कोहिनूर (फारसी/उर्दू: کوہ نور, कोह-ई-नूर; प्रकाशाचा पर्वत) हा जगातल्या सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक आणि एकेकाळी जगातला सर्वात मोठा असलेला, मूळचा भारतीय हिरा आहे.

राइश देर क्रिस्ताल या म्युनिक, जर्मनी येथील संग्रहालयामधील कोहिनूर हिऱ्याची काचेची प्रतिकृती. यात कोहिनूरचा ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिचा पती अल्बर्ट याने इ.स. १८५३ मध्ये, त्याला पुन्हा पैलू पाडून घेण्याआधीचा आकार दिसतो आहे.

कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किवा खरेदी केला नाही. मात्र त्याने कितीतरी मालक बदलले.

इतिहास

संपादन

कोहिनूरचा इतिहास हा खून, लढाया, सत्ता व शोकांतिकांचा इतिहास आहे. काही सूत्रांनुसार कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी तो भारतातील गोवळकोंडा (की पन्ना?)येथील खाणीत सापडला असावा. एका कथेप्रमाणे, सूर्याने सत्राजित राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी. सत्राजिताचा भाऊ प्रसेन हा हिरा बरोबर घेऊन शिकारीला गेला होता. तिथे एका सिंहाने त्याला मारून तो मणी नेला. पुढे जाम्बुवंताने सिंहाला मारून मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला श्रीकृष्णावर. श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेऊन पुढे जाम्बुवंताशी युद्ध केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला मणी व आपली कन्या जाम्बुवंती अर्पण केली. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजितास परत केला. पुढे सत्राजिताची मुलगी सत्यभामा हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होऊन श्रीकृष्णाला स्यमंतक मणी वरदक्षिणेत मिळाला. त्यानंतर श्रीकृष्णाने तो सूर्याला परत केला असे म्हणतात.

त्यानंतर १६ व्या शतकामधे आलेल्या बाबर बादशहाचा इतिहास, बाबरनामा (इ. सन १५२६ ते १५३०), यात या हिऱ्याचा उल्लेख येतो. मे १५२६ मधे बाबर जेव्हा आग्रा येथे आला, तेव्हा तेथील राजा विक्रमादित्य याने तो दिला असावा. पुढे हिरा बाबराचा मुलगा हुमायून याच्याकडे गेला. पुढील २०० वर्षे तो बाबरचा हिरा म्हणून ओळखला जात असे. काही सूत्रांनुसार ' द ग्रेट मुगल' आणि कोहिनूर हे हिरे एकच होत. पुढे हा हिरा मुगलांचे वारसदार शाहजहानऔरंगजेब यांच्याकडे आला.

पर्शियाचा (सध्याचा इराण) नादिरशहा याने मुगलांची दिल्ली व आग्रा ही शहरे लुटली, तेव्हा तो त्यांचे मयूर सिंहासन व कोहिनूर घेऊन मायदेशी परत गेला. पहिल्यांदा हा हिरा पाहिल्यावर नादिरशहा आश्चर्याने उद्गारला "कोह-इ-नूर" म्हणजे "प्रकाशाचा पर्वत". तेव्हापासूनच कोहिनूर हे नाव प्रचलित आहे. इ.सन १७४७ मधे नादिरशहाचा खून झाला व कोहिनूर आला अफ़गाणिस्तानच्या अहमदशहा अब्दालीकडे. इ.सन १८०९ मधे अफ़गाणिस्तानच्या शाह शुजाला पदच्युत करण्यात आले तेव्हा शुजा कोहिनूर घेऊन पळाला. शुजाने पंजाबचा महाराजा रणजितसिंग याची मदत घेऊन इ.सन १८३९ मधे अफ़गाणिस्तानची गादी परत मिळवली आणि कोहिनूर रणजितसिंगला कृतज्ञतापूर्वक भेट दिला.

कोहिनूरचा पुढील इतिहास रक्तलांव्छितच आहे. पुढे कोहिनूर पंजाबच्या महाराजा रणजितसिंगचा अल्पवयीन मुलगा दलिपसिंग याच्याकडे गेला. इंग्रजांनी रणजितसिंगाचा लाहोर येथे पराभव करून कोहिनूर जिंकला व तो इतर रत्नांबरोबर लंडन येथे बळजबरीने नेऊन राणी व्हिक्टोरिया हिला नजर केला (इ.सन १८४९)[ संदर्भ हवा ]. हिऱ्याबरोबर इंग्रजांनी दलिपसिंगलाही इंग्लंडला नेले.

इ.सन १८५३ मधे व्हिक्टोरियाचा पती, अल्बर्ट याने त्याला पुन्हा पैलू पाडायची टूम काढली. अल्बर्टच्या मूर्खपणामुळे त्याचे काही तुकडे वेगळे होऊन मूळ हिऱ्याचे वजन १८० कॅरेटवरून १०५ कॅरेट एवढे कमी झाले. सध्या हा हिरा लंडन येथील राणीच्या खजिन्यात (लंडन टॉवर येथे) पहावयास मिळतो.

 
कोहिनूरच्या सध्याच्या आकाराची काचेची प्रतिकृती

एकूणच असे म्हणतात की कोहिनूर पुरुषांना लाभत नाही. त्याच्या बहुतेक पुरुष मालकांचे दुःखद मृत्यू झाले आहेत. स्त्रियांना मात्र त्याचा फारसा त्रास झालेला नाही.

भारताने कोहिनूर परत मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले होते. १९४७ साली स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली कोहिनूरची मागणी ब्रिटिशांनी धुडकावून लावली होती. तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले होते, हिरे वगैरे राजा-महाराजांचा पोरकटपणा आहे. सध्या भारताला त्याची गरज नाही. पाकिस्तानचे हुकूमशहा झुल्फ़िकारअली भुत्तो, इराणी सरकार, महाराजा रणजितसिंगचे सध्याचे वारसदार यांनीही मग कोहिनूरसाठी ब्रिटिकडे प्रतिदावे करून भारताच्या मागणीत अडसर निर्माण केला. अर्थात हे सर्व प्रतिदावे ब्रिटिशांनीच फूस लावल्यामुळे करण्यात आले होते. त्याद्वारे ब्रिटिशांना कोहिनूरचे स्वमित्व नक्की करता येत नसल्याचे कारण पुढे करून तो स्वतःकडेच ठेवता आला. त्यांच्या फोडा आणि राज्य करा नीतीचा हा आणखी एक नमुना.

अजूनही कोहिनूर भारताला परत करण्याबद्दल वावड्या उठतच असतात. पंजाबचा शेवटचा महाराजा रणजितसिंग याने म्रुत्यूशय्येवर असताना, आपल्या म्रुत्यूपत्रात कोहिनूर हिरा, जगन्नाथपुरी (ओरिसा) येथील जगन्नाथमंदिराला दान केला होता. या दाव्याप्रमाणे, कोहिनूर जगन्नाथालाच (श्रीकृष्णाला) परत करण्यात यावा व जगन्नाथाच्या पायावरच तो विराजमान झालेला सगळ्यांना दिसावा हाच सर्वोत्तम पर्याय आहे. अशा रीतीने कोहिनूरचा श्रीकृष्णापासून श्रीकृष्णापर्यंत एक वर्तुळाकार प्रवास पूर्ण होईल.

आजपर्यंतच्या कोहिनूरच्या मालकांची यादी

संपादन

इतिहासपूर्व काळ - सत्राजित, जांबुवंत, श्रीकृष्ण

हे सुद्धा पहा

संपादन