गंमत जंमत

(गंमत जंमत (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


गंमत जंमत
दिग्दर्शन सचिन पिळगावकर
कथा वसंत सबनीस
पटकथा वसंत सबनीस
प्रमुख कलाकार सचिन पिळगावकर
अशोक सराफ
वर्षा उसगांवकर
चारुशीला साबळे
सुधीर जोशी
श्रीकांत मोघे
आशालता वाबगांवकर
विजू खोटे
संवाद वसंत सबनीस
संकलन चिंटू ढवळे
एस. राव
छाया सूर्यकांत लवंदे
प्रकाश शिंदे
समीर आठल्ये
गीते शांताराम नांदगावकर
संगीत अरुण पौडवाल
ध्वनी हरीलाल चौरसिया
इंद्रदेव
शब्बीर
पार्श्वगायन अनुराधा पौडवाल
सचिन पिळगावकर
किशोर कुमार
वेशभूषा दामोदर जाधव
रंगभूषा मोहन पाठारे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९८७


कलाकार

संपादन

पार्श्वभूमी

संपादन

पैशाची चणचण असलेल्या दोन मित्रांना झटपट पैसा मिळविण्यासाठी 'श्रीमंताची मुलगी खंडणीसाठी पळवून नेण्याची' दुर्बुद्धी होते आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणल्यावर त्यांना चांगलीच महागात पडून त्यातून कोणत्या गंमतीजंमती घडतात ते या चित्रपटात पहावयास मिळते.

कथानक

संपादन


गौतम हा एका बारमध्ये वेटरचे काम करणारा साधा सरळ माणूस. सुहास या त्याच्या अपंग भावाच्या ऑपरेशनसाठी त्याला पंचवीस-तीस हजार रुपयांची निकड असते. भावाची चिंता डोक्यावर असणाऱ्या गौतमची राहण्याची सोय मात्र अचानक बारच्या गच्चीवरून एका बंगल्यात होते. गौतमचा शाळेतील मित्र श्रीकांत हा गौतमला अनेक वर्षांनी भेटतो. गौतमने त्याच्यावर पूर्वी केलेले उपकार लक्षात ठेवून आणि गौतमची सद्यपरिस्थिती ओळखून श्रीकांत गौतमला त्याच्या मुंबईच्या बंगल्यात येऊन राहण्याविषयी सांगतो. एरवी रिकामा असणारा तो बंगला श्रीकांतच्या दुबईस्थित मामाचा असतो आणि वर्षातून ते एखाद-दोन दिवसच त्या बंगल्यात येऊन रहात असत.

गौतमसारखाच आर्थिक विवंचनेत अडकलेला फाल्गुन हा गौतमचा जिवाभावाचा मित्र. साधी नोकरी करत असणाऱ्या फाल्गुनने त्याच्या पैशाच्या चणचणीमुळे कर्जाऊ रक्कम घेऊन अनेक देणेकरी निर्माण केलेले असतात आणि त्यामुळे देणेकऱ्यांचा ससेमिरा वसुलीसाठी कायमचाच त्याच्या मागे लागलेला असतो. सबब, फाल्गुनलाही पैशाची नितांत गरज असते. त्यात भर म्हणून फाल्गुनची बायको अश्विनीही या परिस्थितीमुळे कंटाळून फाल्गुनवर बऱ्याचदा तोंडसुख घेत असते.

समोर पैशाचा प्रश्न आ वासून पडलेला असतानाच्या परिस्थितीत फाल्गुनला एकदा पेपरमधील बातमी वाचून झटपट पैसा उभा करण्यासाठी 'किडनॅपिंग' म्हणजेच कोणाचीतरी प्रिय व्यक्ति काही ठराविक रक्कम मिळवण्यासठी पळवून न्यायची शक्कल सुचते. योगायोगाने हा विचार गौतमच्याही मनात चमकलेला असतो. दोघंही तो मार्ग अवलंबायचं ठरवतात आणि 'गोट्या' नामक एका श्रीमंताच्या मुलाला पळविण्याचा प्लॅन आखतात. प्रत्यक्षात, गोट्या हा त्यांच्या अपेक्षेनुसार एक लहान मुलगा नसतो तर तो एक पैलवान असतो. साहजिकच गोट्याला पळवून न्यायची शक्कल त्यांना झेपत नाही.

पण हताश न होता ते आता एखाद्या श्रीमंताच्या कॉलेजवयीन कन्यकेला पळवून आणायचा प्लॅन रचतात. गौतमची पूर्वी एकदा एका श्रीमंत मुलीशी शब्दिक चकमक झालेलीच असते. तेव्हा त्याच म्हणजे उद्योगपती दादासाहेब कोरेडे यांची एकुलती एक मुलगी कल्पना हिला पळवून न्यायचा बेत ते दोघेही ठरवतात व बदल्यात तिच्या वडलांकडे १ लाख रुपयांची रक्कम मागायची असे ठरवतात.

ठरल्यानुसार ते कल्पनाला पळवून नेतात आणि गौतम रहात असलेल्या बंगल्यात आणून ठेवतात. आता कल्पना घाबरेल आणि तसेच तिचे वडीलही आणि लगेच आपल्याला मागितलेली रक्कम ते देतील अशी स्वप्नं रंगविणाऱ्या गौतम आणि फाल्गुनवर त्यांची ही शक्कल चांगलीच बूमरॅंग होते! कल्पना ही एक स्मार्ट, बिनधास्त आणि धीट मुलगी असते. तिला 'पळवून आणण्यात आलेय' हे कळल्यावर रडण्या-घाबरण्याऐवजी तिला खूप गंमत वाटते आणि असले काहितरी सनसनाटी 'थ्रिल' तिला हवेच होते असे ती सांगते. भरीस भर म्हणजे त्यांनी मागितलेल्या रकमेतील काही वाटा तिला हवा असेही ती त्यांना सुनावते. आता गौतम-फाल्गुन होते साधे-सामान्य! सराईत गुंडगिरी, मारामारी इत्यादीशी काडीचाही संबंध नसलेले आणि किडनॅपिंगच्या क्षेत्रात नवखे! स्मार्ट कल्पनाला त्या दोघांनाही 'गुंडाळून' ठेवणे त्यामुळे सहजशक्य होते. इकडे दादासाहेब कोरड्यांनाही गौतम-फाल्गुनच्या धमक्या देण्याच्या पद्धतीवरून त्यांचा नवखेपणा ओळखता येतो आणि ते ही मागितलेली रक्कम द्यायला टंगळमंगळ करतात. तेवहढ्या वेळात कल्पनाला शोधून काढायचे काम ते पोलिसांऐवजी गणू पैलवानवर सोपवतात.

दरम्यान कल्पना त्या बंगल्यामध्ये गौतम-फाल्गुनकडून स्वतःची चांगलीच बडदास्त ठेवून घेते. मध्येच एकदा श्रीकांतचा मामा किंवा गौतमच्या ओळखीचे पोलीस इन्स्पेक्टर किंवा फाल्गुनच्या शोधात आलेली आश्विनी इत्यादिं व्यक्ती जेव्हा बंगल्यात येतात तेव्हा कल्पना दरवेळेस वेगवेगळी नाटके करून वेळ मारून नेते. त्यामुळे तिला पळवून आणले आहे, असा कोणालाही संशय येत नाही. कल्पनाचे वाढते नखरे आणि मागण्या आणि रक्कम सांगूनसुद्धा ती वेळेवर न देणारा तिचा कंजूस बाप यांच्या कात्रीत दोघेही सापडतात. दोघेही अतिशय जेरीस आलेले असताना एक दिवस गौतमला श्रीकांतकडून पत्र येते. त्यातून श्रीकांत कळवतो की त्याने गौतम आणि फाल्गुनसाठी दिल्लीला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या बघून ठेवल्या आहेत. हे ऐकल्यावर दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. आता कल्पनाचे नखरे सहन करण्याची किंवा तिच्या वडिलांकडून अपेक्षित असलेल्या रकमेची त्यांना आवश्यकताच उरत नाही आणि आता ते अजिबात कल्पनाच्या मागण्यांना भीक घालत नाहीत.

इकडे, आतापर्यंत दोघांना भंडावून सोडणारी कल्पना नकळत गौतमच्या प्रेमात पडलेली असते. त्याचा साधा-सरळ स्वभाव तिला आवडलेला असतो आणि तिला पळवून नेण्यामागचे खरे कारण समजल्यावर तिला त्याचा रागही येत नाही. अर्थात हे ती त्याला आधी सांगत नाही. पण जेव्हा गौतम तिला सांगतो की तू आता मोकळी आहेस आणि आता तिची त्या दोघांना गरज नाही, तेव्हा मनातून थोड्या दुखावलेल्या कल्पनाला तिच्या प्रेमाची कबुली देणे भाग पडते. हे समजल्यावर गौतमही तिच्या प्रेमाचा स्वीकार करतो.

आता कल्पना तिच्या घरी आणि गौतम-फाल्गुन दिल्लीला जायची तयारी कारण्यासाठी निघतात. तेवहढ्यात गणू पैलवान त्यांचा पाठलाग करतो आणि सरतेशेवटी त्या सर्वांना दादासाहेबांच्या पुढ्यात हजर करतो. तिथे कल्पना गौतमची ओळख त्यांचा भावी जावई म्हणून करून देते. अर्थात गौतम जे घडलेले असते ती सत्यघटना कथन करतोच. पण शेवटी त्यांच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन दादासाहेब या लग्नाला परवानगी देतात.

निर्मिती

संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

हिंदीतील नामवंत गायक किशोर कुमार यांनी या चित्रपटा्द्वारे मराठीमध्ये प्रथमच पार्श्वगायन केले होते.

संदर्भ

संपादन