देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर,तुकाराम,सोपान,निवृत्ती,एकनाथ, नामदेव, चोखामेळा संत रामदास स्वामी इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी काही रचना भीमसेन जोशी आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत.

स्वरूप

संपादन

स्थानिक स्तरावर संवादिनी(हार्मोनियम),मृदंग, तबला, ढोलकी, टाळ, टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते. पूर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. वारकरी पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत.

 
संवादिनी आणि तबला

शहरांमधूनही निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेख असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये लोक नाचतातही.

प्रकार

संपादन
  • चक्री भजन एखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात. याला चक्री भजन असे नाव आहे.
  • सोंगी भजन या प्रकारात देवभक्ताच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे.
  • रिंगण भजन या प्रकारात तीन वेगवेगळी भजन मंडळे गोलाकार उभी राहून एकापाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून भजनाचेही रिंगण बनते म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे.

परदेशातील स्थिती

संपादन

परदेशात चिन्मयानंद मिशन तसेच हरेकृष्ण संप्रदायाचे अनुयायी भजनांचे कार्यक्रम आयोजित करत असतात. भक्तियोगाची साधना म्हणून त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो.