इस्लाम धर्माचे संप्रदाय

इस्लाम धर्माचे सर्व अनुयायी स्वतःला मुसलमान म्हणवतात. मात्र इस्लामचा कायदा (फिकह) आणि इतिहास याविषयीच्या आकलनानुसार मुसलमान विविध संप्रदाय किंवा पंथांमध्ये विभागले गेले आहेत. प्रामुख्याने मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. मात्र या दोन्ही पंथांमध्येही अनेक उपपंथ आहेत. एका निष्कर्षानुसार जगभरातील मुसलमानांपैकी ८० ते ८५ टक्के सुन्नी पंथीय आहेत. तर उर्वरित १५ ते २० टक्के शिया पंथाचे आहेत. शिया आणि सुन्नी दोन स्वतंत्र गट असले तरी अल्ला एकच आहे, यावर त्यांचं एकमत आहे. मुहंमद अल्लाचे दूत वा प्रेषित असल्याचं हे दोन्ही पंथ मानतात.

इस्लामचे प्रमुख पंथ व शाखा (N.B.: Ja'fari and Twelver boxes are interchanged)

कुराण हा ग्रंथ अल्लाची देणगी आहे यावर दोन्ही पंथांची श्रद्धा आहे. मात्र धर्मपालनाच्या विविध पद्धती तसंच पैगंबर मुहम्मद यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यासंदर्भात दोन्ही पंथांमध्ये तीव्र मतभेद आहेत. दोन्ही पंथांचे कायदेकानूनही वेगळे आहेत.

सुन्नी

संपादन
मुख्य लेख: सुन्नी

पैगंबर मोहम्मद (इ.स. ५७० - ६३२) यांनी स्वतः अनुसरलेल्या गोष्टी तसेच विचारांचे पालन करणारा पंथ अशी सुन्नी अर्थात सुन्नत गटाची ओळख आहे. एका निष्कर्षानुसार जगभरातील मुसलमानांपैकी ८० ते ८५ टक्के सुन्नी पंथीय आहेत. तर उर्वरित १५ ते २० टक्के शिया पंथाचे आहेत. हा पंथ परंपरावादी आणि उदारमतवादी आहे. सध्याची इस्लामी लोकसंख्या ८५ टक्के सुन्नी असून या पंथाच्या हनाफी, मालिकी, शफी, हमबाली इत्यादी उपशाखा आहेत.[]

  • सुन्नी पंथानुसार पैगंबर मोहम्मद यांच्यानंतर त्यांचे सासरे हजरत अबू बकर (इ.स. ६३२-६३४) मुसलमानांचे प्रमुख झाले.
  • सुन्नी पंथ त्यांना खलिफा म्हणतो.
  • अबू बकर यांच्यानंतर हजरत उमर (इसवी सन ६३४-६४४)
  • हजरत उस्मान (इसवी सन ६४४-६५६)
  • हजरत अली (इसवी सन ६५६-६६१) हे मुसलमानांचे नेते होऊन गेले.

इस्लामच्या कायद्यानुसार सुन्नी पंथाचे चार उपगट आहेत. या चार गटांपासून स्वतःला वेगळे राखणारा पाचवा गटही अस्तित्वात आहे. या पाच गटांच्या धर्मपालन तसेच श्रद्धांमध्ये मोठा फरक नाही. मात्र प्रत्येक गटाच्या प्रमुखाने इस्लामची संकल्पना योग्य पद्धतीनं मांडली असल्याचा त्यांचा दावा आहे.

आठव्या आणि नवव्या शतकात साधारण दीडशे वर्षांमध्ये चार प्रमुख धार्मिक नेते होऊन गेले. त्यांनी इस्लामच्या कायद्याची संकल्पना स्पष्ट केली. या नेत्यांना मानणारे त्या विशिष्ट प्रवाहाचे समर्थक झाले. इमाम अबू हनीफा (इसवी सन ६९९-७६७), इमाम शाफई (इसवी सन ७६७-८२०), इमाम हंबल (इसवी सन ७८०-८५५) आणि इमाम मालिक (इसवी सन ७११-७९५) हे त्या काळातले चार प्रमुख नेते होते.

मुख्य लेख: हनफी

इमाम अबू हनीफा यांना मानणाऱ्यांना हनफी (Hanafi) असे म्हणले जाते. या विचारधारेचे देवबंदी आणि बरेलवी अशा गटांमध्ये विभाजन झाले आहे.

देवबंदी आणि बरेलवी

संपादन
हे सुद्धा पहा: देवबंदी, बरेलवी, आणि सूफी पंथ


उत्तर प्रदेशातील देवबंद आणि बरेली या जिल्ह्यांच्या नावावरून विचारप्रवाहांना नाव मिळाले आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मौलाना अशरफ अली थानवी (१८६३-१९४३) आणि अहमद रजा खॉं बरेलवी (१८५६-१९२१) यांनी इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली. अशरफ अली थानवी देवबंदच्या दारुल-उलूम मदरशाशी संलग्न होते. तर आला हजरत अहमद रजा खॉं बरेलवी बरेलीचे होते.

मौलाना अब्दुल रशीद गंगोही आणि मौलाना कासीम ननोतवी यांनी १८६६ मध्ये देवबंद मदरशाची स्थापना केली.

देवबंद विचारप्रवाहाच्या प्रचारात मौलाना अब्दुल रशीद गंगोही, मौलाना कासिम ननोतवी आणि मौलाना अशरफ अली थानवी यांची भूमिका निर्णायक आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तान या देशांत राहणारे बहुतांशी मुसलमान देवबंद आणि बरेली विचारप्रवाहांशी संबंधित आहेत.

देवबंदी (Deobandi) आणि बरेलवी (Barelvis) या उपपंथांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार कुराण आणि हादीस हे पवित्र धर्मग्रंथच शरियतचे मूलाधार आहेत. मात्र यासाठी इमामांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे शरियतचे कायदे इमाम अबू हनीफा यांच्या विचारांनुसार आहेत. दुसरीकडे बरेलवी उपपंथाचे समर्थक आला हजरत रजा खान बरेलवी यांनी सांगितलेल्या विचारांना प्रमाण मानतात. बरेलीत आला हजरत रजा खान बरेलवी यांचा दर्गा आहे. त्यांना मानणाऱ्या समर्थकांसाठी हा दर्गा तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे.

देवबंद आणि बरेलवी या दोन विचारपंथांमध्ये मोठा फरक नाही. काही गोष्टींमध्ये मात्र मतभिन्नता आहे. बरेलवी विचारपंथानुसार मोहम्मद पैगंबर सर्वज्ञानी आहेत. विश्वातल्या सगळ्या सगुणनिर्गुण गोष्टींची त्यांना कल्पना आहे. ते सर्वव्यापी आहेत आणि विश्वाच्या पसाऱ्यावर त्यांची दृष्टी आहे.

देवबंद विचारपंथाला हा विचार मान्य नाही. देवबंद विचारपंथानुसार अल्लानंतर नबी महत्त्वाचे आहेत. पण, नबी हे मानव आहेत असे ते मानतात. बरेलवी सुफी इस्लामचे अनुयायी आहेत. त्यांच्याकडे सुफी मजार म्हणजेच संतांच्या समाध्यांना विशेष महत्त्व आहे. देवबंदी विचारपंथामध्ये मात्र त्याला फारसे महत्त्व नाही, उलट ते याचा विरोध करतात.

मालिकी

संपादन
मुख्य लेख: मालिकी

सुन्नी पंथीयांमध्ये इमाम अबू हनीफा यांच्यानंतर इमाम मालिक यांच्या विचारांना महत्त्व आहे. आशिया खंडात त्यांना (Maliki) मानणाऱ्यांची संख्या कमी आहे. 'इमाम मोत्ता' हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांचे समर्थक मालिक यांनी विषद केलेल्या नियमांचं पालन करतात. मध्यपूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेत मालिक यांचे समर्थक आहेत.

मुख्य लेख: शाफई

शाफई इमाम मालिक यांचे शिष्य आहेत आणि सुन्नींचे तिसरे प्रमुख नेते आहेत. मध्यपूर्व आशियात आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक आहेत. श्रद्धेच्या बाबतीत ते (Shafi`i) अन्य पंथीयांपासून वेगळे नाहीत. पण, इस्लामच्या अनुसरणाबाबतीत हनफी समुदायाच्या तुलनेत त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो.

हंबली

संपादन
मुख्य लेख: हंबली

सौदी अरेबिया, कतार, कुवैत आणि इतर आखाती देशांसह आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये इमाम हंबल यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते स्वतःला हंबली (Hanbali) म्हणतात. सौदी अरेबियातील सरकारी शरियत अर्थात नियम हंबलच्या नियमांवर आधारित आहे.

सल्फी, वहाबी आणि अहले हदीस

संपादन
मुख्य लेखविविधा: सल्फी, वहाबी, आणि अहले हदीस

सुन्नी पंथात एक विचारप्रवाह असाही आहे, की जो कोणत्याही विशिष्ट इमामाचे अनुकरण मानत नाही. त्यांच्या मते शरीयतचे पालन करण्यासाठी कुराण आणि हदीस यांचे अध्ययन करणे महत्त्वाचे आहे. या समुदायाला सल्फी (Salafism/ Salafi movement) आणि अहले हदीस (Ahl al-Hadith) नावाने ओळखले जाते. हा समुदाय चारही इमामांचे ज्ञान, अध्ययन, साहित्य यांचा आदर करतो. पण, यापैकी कोण्या एकाच इमामाचे अनुकरण करणे योग्य नाही, असे ते मानतात. इमामांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी कुराण आणि हदीसनुसार असतील त्यांचे पालन करावे. मात्र विवादास्पद प्रसंगी कुराण आणि हदीसचा शब्द अंतिम राहील, असे त्यांचे म्हणणे आहे. पैगंबरांच्या काळात इस्लामचे जे स्वरूप होते त्याचा प्रचार व्हावा असे सल्फी समुदायाचे मत आहे.

इब्ने तैमिया (१२६३-१३२८) आणि मोहम्मद बिन अब्दुल वहाब (१७०३-१७९२) यांनी या विचाराला पुष्टी दिली. अब्दुल वहाब यांच्यामुळेच या समुदायाला वहाबी (Wahhabism) नाव मिळाले. आखाती देशांमधील इस्लामिक विद्वान या समुदायाने मांडलेल्या संकल्पनांनी प्रभावित आहेत. या समुदायाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिकदृष्ट्या ते अत्यंत कट्टर असतात आणि मूलतत्त्ववादाला पाठिंबा देतात. सौदी अरेबियाचे राजघराणे याच विचारांचं आहे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनही सल्फी विचारप्रवाहाचा समर्थक होता.

सुन्नी बोहरा

संपादन
मुख्य लेख: सुन्नी बोहरा

भारतातील गुजरातमहाराष्ट्रातील आणि पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात व्यापारउदीम क्षेत्रात जे मुसलमान कार्यरत आहेत यापैकी अनेकजण बोहरा मुस्लिम (Sunni Bohra) असतात. बोहरा शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांमध्ये असतात. सुन्नी बोहरा हनफी इस्लामिक कायद्याचे पालन करतात. पण, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचे शिया पंथीयांच्या चालीरीतींशी साधर्म्य असते.

अहमदिया

संपादन
मुख्य लेख: अहमदिया

हनफी इस्लामिक कायद्याचे पालन करणाऱ्या समुदायाला अहमदिया म्हणले जाते. या समुदायाची स्थापना भारतातल्या पंजाबमधल्या कादियानमध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती. मिर्झा गुलाम अहमद, नबी यांचाच अवतार असल्याचे या समुदायाच्या अनुयायींचे म्हणणे आहे. मिर्झा यांनी नवा शरियतचा कायदा मांडला नाही. पैगंबरांनी सांगितलेल्या शरियतचेच हा समुदाय पालन करतो.

पैगंबरांनंतर जगभरात अल्लाने दूत पाठवण्याची परंपरा बंद झाली यावर मुसलमानांच्या बहुतांशी संप्रदायांमध्ये एकमत आहे. पण, अहमदिया समुदायाच्या म्हणण्यानुसार मिर्झा यांना नबीचा दर्जा प्राप्त आहे. या मुद्यावरून मुसलमानांमध्ये तीव्र मतभेद आहेत. मुसलमानांमधील एक मोठा वर्ग अहमदिया समुदायाला मुसलमान मानतच नाही.

पण, तरीही भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड या देशांमध्ये या समुदायाच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पाकिस्तानात अधिकृतपणे अहमदिया समुदायाला इस्लाममधून वगळण्यात आले आहे.

मुख्य लेख: शिया

सुन्नी पंथियांच्या तुलनेत शिया पंथाचे आचारविचार, धर्मविषयक विचार भिन्न असतात. पैगंबरांनंतर दूत पाठवण्याऐवजी इमामांची नियुक्ती केली जावी या विचारांचे ते समर्थक आहेत. पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे जावई हजरत अली यांना शियापंथीय उत्तराधिकारी म्हणून मानतात. शियांच्या म्हणण्यानुसार पैगंबरांनीही अली यांनाच उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं. पण, हजरत अबू बकर यांनी फसवून प्रमुखपदी वर्णी लावून घेतली. शियापंथीय मुसलमान पैगंबरांनंतरच्या तीन खलीफांना नेता मानत नाहीत. ते त्यांना गासिब असं म्हणतात. गासिब अरबी शब्द आहे. हडपणे असा त्याचा अर्थ होतो. शियापंथीयांनुसार अल्लानं मोहम्मद यांना पैगंबर म्हणून पाठवलं होतं. त्याच धर्तीवर मोहम्मद यांचे जावई अली यांना अल्लानेच इमाम/नबी म्हणून पाठवलं होतं. त्यांची मुलं पुढचे इमाम होत गेले. पुढे जाऊन शिया पंथातही अनेक गट पडले.

इस्ना अशरी

संपादन
मुख्य लेख: इस्ना अशरी

शिया पंथातला इस्ना अशरी (Twelver/ Ithnā‘ashariyyah) हा सगळ्यात मोठा समुदाय आहे. जगभरातल्या शिया पंथियांपैकी ७५ टक्के लोक याच समुदायाचा भाग आहेत. त्यांचे पहिले इमाम हजरत अली आहेत तर शेवटचे आणि बारावे इमाम महदी आहेत. इस्ना अशरी समुदायाचे समर्थक अल्ला, कुराण आणि हदीस यांचे पालन करतात. पण, त्यांच्या इमामांच्या माध्यमातून आलेल्या हदीसचं हा समुदाय पालन करतो. कुराणानंतर 'नहजुल बलागा' आणि 'अलकाफी' हे दोन धर्मग्रंथ या समुदायासाठी महत्त्वाचे आहेत. इस्ना अशरी समुदाय जाफरियावर विश्वास ठेवतात. इराण, इराक, भारतासह पाकिस्तान तसेच जगभरात या समुदायाचे पाईक आहेत.

जैदिया

संपादन
मुख्य लेख: जैदिया

या (Zaidiyyah) समुदायाचे लोक बाराऐवजी केवळ पाच इमामांच्या पद्धतीवर विश्वास ठेवतात. यापैकी चार इमाम इस्ना अशरी समुदायाचेच आहेत. मात्र पाचवे इमाम म्हणून हजरत अली यांचे नातू जैद बिन अली यांना मानतात. म्हणून ते स्वतःला जैदिया म्हणतात. जैद बिन अली यांच्या 'मजमऊल फिकह' नुसार या समुदायाचे कायदेकानून आहेत. आखातातील यमनमध्ये जैदिया समुदायाचे समर्थक आहेत.

इस्माइली शिया

संपादन
मुख्य लेख: इस्माइली शिया

या (Isma'ilism) समुदायानुसार इमामांची संख्या सातच आहे. शेवटचे इमाम मोहम्मद बिन इस्माईल आहेत. यामुळेच समुदायाचे नाव इस्माइली असे आहे. इमाम जाफर सादिक यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा इस्माईल बिन जाफर प्रमुख होणार की त्यांचा धाकटा मुलगा प्रमुख होणार. यावरून त्यांचे इस्ना अशरी समुदायाशी वाद झाले. इस्ना अशरी समुदायाने धाकटा मुलगा मूसा काजिम यांना इमाम मानले. तेव्हापासून दोन गट निर्माण झाले. इस्माइली समुदायाने इस्माईल बिन जाफर यांना सातवे इमाम मानले. या समुदायाचे आचारविचार इस्ना अशरी समुदायापासून वेगळे आहेत.

दाऊदी बोहरा

संपादन
मुख्य लेख: दाऊदी बोहरा

बोहरा समुदायाचाच हा (Dawoodi Bohra) एक छोटा भाग आहे. हा समुदाय इस्माइली शिया गटाच्या आचारविचारांचं पालन करतो. दाउदी बोहरा 21 इमाम असल्याचं मानतात. तैयब अबुल कासिम त्यांचे शेवटचे इमाम होते. त्यानंतर आध्यात्मिक गुरूंची परंपरा या समुदायात आहे. त्यांना दाई म्हटलं जातं. सैय्यदना बुऱ्हानुद्दीन रब्बानी 52 वे दाई होते. 2014 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या दोन मुलांमध्ये उत्तराधिकारी होण्यावरून वाद झाला. हा वाद न्यायालयात गेला. दाऊदी बोहरा समुदाय गुजरात आणि महाराष्ट्रात आहे. पाकिस्तान आणि येमनमध्येही या समुदायाचे समर्थक आहेत. यशस्वी व्यापारी समाज म्हणून दाऊदी बोहरा सुपरिचित आहेत.

मुख्य लेख: खोजा

गुजरातमधला हा (Khoja) व्यापारी समुदाय आहे. ज्यांनी काही दशकांपूर्वीच इस्लामचा स्वीकार केला आहे. खोजा समुदायाचे समर्थक शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांच्या विचारांना मानतात. खोजा समुदायातले अनेकजण इस्माइली शियांच्या धार्मिक नियमांचं पालन करतात. पण, त्याचवेळी याच समुदायातले बहुतांश जण इस्ना अशरी पंथाप्रमाणे आचरण करतात. काही मोजके लोक सुन्नी इस्लामला मानतात. पूर्व आफ्रिकेतील काही देशांत खोजा समुदायाचे लोक राहतात.

नुसैरी

संपादन
मुख्य लेख: नुसैरी

हा (Alawites/ Nusayri) समुदाय सीरिया आणि इतर आखाती देशांमध्ये आढळतो. अलावी नावानेही हा समुदाय ओळखला जातो. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे नुसैरी समुदायाशी संलग्न आहेत. या समुदायानुसार अली देवाचा अवतार म्हणून भूतलावर अवतरले.

इस्ना अशरी समुदायाप्रमाणे ते आचारविचारांचे पालन करतात. मात्र त्यांच्यांत काही मतभिन्नता आहेत.


याव्यतिरिक्त इस्लाममध्ये अजूनही काही छोटे-छोटे उपपंथ आहेत.

पंथाची लोकसंख्या

संपादन
इस्लामिक पंथ लोकसंख्या टीप
सुन्नी १.२ अब्ज जगातील सर्वात मोठा पंथ
शिया १५ कोटी []
Ibadi १५ लाख
अहमदिया १ कोटी []

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ शेख, प्रा. एच. एम. (मार्च २०१३). "मध्ययुगीन भारतात सुफी संप्रदायाचे योगदान". संशोधक. : ३०-३१.
  2. ^ "Mapping the Global Muslim Population". Pew Research Center. 7 October 2009.
  3. ^ "Ahmadiyya Muslim Community - Islam Ahmadiyya".