कीर्तन

भागवत संप्रदायातील एक प्रसिद्ध संकल्पना ज्यामध्ये पौराणिक कथा संगीताच्या माध्यमातून सांगितल

वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत किर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे.[१]

महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी किर्तन असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.

शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ

संपादन

कीर्तन हा शब्द संस्कृतात 'कॄत्‌’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या.

कीर्तनाचा इतिहास

संपादन

भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते.

वस्तुतः 'श्रीहरिकीर्तन' खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे.
अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजी महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले.

Arnett, Robert. India Unveiled. p. 53.

कीर्तनाचे प्रकार

संपादन
 
कीर्तन परंपरा

नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संकीर्तन,नामसंकीर्तन,कथा संकीर्तन असे विविध प्रकार आहेत.'कीर्त'या संस्कृृत शद्बावरून कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता) भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.

कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद्‌ भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे. कीर्तनकार कथा सांगत असल्याने त्यांस कथेकरीबुवा असेही म्हणतात.

कीर्तनाची अंगे

संपादन

कीर्तनाची मुख्य दोन अंगे असतात.१. पूर्वरंग आणि २. उत्तररंग [२] नारदीय कीर्तनात मुख्य ५ भाग असतात.
सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते. हे सर्व कीर्तनकार एकट्याने करीत असतो. त्याला तबला-पेटी वाजविणाऱ्यांची साथ असते.[३]

संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू काव्यातील उद्‌धृते, या गोष्टीसुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरात येतात. असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी, साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव, आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात . इतकेच नव्हे तर या कीर्तनातूनच मराठी संगीत नाटक मंडळीनी आणि जुन्या चित्रपटांनी अनेक सुमधुर लोकप्रिय चाली मिळवल्या.इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुणवर्णन हा कीर्तनांचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असते. स्वररचनेपेक्षा येथे गीतरचना महत्त्वाची असते. साहजिकच कीर्तनातील स्वररचना आणि तालयोजना बहुधा साधीच असून सामान्य गायकांनाही ती पेलता येते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी रचिलेली सु. वीस हजार कीर्तने सु. तीन हजार ताम्रपटांद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायिले जावे, हेही सूचित केले आहे. त्यांतील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत. उदा., आबाली व कोंडा मलहाहरी, शंकराभरण, श्रीराग, ललित इ. आज प्रचलित असलेल्या रागांतही ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी कीर्तनरचना केलेली दिसते. ⇨ पल्लवी ,  ⇨ अनुपल्लवी आणि ⇨ चरण असे एका गीताचे तीन भाग ह्या कीर्तनांतून प्रथमच प्रचारात आले. ‘दिव्यनाम कीर्तन’ हा कीर्तनांचा एक विशेष प्रकार. त्यांत फक्त पल्लवी आणि चरण हे दोन गीतभाग आढळतात. चरणसंख्या बरीच असून सर्व चरण एकाच चालीत गायिले जातात,  किंबहुना कधीकधी पल्लवी आणि चरण ह्यांचीही चाल एकच असते. ⇨ त्यागराज, विजय गोपाळ आणि भद्राचलम् रामदास ह्यांनी अशा प्रकारची कीर्तने रचिली

आहेत. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’, ‘मानसपूजा कीर्तन’ आणि ‘संक्षेप रामायण कीर्तन’ हे कीर्तनाचे आणखी काही प्रकार होत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचिली गेली असली, तरी तेलगू भाषेतील कीर्तनांचे प्रमाण अधिक आहे. 

वारकरी कीर्तन

संपादन

वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग नसतात. संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरूपण अश्या पद्धतीचे आणि टाळ मृदुंगाच्या घोषात २०-२५ साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते. [४]वारकरी कीर्तनाची परंपरा खूप पुरातन आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांना खुले करून एक नवी परंपरा सुरू केली. वारकरी कीर्तन हे आळंदी येथे वारकरी महाविद्यालयात शिकविले जाते.या माधमातून संतानी भक्तीमार्ग शिकविला. संत नामदेवांनी वारकरी कीर्तन संस्थेचा पाया घातला.वारकरी कीर्तन ही सांस्कृृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली. "नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग।जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥" (सकलसंतगाथा)

रामदासी कीर्तन

संपादन

रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केली. रामदासी कीर्तन हे समर्थांच्या रचनांवर मुख्यतः आधारीत असते. आख्याने सुद्धा रामकथा आणि रामभक्ती यावरच मुख्यतः आधारीत असतात.[५] श्रीधरस्वामी, केशवस्वामी , रंगनाथ स्वामी अश्या रामदासी परंपरेतील संतांच्या रचना आणि पदे यांचाही समावेश केला जातो. रामदासी कीर्तन हे आजही परंपरागत गुरुकुल पद्धतीनेच शिकविले जाते.

कीर्तनांचे आधुनिक प्रकार

संपादन

1: संयुक्त कीर्तन

2: जुगलबंदी कीर्तन

3: राष्ट्रीय कीर्तन

4: वैज्ञानिक कीर्तन

कीर्तन आणि पदे

संपादन
 • पदांबद्दल इतर सर्वसाधारण विश्वकोशीय माहिती या विभागात लिहावी. ज्या कीर्तनकारांच्या मृत्यूस ६१ पेक्षा अधिक वर्षे झाली असतील अशा कीर्तनकारांची पदे जशीच्या तशी विकिस्रोत या बंधुप्रकल्पात जतन करता येतील. निरूपण/कीर्तन कसे करावे याबद्दल माहिती विकिबुक्स या बंधुप्रकल्पात लिहावी.

कीर्तन आणि संगीत

संपादन

पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली. टाळ, मृदंग, एकतारी ही वाद्ये साथीला घेत. हल्ली पेटी तबला तर कधी बासरी अशी वाद्ये वापरली जातात.

कीर्तनात वापरली जाणारी वाद्ये

संपादन
 • तबला
 • पेटी / ऑर्गन (ही पारंपरिक वाद्ये).
 • मृदंग
 • हल्ली काही कीर्तनकार व्हायोलिनची साथ घेतात
 • चिपळ्या
 • झांज
 • करताल - हे एक वैशिष्टपूर्ण पारंपरिक वाद्य चार लाकडी पट्ट्यांच्या आधारे वाजवले जाते. महाराष्ट्रात काणे बुवा हे बुजुर्ग कीर्तनकार हे वाद्य वाजवितात

हरिकथा

संपादन

सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हे हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते.

कीर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान

संपादन
मुख्य पान: कीर्तनकार

मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते संत नामदेवांनी. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास संत तुकाविप्र हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.

पेशवेकालीन संत - संत तुकाविप्र यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते वयाच्या ६४ पर्यंत (ज्यावेळी त्यांनी समाधी घेतली) रोज कीर्तन केले. आपला जन्म हा कीर्तनाद्वारे लोकजागृती करण्यासाठी आहे असे ते म्हणत असत. आपल्या अभंगात ते म्हणतात

अवचट नोहे नेमे आलो जन्मा | कीर्तन महिमा कली माजी म्हणोनि

आर्व आहे आम्हा शंभर कोटीचे | खर्व या नामाचे संकीर्तन आमूचे

कलयूगांसाठी जन्माची आवडी | पहा शतकोडी आर्व आम्हा कीर्तन

देव नाम याची सर्व कथा वार्ता | श्रोता गुरू वक्ता संकीर्तन अभंग

तुकाविप्र कली आर्व तेची भागा | कीर्तन गंगा सतगुरू संगती

कीर्तनातून संत देवाचे रूप साकार करत असतात. देव म्हणजे मूर्तीमधला देव नाही तर जन हेच देव या न्यायाने समाजाचे खरे स्वरूप मांडण्याचे काम संत करीत असतात.

संत देवाचे वडील आहेती | रूपासी आणिती देवा संत ||

तुकाविप्र म्हणे भक्ती | देव ऋणी होणे युक्ति ||

नामवंत कीर्तनकार

संपादन

ह.भ.प.रामदास जाधव कैकाडी महाराज पंढरपूर. ह भ प बद्रीनाथ तनपुरे महाराज पंढरपूर. ह भ प माधवशास्त्री महाराज अंबाजोगाई.

बंडातात्या कराडकर (कराडचे), श्री गुरू ज्ञानेश्वर माउली महाराज चातुर्मास्ये, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, मामासाहेब दांडेकर, निजामपूरकर, संत भगवानबाबा, संत वामनभाऊ,संत भिमसिंह महाराज, भिमराव राख, बाबामहाराज सातारकर, विठ्ठल दादा वास्कर, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हरिहर महाराज दिवेगावकर, नारायणबुवा काणे, वै.सद्गुरू आनंद स्वामी उर्फ शंकर महाराज धोटे, श्री विठ्ठल महाराज फुरसुंगीकर (हरपळे) असे नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत.

अन्नमाचार्य, पेद्द तिरूमलयंगार, चिन्मय (हे सर्व ताळ्ळपाक्कम रचनाकार), पुरंदरदास, भद्राचलम् रामदास, नारायण तीर्थ, गिरिराज कवी, विजय गोपाळ स्वामी, त्यागराज, गोपाळकृष्ण भारती, अरुणाचल कविरायर, रामलिंगस्वामी हे काही श्रेष्ठ कीर्तनकार होत. ज्येष्ठ रामदासी कीर्तनकार ह.भ.प. कौस्तुभ बुवा रामदासी श्री संत वेणास्वामी मठ समर्थ वेणास्वामी मठ, मिरज

कीर्तनाविषयक ग्रंथ

संपादन
 • इ.स. १९२६ साली "कीर्तनचार्याकम्‌" नावाचे छोटे पुस्तक काशी येथून ह.भ.प.(हरिभक्तिपरायण विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले.
 • "कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडांत केलेले लेखन
 • "कीर्तन सुमनहार"
 • इ.स. १९८२ मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी लिहिलेले "कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया' नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.
 • अलीकडच्या काळात कीर्तनभूषण श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर यांनी 'कीर्तन रहस्य 'नावाचा सर्व कीर्तन परंपरांचा अभ्यास करून संशोधनात्मक ग्रंथ लिहून प्रकाशित केला आहे
 • कीर्तनतरंगिणी (किमान तीन भाग, पहिल्या तीन भागांचे लेखक अनुक्रमे - पांडुरंग मोघे, भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी, एम. पुराणिक)
 • कीर्तनमालिका (ज्ञानेश्वर म. इंगळे).

कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था

संपादन

महाराष्ट्रात प्रथम वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदी येथे झाली.वै.मारुतीबोवा ठोंबरेंनी या संस्थेची मुहुर्तमेढ रोवली.त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी त्यांनी ही जबाबदारी वै.जोग महाराजांकडे सोपविली.जोग महाराजांनी अथक परिश्रम करून ही संस्था ऊभी केली.

 • महाराष्ट्रात दादर, मुंबई येथे सन १९४० मधे ’अखिल भारतीय कीर्तन संस्था’ या संस्थेची स्थापना झाली [१] Archived 2013-09-28 at the Wayback Machine.. आजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कलाप्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), मुंबई २८ येथे आहे.
 • पुणे येथे "नारद मंदिर" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते.
 • नागपूर येथेही कीर्तन महाविद्यालय आहे.
 • सांगलीला १९९२साली स्थापन झालेली अखिल भारतीय कीर्तनकुल नावाची संस्था आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. संस्थेची पिंपरी-चिंचवड येथेही शाखा आहे.
 • श्री संत वेणास्वामी मठ पू. कौस्तुभबुवा रामदासी समर्थ वेणास्वामी मठ, मिरज[६]
 • चिंचवड येथील श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा कीर्तनाचे वर्ग घेते आणि परीक्षाही. (संस्थाप्रमुख दीपक रास्ते).
 • याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.

वारकरी पद्धतीचे कीर्तन शिकविणारी व विष्णूबुवा जोग यांनी स्थापन केलेली संस्था -वारकरी शिक्षण संस्था महाविद्यालय- आळंदीला आहे.

खानदेशातील कीर्तनसंस्था

संपादन

खानदेशात कीर्तनकारांची एक फळीच निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना, प्रसारासोबत व्यसनमुक्‍तीचे ते धडे देतात. टीव्ही चॅनेल, मोबाईलच्या जमान्यात अनेकजण कीर्तनापासून दूर जात असतानाही खानदेशात कीर्तनकारांची संख्या वाढत आहे. खानदेशात धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.[ संदर्भ हवा ]

चित्रदालन

संपादन

हे सुद्धा पाहा

संपादन

संदर्भ

संपादन
 1. ^ JOSHI, DINKAR; YOGESH, PATEL (2022-06-01). BHARTIY SANSKRITICHE SARJAK. Mehta Publishing House Pvt Ltd. ISBN 978-93-94258-18-1.
 2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
 3. ^ Jawane, Deepak Hanumantrao (2021-12-22). Maharashtra Ki Lokkathayen: Maharashtra Ki Lokkathayen: Exploring Folktales with Deepak Hanumantrao Jawane (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5521-040-1.
 4. ^ चेंडके, डॉ अमोगसिद्ध शिवाजी (2024-01-16). वारकरी संप्रदाय : साहित्य आणि तत्त्वज्ञान. Laxmi Book Publication. ISBN 978-1-304-71099-4.
 5. ^ Rajasvi, M. I. (2016-01-01). Samarth Guru Ramdas: Samarth Guru Ramdas: M.I. Rajasvi's Tribute to a Spiritual Legend (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-84344-40-5.
 6. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; undefined नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही