मोहम्मद

(हजरत मुहम्मद पैगंबर या पानावरून पुनर्निर्देशित)


मुहमंद (५७० – ६३२) [] हे एक अरब नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते.[] इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते.[] जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.

मुहम्मद

"मुहम्मद, देवाचा पैगंबर"
मदीना मधील पैगंबर मशिदी च्या गेटवर कोरलेले आहे
मूळ नाव मुहम्मद इब्न अब्द अल्लाह इब्न अब्द अल-मुतालिब इब्न हाशिम इब्न अब्द मनाफ इब्न कुसय इब्न किलाब
जन्म c. 570 CE (53 BH)[]
निर्वाण ८ जून, ६३२ (वय ६२) (11 हिजरी वर्ष) (वर्षे ६१–६२)
मदीना, Hejaz, Arabia
समाधिमंदिर
धर्म इस्लाम
भाषा अरबी
कार्यक्षेत्र एक ऐश्वर भक्ति आणि सत्य धर्म प्रचार
वंश कुरैश
व्यवसाय धर्म गुरु, नेते, समाज सुधारक
वडील अब्दुल्ला इब्न अब्द अल-मुत्तलिब
आई अमिना बिंत वहाब
पत्नी पहा मुहम्मद यांच्या बायका
अपत्ये पहा मुहम्मद साहेबांची मुले
विशेष माहिती इस्लाम धर्म जगात पासरवला
प्रेषितांची समाप्ती पैगंबरांचा शिक्का

प्रारंभिक जीवन

संपादन

हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला.[ संदर्भ हवा ] त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा अबू मुत्तलीब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सीरियायेमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. या व्यापारी यात्रा करता करता, हजरत मुहम्मद (स.अ.स.) व्यापार करु लागले, ज्यामुळे खदिजाला फायदा झाला. २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४२ वर्ष इतके होते.

कुराणाचे अवतरण

संपादन
 
'हिरा' ही गुहा जिथे महंमदांना जिब्राईल या देवदूताने प्रथम संदेश दिला.

हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जाऊन दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील [] एके दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदूने त्यांना”अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले आहे’ असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी देवदूताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदूताने दुसऱ्यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदा देवदूत म्हणाला:

वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.[]

ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हणले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. []

हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्‍नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला.

विरोधाची वर्षे

संपादन

हजरत मुहम्मद (स.अ.स.) मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हणले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हणले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर [] हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आला. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे आजोबा अबूमुत्तलिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्‍नी खदिजा यांचेही निधन झाले.

मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले.

मदिनेकडे प्रस्थान

संपादन

वयाच्या ५३व्या वर्षी हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्का सोडून मदिनेस जाण्याचा निर्णय घेतला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देऊन ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरुवात झाली.

विरोधकांशी युद्ध व तह

संपादन

मदिनेस पोहचल्यानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबर व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतु लागले. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनीनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी विरोधकांचा पराभव केला.

या लढायांतील विजयानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी आपल्या १४०० सहकाऱ्यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. महंमदांनी हा तह मान्य केला.

मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. महंमदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर यहुदी खैबर या ठिकाणी जाऊन वसले, परंतु तिथेही हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला.

मक्केवर विजय व शेवटची हज यात्रा

संपादन

हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबरांनी १०,००० सहकाऱ्यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले.

सन १० हिजरी मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले:

"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."

याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.[][]

मृत्यू

संपादन

शेवटच्या हज यात्रेनंतर महंमद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: "हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे"[१०]) हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र ह्यांना पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आले.

प्रभाव

संपादन

हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्‍नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणाऱ्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले.

पण याहीपेक्षा हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्सस्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.[११]

आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा निःसंशय प्रभाव आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व तळटीपा

संपादन
  • हजरत मुहम्मद (सल्ल.) की संक्षिप्त जीवनी. लेखक: मौलाना अहमद फारु़क़ खॉं/डॉ. मुहम्मद अहमद.
  • महंमद पैगंबर (चरित्र, लेखक - माधव विनायक प्रधान, १९२९)
  • मुहम्मद पैगंबर (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)
  • रमझान परिचय (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)
  • आधुनिक युगात इस्लाम जीवनशैली (लेखक - अनीस चिश्ती, २०१५)
  1. ^ Conrad 1987.
  2. ^ a b यापैकी मुहम्मद (किंवा महंमद/मोहम्मद) हे नाव असून पैगंबर, नबी, रसूल या शब्दांचा अर्थ प्रेषित असा होतो.
  3. ^ कुराण ३३:१४ महंमद तुम्हारे पुरुषों में से किसी के बाप नहीं हैं, बल्की वे अल्लाह के रसूल और नबियोंके समापक हैं.
  4. ^ कुराण २:१८५ रमजान हा तो महिना आहे ज्या महिन्यात मार्गदर्शन व विवेक यांच्या सुस्पष्ट प्रमाणासह कुराण मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अवतीर्ण करण्यात आले.
  5. ^ कुराण ९६:१-५
  6. ^ Swain, James Edward. History of World Civilizations (English भाषेत). p. 226.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ हा नंतर अबू बक्रनंतर खलिफा झाला
  8. ^ Kaul, Jawaharlal. Human rights: issues and perspectives (English भाषेत). p. 82.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "The Prophet Muhammad's (PBUH) Last Sermon".
  10. ^ या संदर्भात रफीक-उल-आला अर्थात सर्वात श्रेष्ठ मित्र याचा अर्थ बरेच टीकाकार अल्लाह असा घेतात
  11. ^ Nehru, Jawaharlal. Glimpses of World History. pp. 141–146.