थोरले बाजीराव पेशवे

पेशवे
(बाजीराव बल्लाळ या पानावरून पुनर्निर्देशित)

विश्वनाथ बल्लाळ भट, पहिला बाजीराव तथा थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते.

बाजीराव पेशवा (पहिला)
पेशवे
थोरले बाजीराव पेशवे
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. १७२० ते १७४०
राजधानी पुणे
पूर्ण नाव बाजीराव बाळाजी भट (पेशवे)
पदव्या श्रीमंत,पेशवा
जन्म ऑगस्ट १८, इ.स. १७००
डुबेर, सिन्नर, नाशिक.
मृत्यू २८ एप्रिल, १७४० (वय ३९)
रावेरखेडी, मध्यप्रदेश.
पूर्वाधिकारी बाळाजी विश्वनाथ
छत्रपती छत्रपती सम्राट शाहू महाराज
उत्तराधिकारी बाळाजी (बल्लाळ) बाजीराव पेशवे (नानासाहेब पेशवे)
वडील बाळाजी विश्वनाथ
आई राधाबाई
पत्नी काशीबाई
इतर पत्नी मस्तानी
संतती बाळाजी बाजीराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, जनार्दन, समशेरबहादूर
राजघराणे पेशवा
राजब्रीदवाक्य हर हर महादेव
चलन ॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥
धर्म हिंदू

बाजीराव आपले वडील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या सानिध्यात अनेक कला व विद्या कले. बाळाजी बाजीराव दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षाचा बाजीही त्यांच्याबरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहे, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीने घेतला होता. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा विस्तारल्या. वेगवान हालचाली हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

बाळाजींच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले [संदर्भ हवा]. त्याला २ कारणे होती -

  1. यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुनः प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटत होते.
  2. थोरले बाजीराव हे फटकळ होते, एक घाव दोन तुकडे हा त्यांचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले.

मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यांस दिली.

बाजीराव शिपाई होता. उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४०पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), पेशावर (१७३७), कंदहार (१७३७), काबूल (१७३७), बलुचिस्तान (१७३७), तसेच भारतातील भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७ मे १७३९) या आणि अशाच ४७ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो, हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.

बर्नाड मॉन्टगोमेरी या ब्रिटिश फील्ड मार्शलने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.

बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होते, म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.' एवढा एकच उद्‍गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो, वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुनर्रचना झाली. शि‍वरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला.

बुंदेलखंड मोहीम

संपादन

दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता.

"जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥"

- याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली.

याच पत्रात त्याने

"जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥

असा "गजान्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेऊन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले.

छत्रसालाने झाशी प्रांत (२॥ लक्षांचा) पेशव्यांस दिला व पुढे आपल्या राज्याचा तिसरा हिस्साहि त्यांस दिला (१७३३).इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्‍नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली.[] बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा या मागचा हेतू असावा. या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्‍नी होतीच. मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरिता त्याने शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.

चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनाऱ्यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.

बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खनपासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वतः बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वतःची कामे शक्यतो स्वतः करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वतः बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते. फक्त ४० वर्षांच्या जीवनात ४७ लढाया जिंकल्या. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.

बाजीरावांनी वयाच्या अकराव्या वर्षीच दिल्ली पाहिली होती. सर्व हिंदुस्थान त्यांनी नजरेत भरून घेतला होता. त्यांनी गाजवलेल्या मोहिमा लोकांना परिचित नाहीत. किंबहुना इतिहासकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या आहेत, म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. पालखेडची निजामाविरोधातील मोहीम. त्यानंतर भोपाळची मोहीम येथील एका लढाईत बाजीरावांनी निजामाची फारच दारुण अवस्था केली. निजाम ढेकळाची भिंत रचून त्याच्या आड राहू लागला. सैनिकांची रसद बंद झाल्यामुळे ते तोफखान्याचे बैल खाऊ लागले(?). बाजीरावांनी दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा तत्कालीन बादशहा जीव मुठीत धरून लपून बसला. संपूर्ण दिल्ली हादरली. परंतु 'दिल्ली' जिंकल्यावर मराठा भगवा न फडकवता बाजीरावांनी मोर्चा मुघल प्रदेशाकडे वळविला, त्यात पेशावर, बलुचिस्तान, कंदाहार आणि काबूल येथे जाऊन मुघल प्रदेशावर कब्जा केला. तसेच कर्नाटक, राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, गुजरात, दिल्ली, कोकण, आंध्र प्रदेश येथे मराठ्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या. या मुलखांत मराठी माणसांचा प्रवेश झाला. नंतर ते स्थायिक झाले यास कारण फक्त आणि फक्त बाजीराव पेशवे.

बाजीराव आणि धर्म

संपादन

त्यांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही. जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाहीत आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या, सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत, त्यांच्यात रमत. म्हणूनच पुण्यात धर्म मोडला आणि अभक्ष्य भक्षण केले यासाठी तथाकथित पंडितांनी आकांडतांडव केले. द्वितीय पत्नी मस्तानीबाईंचा पुत्र कृष्णसिंग अर्थात समशेर बहादुर (पुढे याने पानिपत युद्धात अतुलनीय पराक्रम केला) याच्या हक्कासाठी ते जागरूक होते. त्याचे मौजीबंधन करण्यास पुण्यातील शास्त्री, पंडिताचा विरोध होता. पण तो विरोध डावलून समशेरसिंगचे मौजीबंधन केले.

' श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ पंतप्रधान '

ही मुद्रा धारण करणाऱ्या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. नेपोलियनने जसे सामान्यांतून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्ये सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवले, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर संभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत.

वैयक्तिक आयुष्य

संपादन

यांचे लग्न १७१३ सालच्या सुमारास चासकर महादजी कृष्ण जोशी यांची मुलगी काशीबाई हिच्याशी झाले. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवा असे ३ पुत्र होते.काशीबाईंंचा मृत्यू १७५८ साली झाला.[] छत्रसाल प्रकरणाच्या वेळी मस्तानीशी विवाह झाला(१७२९). मस्तानीपासून कृष्णराव उर्फ समशेर बहादुर हा पुत्र झाला.

बाजीरावाचे काशीबाई व मस्तानीबाई या दोघींवर अत्यंत उत्कट प्रेम होते. रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले. तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले. महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे बाजीराव उद्‍गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्‍नी बाकी सर्व स्त्रिया मला मायबहिणी.

पेशवे बाजीराव आणि झोप

संपादन

‘लक्षात ठेवा, रात्र ही झोपेकरिता नाही, तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यांवर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे. झोप ही घोड्यावर बसल्यावरही घेता आली पाहिजे.’ हे सुप्रसिद्ध उद्गार थोरल्या बाजीराव पेशव्यांचे होत. बाजीराव पेशवे घोड्यावर बसून झोप घेत असे, ही नोंद अनेक ऐतिहासिक बखरींमध्ये स्पष्ट आहे.

२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासीरजंगाविरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासीरजंगने हंडियाखरगोण हे प्रदेश बाजीराव पेशव्यांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव पेशवे खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव पेशवे वयाच्या फक्त ४०व्या वर्षी निधन पावले. प्रचंड पराक्रमी वर्णनातीत विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असणारे हे थोरले बाजीराव पेशवे आदर्श राष्ट्रपुरुष होते.सर यदुनाथ सरकार लिहितात, 'अखंड हिंदुस्थानात हा एक झाला असे दिसते.'

बाजीराव राजवटीतील मराठा साम्राज्याचा विस्तार

संपादन
चित्र:Https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e8/Historical map of India AD 1720.jpg/800px-Historical map of India AD 1720.jpg
बाजीरावांच्या कारकीर्दीतील मराठा साम्राज्याचा विस्तार

थोरल्या बाजीरावांची मुद्रा

संपादन

॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥

 
बाजीराव पेशवे यांच्या राजमुद्रेची प्रतिकृती शनिवारवाडा पुणे

थोरल्या बाजीरावांवरील पुस्तके

संपादन
  • अजिंक्ययोद्धा बाजीराव (जयराज साळगावकर)
  • अटकेत रोविले झेंडे (कॅप्टन वासुदेव बेलवलकर)
  • द एरा ऑफ बाजीराव (इंग्रजी, डॉ. उदय कुलकर्णी)
  • देवयोद्धा (थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावरील त्रिखंडी महाकादंबरी, लेखक - काका विधाते; प्रफुल्लता प्रकाशन, किंमत ३,२५० रुपये)
  • दुसरा पेशवा (नाटक, वि.वा. शिरवाडकर)
  • पेशवाईतील कर्मयोगी (चिमाजी अप्पांवरील कादंबरी, लेखक - (कॅप्टन वासुदेव बेलवलकर))
  • प्रतापी बाजीराव (म.श्री. दीक्षित)
  • बाजी (कुंदन तांबे)
  • Bajirao I, An Outstanding Cavalry General (R.D. Palsokar)
  • मस्तानीचा बाजीराव (मुरलीधर जावडेकर)
  • या सम हा : एकोणचाळीस लढायांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या अजिंक्य बाजीरावाच्या युद्धनेतृत्वाची लोकविलक्षण यशोगाथा (मेजर जनरल शशिकांत गिरिधर पित्रे)
  • रणझुंझार थोरले बाजीराव पेशवे (कादंबरी, लेखिका - नयनतारा देसाई)
  • राऊ (ना.सं. इनामदार)
  • श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे (ना.के बेहरे. १९२९)
  • थोरला बाजीराव पेशवा (मदन पाटील)
  • थोरले बाजीराव पेशवे (बालवाङ्मय, डॉ. विजय तारे-इंदूर, वरदा प्रकाशन)
  • प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे (डॉ. पद्माकर विष्णू वर्तक)
  • पेशवा पहिला बाजीराव -पूर्वार्ध (१९९९) (श.श्री. पुराणिक)
  • पेशवा पहिला बाजीराव - उत्तरार्ध (२०००) (श.श्री. पुराणिक)

बाजीरावावरील चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका

संपादन
  • बाजीराव मस्तानी (हिंदी चित्रपट. निर्माता दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी)
  • श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी (ई-टीव्हीवरील दूरचित्रवाणी मालिका, निर्माते - नितीन चंद्रकांत देसाई, इ.स. २०१०)
  • पेशवा बाजीराव (सोनी टी.व्ही.वरील दूरचित्रवाणी मालिका, जानेवारी २०१७)

संदर्भ

संपादन
  1. ^ "बाजीराव बल्लाळ पेशवे". ketkardnyankosh.com. 2018-12-23 रोजी पाहिले.
  2. ^ "बाजीराव बल्लाळ पेशवे". ketkardnyankosh.com. 2018-12-24 रोजी पाहिले.


समाधी स्थळ

संपादन