एच.ए.एल. तेजस
एच.ए.एल. तेजस (रोमन लिपी: HAL Tejas;) हे हलक्या वजनाच्या लढाऊ विमानवर्गातील अर्थात लाइट कॉंबॅट एरक्राफ (एल.सी.ए.) वर्गातील संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. इ.स. १९८३ साली एल.सी.ए. हा कार्यक्रम भारतीय शासनातर्फे हाती घेण्यात आला. इ.स. १९७० च्या दशकापासून भारतीय वायु सेना रशियन बनावटीच्या मिग २१ व मिग २३ अवलंबून होती. इ.स. १९९० च्या दशकात या विमानांचा सुमारे २० वर्षांचा सेवाकाळ संपल्यावर वायुसेनेत मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच विदेशी बनावटीच्या विमानांवरील अवलंबन कमी व्हावे हासुद्धा विचार त्यामागे होता [ संदर्भ हवा ].
एच.ए.एल. तेजस | |
---|---|
एच.ए.एल. तेजस | |
प्रकार | बहुउद्देशीय लढाऊ विमान |
उत्पादक देश | भारत |
उत्पादक | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड |
पहिले उड्डाण | ४ जानेवरी २००१ |
समावेश | १७ जानेवारी २०१५[१] |
सद्यस्थिती | सेवेमध्ये आहे[२] |
मुख्य उपभोक्ता | भारतीय वायु सेना |
उत्पादन काळ | २००१ पासून सुृृृरू |
उत्पादित संख्या | १६ |
एकूण कार्यक्रमखर्च | ₹७,३९९.६९ करोड ($१ अब्ज) (२०१५ मधील एलसीए एकूण)[३] |
प्रति एककी किंमत | ₹१६० करोड ($२.४ करोड) मार्क १ साठी[४] ₹२७५ करोड ($४.१ करोड) - ₹३०० करोड ($४.५ करोड) मार्क १ए साठी[४][५] |
इतिहास
संपादनमे इ.स. १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीबाबत भारतावर बंदी आणण्यात आली. त्यामुळे या विमानाचे सर्व भाग भारतात बनविणे भाग पडले. तसेच, भारताला यापूर्वी असे आधुनिक विमान बनविण्याचा अनुभव नव्हता. यामुळे एल.सी.ए. पूर्ण होण्यात उशीर झाला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या विमानाचे तेजस असे नामकरण केले. सध्या या विमानांची भारतीय नौदलासाठी निर्मिती होत आहे. १ जुलै २०१६ रोजी हवाई दलाच्या ४५ व्या तुकडीत (स्क्वाड्रन) तेजस दाखल करण्यात आले.
या विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने तर्फे करण्यात आली. सुरुवातीला याचे नाव केवळ एल सी ए (लाइट कॉम्बॅट एरक्राफ्ट/हलके लढाऊ विमान) असे होते. गोव्यात पार पडलेल्या चाचण्यात या विमानाने १३५० कि.मी. प्रति तास वेगाने प्रवास करून ध्वनी पेक्षा जास्त वेग (सुपरसॉनिक) प्राप्त केला.
बांधणी
संपादनतेजसचा आकार डेल्टा विंग टेक्नॉलॉजी ( यात विमानाचे पंख हे त्रिकोणा सारखे दिसतात) प्रमाणे आहे. विमान बांधताना अॅल्युमिनियम लिथियम मिश्रधातू, कार्बन-फायबर कंपोझिट, अर्थात कार्बन-फायबर मिश्रण, आणि टिटॅनियम-मिश्रधातूचे पोलाद वापरण्यात आले. कार्बन फायबर मिश्रणाचे प्रमाण तेजसमध्ये साधारण ४५ % असून या वर्गातील लढाऊ विमानांत जवळपास सर्वाधिक आहे. जीई-४१४ हे अमेरिकन जेट इंजिन या विमानाला बसवले आहे.
तेजस विमानाच्या कॉकपीटच्या वैशिष्टय़पूर्ण काचेमुळे वैमानिकाला उड्डाणाच्या वेळी आजूबाजूचे दृष्य स्पष्टपणे दिसण्यास मदत होते. यावर बसविलेल्या हॅंड्स ऑन थ्रोटल अँड स्टिक या यंत्रणेमुळे प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी वैमानिकावरील कामाचा ताण कमी होतो. हेल्मेटच्या समोरील पडद्यावर (हेड-अप डिस्प्ले) अद्ययावत माहिती प्रदर्शित होते. ही माहिती यंत्रणा पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. बहुविध प्रकारची माहितीही कॉकपीटमधील विविध पडद्यांवर प्रदर्शित होत राहते. यामुळे वैमानिकाला विमानाचे इंजिन, हायड्रॉलिक्स, इलेक्ट्रिकल, फ्लाइट कंट्रोल आदी बाबींविषयीचीही अद्यावत माहिती सदैव उपलब्ध होत राहते. विमान उड्डाणासाठीची यथायोग्य माहिती रिंग लेसर गायरोवर आधारित इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीमच्या मदतीने उपलब्ध होत राहते.
तेजसचा लहान आकार तसेच रडार तरंगांना कमी परावर्तित करणारे बाह्याआवरण यामुळे रडार वर तेजसला शोधणे अवघड आहे.
ताकद
संपादनडेल्टा विंगच्या या विमानावर आठ ठिकाणी बॉम्ब, क्षेपणास्त्रे ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर पल्ला वाढविण्यासाठी त्यावर हवेतल्या हवेत इंधन भरता येण्याजोगी टाकी बसविण्याची सोय करण्यात आलेली आहे. यावर २३ मि.मी.ची एक ‘जीएसएच-२३’ ही मशिनगन बसविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विम्पेल आर-७७ ही ९० ते १७५ कि.मी.पर्यंत मारा करू शकणारी आणि ३० कि.मी.पर्यंत मारा करू शकणारी विम्पेल आर-७३ ही रशियन बनावटीची क्षेपणास्त्रे , केएच - ५९ एमई ही टी.व्ही. व लेसर गायडेट क्षेपणास्त्रे, जहाजभेदी क्षेपणास्त्रे व विविध प्रकारचे बॉम्बही यावरून डागता येतात. या विमानात बसवलेल्या अत्याधुनिक बहुपयोगी रडार, लेसर डेझिग्नेटर पॉड, फॉरवर्ड लूकिंग इंफ्रा-रेड आणि ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक संवेदकांमुळे लक्ष्याची अचूक माहिती वैमानिकाला उपलब्ध होते.
तेजसची वैशिष्ट्ये
संपादन- चालक दल : १ जागा
- लांबी : १३.२० मी ( ४३ फुट ४ इंच )
- पंखांची लांबी : ८.२० मीटर ( २६ फुट ११ इंच )
- उंची : ४.४० मी (१४ फुट ९ इंच)
- पंखांचे क्षेत्रफ़ळ : ३८.४ मी वर्ग ( ४१३ वर्ग फुट)
- निव्वळ वजन : ६,५६० कि.ग्रॅ.
- सर्व भारासहित वजन : ९,५०० कि.ग्रॅ.
- कमाल वजन क्षमता : १३,५०० किलो
- आंतरिक इंधन क्षमता : २,४५८ कि.ग्रॅ.
- बाह्य इंधन क्षमता : २ × १,२०० लिटर ड्रॉप टाक्या आतमध्ये, १ × ८०० लिटर ड्रॉप टाकी सांगाड्याखाली
- कमाल वेगः
- अति उंचीवर : २,२०५ किमी/तास, माख १.८
- पल्ला : १,७०० किमी
- प्रभाव क्षेत्र : ५०० किमी
- बंदुक : २३ मिमी, २२० गोळ्या
- उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १६,००० मी
हवाई दलात समाविष्ट
संपादनहे विमान दि. २ जुलै २०१८ला भारताच्या हवाई दलात सामील करण्यात आले. कोइंबतूर जवळील सुलूर येथून तेजसने उड्डाण भरले.[६]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ PTI. "After 32 years, India finally gets LCA Tejas aircraft". 17 January 2015 रोजी पाहिले.
- ^ "Tejas: IAF inducts HAL's 'Made in India' Light Combat Aircraft – 10 special facts about the LCA". 1 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "EXCLUSIVE: With only two planes and issues unresolved, IAF to bring LCA Tejas home". 1 July 2016 रोजी पाहिले.
- ^ a b "World's smallest combat jet's Mark-II avatar to be longer". 6 January 2016 रोजी पाहिले.
- ^ "Indian Air Force to launch first squadron of Tejas fighter jets in Bengaluru". 1 July 2016 रोजी पाहिले.
- ^ सकाळ, पुणे दि. ३ जुलै २०१८, पान क्र.७, मथळा-'तेजसने घेतली झेप' (मराठी मजकूर)
बाह्य दुवे
संपादन- एरोनॉटिकल डेव्हलपमेंट अथॉरिटी (भारतीय केंद्रशासनाचा उपक्रम) - एल.सी.ए. कार्यक्रमाच्या पानावरील एच.ए.एल. तेजस विमानाचे तांत्रिक तपशील (इंग्लिश मजकूर)
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै ९, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |