ॲन फ्रँक
आनेलीस मारी फ्रांक, ॲन फ्रँक तथा आने फ्रांक, (जर्मन: Annelies Marie Frank, Anne Frank; उच्चार (सहाय्य·माहिती) ; मराठी लेखनभेद: अॅन फ्रँक) (१२ जून, इ.स. १९२९ - मार्च, इ.स. १९४५) ही ज्यूंच्या शिरकाणात बळी गेलेली एक ज्यूधर्मीय मुलगी होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीयांवर होत असलेल्या अत्याचारांपासून लपण्यासाठी अॅन व तिचे कुटुंब एका घरात लपून राहिले होते, त्या काळात तिने लिहिलेली दैनंदिनी द डायरी ऑफ अ यंग गर्ल या नावाने प्रसिद्ध झाली. त्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटे बनविण्यात आले आहेत.
अॅन फ्रँक | |
---|---|
जन्म |
१२ जून, १९२९ फ्रांकफुर्ट आम माइन, वायमार प्रजासत्ताक, जर्मनी |
मृत्यू |
मार्च, इ.स. १९४५ (वय १५) बर्गन-बेल्सन छळछावणी, लोवर सॅक्सोनी, नाझी जर्मनी |
राष्ट्रीयत्व | इ.स. १९४१पर्यंत वायमार प्रजासत्ताक, त्यानंतर कुठलेच राष्ट्रीयत्व नाही. |
धर्म | ज्यू |
प्रसिद्ध साहित्यकृती | द डायरी ऑफ अ यंग गर्ल (इ.स. १९४७) |
प्रभाव | सिसी व्हान मार्क्सव्हेल्ड[१] |
स्वाक्षरी |
वायमार प्रजासत्ताकामधील[टीप १] फ्रांकफुर्ट आम माइन [टीप २] या शहरात तिचा जन्म झाला. पण ती आयुष्यातील बराचसा काळ अॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स येथे राहिली. ती जन्माने जर्मन होती मात्र नाझी जर्मनीच्या काळातील ज्यूद्वेशी[श १] न्युर्नबर्ग कायद्यामुळे फ्रँक परिवाराचे जर्मन राष्ट्रीयत्व काढून टाकले गेले. मरणोत्तर तिची दैनंदिनी प्रकाशित झाल्यानंतर ती जगभरात प्रसिद्ध झाली.
इ.स. १९३३मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रँक कुटुंब जर्मनीतून अॅम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलँड्सवर सत्ता मिळवली. त्यामुळे ते अॅम्स्टरडॅममध्येच अडकले. जुलै १९४२मध्ये सर्वत्र ज्यूंची छळवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यापासून वाचण्यासाठी फ्रँक कुटुंब, अॅनचे वडील ऑटो फ्रँक यांच्या कार्यालयाच्या इमारतीतील गुप्त खोल्यांमध्ये लपले. तिथे असतांना अॅनच्या तेराव्या वाढदिवशी तिला एक कोरी वही मिळाली होती, त्यातच तिने १२ जून, इ.स. १९४२ ते १ ऑगस्ट, इ.स. १९४४पर्यंतची दैनंदिनी नोंदवली. दोन वर्षे तेथेच लपतछपत राहिल्यानंतर त्यांना विश्वासघाताने पकडण्यात आले व नाझी छळछावणीत[श २] पाठवण्यात आले. अॅन व तिची मोठी बहीण मार्गो यांना नंतर बर्गन-बेल्सन छळछावणीत पाठवले गेले व तिथे इ.स. १९४५मधील मार्चमध्ये दोघीही प्रलापक ज्वराने[श ३] मरण पावल्या.
केवळ ऑटो फ्रँक यातून वाचले. युद्धानंतर अॅमस्टरडॅमला परल्यावर त्यांना अॅनची दैनंदिनी मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे इ.स. १९४७मध्ये ती दैनंदिनी पुस्तकरूपात प्रकाशित झाली. मूळ डच भाषेत लिहिलेल्या त्या दैनंदिनीचे इ.स. १९५२मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले व नंतर अनेक भाषांमधून भाषांतर केले गेले. मराठीमध्ये मंगला निगुडकर यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे.
सुरुवातीचे दिवस
संपादनअॅन फ्रँकचा जन्म १२ जून, इ.स.१९२९ रोजी फ्रांकफुर्ट, जर्मनी येथे झाला. ती ऑटो फ्रँक व ईडिथ फ्रँक-हॉलंडर यांची धाकटी मुलगी होती. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव मार्गो फ्रँक होते. फ्रँक कुटुंब पुरोगामी विचारसरणीचे होते, ते ज्यूधर्माचे सर्व सण व रिवाज मानत नसत. ते राहत असलेल्या फ्रांकफुर्टच्या भागात ज्यूधर्मीय तसेच इतर धर्माचे लोक एकत्र राहत. ईडिथ जास्त श्रद्धाळू पालक होती तर ऑटो यांना विद्वत्प्रचूर[श ४] गोष्टींमध्ये जास्त रस होता. त्यांच्याजवळ अनेक विषयांवरील पुस्तकांचा संग्रह होता. दोन्ही पालकांनी मुलींना लेखन-वाचन करण्यास प्रोत्साहन दिले.
१३ मार्च, इ.स. १९३३ मध्ये फ्रांकफुर्ट नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ॲडॉल्फ हिटलरच्या नाझी पक्षाचा विजय झाला. त्यानंतर शहरात ज्यूविरोधी मोर्चे लगेचच चालू झाले. या वातावरणात आपण जर्मनीतच राहिलो तर आपले काय होईल याची भिती फ्रँक कुटुंबाला वाटू लागली. नंतर त्याच वर्षी ईडिथ मुलींना घेऊन ईडिथची आई रोझा हॉलंडर हिच्याकडे आखेन येथे राहण्यास गेली. ऑटो फ्रँक फ्रांकफुर्टमध्येच राहिले. नंतर त्यांना अॅम्स्टरडॅममध्ये आपली कंपनी काढण्याचा एक प्रस्ताव मिळाला. त्यामुळे व्यवसायाची घडी नीट बसविण्यासाठी व कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ते अॅम्स्टरडॅमला गेले. इ.स. १९३३ ते इ.स. १९३९ च्या काळात सुमारे ३ लाख लोक जर्मनी सोडून निघून गेले.
ऑटो फ्रँक यांनी ओपेक्टा वर्क्स कंपनीत काम सुरू केले. त्यांची कंपनी पेक्टिन नावाचा फळांचा अर्क विकत असे. त्यांनी अॅम्स्टरडॅममधील मेरवेडेप्लेइन (मेरवेडे चौक) येथे घर घेतले. इ.स. १९३४ च्या फेब्रुवारी महिन्यात मुली व ईडिथ अॅम्स्टरडॅमला आले. त्यांनी मार्गोला सार्वजनिक शाळेत दाखल केले आणि अॅनला मॉंटेसरी शाळेत घातले. मार्गोला गणितात रस होता तर अॅनला लेखन आणि वाचनात. त्या काळातील अॅनची मैत्रीण हन्नेली गोस्लर अॅनबद्दल सांगते की, अॅन नेहमी काहीतरी लिहित असे मात्र ते हाताने लपवून ठेवत असे व त्याबद्दल बोलत नसे. त्या दोघी बहिणी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. मार्गो सुसंकृत, अबोल आणि अभ्यासू होती तर अॅन स्पष्टवक्ती, उत्साही आणि बहिर्मुख होती.
इ.स. १९३८ मध्ये फ्रँकने पेक्टाकॉन नावाची दुसरी कंपनी सुरू केली. ही कंपनी औषधी वनस्पती, खारवण्यासाठीचे मीठ आणि मसाल्याच्या पदार्थांची घाउक विक्री करत असे. मसाल्याच्या पदार्थांचा जाणकार म्हणून ऑटोने हर्मन व्हान पेल्स याला कंपनीत नौकरी दिली होती. तोसुद्धा जन्माने ज्यू होता व जर्मनीतील ओस्नाब्रुक येथून आपल्या कुटुंबासोबत पळून आला होता. इ.स. १९३९ मध्ये ईडिथची आईपण त्यांच्यासोबत राहायला आली व जानेवारी, इ.स. १९४२मधील तिच्या मृत्यूपर्यंत ती तिथेच होती.
मे, इ.स. १९४०मध्ये जर्मनीने नेदरलँड्सवर हल्ला केला व नेदरलँड्स पादांकृत केले. नवीन सरकारने अनेक भेदभावपूर्ण कायदे लागू करून ज्यूंचे छळ करणे चालू केले. त्यांना नावनोंदणी करणे बंधनकारक केले तसेच ज्यूंचे वांशिक विभक्तीकरण[श ५] केले. फ्रँक बहिणींची शाळेत प्रगती होत होती, त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी बनले होते. मात्र ज्यू मुलांना केवळ ज्यू शाळेतच घातले पाहिजे, या शासनाच्या हुकुमनाम्यामुळे त्यांना त्यांच्या शाळांतून काढून ज्यूधर्मीय लायसियम (शाळा) मध्ये दाखल केले गेले. तिथे अॅनची जॅकलीन व्हान मार्सेनसोबत मैत्री झाली. एप्रिल, इ.स. १९४१मध्ये पेक्टाकॉन कंपनी एक ज्यू-कंपनी म्हणून जप्त केली जाऊ नये म्हणून ऑटोने पावले उचलली. त्यांनी त्यांचा पेक्टाकॉनमधील वाटा त्यांचा मित्र योहान्स क्लिमन याच्या नावे केला आणि संचालकपदाचा राजीनामा दिला. काही काळानंतर कंपनी बंद करून कंपनीची सर्व मालमत्ता जान खीस याच्या गाइस आणि कंपनीला देउन टाकली. डिसेंबर, इ.स. १९४१मध्ये ऑटो यांनी ऑपेक्टा वाचविण्यासाठीपण हेच केले. यामुळे त्या दोन्ही कंपन्याचे काम चालू राहिले व ऑटो फ्रँक यांना थोडेसेच पण परिवार चालविण्यासाठी पुरेसे पैसे मिळत गेले.
दैनंदिनीत नोंदवलेला काळ
संपादनलपण्याच्या आधी
संपादनॲनला तिच्या तेराव्या वाढदिवशी, १२ जून, १९४२ रोजी, एक वही भेट मिळाली. ही वही तिनेच तिच्या वडिलांना काही दिवसांआधी एका दुकानाच्या खिडकीत दाखवली होती. ती एक स्वाक्षरी-वही[श ६] होती, पांढऱ्या-लाल कापडात बांधलेली [२] आणि वरून छोटेसे कुलुप असलेली अशी ती वही होती. अॅनने ती वही दैनंदिनी म्हणून वापरायचे ठरवले [३] आणि लगेच लिखाण चालू केले. तिच्या सुरुवातीच्या बऱ्याच नोंदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या असल्या तरी तिने नेदरलँड्समध्ये जर्मनीच्या ताब्यानंतर झालेले काही बदल नोंदवले आहेत. तिच्या २० जून, इ.स. १९४२ च्या नोंदीत तिने डच ज्यू लोकांवर लादलेल्या बंधनांची यादी केली आहे, तसेच तिची आजी वारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.[४] तिला चित्रपट बघायला खूप आवडायचे, पण ८ जानेवारी, इ.स. १९४१ पासून ज्यूंना चित्रपटगृहात प्रवेश निषिद्ध केला गेला होता.[५]
जुलै, इ.स. १९४२मध्ये मार्गोला सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश इमिग्रेशन[टीप ३] कडून एक नोटिस आली. डर्चगॅंगस्लेगर[टीप ४] छावणीत पाठविण्याआधी नोंदणी करण्यासाठी तिने कार्यालयात हजर व्हावे असे त्या नोटिशीमध्ये म्हणले होते. ऑटो फ्रँकने याआधीच कुटुंबाला कल्पना दिली होती की, लवकरच त्यांना ओपेक्टा कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या छतातील गुप्त खोल्यांमध्ये लपण्यासाठी जावे लागेल. पण मार्गोला आलेल्या त्या नोटिशीमुळे त्यांनी ठरवले होते त्यापेक्षा कित्येक आठवडे आधीच त्यांना स्थलांतर करावे लागले. [६] ती इमारत अॅम्स्टरडॅममधील कालव्यालगतच्या प्रिन्सेनग्राख्ट रस्त्यावर होती व त्यांच्या कार्यालयातील काही विश्वासू कर्मचारी त्यांना यात मदत करणार होते.
आख्तरहाएस मधील आयुष्य
संपादन६ जुलै, इ.स. १९४२ रोजी, सोमवारी सकाळी,[७] फ्रँक कुटुंब त्यांच्या गुप्त घरात राहण्यास गेले. [श ७] असे म्हणले गेले.) त्यांचे राहते घर ते जाणूनबुजून अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवून गेले. त्यावरून ते घर सोडून पळून गेले असावेत असे शासनाला वाटावे अशी त्यांची योजना होती. ऑटो फ्रँकने घरात एक चिठ्ठीपण ठेवली होती. त्यामध्ये ते स्वित्झर्लंडला गेले आहेत असे दर्शविणारा मजकूर मुद्दाम लिहिला होता. नवीन ठिकाणी आवश्यक असलेल्या गुप्ततेमुळे त्यांना त्यांची मांजर मूर्तजे हिला मागेच ठेवून द्यावे लागले. ज्यू लोकांना सार्वजनिक परिवहन[श ८] वापरण्यास बंदी असल्यामुळे ते अनेक किलोमीटर पायी चालत गेले. सामान घेऊन रस्त्यातून जातांना दिसू नये म्हणून प्रत्येकाने अंगावर सामान घेउन त्वारून अनेकपदरी कपडे घातले होते.[८] त्यांचे आख्तरहाएस ही एक तीन मजली इमारत होती. ओपेक्टाच्या वरच्या बाजूने त्याचे प्रवेशद्वार होते. त्यात पहिल्या मजल्यावर दोन छोट्या खोल्या व त्याला लागून एक शौचालय व प्रसाधनगृह होते. त्यावरच्या मजल्यावर एक मोठी खोली व एक छोटी खोली होती. छोट्या खोलीत वर माळ्यावर[श ९] जाणारी एक शिडी होती. आख्तरहाएसचे प्रवेशद्वार एका पुस्तकांच्या कपाटाने झाकून ठेवले होते. ओपेक्टाची मुख्य इमारत जुनी, साधी व नजरेत न भरणारी होती. अॅम्स्टरडॅमच्या पश्चिम भागात वेस्टरकर्कजवळ ही इमारत होती.
ओपेक्टाच्या कर्मचाऱ्यांमध्ये केवळ व्हिक्टर कुग्लर, योहान्स क्लिमन, मीप खीस आणि बेप वोस्कुइल यांना फ्रँक कुटुंबाच्या बेताची माहिती होते. ते चार जण, मीपचा नवरा जान खीस आणि वोस्कुइलचे वडील योहान्स हे फ्रँक कुटुंबाचे मदतनीस होते. त्यांच्याकडून फ्रँक कुटुंबाला बाहेरच्या जगाबद्दल, युद्धाबद्दल आणि राजकीय परिस्थितीबद्दल माहिती मिळत होती. त्यांनी परिवाराच्या सर्व गरजा पुरवल्या, त्यांच्या सुरक्षेची हमी घेतली आणि त्यांना अन्न पुरवले. हे काम दिवसेंदिवस अवघड होत गेले. अॅनने आपल्या दैनंदिनीमध्ये त्यांच्या निष्ठेचा आणि कठीणसमयी परिवाराचे मनोधैर्य वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. त्या सर्व मदतनीसांना पुरेपूर माहित होते की, जर पकडले गेले तर ज्यूंना ठेवून घेतल्याबद्दल त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकत होती.[९]
१३ जुलै, इ.स. १९४२ रोजी हर्मन, त्याची पत्नी ऑगस्टे आणि त्यांचा १६ वर्षांचा मुलगा पीटर हे कुटुंबसुद्धा तिथे लपण्यासाठी आले आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचा मित्र व दातांचा डॉक्टर फ्रिट्झ फेफर तिथे आला. सुरुवातीला बोलण्यासाठी अनेकजण आले म्हणून अॅनला आनंद झाला होता, पण इतक्या कमी जागेत इतकेजण एकत्र राहत असल्याने त्यांच्यात तणाव निर्माण होऊ लागले. फेफरसोबत खोली विभागणे अॅनला दुःसह वाटू लागले. [१०] तिची ऑगस्टे व्हान पेल्ससोबतपण भांडणे होऊ लागली. दैनंदिनीत तिने लिहिले आहे की, ऑगस्टे मूर्ख आहे व हर्मन व्हान पेल्स आणि फ्रिट्झ फेफर स्वार्थी आहेत कारण ते खूप अन्न संपवतात.[११] सुरुवातीला तिला पीटर लाजाळू व अडनिड वाटला पण नंतर त्यांची मैत्री झाली. ते एकमेकांच्या प्रेमातही पडले व पौगंडावस्थेतील अॅनने तिचे पहिले चुंबन पीटरसोबत अनुभवले. पण हे खरे प्रेम आहे का छोट्या जागेत एकत्र राहण्याचा परिणाम आहे असा प्रश्न तिला भेडसावू लागला. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम हळुहळू कमी होऊ लागले. घरी येणाऱ्या प्रत्येक मदतनीसासोबत मात्र अॅनची घट्ट मैत्री होती. ऑटो फ्रँक आठवण काढतांना लिहितात की अॅन रोज त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असे. अॅनची सर्वात घट्ट मैत्री ओपेक्टातील तरुण लेखनिक मुलगी बेप वॉस्कुइलसोबत होती. ते अनेकदा कोपऱ्यात उभे राहून एकमेकांच्या कानात काहितरी कुजबुजत असत, असे ऑटोच्या पाहण्यात आले होते. [१२]
तिच्या दैनंदिनीत तिने तिच्या कुटुंबातील इतरांच्या भिन्न व्यक्तिमत्त्वांबद्दल आणि तिच्या त्यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल लिहिले आहे. तिच्या मते, भावनिकडृष्ट्या ती वडिलांच्या जास्त जवळ होती. ऑटो फ्रँक नंतर लिहितात, "मार्गोपेक्षा अॅनसोबत त्यांचे संबंध सुधारत गेले. मार्गो आईच्या जास्त जवळ होती. याचे कारण कदाचित त्यांच्या स्वभावात होते. मार्गो क्वचितच आपल्या भावना दाखवत असे व तिला जास्त आधाराची गरज नव्हती. याउलट अॅन चंचल होती व तिची मनस्थिती सतत बदलत असे."[१३] लपण्यास जाण्याआधीपेक्षा फ्रँक बहिणींमध्ये जास्त घट्ट नाते बनले होते. अॅनला कधीकधी मार्गोबद्दल असूया वाटे. विशेषतः जेव्हा तिचे आई-बाबा ती मार्गोसारखी शांत व समजुतदार नाही असे तिला म्हणत असत. जसजशी अॅन मोठी होत गेली तसतसे ते एकमेकांच्या अधिक जवळ येत गेले व एकमेकांसोबत मन हलके करत गेले. १२ जानेवारी, इ.स. १९४४ च्या दैनंदिनीत अॅनने लिहिले आहे ही, "मार्गो बरीच चांगली आहे, ती अताशा तितकी धूर्त (मांजरीसारखी) नाही आणि माझी खरी मैत्रिण बनली आहे. ती मला आता लहान बाळ समजत नाही." [१४]
अॅनने अनेकदा तिच्या आईसोबतच्या अवघड नात्याबद्दल आणि तिच्याबद्द्लच्या द्विधाभावाबद्द्ल लिहिले आहे. ७ नोव्हेंबर, इ.स. १९४२ च्या दैनंदिनीतील नोंदीमध्ये अॅनने आईच्या निष्काळजीपणावर, उपरोधिकपणावर आणि पाषाण-हृदयी स्वभावावर राग व्यक्त केला आहे. त्यातच ती पुढे लिहिते की, "ती माझी आईच नाही आहे".[१५] अॅन आपली दैनंदिनी परत वाचून संपादित करत असे. नंतर हे वाचतांना तिलाच तिची लाज वाटली. ती स्वतःलाच उद्देशून लिहिले आहे की, "अॅन, हा द्वेश व्यक्त करणारी तूच आहेस का? ओह अॅन, तू हे कसे करू शकतेस?" [१६] नंतर तिला जाणवले की, गैरसमजांमुळे हे घडले आहे आणि यात तिच्या आईसोबत तिही दोशी आहे व यामुळे तिच्या आईचा त्रास अधिकच वाढत आहे. या जाणिवेनंतर ती आईसोबत सहनशीलतेने व आदराने वागू लागली.[१७]
फ्रँक बहिणींना आशा होती की, शक्य झाले तर ते लवकरात लवकर शाळेत परततील, म्हणून लपून राहतांनापण त्यांचा अभ्यास चालू होता. मार्गोने बेप वॉस्कुइलच्या नावावर पत्राद्वारा [श १०] लघुलिपीचा[श ११] अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात तिला चांगले गुणही मिळाले. अॅनही बराच वेळ वाचन आणि अभ्यासात घालत असे. तिला मोठे होऊन पत्रकार व्हायचे होते. ती तिची दैनंदिनी परतपरत वाचून त्याचे संपादन करत असे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेतांनाच ती तिच्या भावना, श्रद्धा, महत्त्वाकांक्षा दैनंदिनीत मांडत असे. यासोबतच ज्या गोष्टींबद्दल ती इतरांसोबत चर्चा करू शकत नव्हती, त्यापण दैनंदिनीत नोंदवल्या जात. जसजसा तिचा लिहिण्यातला आत्मविश्वास वाढत गेला तसतसे तिने तिचा देवावरचा विश्वास आणि मानवी स्वभाव यासारख्या काही अमूर्त[श १२] गोष्टींबद्दलली दैनंदिनीमध्ये लिहिले. [१८]
१ ऑगस्ट, इ.स. १९४४ च्या तिच्या शेवटच्या नोंदीपर्यंत ती नियमीतपणे दैनंदिनी लिहीत होती.
अटक
संपादन४ ऑगस्ट, इ.स. १९४४च्या सकाळी अचानक आख्तरहाएसवर जर्मन पोलिसांनी[टीप ५] छापा घातला. एका अज्ञात खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हा छापा घातला गेला. त्या खबऱ्या कोण होता ते अजूनही कळलेले नाही आहे. या छाप्याचे नेतृत्व कार्ल सिल्बरबाउर याने केले होते. फ्रँक कुटुंब, व्हान पेल्स कुटुंब आणि फ्रिट्झ फेफर यांना गेस्टापो[टीप ६] मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांची चौकशी केली गेली व त्यांना रात्रभर तेथे ठेवून घेतले. ५ ऑगस्टला त्यांना वेटरिंगस्खान्स येथील खच्चून भरलेल्या ह्युस व्हान बेवारिंग या तुरुंगात पाठवले गेले. दोन दिवसांनंतर त्यांना वेस्टरबॉर्क संक्रमण छावणीत पाठवले गेले. या छावणीतून तेव्हापर्यंत जवळपास १ लाख डच व जर्मन ज्यू लोक इतर छळछावण्यात पाठवले गेले होते. लपून बसल्यामुळे त्यांना गुन्हेगार ठरवले गेले व त्यांना शिक्षेसाठी बनविलेल्या बराकींमध्ये सश्रम कारावासात[श १३] रहावे लागले.[१९]
व्हिक्टर कुग्लर आणि योहान्स क्लिमन यांना अटक केली गेली आणि शासनाचे शत्रू म्हणून अॅमर्सफूर्ट येथे कैदेत टाकण्यात आले. क्लिमनला सात आठवड्यांनंतर सोडून दिले गेले मात्र कुग्लर युद्धाच्या शेवटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सश्रम कारावासात होता.[२०] मीप खीस व बेप वोस्कुइजची उलटतपासणी घेण्यात आली व त्यांना धमकावले गेले मात्र त्यांना अटक झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते आख्तरहाएसवर परत आले. तिथे त्यांना अॅनची दैनंदिनी सापडली, तसेच त्यांनी काही छायाचित्रे गोळा केले. अॅन परत आल्यावर आपण ते तिला परत करू असा निर्धार मीपने केला. ७ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी ती परत कार्ल सिल्बरबाउरला जाऊन भेटली व त्याला पैसे देऊन कैद्यांना सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सिल्बरबाउरने त्याला नकार दिला. [२१]
छळछावणीत रवानगी व मृत्यू
संपादन३ सप्टेंबर, इ.स. १९४४ रोजी फ्रँक कुटुंबियांना वेस्टरबॉर्कहून आउश्वित्झ छळछावणीत पाठविण्यात आले. वेस्टरबॉर्कवरून आउश्वित्झला गेलेला तो शेवटचा गट होता. तीन दिवसांच्या प्रवासानंतर ते आउश्वित्झला पोहोचले. त्याच्या रेल्वेत मार्गो व अॅनची अॅम्स्टरडॅमच्या ज्यूइश लाएसियममधील मैत्रिण ब्लोइम एव्हर्स-एम्देन हीपण होती. ब्लोइमला ते अनेकदा आउश्वित्झमध्ये दिसत आणि तिच्या ईडिथ, मार्गो व अॅनबद्दलच्या आठवणी इ.स. १९८८मधील माहितीपट अॅन फ्रँकचे शेवटचे सात महिने व इ.स. १९९५मधील बी.बी.सी. माहितीपट ॲन फ्रँक रिमेम्बर्ड यात चित्रित केल्या गेल्या आहेत.
आउश्वित्झ येथे लोकांना रेल्वेतून काढून त्यातील पुरुषांना स्त्रियांपासून व मुलांपासून बळजबरीने वेगळे केले गेले. त्यात ऑटो फ्रँकलाही त्याच्या कुटुंबापासून दूर केले गेले. रेल्वेतील १,०१९ प्रवाशांपैकी ५४९ प्रवाशांना तडक विषारी वायूच्या कोठडीत पाठवून मारण्यात आले. त्यामध्ये १५ वर्षापेक्षा लहान असलेल्या सर्व मुलांचा समावेश होता. अॅनने तीन महिन्यांपूर्वीच १५ वर्षे पूर्ण केले असल्याने ती यातून वाचली. वाचलेल्या लोकांत ती सर्वात तरुण होती. तिला नंतर याबद्दल कत्तलीबद्दल कळाले, पण शेवटपर्यंत आख्तरहाएसमधले सर्वजण या कतलीतून वाचले होते हे तिला माहित नव्हते. तिचे वडील पन्नाशीच्या वरचे होते व शारिरिकदृष्ट्या तितके बळकट नव्हते, त्यामुळे त्यांना बहुदा मारले असावे असा तिने निष्कर्ष काढला. [२२]
वाचलेल्या इतर स्त्रियांसोबत तिलापण नग्न करून निर्जंतुक[श १४] करण्यात आले. तिचे सर्व केस कापण्यात आले व तिच्या हातावर तिचा ओळखक्रमांक[श १५] गोंदवण्यात[श १६] आला. दिवसा स्त्रियांकडून गुलामगिरी करून घेतली जात असे. अॅनला दगड एकिकडून दुसरीकडे वाहून न्यावे लागत, किंवा हिरवळीचे गठ्ठे करावे लागत. रात्री त्यांना दाटीवाटीने बराकींमध्ये झोपावे लागे. काही प्रत्यक्षदर्शींना अॅन अलिप्त व दुःखी दिसली, तर इतरांना ती धैर्यशील बनली होती असे वाटले. तिच्या लाघवी व आत्मविश्वासपूर्ण स्वभावामुळे तिला अनेकदा राशनामध्ये तिच्यासाठी व तिच्या आई-बहिणीसाठी जादा ब्रेड मिळत असे. छावणीत अनेक रोग पसरत आणि काही काळातच अॅनच्या त्वचेवर खरूज[श १७] उगवले. त्यामुळे फ्रँक बहिणींना छावणीतल्या रुग्णालयात टाकण्यात आले. मात्र रुग्णालय नेहमी अंधारे व उंदरांनी भरलेले होते. इकडे ईडिथने खाणे बंद केले व तिच्या हिश्श्याचे ब्रेड ती अॅन व मार्गोला रुग्णालयाच्या भिंतीखालील छिद्रातून देऊ लागली.[२३]
ऑक्टोबर, इ.स. १९४४ मध्ये ईडिथ, अॅन व मार्गोला अप्पर सिलेसियातील लिबौ अर्बैत्सलेगर श्रमछावणीत[श १८] पाठविण्यात येणार होते. मात्र अॅनच्या अंगावर खरूज झालेले असल्यामुळे तिचे तिकडे जाणे रद्द केले गेले. ईडिथ व मार्गो यांनीसुद्धा अॅनसोबतच राहणे स्विकारले. ब्लोइम मात्र त्यांच्याशिवाय तिकडे गेली.
२८ ऑक्टोबरला बर्गन-बेलसन छळछावणीत नेण्यासाठी बायकांची निवड चालू केली गेली. आठ हजाराहून अधिक स्त्रियांना तिकडे पाठवले गेले. त्यात अॅन, मार्गो व ऑगस्टे व्हान पेल्सचा समावेश होता. पण ईडिथला मागेच ठेवण्यात आले आणि जानेवारी, इ.स. १९४५मध्ये ती उपासमारीने मरण पावली. तिकडे बर्गन-बेलसन छळछावणीत येणाऱ्या कैद्यांना सामावण्यासाठी तंबू ठोकण्यात आले होते. कैद्यांची गर्दी वाढल्यामुळे तिथे रोगराईने मरण पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढू लागली. अॅनची तिथे तिच्या दोन जुन्या मैत्रिणी, हनेली गोस्लर व नानेट ब्लित्झ यांच्याशी ओझरती भेट घडली. त्यांना छावणीच्या दुसऱ्या भागात ठेवले होते. त्या दोघीही छावणीतून जिवंत परतल्या. छावणीच्या कुंपणापलिकडून अॅनशी झालेले थोडेसे बोलणे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. अॅन खूप कृश झाल्याचे व थरथरत असल्याचे ब्लित्झला जाणवले. गोस्लरने नोंदवले आहे की, तेव्हा ऑगस्टे अॅन व मार्गोसोबत होती आणि गंभीररीत्या आजारी असलेल्या मार्गोची ऑगस्टे काळजी घेत होती. मार्गो बिछान्याबाहेरही पडू शकत नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष दिसली नव्हती. अॅनने त्या दोघींना सांगितले की, तिच्या मते तिचे दोन्ही पालक बहुदा मरण पावले आहेत व त्यामुळे तिला आता जगण्याची इच्छा राहिली नाही आहे. गोस्लरच्या मते इ.स. १९४५ च्या जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही भेट झाली असावी. [२४]
मार्च, इ.स. १९४५मध्ये छावणीत प्रलापक ज्वराची साथ पसरली व त्यात सुमारे १७,००० कैद्यांचा मृत्यू झाला. [२५] काही दिवसांनंतर अॅनही साथीत मरण पावली. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते आजारात मार्गो तिच्या बिछान्यावरून खाली पडली व त्या धक्काने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची नेमकी तारीख कळू शकली नाही आहे मात्र यानंतर काही अठवड्यातच, १५ एप्रिल, इ.स. १९४५ला ब्रिटिश सेना छावणीपर्यंत पोहोचली व त्यांनी कैद्यांना मुक्त केले. साथीचा प्रसार रोखण्यासाठी छळछावणीच्या मुक्तीनंतर छावणीला पेटवून देण्यात आले. अॅन व मार्गोला ज्या सामूहिक कबरींमध्ये[श १९] पुरण्यात आले होते, ती जागाही अद्याप अज्ञातच राहिली आहे.
ऑटो फ्रँक आउश्वित्झच्या कैदेतून बचावले. अॅम्स्टरडॅमला परल्यावर जान व मीप खीसने त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. त्यांनी आपल्या परिवाराला हुडकण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांना कळाले की त्यांची पत्नी, ईडिथ, आउश्वित्झमध्येच मरण पावली आहे. पण त्यांना मनोमन वाटत होते की, त्यांच्या मुली वाचल्या असाव्यात. पण काही आठवड्यांनंतर त्यांना कळले की, अॅन व मार्गोही बर्गन-बेलसन छावणीत मरण पावल्या आहेत. अॅनच्या मैत्रिणींबद्दल माहिती काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळाले की, तिच्या अनेक मैत्रिणींनाही मारून टाकण्यात आले आहे. सुझान सान्ने लेडरमन, जिचा अॅनच्या दैनंदिनीत अनेकदा उल्लेख होता, तिला, तिच्या आई-वडिलांसोबत विषारी वायूच्या कोठडीत मारण्यात आले होते. तिची मोठी बहीण, बार्बरा, जी मार्गोची जवळची मैत्रीण होती, मात्र यातून वाचली होती. [२६] इ.स. १९३०च्या दशकातच जर्मनी सोडून इंग्लंड, स्वित्झरलॅंड व अमेरिकेला गेलेल्या अॅन व मार्गोच्या काही मैत्रिणी तसेच ऑटो व ईडिथची माहेरची लोकं मात्र यातून बचावले.
नोंदी
संपादन- ^ म्यूलर १९९९, पान. १४३, १८०–१८१, १८६.
- ^ व्हान डर रोल १९९५, पान. ३.
- ^ ली २०००, पान. ९६.
- ^ फ्रँक १९९५, पाने. १–२०.
- ^ म्यूलर १९९९, पाने. ११९-१२०.
- ^ म्यूलर १९९९, पान. १५३.
- ^ म्यूलर १९९९, पान. १६३.
- ^ ली २०००, पाने. १०५–१०६.
- ^ ली २०००, पाने. ११३-११५.
- ^ ली २०००, पाने. १२०–१२१.
- ^ ली २०००, पान. ११७.
- ^ ली २०००, पाने. ११९.
- ^ म्यूलर १९९९, पान. २०३.
- ^ फ्रँक १९९५, पान. १६७.
- ^ फ्रँक १९९५, पान. ६३.
- ^ फ्रँक १९९५, पान. १५७.
- ^ म्यूलर १९९९, पान. २०४.
- ^ म्यूलर १९९९, पान. १९४.
- ^ म्यूलर १९९९, पान. २३३.
- ^ म्यूलर १९९९, पान. २९१.
- ^ म्यूलर १९९९, पान. २७९.
- ^ म्यूलर १९९९, पाने. २४६-२४७.
- ^ म्यूलर १९९९, पाने. २४८-२५१.
- ^ म्यूलर १९९९, पान. २५५.
- ^ म्यूलर १९९९, पान. २६१.
- ^ ली २०००, पाने. २११–२१२.
संदर्भसूची
संपादन- म्यूलर, मेलिसा. जर्मन: Das Mädchen Anne Frank (इंग्लिश: Anne Frank: The Biography) (जर्मन भाषेत). OCLC 42369449.
- व्हान डर रोल, रड. अॅन फ्रँक – बियॉंड द डायरी अ फोटोग्राफिक रिमेंम्बरन्स इंग्लिश: Ann Frank Beyond the Diary – A Photographic Remembrance.
- फ्रँक, अॅन. द डायरी ऑफ अ यंग गर्ल (डच: Het Achterhuis, इंग्लिश: The Diary of a Young Girl – The Definitive Edition) (डच भाषेत).
- फ्रँक, अॅन. Anne Frank's Diary: The Unabridged Original Edition: Notes From the Hiding Place (स्विडिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ली, कॅरोल अॅन. The Biography of Anne Frank – Roses from the Earth.
पारिभाषिक शब्दसूची
संपादन- ^ ज्यूद्वेश - (इंग्लिश: anti-Semitic अॅन्टि-सेमिटिक) - दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीय लोकांवरील नाझी पुरस्कृत द्वेश व अत्याचार.
- ^ छळछावणी - (इंग्लिश: concentration camps - कॉन्सन्ट्रेशन कॅम्प)
- ^ प्रलापक ज्वर - (इंग्लिश: typhus - टायफस)
- ^ विद्वत्प्रचूर - (इंग्लिश: scholarly - स्कॉलरली
- ^ वांशिक विभक्तीकरण - (इंग्लिश: Racial segregation - रेशियल सेग्रीगेशन) - वंशानुसार लोकांचे विभाजन करणे.
- ^ स्वाक्षरी-वही - (इंग्लिश: autograph book - ऑटोग्राफ बुक)
- ^ गुप्त विस्तारगृह (इंग्लिश: secret annex - सिक्रेट अनेक्स)
- ^ सार्वजनिक परिवहन (इंग्लिश: public transport - पब्लिक ट्रांसपोर्ट)
- ^ माळा (इंग्लिश: attic -अॅटिक)
- ^ पत्रद्वारा अभ्यासक्रम (इंग्लिश: correspondence course -करस्पॉंडन्स कोर्स)
- ^ लघुलिपी (इंग्लिश: shorthand - शॉर्टहॅंड)
- ^ अमूर्त (इंग्लिश: abstract - अॅब्स्ट्रॅक्ट)
- ^ सश्रम कारावास (इंग्लिश: hard labour - हार्ड लेबर)
- ^ निर्जंतुकिकरण - (इंग्लिश: disinfection - डिसइंफेक्शन)
- ^ ओळखक्रमांक - (इंग्लिश: identification number - आयडेंटिफिकेशन नंबर)
- ^ गोंदवणे - (इंग्लिश: to tattoo - टु टॅटू)
- ^ खरूज - (इंग्लिश: scabies - स्केबीज) - पुरळे येणे
- ^ श्रमछावणी - (इंग्लिश: labor camp - लेबर कॅम्प)
- ^ सामूहिक कबर - (इंग्लिश: mass grave - मास ग्रेव्ह)
तळटीपा
संपादन- ^ वायमार प्रजासत्ताक - पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत बनलेले प्रजासत्ताक.
- ^ फ्रांकफुर्ट आम माइन (जर्मन: Frankfurt am Main; जर्मन उच्चार: फ्रांकफुर्ट आम माइन ; इंग्लिश भाषेतील रूढ उच्चार: फ्रॅकफर्ट आम माइन)
- ^ सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश इमिग्रेशन (जर्मन: Zentralstelle für jüdische Auswanderung - इंग्लिश: Central Office for Jewish Emigration) दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू लोकांना नाझी वर्चस्वाखालील प्रदेशातून हाकलून देण्यासाठी व्हियेना, प्राग व अॅम्स्टरडॅम येथे बनवलेली संस्था.
- ^ डर्चगॅंगस्लेगर (जर्मन: Durchgangslager - छळछावणीत पाठविण्याआधी ज्यू लोकांना इथे एकत्र केले जात असे.
- ^ ग्रून पोलिझि (जर्मन: Grüne Polizei - हिरवे पोलिस) - इ.स. १९३६ ते इ.स. १९४५ दरम्यानची गणवेशधारी जर्मन पोलिस सेना. यांच्या हिरव्या गणवेशामुळे त्यांना हिरवे पोलिस म्हणले जात असे. यांचे अधिकृत नाव ऑर्डनंगपोलिझी (जर्मन: Ordnungspolizei) होते.
- ^ गेस्टापो (इंग्लिश: Gestapo) - जर्मनी व जर्मनीच्या जिंकलेल्या युरोपातील प्रमुख गुप्त पोलिस सेना.