वजीर-उद्‌-दौला रावबहादुर सरदार माधवराव विनायकराव किबे (४ एप्रिल १८७७:इंदूर - १२ ऑक्टोबर १९६३:इंदूर), एम.ए., एम.आर.ए.एस.,एफ़.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासामध्ये संशोधन करणारे विद्वान होते. त्यांना ग्रंथवाचनाची आणि आपले विचार लिहून काढण्याची मनापासून आवड होती. माधव विनायक किबे एक चांगले मराठी साहित्यिक होते. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी त्यांनी अनेक मार्गदर्शनपर लेख लिहिले. इंदूर संस्थानात मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. इंदूरमधील सामाजिक आणि साहित्यिक चळवळीत त्यांचा पुढाकार असे.

सरदार किबे

मूळचे कोकणातले संगमेश्वर येथे राहणारे किबे यांचे पूर्वज उत्तर पेशवाईत होळकरांच्या इंदूर संस्थानात स्थलांतरित झाले व तेथे होळकरांच्या संस्थानात अधिकारी म्हणून रुजू झाले. तिथेच या घराण्याला सरदार हा किताब मिळाला.

शिक्षण

संपादन

सरदार किबे यांचे प्राथमिक शिक्षण इंदूरला त्यांच्या घरीच झाले. नंतर ते इंदूरच्याच डॅली कॉलेजमध्ये दाखल झाले. त्या कॉलेजमधून १८९४साली मॅट्रिकची परीक्षा दिल्यावर ते अलाहाबादच्या म्यूर कॉलेजातून इ.स. १८९९मध्ये पदवीधर व १९०१ मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.

विवाह

संपादन

त्यांचा विवाह रत्‍नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाईंच्या घरंदाज घराण्यातील कमलाबाईशी झाला. त्या मराठी कवयित्री, गद्यलेखिका आणि उत्तम वक्त्या होत्या.

सरदार किबे यांनी इंदूरात मराठी साहित्याची फार सेवा केली. इंदूर येथे मराठी भाषिकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते एक सदस्य होते. किबे यांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन इतिहासाबरोबरच राजकारण, अर्थकारणाचाही अभ्यास होता. याचबरोबर पुराण वास्तुशास्त्राचा व संस्कृत-मराठी- हिंदी साहित्याचा व्यासंग होता. पुराणवास्तुशास्त्र या विषयावर त्यांनी संशोधनात्मक असे विवेचनात्मक निबंधलेखन केले.

  • लीग ऑफ नेशन्स (इंग्रजी ग्रंथ)
  • हिंदुस्थानातील संस्थाने (इंग्रजी ग्रंथ, मूळ नाव ‘मध्य हिंदुस्थानातील गॅरेंटीड संस्थाने’)
  • करन्सी पॉलिसी ऑफ इंडियन स्टेट्स (इंग्रजी ग्रंथ)
  • रामायण- लंकेचा शोध’ आणि ‘मोहंजोदडो - संस्कृतीच्या नाशाची कारणे (अभ्यासपू्र्ण लेख)
  • अनेक प्रतिष्ठित मराठी, हिंदी आणि इंग्रजी नियतकालिकांमध्ये नियमित लेखन.

दानशूरता

संपादन

सरदार किबे यांनी मुंबईतला हिंदी शिक्षण फंड, पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ इत्यादींना आणि देशातील आणि देशाबाहेरील अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांना, त्यांच्या चांगल्या कामासाठी भरघोस देणग्या दिल्या आहेत.

बांधकामे

संपादन
  • उज्जैनला क्षिप्रा नदीला गंगाघाट नावाचा एक घाट आहे. घाटाशेजारीच सरदार किबे यांचा वाडा आहे. हा घाट बहुधा रावबहादुर माधवराव विनायकराव किबे यांच्या पूर्वजांनी बांधला असावा.
  • पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या शिरूर तालुक्यातील महागणपतीच्या देवळातील लाकडी सभामंडप सरदार किबे यांनी बांधून दिला आहे. हे सरदार किबे कदाचित रावबहादुर किब्यांचे पूर्वज असावेत.

मानसन्मान

संपादन
  • सरदार किबे यांना लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासद करून घेण्यात आले.
  • सरदार किबे यांना लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्‌सची फेलोशिप प्रदान करण्यात आली.
  • किबे यांची मध्यप्रांतात हिंदुस्थान सरकारच्या गव्हर्नर जनरलचे साहाय्यक मंत्री म्हणून नेमणूक झाली.
  • त्यांना इंदूर संस्थानात मानद दंडाधिकारी करण्यात आले.
  • देवास संस्थान(धाकटी पाती)चे ते इ.स.१९११मध्ये दिवाण झाले.
  • यथावकाश ते इंदूरचे महाराज तिसरे तुकोजीराव होळकर यांचे खास चिटणीस (हुज़ूर सेक्रेटरी), नंतर अबकारी मंत्री आणि निवृत्तीच्या वेळी उपपंतप्रधान झाले.
  • मुंबई इलाख्यातील सरदार, इनामदार आणि वतनदार यांच्या संमेलनाचे अध्यक्षपद किबे यांनी भूषविले होते..
  • सरदार किबे बनारसच्या हिंदी साहित्य परिषदेचे आणि पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते.
  • ते मध्य भारत हिंदी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते.
  • त्यांनी १९१५ साली इंदूरमध्ये मराठी साहित्य सभा ही संस्था स्थापन केली आणि तिच्यातर्फे आमंत्रण देऊन १९१७मध्ये इंदूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवले.
  • मुंबईत १९२६ साली भरलेल्या १२व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  • पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियामक मंडळाचे आणि हिस्टॉरिकल रेकोर्ड्‌ससाठीच्या सरकारी कमिशनचे सदस्य.
  • इ.स. १९३१मध्ये सरदार किबे यांनी इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्या बोलावण्यावरून लंडनला जाऊन त्यांच्याबरोबर दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली होती.
  • १९३१मध्येच सरदार किबे यांनी सर लेस्ली विल्सन यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये भरलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या बैठकीत भाषण केले होते.
  • १९३३मध्ये इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीपुढे सरदार किबे यांनी मुंबई इलाख्यातल्या जमीनदारांची कैफियत मांडली होती.
  • देवास संस्थानात केलेल्या समाजकार्यासाठी ब्रिटिश सरकारने, सरदार किबे यांना रावबहादुरया उपाधीने सन्मानित केले.

बाह्य दुवे

संपादन

http://www.mssindore.org/index.php/2012-09-02-10-11-14/1917 Archived 2013-11-26 at the Wayback Machine. (इंदूरचे १९१७ सालचे मराठी साहित्य संमेलन)