मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

(म. द. हातकणंगलेकर या पानावरून पुनर्निर्देशित)


प्राचार्य मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर (जन्म : फेब्रुवारी १, १९२७; - जानेवारी २५, २०१५) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले. ’कोसला‘कार भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी गाजण्याआधी हातकणंगलेकरांनी नेमाडे यांना सांगलीच्या ’विलिंग्डन’ कॉलेजात व्याख्यानास निमंत्रित केले होते.

मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर
जन्म नाव मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर
जन्म फेब्रुवारी १, १९२७
हातकणंगले, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जानेवारी २५, इ.स. २०१५
सांगली (महाराष्ट्र, भारत)
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
भाषा मराठी
साहित्य प्रकार समीक्षा

मराठीतील अक्षरवाङ्‌मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि जागतिक साहित्यविश्‍वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली.

विलिंग्डन महाविद्यालय, सांगलीचे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले.

पूर्वायुष्य

संपादन

म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे एक फेब्रुवारी १९२७ रोजी झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगलेत झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले. इ.स. १९४४ मध्ये ते मॅट्रिक झाले आणि सन १९४६ साली त्यांनी विलिंग्डन कॉलेजात असताना इंटर आर्ट्‌सच्या परीक्षेत तर्कशास्त्र या विषयासाठी ठेवलेले प्रसिद्ध असे सेल्बी पारितोषिक मिळविले. नंतर, सन १९४८ मध्ये बी.ए परीक्षेत इंग्रजी विषयासाठी त्यांना मुंबई विद्यापीठात एलिस पारितोषिक मिळाले.सन १९५० मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि मराठी विषयात एम.ए. पूर्ण केले.

त्यानंतर हातकणंगलेकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे अर्धव्याख्याता म्हणून अध्यापन कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे धारवाड येथे ॲग्रिकल्चरल महाविद्यालयात ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. १९५६ साली ते विलिंग्डन मध्ये परतले आणि तिथेच ते प्राध्यापकापासून ते प्राचार्य असे सलग १९८७ सालापर्यंत काम करीत राहिले.

हातकणंगलेकर हे वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग खूप दांडगा होता. त्यातूनच त्यांनी ललित लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे जाऊन ते समीक्षात्मक लेखन करू लागले. तत्कालीन सत्यकथा, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, वसंत, वीणा, महाद्वार अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन चांगलेच गाजू लागले. याच काळात मराठीचे नामवंत कथालेखक जी.ए. कुलकर्णी ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला.'जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपाने प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबऱ्यांचे इंग्रजीत अनुवाद केले.

आपल्याला आलेल्या अनेक अनुभवावरून ’उघडझाप हे आत्मवृत्त वाचकांच्यासमोर आणले.त्याचे प्रकाशन त्यांचे साहित्यिक मित्र आणि प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले होते.

त्यांनी समीक्षा केलेल्या अनेक कांदबऱ्या आणि साहित्याबाबत त्यांनी आपली मते ठामपणे मांडलेली असायची त्यामुळे त्याविरोधात कोणीसुद्धा ब्र काढू नये इतके ते मत ठाम आणि परिपूर्ण असायचे. त्यामुळेच त्यांच्या स्मीक्षेला मराठी साहित्यात चांगलेच वलय प्राप्त झालेले असे.

म,द, हातकणंगलेकरांनी साहित्य संस्कृती मंडळ तसेच विश्वकोश मंडळावरही अनेक वर्ष काम केले होते. त्यांनी अनेक नवसाहित्यिकांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचा जो प्रयत्‍न केला त्यातून अनेक नवे साहित्यिक तयार झाले.

साहित्य संमेलन

संपादन

सांगली येथील ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ते अध्यपदाच्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडले गेले होते. त्यावेळी त्यांनी अध्यक्षपदाच्या भाषणात त्यांचे आवडते लेखक गूढ कथाकार जी.ए. कुलकर्णी यांचे त्यांच्या लौकिकाला साजेशे असे स्मारक जी.ए.च्या कर्मभूमीत धारवाड येथे उभा करण्यासाठी आपण जो प्रयत्‍न करत आहोत त्याला मराठी माणसांनी साथ द्यावी असे आवाहन केले होते.

मराठी साहित्य संमेलनाच्या सुमारास विद्रोही अगर समातंर साहित्य संमेलनाचा विषय फारच गाजतो, त्यामुळे होणारे साहित्य संमेलन हे साहित्यातील सर्व घटकांना घेऊन सर्वसमावेशक असावे असे हातकणंगलेकरांनी स्पष्ट केले होते. विद्रोही साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर एकत्र यावे असे आवाहनही केले होते. त्यांनी मराठी साहित्यातील अनेक चुकीच्या प्रथांवर तसेच चुकीच्या परंपरावरही प्रहार केले होते.

प्रकाशित साहित्य

संपादन

समीक्षा

संपादन
  1. साहित्यातील अधोरेखिते :(१९८०) : सुपर्ण प्रकाशन
  2. मराठी साहित्य; प्रेरणा आणि प्रवाह ( संपादन) : पॉप्युलर, मुंबई
  3. निवडक मराठी समीक्षा ( संपादन) : साहित्य अकादमी
  4. मराठी कथा : रूप आणि परिसर : सुपर्ण प्रकाशन, पुणे
  5. साहित्यविवेकः प्रतिमा प्रकाशन
  1. आठवणीतील माणसं : स्वरूप प्रकाशन
  2. भाषणे आणि परीक्शणे : सांगाती प्रकाशन, बेळगाव
  3. ‘उघडझाप ’(आत्मचरित्र) : मौज प्रकाशन, मुंबई
  4. विष्णू सखाराम खांडेकर : साहित्य अकादमी : दिल्ली
  5. साहित्यसोबती ( मानसन्मान प्रकाशन, पुणे)

संपादन

संपादन
  1. जी. ए.ची निवडक पत्रे ( खंड १ ते ४) : मौज प्रकाशन, मुंबई
  2. वाङ्मयीन शैली आणि तंत्र ( अजब प्रकाशन, कोल्हापूर)
  3. निवडक ललित शिफारस ( मॅजेस्टिक प्रकाशन)

म.द. हातकणंगलेकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन