अब्राहम लिंकन
अब्राहम लिंकन (इंग्लिश: Abraham Lincoln ;) (फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ - एप्रिल १५, इ.स. १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते (कार्यकाळ: १८६१ ते १८६५) तर रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. ते अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते. लिंकन यांचा गुलामगिरीची पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध होता. युद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेच्या काही गुलामीचे पाठीराखे असणाऱ्या लोकांनी कट करून त्यांची हत्या केली.
अब्राहम लिंकन | |
सही |
---|
जन्म व शिक्षण
संपादनअब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधील सिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे. त्यांचे नाव त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील थॉमस लिंकन व आई नॅन्सी हॅंक्स हे दोघेही निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरिबीचे व कठीण परिस्थितीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुतः त्यांचे वडील ते त्या भागतील श्रीमंत नागरिक होते. त्यांनी ३४८ एकराचा सिंकिंग स्प्रिंग फार्म डिसेंबर १८०८ मध्ये २०० डॉलरला विकत घेतला होता. आता ही जागा एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केली गेली आहे. त्यांचे वडील मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून गुलामगिरीला असलेल्या विरोधामुळे वेगळे झालेल्या अशा एका बाप्टिस्ट चर्चचे सदस्य होते. त्यामुळे अब्राहम लिंकनला लहानपणापासूनच गुलामगिरीच्या विरोधाचे बाळकडू मिळाले होते. ते स्वतः मात्र वडिलांच्या अथवा इतर कोणत्याच चर्चचा सदस्य झाले नाही.
जमिनीच्या वादामुळे लिंकन कुटुंबाला त्यांच्या जमिनीवरून हलावे लागले. त्यांनी इ.स. १८११ साली जवळच नॉब क्रीक येथे ३० एकर जमीन भाडेपट्टीवर घेतली व तेथे बस्तान हलविले. ही जमिन त्या भागातील उत्तम शेतजमिनींपैकी होती. या काळात लिंकनचे वडील हे एक सन्मान्य नागरिक व यशस्वी शेतकरी व सुतार होते. पुढे इ.स. १८१५ साली जमिनीसंदर्भातील आणखी एका वादामुळे लिंकन कुटुंबाला या जमिनीवरूनही हलावे लागले. या सर्व त्रासास कंटाळून लिंकनच्या वडलांनी इंडियाना राज्यात हलण्याचा निर्णय घेतला. या राज्यातील जमिनीचे केंद्र सरकारने सर्वेक्षण केले असल्याने येथील जमिनींचे कागदपत्र अधिक स्पष्ट व विश्वासार्ह होते. पुढे अब्राहम लिंकनने सर्वेक्षण व वकिली शिकण्यामागे कदाचित या घटनांचा परिणामही असण्याची शक्यता आहे.
अखेर इ.स. १८१६ साली, लिंकन सात वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब इंडियानामधील स्पेन्सर काउंटी येथे हलले. लिंकनने या हलण्यामागे आर्थिक परिस्थिती व केंटकीमधील गुलामगिरीची पद्धत अशी दोन कारणे होती असे पुढे सांगितले आहे. लिंकन नऊ वर्षाचे असताना इ.स. १८१८ साली त्यांच्या आईचा दुधातून होणाऱ्या विषबाधेच्या आजारपणामुळे मृत्यू झाला. लवकरच लिंकनच्या वडिलांनी सारा बुश जॉन्स्टन हिच्याशी दुसरा विवाह केला. लिंकनच्या सावत्र आईने त्यांचा स्वतःच्या मुलासारखाच मायेने सांभाळ केला.
आणखी आर्थिक व जमिनीशी निगडित अडचणींनंतर इ.स. १८३० साली लिंकन कुटुंबीयांनी पुन्हा एकदा स्थलांतर केले व इलिनॉय राज्यातील मेकन काउंटी येथे सरकारी जमिनीवर बस्तान हलविले. पुढील वर्षी बावीस वर्षाच्या लिंकनने स्वबळावर जगण्याचे ठरविले व डेंटन ओफुट या व्यापाऱ्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे काम न्यू सेलम ते न्यू ऑर्लिअन्स येथे बोटीने माल वाहून नेण्याचे होते. असे मानले जाते की या काळात त्यांनी ऑर्लिअन्स येथे गुलांमांचा लिलाव पाहिला व ही घटना त्यांच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली.
त्यांचे शालेय शिक्षण केवळ १८ महिने विविध शाळांमध्ये फिरत्या शिक्षकांकडून झाले. परंतु हातात पडेल ते पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे त्यांचे स्वतःचे स्वतः बरेच शिक्षण झाले. बायबल, शेक्सपियरचे लेखन, व इंग्लिश आणि अमेरिकन इतिहासाचा त्यांनी खोलवर अभ्यास केला. याच काळात त्यांनी अतिशय साधी अशी वक्तृत्व शैली कमावली. या भाषाशैलीमुळे अवघड भाषेतील भाषणे ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत असे. खाण्याकरितादेखील प्राणी मारण्याची कल्पना त्याना पसंत नसल्याने त्यांनी शिकार व मासेमारी यातही कधी रस घेतला नाही. त्यांची शरीरयष्टी मजबूत व उंची भरपूर असून ते उत्तम दर्जाचा लाकूडतोड्या व कुस्तीगीर होते.
मृत्यू
संपादनअब्राहम लिंकन १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स थिएटरमध्ये ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे नाटक पाहण्यास गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. बूथच्या खिशात डेरिंजर नावाचे लहानसे पिस्तूल होते. त्याच्या लहान आकारामुळे ते कोठेही लपवण्यास अगदी सोपे होते म्हणूनच बूथने ते शस्त्र निवडले होते. नाटकात एक विनोदी संवाद येईपर्यंत बूथ दबा धरून थांबला. हेतू हा, की संवादानंतरच्या हास्यकल्लोळात गोळीचा आवाज दडपला जावा. त्यानंतर बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या कल्लोळात बूथने लिंकन यांच्या सहकाऱ्यावर चाकूने वार केला आणि गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. त्यात त्याच्या घोटय़ाचे हाड मोडले. तरी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे बारा दिवसांत पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ठार मारले.[१]
व्यावसायिक जीवन
संपादनलिंकनने त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ इ.स. १८३० साली इलिनॉयच्या विधिमंडळाची निवडणूक लढून केला. या वेळी त्यांचे वय २३ वर्षाचे होते. याच काळात त्यांनी इलिनॉयच्या सैन्यदलातही कॅप्टन म्हणून सेवा केली. या काळात त्यांना युद्धास मात्र सामोरे जावे लागले नाही.
याच काळात त्यांनी बरेच लहान लहान व्यवसाय करण्याचे अयशस्वी प्रयत्नदेखील केले. त्यांनी दारु विकण्याचा परवाना घेऊन व्हिस्की विकली. याच काळात त्यांनी सर विल्यम ब्लॅकस्टोनच्या इंग्लिश कायद्यावरील भाष्य या चार खंडाच्या पुस्तकातील दुसरा खंड वाचला. या पुस्तकाने प्रभावित होऊन त्यांनी स्वतःचे स्वतःच कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर १८३७ मध्ये त्यांना इलिनॉय राज्यात वकिली करण्याची परवानगी मिळाली. याच वर्षी त्यांनी आपले बस्तान याच राज्यातील स्प्रिंगफील्ड गावी हलविले व स्टीफन टी. लोगन यांच्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. लवकरच ते या राज्यातील प्रतिष्ठीत व यशस्वी वकिलांपैकी एक बनले व त्यांची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारली.
अब्राहम लिंकनने इ.स. १८३४पासून इलिनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून काम केले. याच काळामध्ये तो ते व्हिग पक्षाचा सभागृहातील नेता म्हणुनही काम केले. त्यांनीइ.स. १८३७ मध्ये गुलामगिरीच्या प्रथेचा विधिमंडळात पहिला निषेध केला. या वेळेस त्यांनी या प्रथेस अन्यायकारक व चुकीचे धोरण असे म्हणले.
लिंकनने इ.स. १८४१ साली विल्यम हर्नडॉन या व्हिग पक्षाच्या सदस्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. या दोघांनीही इ.स. १८५६ नव्यानेच सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.
लग्न व अपत्ये
संपादनअब्राहम लिंकनने नोव्हेंबर ४, इ.स. १८४२ रोजी ३३ वर्षाच्या वयात मेरी टॉड यांच्याशी विवाह केला. या दांपत्यास चार मुले झाली.
- रॉबर्ट टॉड लिंकन: ऑगस्ट १, इ.स. १८४३, मृत्यु: जुलै २६, इ.स. १९२६.
- एडवर्ड बेकर लिंकन: मार्च १०, इ.स. १८४६, मृत्यु: फेब्रुवारी १, इ.स. १८५०.
- विल्यम वॉलेस लिंकन: डिसेंबर २१, इ.स. १८५०, मृत्यु: फेब्रुवारी २०, इ.स. १८६२.
- थॉमस टॅड लिंकन: एप्रिल ४, इ.स. १८५३, मृत्यु: जुलै १६, इ.स. १८७१.
लिंकनचा अखेरचा वंशज, त्यांचा पणतु, रॉबर्ट बेकविथ हा डिसेंबर २४, इ.स. १९८५ रोजी मरण पावला.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ सचिन दिवाण. अब्राहम लिंकन, वॅन गॉ यांचे ‘हत्या’रे!. लोकसत्ता. 15-03-2018 रोजी पाहिले.
बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
लिंकनवरील मराठी पुस्तके
संपादन- अब्राहम लिंकन (ज्योत्स्ना चांदगुडे)
- अब्राहम लिंकन (प्रदीप पंडित)
- अब्राहम लिंकन (भा.रा. भागवत)
- अब्राहम लिंकन (लक्ष्मण सूर्यभान)
- अब्राहम लिंकन (विजया ब्राह्मणकर, पद्मगंधा प्रकाशन)
- अब्राहम लिंकन (विनायक डंके)
- अब्राहम लिंकन (स्मिता लिमये)
- अब्राहम लिंकन चरित्र (बा.ग. पवार)
- अब्राहम लिंकनच्या छान छान गोष्टी (बालवाङ्मय, बाबुराव शिंदे)
- फाळणी टाळणारा महापुरुष अब्राहम लिंकन (वि.ग. कानिटकर)
- गुलामगिरीमुक्त देशाचे स्वप्न पाहणारा अब्राहम लिंकन (जाह्नवी बिदनूर)
अब्राहम लिंकन उद्गार
संपादनबाह्य दुवे
संपादन- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2010-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ३, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "अब्राहम लिंकन: अ रिसोर्स गाइड (अब्राहम लिंकन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- Abraham Lincoln biography in hindi