विष्णू नरसिंह जोग (जन्म : पुणे, १४ सप्टेंबर १८६७ - ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्‍न करणारे सत्पुरुष होते. विष्णूबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आणि लेखक होते. विष्णूपंत जोग हे अत्यंत निरिच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ति मदत करीत.

चरित्र

संपादन

विष्णूबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णूबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णूबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते.

वारकऱ्यांचे फड

संपादन

संत नामदेवांनी वारकऱ्यांच्या ‘फड’ नावाच्या यंत्रणेला संस्थात्मक रूप देऊन वारकरी संप्रदाय वाढवला. दिंडी हे वारकरी संप्रदायाचे सर्वात लहान ‘युनिट’ होय. पूर्वीच्या काळातल्या बहुतेक दिंड्या कुठल्याना कुठल्या फडाशी संलग्न असत.

पुढेपुढे फडांमुळे संप्रदायाच्या वाढीवर मर्यादा पडल्या. फडांची मालकी वंशपरंपरेने चालत राही. संप्रदायात प्रविष्ट होण्यासाठी एखाद्या फडाच्या मालकाच्या हातून तुळशीमाळ गळ्यात घालावी लागायची. अशा प्रकारे एखाद्या फडाशी संलग्न झालेल्या वारकऱ्याने दुसऱ्या फडावरच्या कीर्तनकाराचे कीर्तन ऐकणेही संमत नसे. वारकरी संप्रदायाची ही कोंडी फोडण्याचे काम विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षात विष्णू नरसिंह जोग महाराज यांनी केले.


विष्णूबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.

वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक

संपादन

विष्णूबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले. भजने, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आणि तुकारामाची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा जोगबुवांचा दिनक्रम बनला. पुरेसा अभ्यास झाल्यानंतर ते कीर्तने करू लागले. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या अमोघ वाणीने अस्सल देशी वाङ्‌मयाचा प्रचार आणि प्रसार केला. इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी संतांना आणि संतवाङ्मयाबद्दल आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे कार्य ज्या काही महनीय व्यक्तींनी केले त्यांत जोगमहाराजांचा सिंहाचा वाटा होता असे म्हणले आहे.

विष्णूबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.

बदनामीचा खटला

संपादन

अशा या स्पष्टवक्त्या, निर्भीड, सत्यनिष्ठ आणि विशुद्ध आचरणाच्या जोगमहाराजांसारख्या माणसाला महानुभावपंथीयांनी भरलेल्या एका बदनामीच्या, अब्रनुकसानीच्या न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. १९०७ मध्ये हा खटला जळगाव कोर्टात भरण्यात आला होता. जोगमहाराजांचे शिष्योत्तम प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी विष्णूबुवांचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांच्या अनेकानेक उत्तम गुणदर्शनांबरोबर जळगाव खटल्याचीही हकीकत वाचायला मिळते.

जोगमहाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ, साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष-उत्तरपक्षाची जोड दिली, त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाली. प्राचार्य शं.वा तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे अशा तरुणांपैकी एक. कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीला, १९१६ साली वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली.

वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी-ग्रंथ

संपादन

जोग महाराजांचे प्रशिष्य म्हणजे मामासाहेब दांडेकर यांचे शिष्य जगन्नाथ महाराज पवार यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ‘वटवृक्ष’ नामक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.

मृत्यू

संपादन

फेब्रुवारी १० १९२० रोजी विष्णूबुवा जोगांचे आळंदी येथील घासवले धर्मशाळेत निधन झाले. त्यावेळी केसरीत टिळकांनी लिहिलेला मृत्युलेख छापून आला होता.

ग्रंथलेखन

संपादन
  • तुकारामाच्या अभंगांचा अर्थ लावून सार्थ गाथा तयार करण्याचे काम पहिल्यांदा जोगमहाराजांनी केले. इ.स. १९०१ साली त्र्यंबक हरि आवटे यांनी प्रकाशित केलेली हीच ती तुकारामाची आद्य सार्थ गाथा. या गाथेचा गुजराथीतही अनुवाद झाला.
संपादन केलेली अन्य पुस्तके
  • सार्थ अमृतानुभव (इ.स. १९०५). नानामहाराज साखरे यांच्याकडून श्रवण केलेल्या या ग्रंथार्थातील मायावादाचा त्याग करून विष्णूबुवांना अमृतानुभवाचा ’चिद्‌विलासवादा’ला धरून वेगळा अर्थ लावला.
  • निळोबा महाराजांचा व ज्ञानेश्वर महाराजांचा वर्गीकृत गाथा ( १९०७)
  • सार्थ हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी (?)
  • एकनाथी भागवतादी सहा ग्रंथ (१९११)
  • वेदान्तविचार (१९१५)
  • महीपतीकृत ज्ञानेश्वरीतील वेचे (सार्थ) (१९१७)

चरित्र

संपादन

सोनोपंत (मामासाहेब) दांडेकरांनी ’वैकुंठवासी जोगमहाराज चरित्र’ या नावाचे विष्णूबुवांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात जोगबुवांची काही कीर्तने संक्षिप्‍त रूपात समाविष्ट केली आहेत. दांडेकर, बंकटस्वामी, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर आदी जोगमहारांच्या शिष्यांनी प्रकाशित केलेल्या कीर्तनांचे ग्रंथ हे जोगमहाराजांच्याच प्रकाशित आणि अप्रकाशित कीर्तनांचे विस्तार आहेत. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतले कीर्तनकार विष्णू नरसिंह जोग यांच्या विचारांचाच प्रचार करताना दिसतात.

हे सुद्धा पहा

संपादन