अलिबाग येथे रायगड जिल्ह्याच़े शासकीय मुख्यालय आहे. अलिबाग शहर समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. हे शहर महाराष्ट्रातील कोकण विभागात येते.

  ?अलिबाग

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ३८′ २८″ N, ७२° ५२′ ४५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रायगड
लोकसंख्या १९,४९१ (२००१)
आमदार
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४०२२०१
• +०२१४१

इतिहास

अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. आताचा रामनाथ परिसर हे तेव्हाचे मुख्य गाव होते. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे त्या वेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात. त्या काळात येथे बऱ्याच लढाया झाल्या. १७२२ मध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी कुलाब्यावर एकत्रित हल्ला केला होता, पण ते ती लढाई हरले होते. १८५२ मध्ये अलिबागला तालुक्याचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले.[ संदर्भ हवा ]

लोकसंख्या

इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार अलिबागची लोकसंख्या १९,४९१ आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ५२% आणि महिलांचे प्रमाण ४८% आहे.इथले सरासरी साक्षरता प्रमाण ७९% आहे.[ संदर्भ हवा ]

भूगोल

हे शहर मुंबईपासून दक्षिणेला ७८ कि.मी. आणि पेणपासून ३० कि.मी. अंतरावर आहे. अलिबाग या शहराला समुद्र किनारा आहे

अर्थव्यवस्था

पर्यटन व शेती हे इथले मुख्य व्यवसाय आहेत. अलिबाग शहराच्या जवळच राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स (आर.सी.एफ.) हा कारखाना आहे. इस्पात (मित्तल ग्रुप), विक्रम इस्पात (बिर्ला ग्रुप), गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल), हिंदुस्तान पेट्रोलियम्स (एच.पी) हे कारखानेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत.[ संदर्भ हवा ]

प्रसिद्धी

अलिबागला काही लोक मिनी गोवा म्हणतात. हे मुंबई, पुण्यापासून एक दिवसाच्या सहलीसाठी जवळचे ठिकाण आहे. हे इथल्या समुद्रकिनाऱ्यासाठी आणि सीफूडसाठी प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ]

परिवहन सुविधा

  • रस्ता - मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. या मार्गावर असलेल्या वडखळ या ठिकाणापासून पुढे अलिबागला जाण्यासाठी मार्ग आहे.हे अंतर मुंबईपासून १०८ कि.मी.आहे
  • लोहमार्ग - पेण हे अलिबागजवळचे रेल्वे स्थानक आहे.
  • फेरी - मांडवा हे जवळचे बंदर असून तेथून फेरीबोटीने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला जाता येते. दुसरे जवळचे बंदर रेवस हे आहे. सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत ही फेरी उपलब्ध असते. बोटीच्या प्रकाराप्रमाणे मांडवा ते मुंबई प्रवासाला ४० ते ५५ मिनिटे वेळ लागतो.
  • विमानतळ -जवळचा विमानतळ मुंबईला आहे.

राजकारण

शेतकरी कामगार पक्षाचे सुभाष पाटील हे अलिबागचे २०१४ पासूनचे आमदार आहेत.

समुद्रकिनारे

अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याशिवाय किहीम,नवगाव, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस ,चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत.

इतर प्रेक्षणीय स्थळे

कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर,पद्माक्षी रेणुका,खांदेरी, उंदेरी, चौल, गणेश मंदिर(बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, मुरुड जंजिरा, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत. याच बरोबर मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी गावात आहे. सासवणे येथील करमरकर शिल्पालयातील अतिशय सुबक व मूर्त शिल्पे आहेत. अलिबागचा समुद्र पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ]

पुस्तके

  • माझे किहीम (लेखिका : मीना देवल)
  • साद सागराची - अलिबाग मुरुड जंजिरा (पराग पिंपळे). सहा पुस्तकांचा संच


काही फोटो