहीत धरल्यास जवळपास अडीच ते तीन लाख शर्यतीचे बैलांचे संगोपनावर प्रत्यक्ष परिणाम झालेला आहे. बैलगाडा शर्यतच्या माध्यमातून देशी गाय बैलांच्या संगोपनास प्रेरणा मिळते व यातूनच उपयुक्त देशी गोवंशची वाढ होते. परंतु शर्यत बंदीमुळे या सर्व गोष्टीस खीळ बसली आहे.