दालन:इतिहास/विशेष लेख/४
महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे: अलेक्झांडर द ग्रेट ; ग्रीक: Μέγας Ἀλέξανδρος ; मेगास आलेक्सांद्रोस ;) (जुलै २०, इ.स.पू. ३५६ ते जून ११, इ.स.पू. ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. इ.स.पूर्व ३५६ मध्ये (Μακεδονία) मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची चौथी पत्नी ऑलिंपियास यांच्या पोटी पेल्ला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका अशीही सांगितली जाते की तो फिलिपचा पुत्र नसून सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याचा पुत्र होता. याचे कारण अलेक्झांडरची आई ऑलिंपियास हिचा गूढ विद्यांवर विश्वास होता आणि तिच्याकडे एक सापही पाळलेला होता. साप हे झ्यूसचे प्रतीक मानले गेल्याने अलेक्झांडर हा साक्षात देवाचा पुत्र असल्याची वावडी उठवली गेली. या कथेत फारसे तथ्य नसले तरी राज्यविस्तार व स्वाऱ्यांच्या दरम्यान अजिंक्य ठरण्यास अलेक्झांडरला तिचा खूप मोठा उपयोग झाल्याचे सांगण्यात येते.
फिलिपच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे लहानपणापासून अलेक्झांडरची आपल्या आईशी आणि सख्खी बहीण क्लिओपात्रा हिच्याशी वडिलांपेक्षा जास्त जवळीक होती. तत्कालीन ग्रीस देश हा अनेक लहान राज्यांत विभागला गेला होता. या सर्व ग्रीक प्रदेशावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचे फिलिपचे स्वप्न होते. मुलाशी आणि राज्याच्या युवराजाशी बिघडलेले संबंध पुन्हा एकवार सुधारावेत म्हाणून या स्वारीत अलेक्झांडरने भाग घ्यावा अशी फिलिपची इच्छा होती. यामुळे अलेक्झांडरला स्वारीवर जाण्याची संधी कुमारवस्थेतच मिळाली. इ.स.पू. ३३८मध्ये फिलिपने अथेन्स आणि थेबेसवर स्वारी केली. या युद्धात अलेक्झांडर लढल्याची आणि लढाई जिंकल्याची नोंद मिळते. या लढाईत मिळालेला आपला विजय फिलिपने मोठ्या दिमाखात साजरा केला परंतु अलेक्झांडर या सोहाळ्यात सामील झाला नाही. काही नोंदींनुसार त्याने जखमी सैनिकांची विचारपूस आणि शुश्रूषा करणे पसंत केले असे सांगितले जाते.