रामचंद्र देखणे
डॉ. रामचंद्र अनंत देखणे (जन्म : एप्रिल १९५६-२०२२) हे मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक , व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार आहेत.
रामचंद्र देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.
रामचंद्र देखणे हे जरी भारुडांत रंगून जात त्तरी त्यांच्या अर्थाकडे त्यांचे लक्ष नसे. आई जेव्हा भारुडातील ’दादला नको गं बाई’ किंवा, ’नणदेचं कार्टं किरकिर करतंय’ आदी प्रतीकांचा अर्थ विचारू लागली तेव्हा त्यांनी भारुडांवर संशोधन करायला सुरुवात केली. ’भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान - संत एकनाथांच्या संदर्भातल्या या त्यांच्या प्रबंधास इ.स. १९८५मध्ये पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. या प्रबंधाला डॉ. मु.श्री. कानडे पुरस्कार समितीचा १० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांवरती अनेक व्याख्याने दिली आहेत. देशविदेशांत त्यांनी केलेल्या २१००व्या भारुडाचा कार्यक्रम १४ मे २०१६ रोजी झाला.
रामचंद्र देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. ३४ वर्षांच्या नोकरीनंतर ते ३०-४-२०१४ रोजी निवृत्त झाले. देखणे यांचे पुणे येथे २६ सप्टें २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. [१]
रामचंद्र देखणे यांना मिळालेले सन्मान
संपादन- २३-२४ ऑक्टोबर २००४ या दरम्यान राळेगण सिद्धी येथे झालेल्या ग्रामजागर साहित्य संंमेलनाचे अध्यक्षपद.
- किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ११ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे झालेल्या १२व्या "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमलना'चे अध्यक्षपद..
- अमेरिकेत झालेल्या विश्व साहित्य संमेलनातील "संतसाहित्य आणि आधुनिकता' या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र देखणे होते.
- सासवडच्या मराठी साहित्य संमेलनप्रसंगी (जानेवारी २०१४) ‘प्रश्न आजचे उत्तरे संतांची’ या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदी रामचंद्र देखणे होते.
- कडोली साहित्य संघाच्या माचीगड येथे २७-१२-२०१०ला झालेल्या १३व्या कडोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- संमेलनपूर्व संमेलनात रामचंद्र देखणे यांचा "साहित्यातील लोकरंग' हा कार्यक्रम झाला. १६ फेब्रुवारी २०१० रोजी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता.
- सासवड येथे झालेल्या ८व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते..
लेखन
संपादन- रामचंद्र देखणे हे दैनिक महाराष्ट्र टाइम्सध्ये ’माझं अध्यात्म’ हे साप्ताहिक स्फुट इ.स. २०११ ते २०१२ या काळात, म्हणजे सुमारे ७५ आठवडे लिहीत होते.
- २०१२ सालच्या आषाढी वारीच्याकाळात महाराष्ट्र टाइम्समध्ये डॉ. रामचंद्र देखणे यांचं "पालखी" हे दैनिक सदर प्रकाशित होत होते..
- रामचंद्र देखणे यांची ललित, संशोधन आणि चिंतनात्मक अशी ३८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
- १) Jesse Russell व Ronald Cohn आणि २) Lambert M. Surhone, Mariam T. Tennoe व Susan F. Henssonow यांनी रामचंद्र देखणे यांचीे चरित्रे लिहिलीे आहेत.
रामचंद्र देखणे यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- अंगणातील विद्यापीठ
- आनंद तरंग
- आनंदाचे डोही
- आषाढी
- गोंधळ : परंपरा स्वरूप आणि अविष्कार
- गोरज
- जीवनयोगी साने गुरुजी
- जीवनाची सुंदरता
- तुका म्हणे जागा हिता
- तुका झालासे कळस
- दिंडी
- भारूड आणि लोकशिक्षण
- भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान
- भूमिपुत्र
- मनाचे श्लोक : जीवनबोध (ई-पुस्तक)
- मराठी बोलू कौतुके या ग्रंथातील ’लोककाव्य आणि मराठी भाषा’ हा लेख
- महाकवी
- महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला
- लागे शरीर गर्जाया
- लोकशिक्षक गाडगेबाबा
- वारी : स्वरूप आणि परंपरा
- शारदीचिये चंद्रकळा
- श्रावणसोहळा
- संत साहित्यातील पर्यावरणविचार
- समर्थांची भारुडे (ई-पुस्तक)
- साठवणीच्या गोष्टी
- सुधाकरांचा महाराष्ट्र
- हौशी लख्याची
- ज्ञानदीप लावू जगी
पुरस्कार
संपादन- पुणे सार्वजनिक सभेतर्फे 'सार्वजनिक काका' पुरस्कार (२०१२)
- छत्रपती सेवा प्रतिष्ठानकडून जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार (३-६-२०१७)
- लेवा पाटीदार मित्र मंडळातर्फे बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न पुरस्कार (७-१२-२०१४)
संदर्भ
संपादन- ^ "संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन". eSakal - Marathi Newspaper. 2022-09-28 रोजी पाहिले.