स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात.

गर्भाशयातील बाळ
नवजात बालक


37-40 आठवड्यांच्या गर्भकाळानंतर प्रसूति होते. सामान्यपणे प्रसूति योनिमार्गातून होते. जर योनिमार्गातून सुलभपणे प्रसूति झाली नाही तर शस्त्रक्रिया प्रसूति करावी लागते. प्रसूतिपूर्व काळ- गर्भाशयामधील गर्भकाळ आणि गर्भाचे वजन यावर प्रसव केंव्हा होणार हे अवलंबून असते. 24 आठवड्यापूर्वी प्रसव झाल्यास गर्भ वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. गर्भावधि जसा वाढत जातो तसे गर्भ प्रसूतिनंतर जिवंत राहण्याची शक्यता वाढते. एकवीस आठवड्यांचा गर्भ जिवंत राहण्याच्या शून्य टक्के शक्यतेवरून 25 आठवड्यांचा गर्भ जगण्याची शक्यता 75% पर्यंत वाढते. जेवढे गर्भाचे वजन अधिक तेवढी गर्भ जगण्याची शक्यता वाढते. उदा. 401-500 वजनाचा गर्भ जगण्याची शक्यता 11% तर 701-800 ग्रॅम वजनाचा गर्भजगण्याची शक्यता 75% पर्यंत वाढते. अर्भकाचे वजन जन्मताना 1500-2500 ग्रॅम असल्यास ती कमी वजनाची समजली जातात. 37 आठवड्यापेक्षा कमी कालावधिमध्ये ज्न्मलेली अर्भके अपु-या दिवसांची म्हणून ओळखली जातात. गर्भवती माताना पुरेसे शिक्षण दिले आणि त्यांची काळजी घेतली तरी अपु-या दिवसांच्या आणि कमी वजनाच्या अर्भकांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण मोठे आहे. मातेचे पोषण,गर्भकालामधील मातेचे आजार, मानसिक ताण, मातेचे आरोग्य, यांचा बाळाच्या वाढीवर परिणाम होत असतो. प्रसूति ही टप्प्याटप्प्याने होणारी क्रियाआहे. गर्भकाल पुरा होत आला म्हणजे गर्भावस्था टिकून राहण्यासाठी शरीरात निर्माण होणारी गर्भरक्षक संप्रेरके प्रोजेस्टेरॉन आणि ईस्ट्रोजेन कमी प्रमाणात तयार होतात. संप्रेरकांचा प्रभाव संपल्याने गर्भाशय आकुंचन पावू लागते व प्रसूतीस प्रारंभ होतो. चाळीस आठवड्याहून अधिक गर्भकाल असल्यास वैद्यकीय देखरेखीखाली प्रसूति करावी लागते. नाहीतर माता आणि अर्भक दोघांच्या जिवास धोका उद्भवतो. भारतीय मानकाप्रमाणे 38व्या आठवड्यातील प्रसूति सामान्य समजली जाते. प्रसूतिपूर्वी मातेच्या घ्यावयाच्या काळजीमध्ये मातेचा आहार,मातेचे हीमोग्लोबिन आणि मातेस प्रसूतिपूर्वी धनुर्वाताचे अंतक्षेपण देण्याची पद्धत आहे. माता आणि जन्मणा-या बालकाचे त्यामुळे धनुर्वातापासून रक्षण होते. मातेचे हीमोग्लोबिन कमी असल्यास आधीच काळजी घेता येते. सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये गर्भवती स्त्रियांच्या वजन आणि सामान्य आरोग्याची काळजी शासनातर्फे मोफत घेतली जाते. ज्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र दूर असेल तेथे प्रशिक्षित सुईणी प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीच्या वेळी व प्रसूतिपच्शात काळजी घेतात.

प्रसूती तीन टप्प्यामध्ये होते.

प्रसूतीच्या पहिल्या टप्प्यात गर्भाशयाच्या आकुंचन पावण्याने गर्भाशयमुखाची जाडी कमी होते. गर्भाशय मुख दहा सेमीपर्यंत उघडते. गर्भाशयाच्या आकुंचनामुळे उल्बआवरण फाटते आणि उल्बद्रव योनीमधून बाहेर येतो. उल्बद्रवामध्ये असलेल्या अर्भकाचे डोके वजनाने शरीराच्या मानाने अधिक वजनाचे असते. उल्बद्रवामध्ये डोके गर्भाशयमुखाकडे येणे ही सामान्य बाब आहे. त्यामुळे मूल जन्मताना आधी डोके गर्भाशय आणि योनीतून बाहेर येते.

प्रसूतिच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशयाचे आकुंचन तीव्र होते. गर्भाशयाच्या तीव्र आकुंचन पावण्याने आणि गर्भाशय मुखाच्या विस्तृत होण्याने श्रोणि कुटिरात असह्य वेदना होतात. वेदना संवेदामुळे पश्चपोषग्रंथीमधून आणखी एक संप्रेरक ऑक्सिटॉसिन बाहेर पडते. ऑक्सिटॉसिनच्या होणाऱ्या परिणामाने गर्भाशयावरील आणि गर्भाशयमुख अधिक आकुंचन पावते. ऑक्सिटॉसिनच्या या परिणामास ‘घनपुनःप्रदान’ प्रक्रिया (पॉझिटिव्ह फीडबॅक) असे म्हणतात. जोपर्यंत गर्भाशय पूर्णपणे आकुंचन पावून अर्भकाचा जन्म होत नाही तोपर्यंत ऑक्सिटॉसिनचे स्त्रवणे आणि गर्भाशयाचे आकुंचन पावणे हे चालूच राहते. प्रगत राष्ट्रामध्ये वेदनारहित प्रसूति तंत्र विकसित झाले आहे. यास इपिड्यूरल असे म्हणतात. मेरुरज्जूच्या शेवटी असलेल्या पोकळीमध्ये वेदनाशामकांच्या क्षेपणाने मातेस वेदना होत नाहीत. भारतामध्ये हे तंत्र अजून सर्वत्र पोहोचलेले नाही. मातेस प्रसव क्रियेच्या वेळी होणाऱ्या असह्य वेदनेमुळे शेवटी प्रतिक्षेपी क्रियेमुळे पोटाचे आणि श्रोणिगुहेचे स्नायू मोठ्या प्रमाणात आकुंचन पावतात आणि अर्भक योनीबाहेर येते. दर दहापैकी नऊ प्रसवामध्ये बाळाचे डोके आधी बाहेर येते. काहीं प्रसवामध्ये अर्भकाचे हात, खांदा, ढुंगण आधी गर्भाशयातून बाहेर येते. अशी प्रसवक्रिया अवघड समजली जाते.

प्रसवाच्या तिस-या टप्प्यात उल्बावरण, अपरा आणि वार गर्भाशयाच्या तीव्र आकुंचन पावण्याने गर्भाशयाबाहेर येते. यानंतरसुद्धा गर्भाशय आकुंचन पावते. त्यामुळे अपरा गर्भाशय भित्तिकेपासून वेगळी होते. या प्रसंगी गर्भाशय भित्तिका आणि अपरेमधील रक्त पोकळ्या उघडतात आणि रक्तस्त्राव होतो. एका प्रसूतीच्या वेळी सु. 150-250 मिलि रक्तस्त्राव होतो.मूल जन्मल्यानंतर अपरा आणि वार गर्भाशयाबाहेर येण्यास सु. पाच मिनिटांचा वेळ लागतो.

प्रसवाच्या चवथ्या आणि अखेरच्या टप्प्यास प्रसवपश्च टप्पा म्हणतात. अपरा आणि वार बाहेर आल्यानंतर या टप्प्याचा कालावधि सु. एक ते चार तासांचा आहे. या काळात गर्भाशयातील अपरा गर्भाशयापासून सुटल्याने उघड्या झालेल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तस्त्राव थांबतो. प्रसूतिमध्ये घ्यावयाची काळजी प्रसूतिमध्ये माता आणि अर्भकाची अनेक प्रकारे काळजी आणि त्वरित निर्णय घ्यावे लागतात. मातेची सुरक्षितता, मातेचे आरोग्य, अर्भकाची सुरक्षितता, अर्भकाची जन्म घेण्यावेळीची स्थिति, प्रसूतिमधील टप्पा व माता आणि अर्भकाचा प्रतिसाद. बहुतेक रुग्णालयामध्ये प्रसूतिच्या वेळी माता आणि अर्भकाच्या हृदयाचे ठोके, मातेचा रक्तदाब व अर्भकाच्या टाळूवरील दाब पाहिला जातो. प्रसव वेदनारहित करण्याचा निर्णय आणि प्रसव काळात पिटोसिन (ऑक्सिटॉसिन) देण्याचा निर्णय योग्य वेळी मातेच्या क्षमते प्रमाणे घेतला जातो. सुलभ प्रसूतिसाठी योनिमुख आणि गुदद्वारामध्ये उभा छेद घेण्याने प्रसूति लवकर होते. ही जखम कालांतराने बरी होते.

शत्रक्रिया प्रसूति: योनिमार्गातील प्रसूति अवघड आणि अधिक वेळ खाणारी असल्यास माता आणि अर्भक या दोघांच्या जिवावर बेतू शकते. अशा वेळी पोटाचा छेद घेऊन गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून मूल गर्भाशयाबाहेर काढण्याच्या प्रकारास शस्त्रक्रिया प्रसूति म्हणतात. योनिमार्गातील प्रसूतीमधील एक मोठा अडथळा म्हणजे कटिबंधाची हाडे. या हाडांच्या पोकळीमधून अर्भकाचे डोके गर्भाशयग्रीवेतून योनिमार्गामध्ये यावे लागते. प्रसूतिच्या वेळी कटिबंधाची हाडे रिलॅक्सिन नावाच्या संप्रेरकाने सैल होतात. सध्या मातेचे गर्भधारणेचे वय वाढलेले असल्याने कटिबंधाची हाडे कडक होतात. अशा वेळी मधूनच प्रसव वेदना थांबल्यास,मूल योनिमार्गामध्ये बराच काळ राहिल्यास किंवा नाळेचा अर्भकाच्या गळ्याभोवती वेढा पडल्यास अर्भकाच्या मेंदूस पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. अशा मुलाच्या मेंदूमध्ये दोष उत्पन्न होण्याची शक्यता असते. अशा वेळी शस्त्रक्रिया प्रसूति करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिका-यावर सोडावा.

जन्मानंतर बालकाची काळजी

संपादन

जन्मानंतर सर्व प्रथम बाळाच्या तोंडातील चिकटश्राव कोरड्या साफ कपड्याने पुसून घ्यावेत व नवजात शिशुला उबदार कपड्यात गुंडाळुन ठेवावे.

अधिक वाचन

संपादन