* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

ओसामा बिन लादेन
जन्म मार्च १०, १९५७
रियाध सौदी अरेबिया
मृत्यू मे १ २०११ (वय ५४)
अबोटाबाद 34°10′9.67″N 73°14′33.60″E / 34.1693528°N 73.2426667°E / 34.1693528; 73.2426667 पाकिस्तान
मृत्यूचे कारण बंदुकीच्या गोळ्यांनी त्याचे मस्तक भेदले गेले.
चिरविश्रांतिस्थान अरबी समुदाच्या तळाशी
गुप्त
शिक्षण व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र
कारकिर्दीचा काळ १९८८ - २०११
ख्याती कुप्रसिद्ध दहशतवादी
धर्म मुस्लिम
वडील मोहम्मद बिन लादेन

ओसामा बिन मोहम्मद बिन अवाद बिन लादेन ( अरबी: أسامة بن محمد بن عوض بن لادن ; रोमन लिपी: Osama bin Mohammed bin Awad bin Laden) (१० मार्च, इ.स. १९५७ - २ मे, इ.स. २०११) हा सप्टेंबर ११ च्या अमेरिकेवरील हल्ल्यांस, तसेच जगभर अन्यत्र नरसंहारास जबाबदर असलेल्या अल कायदा या इस्लामी जिहादी संघटनेचा संस्थापक व प्रमुख होता. वांशिकतेने येमेनी असलेला ओसामा बिन लादेन सौदी अरेबियातल्या प्रतिष्ठित बिन लादेन घराण्यात जन्मला होता.

त्याला पडकण्यासाठी अडीच कोटी अमेरिकन डॉलरचे बक्षीसही अमेरिकेने जाहीर केले होते. पुढे १३ जुलै २००७ रोजी या बक्षिसाची रक्कम पाच कोटी डॉलर इतकी वाढवण्यात आली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार, १ मे २०११ च्या मध्यरात्री पाकिस्तानात देशाची राजधानी इस्लामाबादपासून केवळ ६५ किमी अंतरावरील अबोटाबादमध्ये 34°10′9.67″N 73°14′33.60″E / 34.1693528°N 73.2426667°E / 34.1693528; 73.2426667 अमेरिकी नेव्ही सील कमांडोंनी या क्रूरकर्म्याला मस्तकात आणि छातीवर बंदुकींतून गोळ्या झाडून ठार मारले. लादेनसाठीच्या या कारवाईला ‘जेरोनिमो’ असे सांकेतिक नाव ठेवण्यात आले होते.[]

जीवन

ओसामा बिन मोहम्मद बिन अवाद बिन लादेन हे त्याचे पूर्ण नाव होते. लादेनचा जन्म १० मार्च इ.स. १९५७ला सौदी अरेबियातील रियाध येथे झाला होता. ओसामाचे वडील मुहम्मद बिन लादेन हे ऐश्‍वर्यसंपन्न उद्योगपती आणि सौदी राजघराण्याशी संबध असणारे बडी असामी होते. जेद्दाहमधील किंग अब्दुल अझीझ विद्यापीठातून व्यापार, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेला ओबामा इस्लाम धर्मातील काही मौलवींच्या संपर्कात आला आणि त्याने इस्लामच्या कार्याला वाहून घेतले. धर्म आणि धार्मिक तत्त्वज्ञान हीच ओसामाची खरी आवड होती. कुराण आणि मुख्यत: जिहाद या संकल्पनेचे विश्‍लेषण करण्यावर ओसामाने आपले लक्ष केंद्रित केले.

 
बिन लादेन घराण्याचे सौदी अरेबियातील ऑफिस

शरिया या इस्लामी कायद्याचे पुनरुज्जीवन आणि पॅन अरेबिझम, लोकशाही, कम्युनिझम , सोशॅलिझम किंवा इतर कुठल्याही विचारप्रणालीला विरोध हे ओसामाच्या तात्त्विक बैठकीचे प्रमुख सूत्र होते. जगात अफगाणिस्तान हे एकमेव मुस्लिम राज्य असल्याचे ओसामाचे म्हणणे होते. इस्रायलच्या निर्मितीला विरोध आणि इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेशी युद्ध हेच त्याच्या जीवनाचे मुख्य ध्येय बनले होते. आत्यंतिक धार्मिकतेकडे झुकणाऱ्या या विचारसरणीने ओसामा तालिबानच्या गळ्यामधील ताईत बनला होता. सौदी उमराव घराण्यामधील ऐश्‍वर्यसंपन्न कुमार ते जगाला धडकी बसवणारा कुख्यात दहशतवादी असा लादेनचा प्रवास होता. राजकारणामधील सतत बदलणाऱ्या संदर्भाने ओसामाला जागतिक मंचावर पदार्पण करण्याची संधी चालून आली. रशियन साम्यवादाला विरोध करण्यासाठी जन्माला आलेल्या विविध संघटना अल कायदामध्ये विसर्जित करून ओसामा जगभरातील दहशतवाद्यांचे स्फूर्तिस्थान बनला.

इ.स. १९८० साली तो अफगाणिस्तानात गेला आणि रशियाच्या आक्रमणाविरुद्धच्या लढाईत सहभागी झाला. अफगाणातील तालिबान संघटनेच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या सहकार्याने ओसामाने आपलेही कार्यक्षेत्र वाढविले. इ.स. १९८९ मध्ये रशियाने अफगाणमधून माघार घेतल्यानंतर ओसामा सौदी अरेबियात परतला आणि बांधकाम व्यवसाय करू लागला. इ.स. १९९० मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले त्याच्या निषेधार्थ अमेरिकेने इराकवर हल्ला करून कुवेतची बाजू घेतली. सौदी अरेबियाचादेखील त्याला पाठिंबा होता.

११ सप्टेंबर, इ.स. २००१ या दिवशी ओसामा बिन लादेनने अमेरिका नावाच्या महासत्तेला प्रचंड मोठा हादरा दिला होता. अमेरिकेचीच विमाने वापरून त्याने वॉशिंग्टनमधील ट्विन टॉवर नामक अमेरिकेच्या आर्थिक उलाढालीवे केंद्र जमीनदोस्त केले आणि जगातील महासत्तेशी युद्धच पुकारले. त्या दिवसापासून लादेन हा अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू झाला. त्याला शोधण्यासाठी जंग जंग पछाडले, परंतु काही केल्या अमेरिकेला तो सापडत नव्हता. अफगाणिस्तानात बसून लादेन, अल् कायदाची सगळी सूले हलवत होता. अमेरिकेची क्षेपणास्त्रेही लादेनचा वेध घेऊ शकत नव्हती. तो ठार झाल्याच्या बातम्या यायच्या, पण लगेचच व्हिडिओ मेसेज पाठवून लादेन अमेरिकेला चिथावणी द्यायचा. असे जवळपास ३० ऑडिओ, व्हिडिओ मेसेज त्याने पाठवले होते.

दहशतवादी कारवाया

अमेरिकेची कारवाई व मृत्यू

सप्टेंबर ११, इ.स. २००१ मधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामाचा शोध घेण्यासाठी दहा वर्षात अनेक योजना आखल्या. तथापि, त्यांमध्ये त्यांना यश मिळाले नव्हते. तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी अफगाणिस्तानपाकिस्तान सीमेवरील छुप्या अड्डय़ांवर अनेक विमानहल्ले करूनसुद्धा ओसामा आणि तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद ओमर हाती लागले नाहीत. मात्र, अल कायदा या संघटनेतर्फे अनेकदा ओसामा जिवंत असल्याच्या घोषणा करण्यात येत असत.

ओसामा बिन लादेन अबोटाबादमध्ये लपल्याची माहिती अमेरिकेला ऑगस्ट, इ.स. २०१० मध्ये मिळाली होती. लादेन ज्या कुरिअरमार्फत साथीदारांशी व बाह्य जगाशी संपर्क साधत असे, त्याचा शोध अमेरिकी गुप्तचर संस्थांनी घेतला आणि त्या कुरिअरचा माग घेतल्यावर लादेनचा ठावठिकाणा हुडकून काढला.

 
पाकमधील लादेन रहात असलेल्या हवेलीचा नकाशा

पाकमधील अबोटाबाद येथील एका अलिशान हवेलीमध्ये पाच वर्षे लादेन रहात होता. इस्लामाबादपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या अबोटाबाद येथे पाकिस्तानची सैनिकी प्रशिक्षणसंस्था व पाकच्या सैन्याचा तळही आहे. तो अबोटाबादमध्ये रहात आहे असा संशय अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए)ला ऑगस्ट इ.स. २०१० मध्ये आला होता. तेव्हापासून लादेन रहात असलेल्या हवेलीवर अमेरिकेच्या गुप्तचरांचे लक्ष होते. चोहोबाजूंनी १२ फूट उंचीची भिंत असलेली ही हवेली ५ कोटी रुपये किंमतीची होती. या हवेलीमध्ये दूरध्वनी आणि इंटरनेट सुविधा नव्हती. केवळ कुरियरच्या माध्यमातूनच स्वतःच्या पूर्ण परिवारासह रहात असलेल्या लादेनचा बाहेरच्या जगाशी संपर्क येत नव्हता. हवेलीतून कोणीही बाहेर जात नव्हते अथवा कोणीही हवेलीत जात नव्हते. त्यामुळेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा संशय बळकट झाला आणि त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे ओसामाला ठार मारण्याची अनुमती मागितली. त्यानुसार ओबामा यांनी २९ एप्रिल, इ.स. २०११ या दिवशी त्याला ठार मारण्याची लेखी संमती दिली.

 
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या अत्यंत जवळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सिच्युएशन रूम’मध्ये बसून लादेनवरची कारवाई पाहिली.

भारतीय प्रमाणवेळेनुसार, १ मे, इ.स. २०११ च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान देशाची राजधानी इस्लामाबादपासून केवळ ६५ किलोमीटर अंतरावरील अबोटाबादमध्ये अमेरिकन 'नेव्ही सील'च्या २०-२५ कमांडोंनी अबोटाबादमधील एका दुमजली बंगल्यात दडलेल्या लादेनला घेरले आणि बंदुकीच्या गोळ्यांनी त्याचे मस्तक भेदले. एका कमांडोने त्याच स्थितीत त्याचे छायाचित्र टिपले. या छायाचित्राचे तात्काळ विश्‍लेषण अमेरिकेतील तज्ज्ञांनी विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने केले व तो ओसामा बिन लादेनच असल्याचा दुजोरा कमांडोंना दिला. नंतर अमेरिकेच्या अनुवंशशास्त्र अभ्यासकांनी केलेल्या डी.एन्.ए. चाचणीतून ठार झालेली व्यक्ती लादेनच होती, हे सिद्ध झाले. अवघ्या ४० मिनिटांच्या कारवाईत ५४ वर्षीय लादेनसह त्याचा मुलगा तसेच एक महिलाही ठार झाली.

पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा, आय.एस.आय. व पाक सरकार या सर्वांना अंधारात ठेवून अमेरिकन नौदलाच्या कमांडोंनी(नेव्ही सील) ही कारवाई केली.[] पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या या कारवाईचे थेट प्रक्षेपण राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या अत्यंत जवळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हाइट हाउस मधील ‘सिच्युएशन रूम’ या बैठकीच्या विशेष खोलीत मध्ये बसून पाहिले. कारवाईत अमेरिकेचा नेव्ही सीलमधील कोणताही सैनिक मृत वा घायाळ झालेला नाही. या प्रसंगी घायाळ झालेल्या ओसामाच्या कुटुंबीयांना अबोटाबाद येथील रुग्णालयातच दाखल करण्यात आले. ओसामा ठार झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी करताच पूर्ण अमेरिकेत एकच जल्लोष साजरा करण्यात आला.

लादेनचा मृतदेह सर्वप्रथम अफगाणिस्तानमध्ये नेण्यात आला. लादेनचा मृतदेह स्वीकारण्यासाठी सौदी अरेबियाशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, सौदी सरकारने तो स्वीकारण्यास नकार दिल्याने मृतदेह अरबी समुद्रात 'कार्ल विन्सन' या अमेरिकन नौदलाच्या जहाजावर नेण्यात आला. तेथे इस्लामी पद्धतीने शवाला स्नान घालून शुभ्र वस्त्रे चढवण्यात आली. एका मोठ्या पेटीमध्ये त्याचा मृतदेह ठेवण्यात आला. मुस्लिम धर्माच्या परंपरेनुसार अंत्यसंस्काराचे विधी केल्यावर एका सपाट नौकेत ती पेटी ठेवण्यात आली व नौका समुद्रात बुडविण्यात आली. या जागेविषयी अमेरिकेने कोणालाच थांगपत्ता लागू दिलेला नाही. अतिरेकी अनुयायी स्मारक उभारतील आणि त्याला 'आकर्षणकेंद्र' बनवितील या भीतीपोटी मृतदेहाचे दफन इस्लामी परंपरेनुसारच, पण समुदाच्या तळाशी केले गेले.[][][]

लादेन ज्या अबोटाबाद येथील घरात राहत होता, ते घर भविष्यामध्ये लादेनचे स्मृतिस्थळ बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आता ते घर पाडून टाकण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.[]

संदर्भ व नोंदी

  1. ^ अमेरिकेने सुतावरून गाठला स्वर्ग... महाराष्ट्र टाइम्स ३ मे २०११
  2. ^ लादेनची अखेर! महाराष्ट्र टाईम्स ३ मे, इ.स. २०११
  3. ^ पाकच्या मुसक्‍या आणखी आवळणार[मृत दुवा] सकाळ
  4. ^ अग्रलेख - लादेनचा अंत Archived 2011-05-07 at the Wayback Machine. महाराष्ट्र टाईम्स २ मे, इ.स. २०११
  5. ^ http://en.wikinews.org/wiki/Osama_bin_Laden_dead,_report_US_officials
  6. ^ लादेनच्या 'त्या' घरावर हातोडा Archived 2011-05-09 at the Wayback Machine. महाराष्ट्र टाईम्स ६ मे, इ.स. २०११