चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण

(चित्पावन या पानावरून पुनर्निर्देशित)

चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण (चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण अर्थात, "कोकणातील रहिवासी ब्राह्मण") हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेश कोकणमधील एक हिंदू ब्राह्मण समाज आहे.

कर्नाटकातील काही भागात बोलल्या जाणाऱ्या चित्पावनी भाषेचा नमुना

एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने 'मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. तर "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ही एक पोटजात आहे.[ संदर्भ हवा ]

व्युत्पत्ती

संपादन
 
 

बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नी चयन करत व अग्नि (चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे.[]

 
परशुराम घाटातून दिसणारे चिपळूण शहराचे दृश्य

दंतकथा

संपादन

परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती लावली जाते. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे. क्षितिपावन या शब्दापासून चित्पावन हा शब्द आला आहे असे गो.कृ.मोडक यांनी नोंदविलेले आहे. क्षिती म्हणजे जमीन. ती खणून साफ करणारे असा त्याचा अर्थ आहे. कोकणातील जमीन पूर्वी खाजणी होती.चित्पावन लोकांची वस्ती पूर्वी मुख्यत: खाडीच्या काठी होती. त्या लोकांनी तिथे बांध घालून,पाणी काढून,तिथल्या जमिनी शेतीयोग्य केल्या. त्यांना मळेजमिनी म्हणतात.समुद्र मागे हटवून त्या मिळवलेल्या आहेत हे परशुराम कथेचे तात्पर्य म्हणून सांगता येईल.[] अरुण क. घोष यांच्या मतानुसार चित्पावन पोटजात सातवाहनाच्या काळात निर्माण झाली.[] अद्यापि संशोधनाने सिद्ध/शास्त्रीय आधार नसलेल्या काही मतांनुसार चित्पावन ब्राह्मणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राह्मण पंजाबचे मोहियाल ब्राह्मण, केरळातील नंबुद्री ब्राह्मण, आंध्र प्रदेशातील हव्यक, गुजरातेतील अान्विक, उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राह्मण आदींशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायांत परशुरामास विशेष सन्मान आहे.[ संदर्भ हवा ]

अनुवंशशास्त्र आणि शरीरयष्टी

संपादन

चित्पावन कुटुंबांचे सर्वसाधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका असे शरीरवर्णन असते. काही चित्पावन कुटुंबांत क्वचित काळा तसेच सावळा वर्णही आढळून येतो.[ संदर्भ हवा ] (साहू आणि इतर २००६) यांच्या मते चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बऱ्याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा हेप्लोग्रुप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामान्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.[ संदर्भ हवा ] मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बऱ्याच उच्चजातीय भारतीयांत आढळतो. (साहू आणि इतर २००६). यांच्या मतानुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्त्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणाऱ्या आणि पश्चिम व दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांत आढळते. उत्तरांचल राज्याच्या गढवाल प्रभागातील सुमारे १६४९९ फुटावरील रूपकुंड नावाच्या तलावात वादळात सापडलेले अनेक जुने (सुमारे नवव्या शतकातील) मानवी सांगाडे एकत्र सापडले होते त्या सांगाड्यांच्या the Centre for Cellular and Molecular Biology (CCMB), Hyderabad, येथे केल्या गेलेल्या DNA संशोधनानुसार त्यातील तीन नमुन्यांचे DNA चित्पावन ब्राह्मणांशी साधर्म्य असणारे आढळून आले.[][].

गोत्रे

संपादन

चित्पावनांची १४ गोत्रे आहेत. गोत्रांची नावे ही त्या गोत्रांचा मूळपुरुष असलेल्या ऋषींची नावे आहेत. प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. काही उपनामे ही एकापेक्षा जास्त गोत्रांत आढळतात.[]

गोत्रे प्रवर
अत्रि आत्रेयार्चनानसश्यावाश्चेति
कपि आंगिरसामहीवोरुक्षयसेति
काश्यप काश्यपावत्सारनैध्रुव
कौंडिण्य वासिष्ठमैत्रावरुणकौंडिण्येति
कौशिक वैश्वामित्रघमर्षणकौशिकेति
गार्ग्य आंगिरसशैन्यगार्ग्येति
जामदग्न्य भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति
नित्युंदन आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
बाभ्रव्य वैश्वमित्रदेवरातौदसेति
भारद्वाज आङि्गरसबार्हस्पत्यभारद्वाजेति
वत्स भार्गवच्यवनाप्नवानौर्वजामदग्न्येति
वासिष्ठ वासिष्ठेन्द्रप्रमदाभरद्वस्विति
विष्णूवृद्ध आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
शाण्डिल्य शाण्डिल्यासितदेवलेति

सर्व गोत्रे आणि त्यांतील मूळ आडनावे

संपादन

चित्पावनांत १४ गोत्रे आहेत, व मूळ कुळे (आडनावे) ६० समजली जातात. स्थलांतर आणि व्यवसायादी कारणांमुळे मूळ आडनावांत अठराव्या शतकानंतर बदल होत जाऊन टिळक पंचांगाधारे सुमारे ३५० आडनावे दिसून येतात.[]

१. अत्री : आठवले, चितळे, फडके. (एकूण तीन)

२. कपि : खांबेटे, जाईल, माईल, लिमये, साने, मराठे (एकूण सहा)

३. कश्यप : गानू, गोखले, जोग, लेले, भोपटराव , जोशी (हर्णे मुरुड) (एकूण सहा)

४. कौंडिण्य : पटवर्धन, फणसे (फणशे). (एकूण दोन)

५. कौशिक : बरवे (बर्वे), आपटे, गद्रे, खरे, भावे(भाव्ये), वाड

६. गार्ग्य : कर्वे, गाडगीळ, दाबके, माटे, लोंढे (एकूण पाच)

७. भारद्वाज : आचवल, गांधार, घांघुरडे, टेणे, दर्वे, रानडे (रानड्ये), हापसे . (एकूण सात)

८. जमदग्नि : कुंटे,मुळे, मुळीक,मुळेकर, पेंडसे.(एकूण पाच)

९. नित्युंदन : भाडभोके, वैशंपायन, भिडे . (एकूण तीन)

१०. बाभ्रव्य : बाळ, बेहेरे. (एकूण दोन)

११. वत्स : मालशे. गोरे (वत्स पंचप्रवर) (एकूण दोन)

१२. वसिष्ठ : ओक, गोगटे, गोवंड्ये, धारू, पोंगशे, बागल. बापट, बोडस, दाते (दात्ये), भाभे, विंझे, साठे (साठये, साठ्ये). (एकूण बारा)

१३. विष्णूवर्धन : किडमिडे, नेने, परांजपे (परांजप्ये), मेहेंदळे. (एकूण चार)

१४. शांडिल्य : सोमण ,गणपुले, गांगल, डोंगरे, जोशी, दामले, परचुरे, पाटणकर, भाटे, ताम्हनकर. (एकूण आठ)<

चित्पावनांची आडनावे यज्ञविषयक कार्यावरून बनली असा सारवर्तरीक सिद्धांत आहे । 'खांडल विप्र महासभा का इतिहास' या ग्रंथातील सूचीत प्रथम संस्कृत अधिकारनामे व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत.

संस्कृती

संपादन
 

सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरुषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नऊवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकांत त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे लक्ष्य ठरत आला. सुरुवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम असा झाला की आज कोकणस्थ स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने जीवनातील सर्व क्षेत्रांत कार्यरत दिसतात.[ संदर्भ हवा ]

कुलाबा गॅझेटियरनुसार पेशव्यांच्या काळात अनेक कोकणस्थ कुलाबा जिल्ह्यात स्थायिक झाले. यांच्या स्त्रिया या दिसायला सुंदर असल्याचे जाणवते. हे मध्यम बांध्याचे असतात. हया व्यक्ती मराठी भाषिक आहेत. यांपैकी काही व्यापारी आहेत तर काही सरकारी कर्मचारी, भिक्षुकी करणारे, तर काही धनिक आहेत. यांची घरे माती आणि दगडाची असून घराभोवती बाग दिसते. त्यांचे दैनंदिन अन्न भात, पोळी, भाजी, लोणी, कडधान्ये, दही असे प्रामुख्याने आहे. ते दिवसातून दोनदा भोजन करतात.[]

कुलदेवता

संपादन

गुहागर येथील श्री व्याडेश्वर हा कुुलस्वामी तर अंबेजोगाई येथील योगेश्वरी भवानी, महालक्ष्मी, वज्राई या कोकणस्थांच्या कुलदेवता आहेत. काळभैरव, हरिहरेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळणेश्वर, लक्ष्मीनृृसिंह, केशवराज, परशुराम, लक्ष्मीकेशव, कोळेश्वर इ. देवताही चित्पावनांच्या कुलदेव व कुलदेवता आहेत.[]

चैत्र पाडवा,नागपंचमी ,नारळी पौर्णिमा,दसरा,दिवाळी,आषाढी कार्तिकी एकादशी ,मकरसंक्रांत,होळी, रंगपंचमी हे कोकणस्थांचे सर्वसामान्य सण होत.रंगपंचमीचे महत्त्व पेशवाईपासून वाढले आहे,होळीचा सन केवळ एक धार्मिक कार्यक्रम म्हणून केला जाई.[]

नवरात्र
 
महालक्ष्मी अष्टमी पूजन (नवरात्र)

आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रातील अष्टमीला कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवासिनी महालक्ष्मीची पूजा करतात. नवविवाहित स्रिया पाच वर्षपर्यंत खडे आणि दोरक यांची पूजा करतात. तो दोरक नंतर मनगटाला बांधतात. तिन्हीसांजेला महालक्ष्मीचा तांदळाच्या उकडीचा मुखवटा तयार करून देवी उभी करतात. नंतर तिची पूजा करण्यात येते. त्यावेळी देवीची ओटी भरून हा दोरक देवीला अर्पण करतात. धूपाच्या धुराने भरलेल्या घागरी फुंकण्याला संध्याकाळी सुरुवात होते. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.[ संदर्भ हवा ]

संक्रांत
 

संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणे सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ व एक तुळशीजवळ ठेवले जाते. व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगडे' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे.[ संदर्भ हवा ]

लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणे' देतात. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगडी, तिळगूळ व हळदकुंकू घेतात आणि तीन किंवा पाच सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरांतील देवासमोर पाट मांडून त्यावर या वस्तु ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका आपापल्या घरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी आलेल्या स्त्रियांना वस्तु दिल्या जातात. या वस्तु 'लुटल्या' गेल्या असे म्हणायची पद्धत आहे.. पूर्वी काही ठिकाणी 'सोरट' करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तु त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.[ संदर्भ हवा ]

गौरी-गणपती

संपादन

गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी हात असलेल्या तर काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.[ संदर्भ हवा ]

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. पाच किंवा सात खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने किंवा कुमारिकेने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने (न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळदकुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदुळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींसाठी खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील व मागील दारांपासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्यामोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.[ संदर्भ हवा ]

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबऱ्याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दूर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यतः घावन-घाटले किंवा पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.

तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी 'उतरवतात' म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.[ संदर्भ हवा ]

अनंत चतुर्दशी (भाद्रपद शुद्ध चतुर्दशी)

संपादन

अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने फल प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.[ संदर्भ हवा ]

मुख्य लेख: बोडण

बोडण हे धार्मिक कार्य चित्पावन समाजात केले जाते. लग्न, मुंज यांसारखे मंगलकार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणातील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम एरवी कधीही करता येतो.[ संदर्भ हवा ]

तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नात होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठराविक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.[ संदर्भ हवा ]

आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात.[ संदर्भ हवा ]

देवीची पूजा घरच्या मुख्य स्त्रीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे असा संकेत आहे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर)आवश्यक मानले जाते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घरातील मुख्य स्री सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.[ संदर्भ हवा ]

खानपान

संपादन
 

कोकणातील रहिवासी असल्याने यांचे मुख्य अन्न तांदूळ, कुळीथ, नाचणी हे आहे. यापासून तयार केलेले अन्नपदार्थ आणि त्यामधे नारळाचा मुबलक वापर हे प्रांतीय उपलब्धतेचे द्योतक आहेत. [१०]

चित्पावनांची स्वतःची चित्पावनी बोलीभाषा ही कोकणी भाषेची उपबोली होती.[११]. १९५० च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत.

देशावरील बहुतेक चित्पावन ब्राह्मणांनी चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला. एके काळी चित्पावन ब्राह्मणांचे संस्कृत भाषेवरसुद्धा प्रभुत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी ही जवळपास प्रमाण मराठी भाषेसारखीच असते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमिक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामुख्याने चालू केला.[ संदर्भ हवा ]

व्यवसाय आणि अर्थकारण

संपादन

पेशवाईपूर्व काळात कोकण विभागात चित्पावन समाज हा मुख्यत्वे स्थानिक समुदाय शेती व भिक्षुकीवर अवलंबून होता. त्यांत अगदी तुरळक प्रमाणात प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा समावेश असे. पेशवाईच्या काळात थोडा बदल होऊन सरदारकी तसेच सैन्यातील कामे वाढली, प्रशासनातील कारकुनी कामातही वाढ झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भिक्षुकांची स्थिती सुधारली. असे असले तरी, सुधारलेल्या स्थितीचा उपयोग करून अपवादात्मक उद्योग व्यवसाय करण्याचे जे प्रयत्‍न झाले ते तात्कालिक स्वरूपाचे ठरले. आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेला हा चित्पावन समाज पेशवाईनंतर आलेल्या इंग्रजी प्रशासनात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून शासकीय क्षेत्रात रमला. इंग्रजांनीसुद्धा सुरुवातीला थोडा संशय बाळगला तरी लौकरच त्यांना प्रशासनात सामील करून घेतले. चित्पावन समुदायाचे बरेच लोक अर्थक्षेत्रे, विपणन, शिक्षण, स्वयंउद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रांत आढळतात.[ संदर्भ हवा ]

इतिहास

संपादन

पेशवाई पूर्व

संपादन

कोकणात १८०० वर्षांपासून राहात असूनही या गटातील लोकांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कोकणस्थांत वेदाध्ययन करून स्नानसंध्येत काल घालवणारे व चरितार्थाकारिता शेती करणारेच पुष्कळ होते.[१२] या संदर्भात वि. का. राजवाडे लिहितात,

"चित्पावनांची उद्योन्मुखता आस्ते आस्ते व क्रमाक्रमानेच होत आली आहे. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावनांना परशुरामाने कोकणात आणून बसवले तेव्हा ते फक्त १४ जण होते. शकपूर्व १२०० ते शकोत्तर १२०० पर्यंतच्या २५०० वर्षांत चित्पावनांची लोकसंख्या इतकी थोडी होती की, हिंदुस्थानच्या राजकारणांत हात घालण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. त्यांची लोकसंख्या चार-पाच हजार असावी. प्रजावृद्धी होण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. शके १२०० नंतर मुसलमानी अमलात लौकिक व्यवहार चित्पावन उचलू लागले, तसतसे त्यांचे आर्थिक सामर्थ्य वाढू लागले व जास्त प्रजा पोसण्याची शक्ती-बुद्धीला काही प्रमाणात संपत्तीची व प्रजावृद्धीची जोड मिळाली, तेव्हा हिंदुस्थानच्या राजकारणात हात घालण्याची शक्ती त्यांच्यांत उत्पन्न झाली. ही शक्ती संधीची वाट पाहत होती व ती संधी राजाराम छत्रपतींच्या मृत्यूनंतर चित्पावनांना सापडली व तिचा त्यांनी यथायोग्य उपयोग केला."[ संदर्भ हवा ]

पेशवाई

संपादन

चित्पावनांचे मूळपुरुष साधारण ३००० वर्षांपूर्वी कोकणात स्थायिक झाले असावेत. उत्तरेतून ६२ कुळे यज्ञाच्या निमित्ताने पैठण, कर्नाटक व अखेर कोकणात आली. बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून चित्पावनांच्या इतिहासाची ठळक नोंद मिळते.

राजकारणातील सहभाग

संपादन

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्री मंडळात स्थान मिळवणारे विठ्ठलराव गाडगीळ. पांडुरंग सदाशिव साने हे ज्येष्ठ गांधीवादी.



बहुसंख्य नागरिकांप्रमाणे चित्पावन हेही हिंदुत्वाचे अभिमानी व राष्ट्रीय मनोवृत्तीचे असतात असे मानले जाते. या गटातील काही व्यक्ती पुरोगामी असल्याचेही दिसून येते. गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी अशा विविध विचारसरणी अनुसरणाऱ्या गटांमधे या वर्णातील लोकही सहभागी आहेत,' चित्पावनांमध्ये हिंदुत्ववादी जास्त आहेत असा समज रूढ असल्याचे दिसते.[ संदर्भ हवा ]

चित्पावनांचा समाजकारण सहभाग

संपादन

अमरावतीजवळ तपोवन येथे प्रख्यात समाजसेवी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम काढला होता.[१३] महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळीला पुण्यातील चित्पावन भिडेशास्त्री यांनी सर्वतोपरी मदत केली. पुढे लोकमान्य टिळकांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला त्यांनी आंतरशाखीय विवाहाचे समर्थन केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेले अस्पृश्यता निवारण कार्य उल्लेखनीय होते. सहभोजन (सर्व जातीय एक पंगत), रत्‍नागिरीत त्यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले पतित पावन मंदिर सर्व जातीय हिंदूंसाठी खुले असे मंदिर होते. शाळेत सर्व जातीय मुलांना सरमिसळ बसवण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले आणि ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. भूदान चळवळ करून शेत जमिनीच्या समान वाटपाचा आग्रह धरणारे विनोबा भावे हे एक श्रेष्ठ गांधीवादी नेते होते. सेनापती बापट या नावाने प्रसिद्ध असणारे पांडुरंगराव महदेवराव बापट हे सामजिक चळवळीत अग्रेसर असणार मोठं नाव होत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात मोठं योगदान देणारे श्री. यशवंतराव केळकर हे ही कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण. विवेकानंद शीला स्मारक, कन्याकुमारीच्या उभारणीचं अशक्यप्राय वाटणार काम उभ करणारे एकनाथराव रानडे हे ही कोकणस्थ चित्पावन! कसबा पेठ मतदार संघाचे माजी आमदार माजी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र शासन तसेच पुण्याचे विद्यमान खासदार गिरिश बापट,देवगड कणकवली मतदार संघाचे माजी आमदार अप्पासाहेब गोगटे तसेच त्यांचे पुतणे माजी आमदार अजितराव गोगटे.

चित्पावनांच्या संस्था आणि उपक्रम

संपादन
  • अपरांत (संस्था)
  • महाराष्ट्र चित्पावन संघ
  • चित्तपावन सेवा संघ ट्रस्ट
  • चित्पावन ब्राह्मण संघ
  • महर्षि शांडिल्य प्रतिष्ठान

भारतातील विविध राज्यात तसेच भारताबाहेरही या संस्था कार्यरत आहेत,

प्रसिद्ध चित्पावन

संपादन

पेशवा, इरावती कर्वे, माधुरी दीक्षित, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अजित भालचंद्र आगरकर, वासुदेव बळवंत फडके, विठ्ठल नरहर गाडगीळ माधव आपटे, प्रशांत दामले, गोपाळ गणेश आगरकर, विक्रम गोखले, मोहन गोखले, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळराव जोशी, चाफेकर बंधू, विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले, सेनापती बापट, नाना फडणवीस, बापू गोखले, धोंडो केशव कर्वे, विमलबाई गायकवाड (पूर्वीचे रानडे), बी. जी. चितळे, कॅम्लिनचे दांडेकर, परांजपे स्कीमस् चे परांजपे, संस्कृती कोशकर्ते पं. महादेवशास्त्री जोशी, ज्ञानकोशकार केतकर, शरद पोंग्शे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, चितळे, वामन हरी पेठे, पु.ना.गाडगीळ, चितळे उद्योग समूह, परांजपे बिल्डर, पेठे लोणचीवाले, कॅम्लिनचे दांडेकर, अल आदिल सुपर स्टोअर दुबईचे महादेव दातार

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "मराठी पुस्तक आम्ही चित्पावन, marathi book AmhI chitpAvan AmhI chitpAwan". www.rasik.com. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-10 रोजी पाहिले.
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा, पृष्ठ ४०२
  3. ^ Ghosh, Oroon K. (1976). The Changing Indian Civilization: A Perspective on India (इंग्रजी भाषेत). Minerva Associates (Publications). ISBN 9780883865026.
  4. ^ Hari Menon (2004-11-08). "Bones Of A Riddle". 2013-05-31 रोजी पाहिले.
  5. ^ "New Twist to mystery over Roopkund skeletons". The Hindu. 25 January 2005. 2005-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 May 2013 रोजी पाहिले.
  6. ^ https://web.archive.org/web/20071227160923/http://www.chitpavans.in/marathi/gotra.htm तारीख २६/५/२००९ १६.५० वाजता घेतेलेला आंतरजालीय संदर्भ
  7. ^ http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Kolaba/population_brahmans.html#1
  8. ^ दीक्षित म.श्री.,आम्ही चित्पावन,नीलकंठ प्रकाशन,२००३,पृृष्ठ १२५
  9. ^ भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा. पृष्ठ ४०४
  10. ^ "उकडीचे मोदक,उकडीच्या करंज्या". 2009-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-08-08 रोजी पाहिले.
  11. ^ Chitpavani dialect is found in Gazetteer of the Bombay Presidency- Ratnagiri and Sawantwadi Districts, which has been published in 1880.
  12. ^ 'कोकण आणि कोकणस्थ' हे चिंतामणराव वैद्य यांनी लिहिलेले आहे.
  13. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi Archived 2016-03-04 at the Wayback Machine. ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.

[१८८० च्या गॅझेटियर चा दुवा १]

बाह्य दुवे

संपादन


चुका उधृत करा: "१८८० च्या गॅझेटियर चा दुवा" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="१८८० च्या गॅझेटियर चा दुवा"/> खूण मिळाली नाही.