व्हर्जिनिया वूल्फ

इंग्रजी भाषेतील लेखिका
(वुल्फ, व्हर्जिनिया या पानावरून पुनर्निर्देशित)


(२५ जानेवारी १८८२ – २८ मार्च १९४१). एक अग्रगण्य इंग्रजी कादंबरीकर्त्री. जन्म लंडनमध्ये. थोर विचारवंत, चरित्रकार आणि सांस्कृतिक समीक्षक ⇨सर लेस्ली स्टीव्हन हे तिचे वडील. घरातील वातावरण सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न होते. तथापि आई, वडील, बहीणभाऊ ह्यांच्या निधनाचे आघात सोसावे लागल्याने तिच्या अतिसंवेदनशील मनावर खोल परिणाम झाला. अनेकदा तिला नैराश्याचे झटके येत. वडिलांच्या मृत्यूनंतर लंडनच्या ब्लूम्झबरी विभागातील गॉर्डन स्क्वेअर येथे ती राहत असताना तिचे घर नामवंत साहित्यिक, तत्त्वज्ञ, कलावंत ह्यांच्या विख्यात ‘ब्लूम्झबरी ग्रुप’चे केंद्र झाले होते. ह्याच गटाचे एक साहित्यिक सदस्य लेनर्ड वुल्फ ह्यांच्याशी तिचा विवाह झाला (१९१२).

व्हर्जिनियाने आपला लेखनारंभ टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये ग्रंथसमीक्षणे लिहून केल्यानंतर ती कादंबरीलेखनाकडे वळली. द व्हॉयिज आउट (१९१५) व नाइट अँड डे (१९१९) ह्या पारंपारिक वास्तववादी वळणाच्या पहिल्या दोन कादंबऱ्या लिहिल्यानंतर कादंबरीलेखनात नवनवे प्रयोग करण्याची गरज तिला तीव्रतेने जाणव कादंबरीच्या स्वरूपाबद्दलची तिची  भूमिका ‘मॉडर्न फिक्‌शन’ (१९१९) आणि ‘मिस्टर बेनेट अँड मिसेस ब्राउन’ ह्या दोन सुप्रसिद्ध निबंधांतून तिने मांडली आहे. तिच्या मते पात्रांच्या अंतरंगाचा वेध घेणे, त्यांच्या जिवंत जाणिवेचा आलेख काढणे हे कादंबरीकाराचे उद्दिष्ट होय. दिव्याभोवती असलेल्या आभावलयाला (हेलो) निश्चित आकार नसतो.


आपल्याला फक्त एका प्रकाशकेंद्रापासून निघालेल्या सहस्रावधी तरल प्रकाशशलाका जाणवतात. त्याचप्रमाणे पात्राच्या जाणीव केंद्रापासून निघालेल्या आंतरिक भावविश्वाच्या अगणित शलाकांतूनच जीवनाचा खरा अर्थ जाणवू शकतो, अशी तिची भूमिका पात्रांना येणारा केवळ व्यक्तिविशिष्ट असा अनुभव साकार करणे, ही कादंबरीकाराची कलात्मक आणि नैतिक जबाबदारी असून तो भाषेसारख्या सामाजिक-सार्वजनिक माध्यमातून मांडण्यासाठी भाषेच्या स्वभावाविरूद्ध जाऊन भाषा वाकवणे तिला अपरिहार्य वाटत होते. कादंबरीचा बंध आणि निवेदनपद्धती यांत तिने केलेल्या प्रयोगांमुळे कादंबरीबाबतच्या पारंपरिक धारणांमध्ये मूलभूत परिवर्तन घडून आले. चित्रकलेतील उत्तर-दृक्‌प्रत्ययवादाचा (पोस्ट-इंप्रेशनिझम) तिच्यावर विशेष प्रभाव होता. त्याच्या खुणा तिच्या कादंबऱ्यांत सर्वत्र दिसतात. जेकब्ज रूममध्ये (१९२२) तिने वापरलेले अप्रत्यक्ष निवेदनतंत्र आणि काव्यात्म दृक्‌प्रत्यय ह्यातून तिची प्रयोगशीलता स्पष्टपणे दिसून आली.

घड्याळ, दिनदर्शिका, कालानुक्रमे उलगडत जाणारा इतिहास इत्यादींनी दाखविली जाणारी काळाची एकरेषीय संकल्पना कादंबरी-लेखकांना अनेकदा अपुरी, असमाधानकारक वाटते; कारण व्यक्तिजीवनातील अनुभवात काळाचे एकरेषीय स्वरूप, अनुक्रम, कार्यकारणभाव ह्या गोष्टी मोडून पडतात. परस्परांशी असंबद्ध अशा कित्येक संवेदनांचा व्यक्तीला अनुभव येत असतो आणि ह्या संवेदना आता वर्तमानात, तर आता (स्मृतींच्याद्वारे) भूतकाळात, तर आता भविष्यात, अशा असतात. संज्ञेचा असा अप्रतिहत चालणारा संचार, तदानुषंगिक विचार, स्मृती, आशा-निराशा, संताप, प्रेम इ. भावना अशा अनेक घटकांची दर क्षणी होणारी नित्यनूतन जुळणी व ती दर्शविताना होणारी व्यक्तीच्या अंतरंगाची ओळख हे व्हर्जिनियाच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. व्यक्तींचे समृद्ध आंतरिक भावविश्व आणि त्याला बाह्य, व्यवहारी जगाकडून मिळणारा विरोधी प्रतिसाद हे तिच्या कादंबऱ्यांचे आशयसूत्र आहे. तिच्या प्रयोगशील कादंबऱ्यांमध्ये उपर्युक्त जेकब्ज रूमखेरीज मिसेस डॅलोवे (१९२५), टू द लाइट हाउस (१९२७), द वेव्ह्‌ज्‌ (१९३१), बिट्‌वीन द ॲक्ट्‌स (१९४१) अशा काही कादंबऱ्यांचा समावेश होतो.

तिचे समीक्षालेखनही विपुल आहे. आपले विशेष महत्त्वाचे टीकालेखन तिने आधुनिक कादंबरीची तत्त्वे विशद करण्यासाठी लिहिले असले, तरी आपल्या पूर्वकालीन व समकालीन लेखकांच्या कृतींवरील समीक्षणाचा भागही त्यात लक्षणीय प्रमाणात आहे.

स्त्रीमुक्तीच्या संदर्भात तिचे दोन निबंध - ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ (१९२९) आणि ‘थ्री गिनीज’ (१९३८)–विशेष चर्चिले जातात. ‘ए रूम...’ ह्या निबंधात साहित्यिक स्त्रिया आणि कादंबरी ह्यांच्यातील ऐतिहासिक संबंधाचा आढावा घेतलेला आहे. पितृसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रियांना दीर्घकाळ उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले गेले. त्यामुळे काही क्षेत्रे–उदा.व्यावसायिक लेखन–स्त्रियांना बंद झाली वा प्रवेशास अवघड ठरली. आर्थिक पारतंत्र्य, दडपणूक, समाजातला निकृष्ट दर्जा हेही त्यांच्या वाट्याला आले. तथापि असली बंधने दूर होताच, त्याही सर्जनशीलतेची अत्युच्च शिखरे गाठू शकतील, अशी व्हर्जिनियाची धारणा होती. विविध क्षेत्रांतून स्त्रियांना वगळण्याचा पुरूषी कावा असला, तरी त्यामुळे आपली स्वतंत्र राजकीय-सांस्कृतिक अस्मिता सिद्ध करण्याची संधी स्त्रियांना प्राप्त होईल, असे विचार ‘थ्री गिनीज’ मध्ये मांडलेले आहेत.

तिचे ग्रंथ युनिफॉर्म एडिशन ऑफ द वर्कस ओफ व्हर्जिनिया वुल्फ (१४ खंड, १९२९-५२) ह्या नावाने संकलित करण्यात आले आहेत, तर व्हर्जिनिया वुल्फ : कलेक्टेड एसेज (४ खंड, १९६६-६७) ह्या नावाने तिचे निबंध प्रसिद्ध झाले आहेत.

मूळची अतिसंवेदनशीलता, वाङ्‌मयनिर्मितीतून येणारा प्रचंड ताण आणि दुसऱ्या महायुद्धाच्या भयंकर अनुभवाने आलेली व्याकुळता ह्यांचा एकत्रित परिणाम होऊन रॉडमेल येथे तिने आत्महत्या केली.