विशेष लेख १

दालन:इतिहास/विशेष लेख/१

एक कल्पनाचित्र
पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी भारतातील हरयाणा राज्यातील पानिपत नजीक झाली.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते.

पानिपतजवळ पूर्वीही दोन मोठी युद्धे झाली होती, ज्यात मोघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.

पानिपतच्या युद्धाचे परिणाम केवळ त्या युद्धापुरते मर्यादित राहिले नाहीत. भारतीय इतिहासावर याचे अत्यंत दूरगामी परिणाम झाले. मराठ्यांचे एकाच दिवसात ४० ते ५० हजार सैनिक मारले गेले व एकूण युद्धात ६० हजारांवर सैनिक व नागरिक मारले गेले. मराठ्यांना अनेक शूर योद्धांना मुकावे लागले. या युद्धात महाराष्ट्राच्या दोन पिढ्या गारद झाल्यासारखे झाले. नानासाहेब पेशव्यांना या युद्धाचा जबरदस्त धक्का बसला व शोकातच त्यांनी प्राण सोडला.

युद्ध जिंकूनसुद्धा क्षीण झालेल्या सैन्यामुळे क्षुल्लक लुटी शिवाय अब्दाली काहीच प्राप्त करु शकला नाही. उत्तर भारतात केवळ नाममात्र इस्लामी राज्य स्थापन झाले जे पुन्हा काही वर्षात लयाला गेले. अब्दालीच्या क्षीण झालेल्या ताकदीचा जाट व शिखांनी फायदा घेतला. अफगाणी लुटारुंच्या भारतवार्‍या कायमच्या बंद झाल्या.

विशेष लेख २

दालन:इतिहास/विशेष लेख/२

सम्राट अशोकाचे शिलालेख म्हणजेच बिंदुसार राजाचा दुसरा मुलगा व चंद्रगुप्ताचा नातू आणि मगध साम्राज्याचा इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ या काळात राज्यकर्ता राहिलेल्या सम्राट अशोक याचे शिलालेख होत.

सम्राट अशोकाच्या शाही आज्ञा आणि त्याच्या अन्य आलेखांचे बृहद शिलालेख, लघु शिलालेख, विशाल स्तंभालेख, लघु स्तंभालेख आणि गुंफा शिलालेख असे पाच प्रकारचे शिलालेख आहेत. चौदा बृहद शिलालेख शृंखला पाच ठिकाणी, सहा विशाल स्तंभालेख शृंखला सहा ठिकाणी (त्या पैकी टोपरा स्तंभावर सात लेख), एकोणीस ठिकाणी लधु शिलालेख, सहा लघु स्तंभालेख आणि तीन गुंफा-शिलालेख असे शिलालेख उपलब्ध झाले आहेत.

सम्राट अशोकाचा मीरतमध्ये असलेला पहिला आलेख इ.स. १७५० मध्ये पेड्रोटिफेन-थेलरने शोधून काढला. त्यानंतर इ.स. १९१५ पर्यंत टॉंड, किट्टो, राईस, एलिस, कॅप्टन ले, फीहरर, ऑस्ट्रेल, बीडन व भगवानलाल इंद्र यांनी अशोकाचे आलेख शोधले. इ.स. १८३७ साली प्रिन्सेप याने आलेखातील ब्राह्मी लिपीचे वाचन केले. हे आलेख शाहबाझगढी, मानसेरा, कालसी, गिरनार, धौली, जौगड, कर्नूल, सोपारा या ठिकाणी सापडलेले आहेत. अशोकाचे स्तंभालेख लोरिया नंदनगड, टोपरा, अलाहाबाद, लोरिया अरराज, रामपुरवा व सारनाथ येथे मिळाले. याचबरोबर आणखी काही महत्त्वपूर्ण आलेख रूपनाथ, सहसराम, बैराट, चितळदुर्ग, बाराबर, मस्की, भाब्रू, साँची व कौशांबी येथेही सापडले आहेत.

अशोकाचे हे लेख सामान्यपणे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेले आढळतात परंतु भारताच्या वायव्य भागात आढळलेले लेख आरमाइक भाषेतखरोष्टी लिपीत आढळतात. अफगाणिस्तानात ते आरमाइक व ग्रीक भाषांमध्ये कोरलेले आहेत.

अशोकस्तंभांमध्ये सारनाथ येथील स्तंभ सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. इ.स. १९०५ मध्ये केलेल्या उत्खननात याचे फक्त स्तंभशीर्षच सापडले. ते दोन मीटर उंचीचे असून सध्या ते सारनाथ येथील संग्रहालयात ठेवलेले आहे. भारतीय प्रजासत्ताकाने पहिल्या प्रजासत्ताकदिनी या स्तंभाचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले.

विशेष लेख ३

दालन:इतिहास/विशेष लेख/३

क्लिओपात्रा ७ फिलोपातोर (ग्रीक: Κλεοπάτρα Φιλοπάτωρ) (इ.स. पूर्व ६९ - १२ ऑगस्ट ३०) ही प्राचीन इजिप्तची राणी होती. क्लिओपात्रा जुलियस सीझर ह्या रोमन सम्राटाची अविवाहित पत्नी होती असे मानले जाते. १२ ऑगस्ट ३० रोजी वयाच्या ३९व्या वर्षी क्लिओपात्राने स्वतःवर सर्पदंश करून घेऊन आत्महत्या केली.

इ.स.पू. ६९ मध्ये जन्मलेली क्लिओपात्रा बाराव्या प्टॉलेमीची कन्या होती. या प्टॉलेमीचा पूर्वज पहिला प्टॉलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यात सेनानी होता. हा मॅसोडेनियन सेनानी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इजिप्तचा पहिला प्टॉलेमी राजा झाला. या राजघराण्याने भाऊ-बहिणींमधील लग्नाची पद्धत वंशशुद्धीच्या कल्पनेने उचलली होती. क्लिओपात्राच्या जन्माच्या वेळी इजिप्त हे अतिशय श्रीमंत राज्य होते. परंतु हे राज्य राजकीयदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे व शेजारच्या रोमन साम्राज्यापुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून क्लिओपात्राच्या बापाने करार करून सीझर आणि पॉंपेईकडून आपला इजिप्तवर राजा म्हणून असलेला अधिकार मान्य करून घेतला होता. याबदल्यात रोमनांनी प्टॉलेमीकडून प्रचंड रक्कम घेतली. ही रक्कम प्टॉलेमीने रोमन धनकोंकडून कर्जाऊ घेऊन दिली. या प्रचंड रकमेची परतफेड करणे अवघड होते त्यामुळे त्याच्या राज्यातील नागरीकांना त्याचे हे कृत्य पसंत नसल्याने राज्यात अंतर्गत बंडाळी माजली. या परिस्थितीतच इ.स.पू. ५१ मध्ये प्टॉलेमीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची १८ वर्षीय कन्या क्लिओपात्रा आणि तिचा धाकटा १० वर्षाचा भाऊ तेरावा प्टॉलेमी संयुक्तपणे राज्यावर आले. या राजघराण्यातील परंपरेनुसार हा तिचा धाकटा भाऊ तेरावा प्टॉलेमी क्लिओपात्राचा नवरा होता. तो आपल्याच हाताखालील एका सेवकाच्या आहारी जाऊन त्याच्या हातातील बाहुले बनला होता. क्लिओपात्राला दूर करून राज्य हातात घेण्याच्या त्यांच्या योजना चालू होत्या. रोममध्येही त्याचवेळी सीझर सत्तेवर आला होता. रोमची तिजोरी रिकामी होती त्यासाठी सीझरला इजिप्तकडून वसूली करणे गरजेचे होते म्हणून सीझर अलेक्झांड्रियाला आला. राज्यातील अंतर्गत बंडाळी आणि भावाची/नवऱ्याची कारस्थाने यातून मार्ग काढण्यासाठी क्लिओपात्राने सीझरची मदत घेतली. यानंतर क्लिओपात्राचे सीझरशी अत्यंत सलोख्याचे संबंध असले तरी रोमविषयी तिच्या मनात भीती होतीच. सीझरच्या खूनाच्या वेळी क्लिओपात्रा रोममध्येच होती. सीझरचे खूनी आणि त्याचे मित्रही या खूनासाठी क्लिओपात्राची मदत मागत होते. तिची सत्ता आणि राज्याचे स्वतंत्र असणे याचा विचार करून तिने त्यावेळी अॅंटोनीला मदत केली. नौका पुरविल्या. पैसा दिला. त्यामुळे साहजिकच क्लिओपात्रा आणि अॅंटोनी यांच्यातही सलोख्याचे संबंध निर्माण झाले.

विशेष लेख ४

दालन:इतिहास/विशेष लेख/४

महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे: अलेक्झांडर द ग्रेट ; ग्रीक: Μέγας Ἀλέξανδρος ; मेगास आलेक्सांद्रोस ;) (जुलै २०, इ.स.पू. ३५६ ते जून ११, इ.स.पू. ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. इ.स.पूर्व ३५६ मध्ये (Μακεδονία) मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची चौथी पत्‍नी ऑलिंपियास यांच्या पोटी पेल्ला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका अशीही सांगितली जाते की तो फिलिपचा पुत्र नसून सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याचा पुत्र होता. याचे कारण अलेक्झांडरची आई ऑलिंपियास हिचा गूढ विद्यांवर विश्वास होता आणि तिच्याकडे एक सापही पाळलेला होता. साप हे झ्यूसचे प्रतीक मानले गेल्याने अलेक्झांडर हा साक्षात देवाचा पुत्र असल्याची वावडी उठवली गेली. या कथेत फारसे तथ्य नसले तरी राज्यविस्तार व स्वाऱ्यांच्या दरम्यान अजिंक्य ठरण्यास अलेक्झांडरला तिचा खूप मोठा उपयोग झाल्याचे सांगण्यात येते.
सिंहासोबत लढणारा अलेक्झांडर
फिलिपच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे लहानपणापासून अलेक्झांडरची आपल्या आईशी आणि सख्खी बहीण क्लिओपात्रा हिच्याशी वडिलांपेक्षा जास्त जवळीक होती. तत्कालीन ग्रीस देश हा अनेक लहान राज्यांत विभागला गेला होता. या सर्व ग्रीक प्रदेशावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचे फिलिपचे स्वप्न होते. मुलाशी आणि राज्याच्या युवराजाशी बिघडलेले संबंध पुन्हा एकवार सुधारावेत म्हाणून या स्वारीत अलेक्झांडरने भाग घ्यावा अशी फिलिपची इच्छा होती. यामुळे अलेक्झांडरला स्वारीवर जाण्याची संधी कुमारवस्थेतच मिळाली. इ.स.पू. ३३८मध्ये फिलिपने अथेन्स आणि थेबेसवर स्वारी केली. या युद्धात अलेक्झांडर लढल्याची आणि लढाई जिंकल्याची नोंद मिळते. या लढाईत मिळालेला आपला विजय फिलिपने मोठ्या दिमाखात साजरा केला परंतु अलेक्झांडर या सोहाळ्यात सामील झाला नाही. काही नोंदींनुसार त्याने जखमी सैनिकांची विचारपूस आणि शुश्रूषा करणे पसंत केले असे सांगितले जाते.

विशेष लेख ५

विशेष लेख ६

विशेष लेख ७

विशेष लेख ८

विशेष लेख ९

विशेष लेख १०

विशेष लेख ११

विशेष लेख १२

विशेष लेख १३

विशेष लेख १४

विशेष लेख १५

विशेष लेख १६

विशेष लेख १७

विशेष लेख १८

विशेष लेख १९

विशेष लेख २०

विशेष लेख २१

विशेष लेख २२

विशेष लेख २३

विशेष लेख २४

विशेष लेख २५

विशेष लेख २६

विशेष लेख २७

विशेष लेख २८

विशेष लेख २९

विशेष लेख ३०