शनिवार वाडा

पेशव्यांचे निवास स्थान, पुणे शहरातील एक प्रमुख वास्तू

शनिवार वाडा (बोली मराठीत शनवारवाडा) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[]

शनिवार वाड्याच्या 'दिल्ली दरवाजा'चे दृश्य

शनिवारवाड्याचा इतिहास

संपादन

शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाच्या दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे. पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली दरवाजा वाड्यातील मुख्य प्रवेशद्वार तर हजारी कारंजे हे विशेष आहेत.

इमारत

संपादन

शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत.[ संदर्भ हवा ] तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे.[ संदर्भ हवा ] हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.[ संदर्भ हवा ]

दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच आहे.[ संदर्भ हवा ] देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची तसेच महाभारतातील काही दृश्यांची चित्रे काढलेली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.[]वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.

एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो.[]

गणेश रंगमहाल

संपादन

शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५ साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे.

सांगलीचे कवी साधुदास यांनी केलेले शनिवारवाड्याचे वर्णन

संपादन

वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादी कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकांतून करण्यात आली होती. कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळविले होते. वर्णन सांगलीचे प्रसिद्ध कवी साधुदास यांनी आपल्या ‘पौर्णिमा’ नामक कादंबरीत केले आहे. त्यावरून वाड्याचे समग्र चित्र डोळ्यांसमोर उभे रहाते. "सभोवार एक प्रचंड तट राखून वाड्याचे बांधकाम केले होते. वाड्याकरिता आणि भोवतालच्या बागेकरिता मिळून तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली होती. वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पाच दरवाजे होते. उत्तरेकडेचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी (किंवा अलीबहाद्दर) दरवाजा , दक्षिणेकडे आग्नेय व नैर्ऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नावांचे दरवाजे, आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा, अशा नावांनी हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाज्यांवर अष्टौप्रहर गारद्यांचा जागता पहारा असे.
"दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरूज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे. बुरुजाच्या आत तीन मोठ्या कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. ही इमारत सहा मजली असून तिचे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, पण तो बाहेरील चौक या नावानेही ओळखला जाई. नैर्ऋत्येकडील चौकास मोतीचौक असे म्हणत. त्या चौकाला बाईंचा (गोपिकाबाई) चौक असेही म्हणत. वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असे नाव असून तो मधला चौक या नावाने ओळखला जात असे. शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक ही संज्ञा असून त्या
"या मोठया चौकांशिवाय फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादी अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना
"वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याचा घेर सुमारे ऐशी फूट होता. त्यात सोळा पाकळ्या असून प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणे सर्व पाकळ्यांत मिळून दोनशे छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचे असून त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालने काढलेली होती. सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावर पक्षी, फळे, वेलबुट्टी वगैरे चित्रे कोरलेली होती. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपती महालाचे चित्रकाम फारच प्रेक्षणीय होते. त्यांत रामायण-महाभारतातील अनेक कथांची चित्रे होती. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याजकडून हे चित्रकाम तयार करून घेण्यात आले होते. यावरून हा वाडा सजविण्यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा."

खजिना

संपादन

पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा(फीरोजा), १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या(लहसुनीया) असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना दुसऱ्या बाजीरावांनंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब (दुसरे) यांना मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.

पुस्तके

संपादन

शनिवारवाड्याचा इतिहास आणि अंतर्गत रचना सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांतली काही अशी:-

  • पुण्याचा शनिवारवाडा : लेखक रमेश जि. नेवसे
  • पौर्णिमा (कादंबरी) : लेखक साधुदास
  • शनिवारवाडा : लेखक डॉ. गणेश हरी खरे
  • शनिवारवाडा : लेखक प्र.के. घाणेकर
  • शनवारवाडा (प्रभाकर भावे)
  • शनिवारवाडा (ललित कादंबरी) : लेखक वा.ना. शहा

चित्रदालन

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2013-12-28 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ https://m.timesofindia.com/city/pune/peshwa-era-mural-at-shaniwarwada-falls-victim-to-neglect/amp_articleshow/63447585.cms
  3. ^ घाणेकर, प्र. के. (२०१३). पेशव्यांचे अधिकृत निवासस्थान शनिवारवाडा. पुणे: स्नेहल प्रकाशन. pp. ४२.

बाह्य दुवे

संपादन