अतिनील किरण

सुर्यप्रकाशात आढळणारी किरणे
(अतिनील किरणे या पानावरून पुनर्निर्देशित)

अतिनील किरणे ही सूर्यप्रकाशात आढळणारी किरणे आहेत. त्यांची तरंगलांबी ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा छोटी म्हणजे १०० ते ४०० नॅनोमीटर असते. सूर्यप्रकाशाचा केवळ ७% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो. वातावरणातील ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. सूर्यप्रकाशाच्या वर्णपटातील जांभळ्या पट्ट्याच्या पलीकडचा, साध्या डोळ्यांनी न दिसणारा पट्टा म्हणजे अतिनील किरण अर्थात अल्ट्रा व्हायोलेट किरण. याची तरंग लांबी सु. ४००० ॲगस्ट्रॉम एककापर्यंत असते. यास जंबूपार किरण असेही म्हणतात. ही एक प्रकारची ऊर्जा आहे.

सूर्याच्या कोरोनाचे (किरीटाचे) [मराठी शब्द सुचवा] अतिनील किरणांत घेतलेले छायाचित्र

परिणाम

संपादन

तीव्र स्वरूपातील अतिनील किरणे सजीवांसाठी हानीकारक असतात. त्यांच्यामुळे त्वचेची प्रतिकार शक्ती कमी होऊन त्वचेचा कर्करोग होतो. याशिवाय गुणसूत्रांचे उत्परिवर्तन (mutation) होते. पेशीतील प्रथिने आणि केंद्रकाम्लासारख्या (nuclein acid) सूक्ष्म रेणूंना झळ पोहोचते. अतिनील किरणांतील ऊर्जेमुळे त्वचेतील मुख्यत: पेशी केंद्रकाम्लाला (डीएनए) हानी पोहोचते. याचा परिणाम म्हणून विविध प्रथिने आणि विकारांची निर्मिती होते. यातील काही प्रथिनांमुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व त्या ठिकाणी लालसरपणा येतो. सूज, वेदना अशी लक्षणे दिसू लागतात. प्रखर किरण त्वचेवर पडल्यानंतर चार ते सहा तासानंतर ही प्रथिने तयार होतात. म्हणजेच सनबर्नची लक्षणे लगेच दिसत नाहीत. अतिनील किरणांमुळे हानी पोहोचलेल्या डीएनए पेशी केंद्रकाम्लाला पूर्वस्थितीत आणण्याची क्षमता शरीरात असते. पण त्वचा अधिक काळ अतिनील किरणांच्या सान्निध्यात राहिल्यास ते कठीण होते. तसेच डीएनएमध्ये बदल घडल्यास त्वचेचा कर्करोग होण्याचाही धोका असतो. सूर्याच्या अतिनील किरणांचा सामना कराव्या लागणा-या स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या वेळी अधिक गुंतागुंत होते असे म्हंटले जाते. अतिनील किरणांचे असे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. वनस्पती पेशींवरही अतिनील किरणांचा परिणाम होतो. पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन उत्पादन कमी होते. अन्नसाखळीच्या तळाशी असणाऱ्या फायटोप्लॅंक्टन हे सुक्ष्म शेवाळ (जलीय वनस्पती) अतिनील प्रारणांमुळे नष्ट होऊ शकतात.

उपयोग

संपादन

पाणी निर्जंतूक करण्यासाठी याचा महत्त्वाचा उपयोग होतो. यासाठी अतिनील किरण पाण्यातून नेतात. आयआयटी चेन्नईच्या संशोधकांनी कोळसा आणि अतिनील किरण यांच्यापासून हवा शुद्धीकारक यंत्र तयार केले आहे. अतिनील किरणांनी जीवाणूविषाणू मारले जातात नंतर शुद्ध हवा बाहेर येते. अतिनील किरण जरी अनेक प्रकारच्या जीवांणूंना नष्ट करू शकत असले तरी सर्व जीवाणूंना नष्ट करू शकत नाहीत. निर्जंतुकीकरण पद्धतीमध्ये अतिनील किरण, इलेक्ट्रॉन शलाका, क्ष-किरण, किंवा आण्वीय कणांचा वापर आवश्यकतेनुसार करतात. यातील अतिनील किरणांमुळे आयनीकरण होत नाही. विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेऊ शकणारी भारताची अंतराळ दुर्बीण ॲस्ट्रोसॅट दूरवरील अतिनील किरणे शोधून अवकाश संबंधित निरिक्षणे करते. अतिनील आणि क्ष-किरण यांतील विविध तरंगलांबीमधली माहिती खगोलीय वस्तूंच्या स्वरूपाबद्दलची रहस्ये उलगडण्यास मदत करते. टायटॅनियम डायऑक्साइड अतिनील किरण शोषून घेते.

प्राणी

संपादन

विशिष्ट प्राण्यांमध्ये मानवाला दिसू न शकणारे अल्ट्रा व्हायोलेट अर्थात अतिनील किरण पाहण्याची क्षमता असते.