संत तुकाराम

मराठी वारकरी संत
(तुकाराम या पानावरून पुनर्निर्देशित)

संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांचा जन्म देहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरू' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - 'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. 'जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज
मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म सोमवार २१ जानेवारी १६०८,
माघ शुद्ध पंचमी, शा.शके १५३०, युगाब्द ४७०९.
देहू, महाराष्ट्र.
निर्वाण १९ मार्च, १६५० (वय ४२),
फाल्गुन वद्य द्वितीया, शा.शके १५७२, युगाब्द ४७५१.
देहू, महाराष्ट्र
संप्रदाय वारकरी संप्रदाय
गुरू केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य)
शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवानबाबा,
भाषा मराठी भाषा
साहित्यरचना तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)[]
कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
संबंधित तीर्थक्षेत्रे देहू
व्यवसाय वाणी
वडील बोल्होबा अंबिले
आई कनकाई बोल्होबा आंबिले
पत्नी रखुमाबाई, जिजाबाई (आवली)
अपत्ये महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत.

संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेले आहे.

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. पण याबद्दल पुरोगामी आणि सुशिक्षित लोकांना साशंकता आहे.

तुकाराम महाराज वाणी समाजाचे; त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा द्वितीय विवाह झाला होता.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते.

तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले.

संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले. संत तुकाराम महाराजांना "जगदगुरू" असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव "हरिनामात" गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी "तुकाराम बीज" हा दिवस येतो. याच दिवशी जगदगुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्त बसून सदेह वैकुंठधामाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात "श्री हरि भगवान विष्णू" यांचे धाम. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच "राम" आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना "जगदगुरू" असे संबोधले जाते.

वंशावळ

संपादन
  • विश्वंभर आणि आमाई अंबिले यांना दोन मुले - हरि व मुकुंद
  • यांतील एकाचा मुलगा विठ्ठल
  • दुसऱ्याची मुले - पदाजी अंबिले, शंकर अंबिले, कान्हया अंबिले
 
संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आणि वसतीस्थान, देहूगाव
  • बोल्होबा आणि कनकाई अंबिले यांना तीन मुले - सावजी (थोरला). याने तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले. मधला तुकाराम व धाकटा कान्होबा

जीवनोत्तर प्रभाव

संपादन

संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरुपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.[ संदर्भ हवा ]

तुकारामांनी लिहिलेली पुस्तके

संपादन

संत तुकाराम गाथा म्हणजे हिंदूची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत.

महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे जू हिंदूंच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते. स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली. ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत - ज्ञानेश्वर - या काळामध्ये पुढे आले. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञान-ज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्म-मार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे.

ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम,त्यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. या वादळाला थोपविण्यासाठी सनातनी धर्ममार्तंडांनी कल्लोळ केला, कटकारस्थाने रचली अशा अनेक संकटातून नव्हे तर अग्निदिव्यातून जात असताना अभंग सतत गर्जत राहिला. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला.

संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म यासंबंधी ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवभोळेपणा धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना खूप विरोध केला. नंतर ते विरोधक नमले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे. त्यांची वंशावळ पाहिली तर त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड दिसते.त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर त्यांची पत्नी रमाबाई हरी आणि मुकुंद अशी त्यांची दोन मुले ही दोन मुले लढाईत मारली गेली. तत्कालीन रूढीप्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्याने सती गेली नाही. हरीला विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबाचा दाजी व दाजीचा शंकर, शंकरचा कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा आणि बोल्होबाचा संत तुकाराम असा हा वंश आहे. संत तुकारामांचे उपनाव मोरे असे होते. वंशपरंपरेने घरी वाण्याच्या दुकानाचा व्यवसाय होता. सावकारी होती. पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी देहू गाव वसले आहे. संत तुकाराम यांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी गावांमध्ये विठोबाचे देऊळ बांधलेले होते. घराण्यात वारकरी संप्रदाय अखंड चालत आलेला होता. असा उल्लेख महिपतीकृत संत तुकाराम चरित्रात सापडतो. संत तुकाराम यांच्या घराण्यात आठ पिढ्या सावकारी होती, ते महाजन होते. घरात श्रीमंती नांदत होती. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरी नोकर-चाकर यांची मांदियाळी होती, असे असूनसुद्धा संत तुकाराम या गोष्टींपासून विरक्तच राहिले. संसार असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहिले.

  • तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू भाषेत भाषांतर (भाषांतरकार - कर्णे गजेंद्र भारती महाराज)
  • तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
  • दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
  • श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)
  • श्री संत तुकाराम महाराजांची गाथा (संपादक ह. भ. प. श्री. पांडुरंग अनाजी घुल)[]
  • इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत 'संत तुकाराम' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णूपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. हा मराठी चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता. त्यानंतर भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट निघाले.
  • हा १९३६ सालचा मराठी चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर अँड कंपनी'ने 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एका नाटकाचे चित्रण होते. शारदा फिल्म कंपनीचा 'तुकाराम' मात्र चित्रपट म्हणूनच तयार करण्यात आला होता. या 'तुकारामा'चीही काही माहिती आज उपलब्ध नाही.
  • १९६३ मध्ये संत तुकाराम नावाचा कानडी चित्रपट आला होता. दिग्दर्शक - सुंदराराव नाडकर्णी
  • तुका झालासे कळस (मराठी चित्रपट, १९६४) - दिग्दर्शक राजा नेने. या चित्रपटात तुकारामाची भूमिका कुमार दिघे यांनी केली होती.
  • १९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्सने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा 'आवडी' बनल्या होत्या.
  • त्यानंतर १९७४ मध्ये 'महाभक्त तुकाराम' आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता,आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीदेवी यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती.
  • यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्सचा 'श्री जगत्गुरू तुकाराम'.
  • इ.स. २०१२सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे. हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केला होता. यात तुकाराम महाराजांची भूमिका जितेंद्र जोशी यांनी साकारली आहे.
  • तुकारामाच्या आयुष्यावर कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर ‘तू माझा सांगाती’ नावाची मालिका ११-७-२०१४पासून सुरू झाली. ११ ऑगस्ट २०१८ रोजी तिचा शेवटचा एपिसोड झाला.
  • 'तुका आकाशा एवढा' हा मराठी चित्रपट ???? साली आला होता. दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक - जितेंद्र वाईकर

तुकारामांचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

संपादन

तुकारामांचे ’तुकारामबाबांचे चरित्र’ नावाचे मराठीतले पहिले चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी इ.स. १८९६ साली लिहिले. ’आध्यात्मिक ज्ञान रत्‍नावली’ नावाच्या मासिकात हे चरित्र क्रमश: प्रसिद्ध झाले होते. न्यायमूर्ती रानडे यांनी या चरित्राचे कौतुक केले होते. दक्षिणा प्राईज कमिटीने या पुस्तकाला पहिले बक्षीस दिले होते. चमत्कारांवर भर न देता संत तुकारामांचे थोरपण या पुस्तकात सांगितले आहे. २०१५ साली औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने या पुस्तकाची ’संत तुकाराम’ या नावाची नवी आवृत्ती काढली आहे. अन्य पुस्तके -

  • अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची (ग.बा. सरदार)
  • अभंगवाणी श्री तुकयाची (प्रा. डाॅ. गणेश मालधुरे)
  • आनंदओवरी (कादंबरी - लेखक दि.बा. मोकाशी)
  • आनंड डोह (२०१४). नाटक - लेखक  : योगेश्वर
  • आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी)
  • ’A complete collection of the poems of Tukáráma, the Poet of Maharashtra (दोन खंड-इ.स.१८६९) मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणारे : विष्णू परशुरामशास्त्री पंडित, शंकर पांडुरंग पंडित आणि जनार्दन सखाराम गाडगीळ
  • तुका आकाशाएवढा : लेखक गो.नी. दांडेकर
  • तुका झाला पांडुरंग (कादंबरी, भा.द. खेर)
  • तुका म्हणे : लेखक डॉ. सदानंद मोरे
  • तुका म्हणे भाग १, २ : लेखक डॉ. दिलीप धोंगडे
  • तुका म्हणे सोपी केली पायवाट (डॉ. अविनाश वाचासुंदर - दैनंदिन उपयोगाच्या तुकारामांच्या निवडक १५० अभंगांचे निरूपण)
  • तुका झाले कळस (डाॅ. व.दि. कुलकर्णी)
  • तुका झालासे कळस : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
  • तुका झालासे कळस : लेखक स.कृ. जोशी
  • तुका झालासे कळस : लेखक डॉ. रामचंद्र देखणे
  • तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब
  • तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन)
  • संत तुकाराम (बाबाजीराव राणे)
  • तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील)
  • तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
  • समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
  • तुकाराम (हिंदी बालनाट्य, लेखिका - धनश्री हेबळीकर, दिग्दर्शन अभिजित चौधरी, निर्माता युवराज शहा)
  • तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे)
  • तुका राम दास (तुलसी आंबिले, लोकसत्ता दैनिकात २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या दोन सदरांतील मजकुराचे संकलन)
  • तुकाराम नावाचा संत माणूस (विश्वास सुतार)
  • श्री तुकाराम महाराज चरित्र - (प्रा. र.रा. गोसावी, वीणा गोसावी)
  • तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
  • तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे
  • तुकारामांचा शेतकरी : लेखक डॉ. आ.ह. साळुंखे
  • तुकारामांची अभंगवाणी : लेखक पंडित कृष्णकांत नाईक
  • तुकारामाचे निवडक १०० अभंग : लेखक डॉ. दिलीप चित्रे
  • तुकारामाचे निवडक १००० अभंग (व्हीनस प्रकाशन)
  • तुकारामाच्या अभंगांची चर्चा (खंड १, २) (वासुदेव पटवर्धन)
  • तुका, विठू आणि मी : लेखिका यशश्री भवाळकर
  • तुकोबा : लेखक शंकर पांडुरंग गुणाजी
  • तुकोबाचे वैकुंठगमन दिलीप चित्रे
  • धन्य तुकाराम समर्थ (एकपात्री नाट्यप्रयोग), लेखक व सादरकर्ते नामदेव तळपे
  • निवडक तुकाराम (वामन देशपांडे)
  • ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे.
  • पुन्हा तुकाराम : दिलीप चित्रे
  • प्रसादाची वाणी अर्थात तुका म्हणे (डॉ.सदानंद मोरे)
  • मुलांसाठी तुकाराम (वामन देशपांडे)
  • रोखठोक संत तुकाराम (डाॅ. यशवंतराव पाटीलसर)
  • One Hundred Poems of Tukaram (चंद्रकांत म्हात्रे)
  • वारीच्या वाटेवर महाकादंबरी (दशरथ यादव)
  • विद्रोही तुकाराम : लेखक आ.ह. साळुंखे
  • विद्रोही तुकाराम - समीक्षेची समीक्षा : लेखक आ.ह. साळुंखे
  • संत तुकाराम आणि रेव्ह. टिळक : एक भावानुबंध (लेखक : सुभाष पाटील):
  • श्री संत तुकाराम चरित्र (अनंत पैठणकर)
  • संत तुकाराम (चरित्र) (कृ.अ. केळूसकर, १८९५)
  • संत तुकाराम (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
  • संत तुकाराम - व्यक्ती व वाङ्मय (प्रा. डाॅ. शोभा गायकवाड)
  • संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग (वा.सी. बेंद्रे)
  • तुकारामबावांंच्या गाथेचे ‍‍निरूपण (संपादक : मारुती भाऊसाहेब जाधवगुरुजी; प्रकाशक : संत तुकाराम अध्यासन, ‍कोल्हापूर शिवाजी ‍विद्यापीठ)
  • संतसूर्य तुकाराम (कादंबरी, लेखक : आनंद यादव)
  • साक्षात्कारी संत तुकाराम (शं.दा. पेंडसे)
  • 'Says Tuka (चार खंड) : लेखक दिलीप चित्रे
  • द सेंट पोएट्स ऑफ महाराष्ट्र : देअर इम्पॅक्ट ऑन सोसायटी (इंग्रजी) (१९६९) (गं.बा. सरदार)

तुकाराम महाराजांचे नाव दिलेली ठिकाणे

संपादन
  • तुकाराम उद्यान (निगडी-पुणे)
  • तुकारामनगर (खराडी-पुणे)
  • तुकारामनगर (तळेगाव दाभाडे-पुणे)
  • तुकारामनगर (पिंपरी-पुणे)
  • तुकारामवाडी (जळगांव)
  • तुकारामवाडी (डोंबिवली पूर्व)
  • तुकारामवाडी (पेण-कोंकण)
  • संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल (संत तुकाराम चौक अकोला)

चित्रकला-शिल्पकला व मुद्राचित्र

संपादन

विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात हॉलंडमध्ये वास्तव्य असलेल्या चित्रकार, शिल्पकार व कवी भास्कर हांडे यांनी तुकारामाच्या गाथेतील अभंगावरून स्फुरलेल्या चित्रांची शिल्पांची व मुद्रा चित्रांची मालिका तयार केली. तिला 'तुझे रूप माझे देणे' असे नाव दिले आहे. त्या चित्रांची कायमस्वरूपी मांडणी वैश्विक कला पर्यावरण औंध (पुणे) येथे केली आहे. लोकांसाठी हे कलादालन उघडे आहे. गाथेतील अभंगांवर चित्र काढण्याचा हा पहिलाच प्रयोग होता.

पुस्तके

संपादन

संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी  प्रबंध यादी[] १. संत तुकाराम आणि महात्मा बसवेश्वर यांच्या भक्तीकाव्याचा तुलनात्मक अभ्यास

२. श्री संत तुकाराम व्यक्तित्व व कवित्व

३ संत तुकाराम : व्यक्ती आणि वाण्ग्मय

४ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील लोकजीवन संदर्भ आणि चिंतन : एक अभ्यास

५ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील अनौपचारिक मूल्यशिक्षणाचा अभ्यास

६ संत तुकाराम महाराज आणि त्यांची विठ्ठलभक्ती

७. संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या साहित्यातील मुल्यविचारांचाअभ्यास

८. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत रामदास यांच्यासाहित्यात प्रतिबिंबित झालेले चित्तवृतीनिरोधाचे मार्ग

९. संत एकनाथ व संत तुकाराम यांचा अनुबंध : एक अभ्यास

१०. संत तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान एक चिकित्सक अभ्यास

११. संत तुकारामांच्या गाथेवरील स्वातंत्र्योत्तर  समीक्षेचा अभ्यास

१२. संत तुकाराम गाथा – लोकतत्त्वीय अभ्यास

१३. मराठी साहित्यात प्रतिबिंबित झालेले संत तुकारामांचे व्यक्तिमत्त्व

१४. संत साहित्यातील कल्याणाच्या अर्थशास्त्राचा एक तौलनिक अभ्यास : विशेष संदर्भ – संत तुकाराम ,ज्ञानेश्वर, एकनाथ व नामदेव

१५. संत तुकारामांची गौळण रचना : स्वरूप आणि चिकित्सा

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "तुकाराम गाथा". 2018-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-02 रोजी पाहिले.
  2. ^ संपादक घुले, पांडुरंग अनाजी, ह्. भ्. प्. (२०१७). श्री संत तुकाराम महाराजांची गाथा. श्री क्षेत्र आळंदी: श्री संत तुकाराम महाराज वाङ्मय प्रकाशन संस्था.
  3. ^ "Sant Tukaram related Selected Books, Ph.D Theses, Films- Videos, Other Information Sources" (इंग्रजी भाषेत). 2021-07-02 रोजी पाहिले.