विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन

(या पानावरील मजकूर हे इंग्रजी पानावरील मजकुराचे भाषांतर आहे.)

विकिपीडिया : निष्पक्षपाती दृष्टिकोण

संपादन

विकिपीडियावरील सर्व मजकूर निष्पक्षपाती दृष्टिकोणातून लिहिलेला असला पाहिजे. याचा अर्थ असा की ज्या विशिष्ट विषयावर मजकूर लिहिलेला असेल, त्या विषयासंबंधातील सर्व लक्षणीय व विविध विचार जे विश्वसनीय स्रोतांमध्ये प्रसिद्ध झालेले असतील, त्यांचा योग्य प्रमाणात व कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निष्पक्षपाती परामर्श घेतलेला असावा.

निष्पक्षपाती दृष्टिकोण हे विकिपीडियाचे आणि विकिमीडियाच्या इतर प्रकल्पांचे एक मूलभूत तत्त्व आहे. तसेच ते विकिपीडियाच्या केंद्रस्थानी असलेल्या तीन धोरणांपैकी एक आहे; इतर दोन धोरणे ही - "पडताळणी करता येणे" आणि "मूलभूत संशोधन नाही." ही धोरणे सामायिकरीत्या ठरवितात की विकिपीडियावरील लेखांमध्ये कोणत्या प्रकारचा आणि गुणवत्तेचा मजकूर स्वीकारार्ह असेल, आणि त्या धोरणांचा निकष एकत्रितपणे लावला जात असल्याने, कोणत्याही एका धोरणाचा अर्थ स्वतंत्रपणे लावला जाऊ नये. संपादकांनी या तीन धोरणांचा नीट परिचय करून घ्यावा असा आमचा आग्रह आहे.

या धोरणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, आणि ज्या तत्त्वावर ते आधारित आहे, त्यांच्याविरुद्ध कोणतीही इतर धोरणे किंवा मार्गदर्शक तत्त्वे घालून देता येणार नाहीत किंवा संपादकांच्या सहमतीने सुद्धा तसे करता येणार नाही.

निष्पक्षपाती दृष्टिकोणाचे स्पष्टीकरण

संपादन

निष्पक्षपातीपणा म्हणजे विकिपीडिया समुदायाला जे अपेक्षित असते, ते देण्यासाठी निरनिराळ्या विश्वसनीय स्रोतांचे काळजीपूर्वक विश्लेषण आणि समीक्षा करावी लागते आणि मग त्यातील माहिती समतोलपणे, योग्य प्रमाणात आणि शक्यतो कोणत्याही संपादकीय पूर्वग्रहाशिवाय वाचकापर्यंत पोहचवावी लागते. विकिपीडियाचा उद्देश वादविवादांचे वर्णन करणॆ हा असतो, परंतु त्यात भाग घेणे हा नसतो. संपादकांचा स्वत:चा स्वाभाविक दृष्टिकोण असू शकतो, परंतु त्यांनी निष्ठापूर्वक संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करावा व एका विशिष्ट दृष्टिकोणाचा दुसर्‍यापेक्षा अधिक पुरस्कार करू नये. तेव्हां, निष्पक्षपाती दृष्टिकोण म्हणजे कांही विशिष्ट दृष्टिकोण वगळणे नव्हे, तर ज्यांची पडताळणी करता येणे शक्य असेल व ज्यांच्यामध्ये पुरेसे वजन असेल, असे सर्व दृष्टिकोण समाविष्ट करणे. एका ज्ञानकोशासाठी योग्य असा निष्पक्षपातीपणा येण्यासाठी खालील तत्त्वांचा अवलंब करावा.

  • मते वस्तुस्थिति म्हणून मांडणे टाळावे. सर्वसामान्यपणे, लेखांमध्ये त्यांच्या विषयासंबंधातील लक्षणीय मतांची माहिती असते. तथापि, ती मते विकिपीडियाच्या आवाजात मांडू नयेत. त्याऐवजी, त्यांच्या विशिष्ट मूळ स्रोताचा उल्लेख करावा, किंवा जेथे योग्य असेल तेथे, त्याचा एक व्यापक दृष्टिकोण म्हणून उल्लेख करावा. उदाहरणार्थ, लेखात असे म्हणू नये की "वंशविच्छेद हे एक सैतानी कृत्य आहे", तर असे म्हणावे की "अमुक व्यक्तीने वंशविच्छेदाचे वर्णन मानवी पाशवीपणाची परिसीमा असे केले आहे."
  • वादग्रस्त दावे वस्तुस्थिति म्हणून मांडू नयेत. वेगवेगळे विश्वसनीय स्रोत एकाच विषयाबाबत उलटसुलट दावे करत असतील, तर त्या दाव्यांना मतप्रदर्शन समजावे, वस्तुस्थिति नव्हे, आणि ती थेट विधाने म्हणून मांडू नयेत.
  • वस्तुस्थितीला मत म्हणून मांडू नये. विश्वसनीय स्रोतांमध्ये मांडलेले वस्तुस्थितीचे दावे, जे निर्विवाद आणि निर्विरोध असतील, ते सर्वसामान्यपणे थेट विकिपीडियाचा आवाज म्हणून मांडावेत. एखाद्या निर्विवाद दाव्यासंबंधात अमान्यता दर्शविणारा लेख असेल, तरच मूळ दाव्याच्या स्रोताचा उल्लेख करावा अन्यथा तशी आवश्यकता नाही. तथापि, पडताळणीसाठी मूळ स्रोताची लिंक देणे नेहमीच अधिक चांगले. शिवाय, मजकूर अशा स्वरूपाचा नसावा की ज्यातून कोणत्याही प्रकारे विवाद दर्शविला जात असेल.
  • मूल्यमापनात्मक भाषा टाळावी. एक निष्पक्षपाती दृष्टिकोण त्या विषयाबद्द्ल (किंवा त्या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जे म्हणत असतील त्याबद्दल) सहानुभूति दर्शवीत नाही किंवा त्याची हेटाळणी करत नाही. अर्थात, क्वचित प्रसंगी स्पष्टतेसाठी यात थोडी तडजोड गरजेची असू शकते. मते आणि दुमते एका समतोल रंगात मांडावीत. संपादकीय मते त्यात घालू नयेत. जेव्हां एका विशिष्ट दृष्टिकोणाकडे झुकलेला संपादकीय पूर्वग्रह जाणवत असेल, तेव्हां तो लेख सुधारला पाहिजे.
  • परस्परविरोधी दृष्टिकोणांचे तौलनिक महत्त्व दर्शवावे. एखाद्या विषयासंबंधातील वेगवेगळ्या दृष्टिकोणांना असलेला तौलनिक पाठिंबा लेखात प्रतिबिंबित व्हावा आणि उगाचच त्यांची नसलेली समानता प्रतीत होऊ नये, किंवा एखाद्या विशिष्ट दृष्टिकोणाला अवाजवी वजन देऊ नये. उदाहरणार्थ, असे म्हणणे की, "सायमन वीसेन्थालच्या म्हणण्यानुसार, होलोकॉस्ट हा जर्मनीतील यहूदी लोकांचा समूळ नाश करण्याचा कार्यक्रम होता, परंतु डेव्हिड इर्विंग या विश्लेषणावर शंका व्यक्त करतो", हे मोठ्या बहुमताला आणि अल्पमताला एकाच पातळीवर ठेवल्यासारखे होईल, जणू ते दोन दृष्टिकोण दोन व्यक्तींचेच आहेत.

निष्पक्षपातीपणा कसा आणावा

संपादन

एक सर्वसामान्य नियम असा की, एखाद्या स्रोतातून मिळविलेली माहिती ज्ञानकोशातून केवळ एवढ्याचसाठी वगळू नये की ती पूर्वग्रहदूषित वाटते. त्याऐवजी, तो परिच्छेद किंवा विभाग अशा पद्धतीने पुन्हा लिहावा की ज्यायोगे एक अधिक निष्पक्षपाती दृष्टिकोण व्यक्त होईल. अनेकदा, पूर्वग्रहदूषित माहितीच्या समोर इतर स्रोतांमधील माहिती सादर केली असता अधिक निष्पक्षपातीपणा दिसू शकतो. तेव्हां अशा वेळी शक्यतोवर सर्वसाधारण संपादन प्रक्रियेतून या प्रकारचा दोष सुधारावा. मजकूर तेव्हांच गाळावा, जेव्हां असे वाटायला जागा असेल की त्या मजकुरामुळे वाचकांची दिशाभूल होईल किंवा त्यांना चुकीची माहिती मिळेल आणि तो परिच्छेद पुन्हा लिहून देखील ते टाळता येणार नाही. खालील विभागांमध्ये सर्वसाधारण अडचणी व दोष यांच्या संबंधात विशिष्ट मार्गदर्शन केले आहे.

मथळा देणे

संपादन

कांही वेळा, एखाद्या विषयासाठी जो मथळा वापरलेला असतो, त्यातून पूर्वग्रह दिसू शकतो. निष्पक्षपाती शब्दप्रयोग केव्हांही अधिक योग्य,पण सुस्पष्टपणा सुद्धा विचारात घेतला पाहिजे. जर एखादा शब्दप्रयोग विश्वसनीय स्रोतांमध्ये विस्तृत प्रमाणावर उपयोगात असेल, आणि म्हणून तो वाचकांना व्यवस्थितपणे परिचित असेल, तर त्याचा मथळा म्हणून उपयोग करायला हरकत नाही, मग ते जरी कांही वाचकांना पूर्वग्रहदूषित वाटले तरी. उदाहरणार्थ, "बॉस्टन हत्त्याकांड", "टीपॉट डोम घोटाळा" आणि "जॅक, द रिप्पर" हे त्या त्या विषयांच्या संदर्भातील योग्य शब्दप्रयोग आहेत, जरी त्यातून न्यायनिवाडा केल्याचे प्रतीत होत असले तरी. एखाद्या विषयासाठी कोणत मथळा योग्य असेल, ते संदर्भावर अवलंबून असेल. त्या मथळ्याऐवजी दुसरे कांही शब्दप्रयोग असतील, तर त्यांचा उल्लेख करणे आणि त्यांच्या बाबतीत जे वाद असतील त्यांचा सुद्धा उल्लेख करणे योग्य असेल, विशेषत: तेव्हां, जेव्हां हातात असलेला विषय मुख्य विषय असेल.

हा सल्ला खास करून लेखांच्या मथळ्यासाठी उपयुक्त आहे. जरी कित्येक वेगवेगळे शब्दप्रयोग सर्वसाधारण उपयोगात असले, तरी लेखाच्या मथळ्यासाठी लेखाच्या मथळ्यासाठीच्या धोरणानुसार (आणि त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उदाहरणार्थ भौगोलिक नांवे) एकाचाच उपयोग करावा. लेखांच्या मथळ्यांमध्ये वैकल्पिक शब्दप्रयोग असू नयेत. उदाहरणार्थ, "सपाट पृथ्वी (गोल पृथ्वी)". त्याऐवजी, वैकल्पिक शब्दप्रयोग लेखातच ठळकपणे दर्शवावे आणि त्याच्या योग्य संदर्भाकडे दिशानिर्देश करावा.

कांही लेखांचे मथळे वर्णनात्मक असतात आणि केवळ नांवच नसतात. वर्णनात्मक मथळ्यांमध्ये शब्द नैसर्गिक असावेत, जेणॆकरून विषयाच्या बाजूने किंवा विरुद्ध असा कोणताही दृष्टिकोण सूचित होत असू नये, किंवा त्यामुळे विषयाच्या एका विशिष्ट पैलूवरच लेख असल्याचे दिसू नये. (उदाहरणार्थ, "क्ष वरील टीका" अशा मथळ्याऐवजी "क्ष बाबत समाजाचे दृष्टिकोण" हा मथळा अधिक योग्य). निष्पक्षपाती मथळ्यांमुळे विविध दृष्टिकोण आणि जबाबदार लिखाण यांना उत्तेजन मिळते.

लेखाची रचना

संपादन

निष्पक्षपातीपणा राखण्यासाठी आणि दृष्टिकोणांचे विभाजन किंवा अवाजवी भर यासारखे दोष टाळण्यासाठी, लेखाच्या अंतर्रचनेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असू शकते. जरी कोणत्याही विशिष्ट लेखरचना निषिद्ध नाहीत, तरी ही काळजी घेतली गेली पाहिजे की मांडणी सामान्यपणे निष्पक्षपाती असेल.

मजकुराच्या दृष्टिकोणानुरूप वेगवेगळे विभाग किंवा उपविभाग अशी रचना केल्याने ते ज्ञानकोशासारखे न वाटता, दोन बाजूंधील वादविवाद असल्यासारखे दिसेल. त्यामुळे असे पण वाटू शकते की मुख्य परिच्छेद हा सत्य आणि निर्विवादित आहे, आणि इतर मजकूर विवादास्पद आहे आणि म्हणून असत्य असण्याची अधिक शक्यता आहे. तेव्हां परस्परविरोधी वादविवाद हे वेगवेगळे न मांडता मुख्य मजकुरातच समाविष्ट करून लेखात निष्पक्षपातीपणा आणता येईल.

वाजवी आणि अवाजवी भर

संपादन

निष्पक्षपातीपणासाठी हे गरजेचे आहे की प्रत्येक लेखात किंवा दुसर्‍या पानात, विश्वसनीय स्रोतांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या लक्षणीय दृष्टिकोणांचे त्यांच्या तेथील ठळकपणाच्या प्रमाणात सादरीकरण झालेले असावे. योग्य भर देणे आणि अवाजवी भर टाळणे याचा अर्थ असा की अल्पमतातील दृष्टिकोण किंवा पैलू यांना बहुमतातील दृष्टिकोणांइतके महत्त्व देऊ नये. सर्वसामान्यपणे, अगदी नगण्य पाठिंबा असलेले मत समाविष्ट करूच नये किंवा फार फार तर "हे सुद्धा पहा" याखाली द्यावे. उदाहरणार्थ, पृथ्वीवरील लेखात सपाट पृथ्वीच्या संकल्पनेला आधुनिक काळात अत्यल्प पाठिंबा असल्याचा थेट उल्लेख नसतो, कारण तसे केल्याने त्याला अवाजवी महत्त्व दिल्यासारखे होईल.

अवाजवी भर कित्येक वेगवेगळ्या पद्धतींनी दिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तपशीलांची खोली, मजकुराची लांबी, तो जिथे ठेवला आहे त्या जागेचा ठळकपणा आणि आजूबाजूला ठेवलेली वाक्ये, वगैरे. अल्पमताचा दृष्टिकोण मांडण्यासाठी लिहिलेल्या लेखांमध्ये, अशा दृष्टिकोणाला अधिक जागा आणि लक्षवेधीपणा मिळू शकतात. तथापि, अशा पानांमध्ये योग्य ठिकाणी बहुमताच्या दृष्टिकोणाचा योग्य प्रकारे उल्लेख असला पाहिजे आणि केवळ अल्पमताचाच दृष्टिकोण असू नये. खास करून याकडे लक्ष द्यावे की मजकुरातील जो भाग अल्पमताचा दृष्टिकोण असेल, ते तसे स्पष्ट व्हावे. शिवाय, बहुमताचा दृष्टिकोण पुरेशा तपशीलासह स्पष्ट केला जावा, जेणेकरून वाचकाला हे समजेल की अल्पमताचा दृष्टिकोण कशा प्रकारे बहुमताच्या दृष्टिकोणापेक्षा वेगळा आहे आणि अल्पमतातील दृष्टिकोणाच्या कोणत्या पैलूंबाबत वाद आहे, ते स्पष्टपणे मांडलेले असावे. किती तपशील असावा हे विषयावर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, सपाट पृथ्वी यासारख्या विषयावरील ऐतिहासिक दृष्टिकोणांचा आढावा घेणार्‍या लेखात, आधी आधुनिक दृष्टिकोण थोडक्यात मांडून मग त्या संकल्पनेच्या इतिहासाची तपशीलवार चर्चा करावी, कारण सपाट पृथ्वी या संकल्पनेला आधुनिक काळात कोणाचाच पाठिंबा नाही. असे करतांना, त्या नाकारल्या गेलेल्या संकल्पनेचा इतिहास निष्पक्षपातीपणॆ मांडावा. इतर अल्पमतातील दृष्टिकोणांच्या संदर्भात, बहुमतातील दृष्टिकोणाचे विस्तृत वर्णन गरजेचे असू शकते, जेणेकरून वाचकाची दिशाभूल होणार नाही.

विकिपीडियामध्ये कोणताही वाद अशा प्रकारे मांडला जाऊ नये की जणू एका छोट्या अल्पमतातील दृष्टिकोणाला सुद्धा बहुमतातील दृष्टिकोणाइतकेच महत्त्व आहे. एका अत्यल्पमतातील दृष्टिकोणाची मांडणी तेव्हांच केली जावी, जेव्हां तो लेख त्या दृष्टिकोणाबद्दलच असेल (उदाहरणार्थ सपाट पृथ्वी). लक्षणीय, तरी अल्पमतातील दृष्टिकोणाला अवाजवी वजन देणे, किंवा अत्यल्पमतातील दृष्टिकोणाचा समावेश करणे यामुळे वादाला दिशाभूल करणारे वळण मिळू शकते. एखाद्या विषयावरील निरनिराळ्या दृष्टिकोणांना विश्वसनीय स्रोतांमध्ये ज्या प्रमाणात जागा दिली गेली असेल, त्याच प्रमाणात विकिपीडियामध्ये त्यांना मांडणी मिळावी असे विकिपीडियाचे ध्येय आहे. हे केवळ लेखाच्या मजकुराबाबतच नाही, तर चित्रे, विकिलिंक्स, बाह्यलिंक्स, वर्गवारी आणि इतर साहित्याबाबत सुद्धा लागू आहे.

जिंबो वेल्स च्या सप्टेंबर, २००३ च्या पोस्टचा सारांश :

  • जर एक दृष्टिकोण बहुमताचा असेल, तर सर्वसाधारणपणॆ स्वीकारार्ह असलेल्या संदर्भांच्या सहाय्याने त्याचे पुष्टिकरण करणॆ सोपे असते.
  • जर एक दृष्टिकोण लक्षणीय अल्पमताचा असेल, तर त्याला पाठिंबा देणार्‍या कांही मान्यवर व्यतींची नांवे देणे शक्य असावे.
  • जर एक दृष्टिकोण खूपच अल्पमताचा असेल, तर तो विकिपीडियावर असता कामा नये, मग तो सत्य असला तरी, किंवा तो सिद्ध करता येत असला तरी; पण तो एखाद्या दुय्यम लेखात मांडला जाऊ शकतो.

हे लक्षात असू द्यावे की एखाद्या दृष्टिकोणासाठीचे योग्य वजन ठरवितांना, आपण तो किती विश्वसनीय स्रोतांमध्ये आणि किती प्रमाणात आहे, ते विचारात घेतो, विकिपीडियाच्या संपादकमंडळात किंवा सर्वसामान्य जनतेत त्याला किती महत्त्व आहे ते नाही.

जर तुम्ही असे कांही तरी सिद्ध करू शकत असाल, ज्याच्यावर सध्या तरी कोणाचाच विश्वास नाही किंवा फारच अपवादात्मक विश्वास आहे, तर विकिपीडिया ही त्याची सिद्धता सादर करण्याची जागा नाही. एकदा ते सादर होऊन विश्वसनीय स्रोतांमध्ये त्याच्यावर चर्चा झाली की मग त्याचा योग्य प्रकारे समावेश करायला हरकत नाही.

समतोल राखणारे पैलू

संपादन

विषयाच्या दुय्यम पैलूंना लेखात अवाजवी वजन दिलेले असू नये, तर लेखात असा प्रयत्न असावा की विश्वसनीय आणि प्रसिद्ध झालेल्या स्रोतांमध्ये ते ज्या प्रकारे हाताळलेले असेल, त्याच प्रमाणात दुय्यम पैलूंची मांडणी असावी. उदाहरणार्थ, एखाद्या विषयासंबंधीची तुरळक घटना, टीका, किंवा बातमीपत्रे पडताळता येण्यासारखे आणि निष्पक्ष असतील, पण तरी त्यांची चर्चा लेखाच्या विषयाच्या लक्षणीयतेच्या मानाने कदाचित अवाजवी असेल. हे त्याबाबतीत अधिक चिंताजनक असते, जेव्हां अलिकडील घटना बातम्यांमध्ये असतील.

"समान वैधता" देण्यामुळे खोटा समतोल निर्माण होऊ शकतो कोणत्याही विषयाच्या बाबतीतील सर्व लक्षणीय दृष्टिकोणांचा समावेश करणे जरी महत्त्वाचे असले, तरी प्रत्येक अल्पमतातील दृष्टिकोण किंवा असाधारण दावा सुद्धा सर्वसामान्यपणॆ ग्राह्य असलेल्या विद्वत्तापूर्ण दृष्टिकोणांच्या बरोबरीने मांडले जावेत, असे विकिपीडियाचे धोरण सांगत नाही किंवा त्यातून तसे प्रतीत देखील होत नाही. जगात अशा कित्येक श्रद्धा आहेत, ज्यातील कांही लोकप्रिय आणि कांही फारच थोड्या लोकांना परिचित असतील, उदाहरणार्थ पृथ्वी सपाट असल्याचा दावा, किंवा अपोलोचे चंद्रावर उतरणे ही लबाडी होती, वगैरे. कटकारस्थानाची कथा, दांभिक विज्ञान, तार्किक इतिहास किंवा शक्यतेच्या परिघात असलेल्या, परंतु अजून तरी ग्राह्य नसलेल्या सिद्धांतांची तुलना, ग्राह्य असलेल्या विद्वत्तापूर्ण शैक्षणिक सिद्धांतांच्या बरोबर करून त्यांना मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करू नये. ज्ञानकोशाचे लेखक या नात्याने आपण या बाबींवर त्यांच्या बाजूने किंवा विरुद्ध भूमिका घेत नाही; आपण फक्त ती माहिती गाळायची, जिचा समावेश केला तर तिला उगाचच अवाजवी मान्यता दिल्यासारखे होईल. अन्यथा, या संकल्पनांचा समावेश केलाच, तर प्रस्थापित विद्वत्तापूर्ण मांडणी आणि विस्तृत स्वीकारार्हता असलेल्या विचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वर्णन करावे.

उत्तम संशोधन

संपादन

सर्वोत्तम, मान्यताप्राप्त आणि अधिकारी अशा स्रोतांमध्ये केलेल्या चांगल्या आणि निष्पक्षपाती संशोधनाची निष्पक्षपाती दृष्टिकोणासंबंधातील वादविवाद टाळण्यास मदत होते. सन्मान्य पुस्तके आणि जर्नल्स मधील लेख यांसाठी ग्रंथालयात जावे आणि इंटरनेटवर जाऊन जास्तीत जास्त विश्वसनीय स्रोत शोधावेत. तुम्ही ज्या लेखावर काम करत असाल, त्यासाठी जर तुम्हाला उत्तम गुणवत्तेचे स्रोत शोधण्यासाठी मदत हवी असेल, तर संवाद पानावर इतर संपादकांची मदत मागा किंवा संदर्भ खात्याला विचारा.

समतोल

संपादन

निष्पक्षपातीपणासाठी निरनिराळ्या दृष्टिकोणांना त्यांच्या त्यांच्या ठळकपणाच्या प्रमाणात महत्त्व (वजन) द्यावे. परंतु, जेव्हां सन्मान्य स्रोतांमध्येच असहमति असते आणि ते समान प्रमाणात ठळक असतात, तेव्हां त्या दोन्ही दृष्टिकोणांचे वर्णन करा आणि त्यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. यासाठी परस्पविरोधी दृष्टिकोण स्पष्टपणॆ वर्णन केले पाहिजेत आणि इतर दुय्यम व तिय्यम स्रोतांमधून माहिती मिळवावी, जी अधिक तटस्थ असेल.

निष्पक्षपाती सूर

संपादन

विकिपीडिया वादविवादांचे वर्णन करतो. विकिपीडिया स्वत: वादविवादात भाग घेत नाही. वादविवादांचे निष्पक्षपाती सादरीकरण करण्यासाठी सर्व वेगवेगळे दृष्टिकोण सातत्याने निष्पक्षपातीपणे मांडले पाहिजेत; अन्यथा, लेखात जरी सर्व दृष्टिकोण मांडलेले असले, तरी तो पक्षपाती भाष्यासारखा वाटेल. जरी एखादा विषय सर्वस्वी वस्तुस्थितीचे वर्णन करत असला आणि मतमतांतरांचे नाही, तरी ज्या पद्धतीने वेगवेगळी तथ्ये लेखात निवडली, मांडली आणि लावली जातात, त्यानुसार लेखाचा सूर अयोग्य लागू शकतो. निष्पक्षपाती लेख अशा सुरात लिहिले जातात, जेणेकरून लेखात समाविष्ट केलेल्या सर्व दृष्टिकोणांचे एक तटस्थ, अचूक आणि प्रमाणबद्ध सादरीकरण दिसेल.

विकिपीडियातील लेखांचा सूर निष्पक्षपाती असला पाहिजे, जो कोणत्याही दृष्टिकोणाला दुजोरा देत नसावा किंवा नाकारत नसावा. तीव्र वादात सहभागी असलेल्यांचे म्हणणे जसेच्या तसे उद्धृत करू नका, तर त्यांचा सारांश देऊन त्यांचे म्हणणॆ निष्पक्षपातीपणॆ मांडा.

सौंदर्यग्राहक मते वर्णन करणॆ

संपादन

विकिपीडियामधील कला व इतर सृजनशील विषयांवरील लेख (उदाहरणार्थ, संगीतकार, नट, पुस्तके, वगैरे) बर्‍याचदा भावनिक आणि शब्दबंबाळ असतात. ज्ञानकोशात हे बसत नाही. सौंदर्यग्राहक मते विविध प्रकारची आणि वैयक्तिक असतात - सर्वश्रेष्ठ तबलावादक कोण याबाबत आपल्या सर्वांचे एकमत होणे शक्य नाही. तथापि, एखाद्या कलाकाराच्या कामाबद्दल प्रथितयश तज्ञ काय म्हणतात आणि सर्वसामान्य लोकांना काय वाटते, याची नोंद करणे योग्य आहे. उदाहरणार्थ, शेक्सपियरवरील लेखात असे लिहिले असावे की इंग्रजी भाषेतील सर्वश्रेष्ठ लेखकांपैकी तो एक होता असे मानले जाते. सृजनशील कृतीच्या तज्ञांनी केलेल्या समीक्षांचा आढावा योग्य त्या संदर्भासहित लेखामध्ये समाविष्ट करावा. ज्यांची पडताळणी करता येऊ शकेल, अशा तज्ञांच्या तसेच सर्वसामान्य लोकांच्या समीक्षांमुळे कलाकृतींना योग्य तो संदर्भ प्राप्त होतो.

कोणत्या शब्दांकडे विशेष लक्ष द्यावे

संपादन

विकिपीडियासाठी निषिद्ध शब्द किंवा शब्दसमूह कोणतेच नाहीत, परंतु कांही शब्दप्रयोग जरा जपून करावेत, कारण अन्यथा त्यांच्यामुळे पक्षपातीपणा दिसेल. उदाहरणार्थ, दावा हा शब्द, जसे "अशोकने असा दावा केला की त्याने बिलाचे पैसे दिले होते" या वाक्यातून अविश्वास ध्वनित होतो. हे किंवा अशा प्रकारचे संशय व्यक्त करणारे शब्दप्रयोग वापरल्यामुळे लेखातून एका भूमिकेला दुसरीपेक्षा अधिक मान्यता असल्यासारखे वाटू शकते. अशा प्रकारचे संशयकारक शब्दप्रयोग न वापरता, वस्तुस्थिति सरळपणे सांगावी; उदाहरणार्थ, "अशोक म्हणाला की त्याने बिलाचे पैसे दिले होते." स्तुतिपर, निंदाकारक, अस्पष्ट, किंवा वापरून गुळगुळीत झालेले शब्दप्रयोग टाळावेत, ज्यांच्यामुळे एखाद्या विशिष्ट दृष्टिकोणाला दुजोरा दिल्यासारखे वाटेल. अर्थात, तसे शब्दप्रयोग जर मूळ लक्षणीय स्रोतात वापरले असतील, तर तो स्रोत उद्धृत करतांना ते तसेच ठेवावे लागतील.

स्रोतांमधील पक्षपातीपणा

संपादन

विश्वसनीय स्रोतांबाबतच्या वादातील एक सर्वसाधारण मुद्दा असा असतो की एक स्रोत पक्षपाती आहे आणि म्हणून दुसर्‍या स्रोताला प्राधान्य द्यावे. कांही संपादक म्हणतात की पक्षपाती स्रोत वापरता कामा नये कारण त्यामुळे लेखात अयोग्य असा दृष्टिकोण येतो. परंतु, पक्षपाती स्रोत केवळ त्यांच्या झुकत्या कलासाठीच नाकारू नयेत. अर्थात, कदाचित तसे स्रोत दुसर्‍या कांही कारणांमुळे अवैध ठरू शकतात. स्रोतांमधील झुकता कल आणि इतर विश्वसनीय स्रोतांमध्ये मतांना ज्या प्रमाणात वजन आहे यांच्यात समतोल साधून लेखात निष्पक्षपाती दृष्टिकोण आणता येतो. त्यासाठी संपादकाच्या दृष्टिकोणाशी सहमत नसलेला स्रोत गाळू नये. अर्थात, याचा अर्थ असा नाही की कोणताही पक्षपाती दृष्टिकोण समाविष्ट करावा; कधी कधी तो गाळल्यामुळे लेख अधिक चांगला होऊ शकेल.

निष्पक्षपातीपणासंबंधातील वादविवाद कसे हाताळावेत

संपादन

पक्षपाती विधाने आणि त्यांचा स्रोत दर्शविणे. पक्षपाती विधाने त्या विधानातच त्यांच्या स्रोतासहित द्यावीत. उदाहरणार्थ, "विनोद हा सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू आहे" हे विधान एक मत दर्शविते आणि विकिपीडियात ते तसेच ठामपणॆ वस्तुस्थिति असल्यासारखे देता येत नाही. त्याऐवजी, ते एका मताचे वास्तविक विधान म्हणून देता येते : "विनोदच्या क्रिकेटमधील कौशल्याची स्तुति "क्ष" व "य" समीक्षकांनी केली आहे." मते पडताळण्याजोगी असली पाहिजेत आणि त्यांचा योग्य संदर्भ दिला पाहिजे.

आणखी एक मार्ग असा की वस्तुस्थितीला अनुसरून तपशील देऊन त्या विधानाचे पुष्टिकरण करणे. उदाहरणार्थ, "विनोदने २००७-०८ च्या कसोटी मोसमात ५० च्या सरासरीने १००० धावा केल्या आणि शिवाय २५ बळी सुद्धा घेतले." विनोद सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू होता की नाही यावर लोक वाद घालू शकतील, परंतु या वस्तुस्थितिदर्शक विधानावर नाही.

पक्षपाती विधाने वेगळ्या आणि गोलमोल शब्दात देण्याचा मोह टाळावा. उदाहरणार्थ, कित्येक लोकांना असे वाटते की विनोद हा सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहे." पण नक्की कोणाला असे वाटते आणि किती लोकांना असा आक्षेप स्वाभाविकपणे येऊ शकतो. यासाठी एकच अपवाद हा की जेव्हां "कित्येक लोकांना वाटते" यासाठी एखाद्या विश्वसनीय स्रोताचा आधार असेल, जसे की मतसर्वेक्षणाचा अहवाल.

दृष्टिकोणाला फाटे फोडणे

संपादन

दृष्टिकोणाला फाटा फोडणे म्हणजे, निष्पक्षपातीपणाच्या धोरणाला वळसा घालण्यासाठी, जो विषय आधीच एका लेखात हाताळलेला असेल, त्या विषयावर एक दुसरा लेख बनविणे. याचा उद्देश असा असतो की सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टिकोण किंवा वस्तुस्थिति टाळणे. हे विकिपीडियात चालत नाही.

एखाद्या विषयाबाबतची सर्व वस्तुस्थिति आणि लक्षणीय दृष्टिकोण एकाच लेखात हाताळले पाहिजेत. अपवाद तेव्हांच असू शकतो जेव्हां एका लेखातून दुसरा उपलेख निघत असतो. कांही विषय एवढे मोठे असतात की एका लेखात त्या विषयाचे सर्व पैलू हाताळता येत नाहीत. उदाहरणार्थ, "उत्क्रांति - वस्तुस्थिति आणि सिद्धांत" हा "उत्क्रांति" या लेखाचा उपलेख आहे, आणि "निर्मिति की उत्क्रांति- एक वाद" हा "निर्मिति सिद्धांत" या लेखाचा उपलेख आहे. या प्रकारे फाटा फोडणॆ हे तेव्हांच चालते, जेव्हां ते निष्पक्षपाती दृष्टिकोणातून लिहिले जाते आणि तो दुसर्‍या एका लेखासंबंधातील सहमती टाळण्याचा प्रयत्न नसतो.

आवश्यक अशी गृहीते धरणे

संपादन

लेख लिहितांना कधी कधी एखादा विषय मांडण्यासाठी कांही गृहीतके आवश्यक असतात. उदाहरणार्थ, उत्क्रांतीबद्दल लिहितांना, प्रत्येक पानावर निर्मिति-उत्क्रांति हा वाद आणण्याने कांही हेतु साध्य होत नाही. कोणाचाच आक्षेप नसेल अशी गृहीतके घेऊन विषय मांडणे किंवा अजिबात गृहीतके घ्यावी न लागता एखादा लेख लिहिणे जवळपास अशक्यच आहे. हे फक्त उत्क्रांतिसिद्धांतावर आधारित प्राणिशास्त्राबाबतच लागू आहे असे नाही, तर तत्त्वज्ञान, इतिहास, पदार्थविज्ञान वगैरेंसारख्या विषयांना सुद्धा लागू आहे.

याबाबतीत कोणताही नियम घालून देणे अवघड आहे, पण पुढील तत्त्वाचा उपयोग होऊ शकेल - एखाद्या विशिष्ट पानावर एका विशिष्ट गृहीतकाची चर्चा करणे योग्य नसेल आणि ते दुसर्‍या एखाद्या पानावर मांडणॆ अधिक योग्य असेल. तथापि, एक थोडका आणि फारसा डोळ्यात न येणारा उल्लेख योग्य असेल.

वादग्रस्त विषय

संपादन

विकिपीडिया असे कित्येक विषय हाताळतो, ज्यांच्यावर जगात तसेच ज्ञानकोशाच्या संपादकांमध्ये तीव्र वादविवाद असतात. विकिपीडियाचा सर्वच विषयांबाबत निष्पक्षपाती दृष्टिकोण ठेवण्याचा प्रयत्न असतो, तरी अशा विषयांबाबत तो अधिक गरजेचा असतो.

अतिरेकी सिद्धांत आणि ढोंगी विज्ञान

संपादन

ढोंगी वैज्ञानिक सिद्धांत त्यांच्या समर्थकांकडून विज्ञान म्हणून मांडले जातात, पण ते विज्ञानाच्या प्रमाणांमध्ये आणि निकषांमध्ये कमी पडतात. उलटपक्षी, वैज्ञानिक सहमति हा एखाद्या विषयाबाबतचा शास्त्रज्ञांमधील बहुमताचा दृष्टिकोण असतो. तेव्हां, आपण जेव्हां ढोंगी विज्ञानातील एखाद्या विषयाबद्दल बोलत असतो, तेव्हां आपण दोन परस्परविरोधी दृष्टिकोण समान असल्याप्रमाणे त्यांचे वर्णन करू नये. कधी कधी, एखाद्या लेखात त्यासंबंधातील ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोण लक्षणीय असू शकतो, पण तरी, त्यामुळे शास्त्रज्ञांमधील बहुसंख्यांचा जो दृष्टिकोण असेल, तो धूसर होऊ नये. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोणाचा समावेश करतांना त्यांना अवाजवी वजन देऊ नये. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोण स्पष्टपणॆ तसाच सांगितला पाहिजे. ढोंगी वैज्ञानिक दृष्टिकोणाबद्दल शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया काय आहे, ते ठळकपणे मांडले पाहिजे. यामुळे विविध दृष्टिकोणांचे वर्णन न्याय्य पद्धतीने करायला मदत होते. हे इतर अतिरेकी विषयांना सुद्धा लागू होते, उदाहरणार्थ, ऐतिहासिक सुधारणावादासाठी पुरावा नसतो किंवा ते जाणूनबुजून पुराव्याकडे काणाडोळा करतात, जसे की पोप जॉन पॉल १ चा खून झाला, किंवा अपोलोचे चंद्रावर उतरणे हे खोटे होते असे म्हणणे.

एखादा विषय ढोंगी विज्ञानात मोडतो की नाही हे ठरविण्यासाठी विकिपीडियाने ढोंगी विज्ञानासाठीची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत.

श्रद्धा आणि व्यवहार या विषयांवरील विकिपीडियातील लेखांमध्ये ज्या व्यक्ति कांही विशिष्ट श्रद्धा बाळगतात आणि त्यानुसार व्यवहार करतात, त्या तसे करण्यासाठी कशामुळे प्रवृत्त होतात याचाच फक्त समावेश न करता, अशा श्रद्धा आणि व्यवहार कसे विकसित झाले, याचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे. इतिहास आणि धर्म यावरील विकिपीडियातील लेख धर्मग्रंथांमधून संदर्भ घेतात, तसेच आधुनिक पुरातत्त्व, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्रोतांचा आधार घेतात.

एखाद्या धर्माचे अनुयायी त्यांच्या धर्मावरील टीकेला आक्षेप घेऊ शकतात कारण त्यांच्या मते, असे विश्लेषण त्यांच्या श्रद्धेच्या विरुद्ध असते. जर त्यांच्या दृष्टिकोणाला विश्वसनीय स्रोतांचा योग्य तो संदर्भ असेल, तर त्याचा उल्लेख करायला हरकत नाही. पण तरी याची खातरजमा करावी की कोणताही विरोधाभास नसावा. निष्पक्षपाती दृष्टिकोणाच्या धोरणाचा अर्थ असा की विकिपीडियाच्या संपादकांनी पुढील वाक्यासारखी वाक्ये लिहावीत : "हिंदुधर्मीयांचा अमुक विश्वास आहे आणि त्यांची अशी पण श्रद्धा आहे की हा विशिष्ट विश्वास हिंदु धर्मात अगदी सुरुवातीपासून आहे; तथापि, आधुनिक काळातील संशोधनातून (उदाहरणार्थ, डॉ. "क्ष" चा शोधनिबंध आणि प्रा."य" नी केलेले कार्बन डेटिंगचे काम) पुढे आलेल्या वस्तुस्थितीच्या परिणामस्वरूप, कांही हिंदुपंथांचा विश्वास आता वेगळा आहे."

धर्माच्या संबधातील अभ्यासांमध्ये कित्येक शब्दांना एक विशिष्ट असा आपला अर्थ असतो, परंतु कमी आधिकारिक संदर्भात, त्यांचा अर्थ वेगळा असतो. उदाहरणार्थ, रूढीवाद, पुराणे, वगैरे. धर्मावरील विकिपीडियातील लेखात असे शब्द वापरतांना विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आधिकारिक अर्थानेच ते शब्द वापरले पाहिजेत, जेणेकरून उगाच कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत किंवा वाचकाचा कांही गैरसमज होऊ नये. उलटपक्षी, एखाद्या विशिष्ट दृष्टिकोणाला सहानुभूति म्हणून किंवा वाचकांचा आधिकारिक आणि अनाधिकारिक अर्थांमध्ये गोंधळ होऊ नये, केवळ एवढ्याचसाठी, जे शब्दप्रयोग सध्याच्या विश्वसनीय आणि समर्पक अशा स्रोतांमध्ये बहुमताने प्रस्थापित झालेले असतील, त्यांचा वापर करणॆ संपादकांनी टाळू नये.

सर्वसाधारण आक्षेप आणि खुलासे

संपादन

विकिपीडियाच्या निष्पक्षपाती दृष्टिकोणाच्या धोरणाबाबत जे आक्षेप आणि चिंता व्यक्त केलेल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे -

तटस्थ असणे

संपादन

⦁ निष्पक्षपातीपणा असे कांही नसतेच तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यास असलेल्या सर्वांना हे माहीत असते की आपणा सर्वांचे आपापले कल असतात. मग, आपण निष्पक्षपाती दृष्टिकोणासंबंधातील धोरण गंभीरपणे कसे घेऊ शकणार? ⦁ वगळण्यासाठी निष्पक्षपातीपणा नसल्याची सबब निष्पक्षपातीपणाच्या धोरणाचा उपयोग कधी कधी असा मजकूर वगळण्यासाठी सबब म्हणून केला जातो, जो पक्षपाती वाटतो. ही एक समस्या नाही का? ⦁ एक स्पष्ट मांडणी - याचा अर्थ काय? या धोरणाच्या एका पूर्वीच्या विभागात, ज्याचा मथळा होता, "एक स्पष्ट मांडणी", त्यात असे म्हटले होते, "वस्तुस्थिति आणि वस्तुस्थितीबद्दलची मते ठामपणॆ मांडा, पण मते ठामपणॆ मांडू नका." याचा अर्थ काय?

निरनिराळ्या दृष्टिकोणात समतोल साधणे

संपादन

⦁ विरोधकासाठी लिहिणे "विरोधकासाठी लिहिणे" याबद्दल तुम्ही काय म्हणता, ते मला समजत नाही. मला विरोधकांसाठी लिहायचे नाही आहे. जी विधाने खोटी असल्याचे दाखवून देता येते, ती वस्तुस्थिति आहे असे ते सांगतात. तुम्हाला असे म्हणायचे आहे काय की लेख लिहितांना निष्पक्षपाती राहाण्यासाठी मी खोटे बोलले पाहिजे, जेणेकरून मी ज्या दृष्टिकोणाशी सहमत नाही, तो पण मांडला जावा? ⦁ नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह दृष्टिकोण हॉलोकॉस्ट नाकारणे यासारख्या दृष्टिकोणांचे काय, जे बहुसंख्य वाचकांना नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह वाटतात, पण कांही लोकांचा तो दृष्टिकोण खरोखरच असतो? आपण त्याबाबत नक्कीच निष्पक्षपाती असायला नको?

संपादकांमधील वाद

संपादन

⦁ पक्षपाती लेखकांना हाताळणॆ

निष्पक्षपातीपणाच्या धोरणाशी मी सहमत आहे, पण इथे असे कांही लोक आहेत, जे कमालीचे पक्षपाती आहेत. मला त्यांचे काम साफ करावे लागते. मी काय करावे?

⦁ सततचे वाद टाळणे

निष्पक्षपातीपणाबाबतचे सततचे आणि न संपणारे झगडे कसे टाळायचे?

इतर आक्षेप

संपादन

⦁ आंग्ल-अमेरिकी भर

विकिपीडियाचा भर आंग्ल-अमेरिकी असल्यासारखे वाटते. हे निष्पक्षपाती दृष्टिकोणाच्या विरुद्ध आहे काय?

⦁ इथे उत्तर नाही

माझा दुसराच आक्षेप आहे - मी कुठे तक्रार करावी?

निष्पक्षपाती दृष्टिकोणाचे धोरण नवीन लोकांना परिचित नसल्यामुळे आणि ते महत्त्वाचे असल्यामुळॆ त्याच्या बाबतचे सर्व मुद्दे यापूर्वी विस्तृतपणे हाताळलेले आहेत. जर तुम्हाला या वादविवादात कांही नवीन भर घालायची असेल, तर तुम्ही धोरणचर्चा या पानावर प्रयत्न करू शकता. विचारण्यापूर्वी खालील पाने पहा.