योगिराज पैठणकर

(योगिराज महाराज पैठणकर या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री योगिराज महाराज पैठणकर ( Yogiraj Maharaj Paithankar ),(श्रीएकनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र पैठण) हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार , प्रवचनकार म्हणून सुपरिचित आहेत. शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज [] आहेत. घरात परंपरेने चालत आलेल्या वारकरी सांप्रदायाचे संस्कार असल्याकारणाने बालपणापासूनच परमार्थाप्रती त्यांना विशेष रुची निर्माण झाली. महाराज हे जेष्ठ आध्यात्मिक विभूती तथा श्रीएकनाथमहाराज संस्थानाधिपती श्री भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांचे नातू. योगिराज महाराजांचे पारमार्थिक शिक्षण सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथे झाले असून तेथील कीर्तन परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. येथील चार वर्षांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर इ. स. २००५ पासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक कीर्तन व्याख्यानांच्याद्वारा वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत.

इ. स. २००६ साली त्यांनी "शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन,पैठण" या सामाजिक संस्थेची स्थापना केली[] सर्व स्तरातील गरजुंना मदत व्हावी यासाठी ते समाजकार्यातही कार्यरत आहेत. श्री जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षपूर्तीचे औचीत्त्य साधत त्यांचेद्वारा "Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाद्वारे सर्व संतांचे वाङ्मय अभ्यासण्याची सोय झाली असून जगभरातील हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

मिशनद्वारा इ.स. २०१८ सालापासून संत एकनाथ महाराजांच्या नावाने विविध सहा पुरस्कार देण्यात येत असून मुख्य "भानुदास-एकनाथ पुरस्कार" आजवर अनेक महान विभूतींना देण्यात आला आहे. त्यात ह.भ.प.गु.श्री मारोतीबाबा कुऱ्हेकर, जेष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे, ह.भ.प.श्री जितेंद्रनाथ महाराज अंजनगावसुर्जी, गाथा मंदिर अध्यक्ष ह.भ.प.श्री पांडुरंगमहाराज घुले, अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेवगिरीजी महाराज आदींचा समावेश आहे.

मिशनद्वाराच इ.स. २०१८ मध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिरात असणाऱ्या श्रीसंत एकनाथमहाराज पाराचा जीर्णोद्धार करून त्याठिकाणी श्री एकनाथमहाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

शांतिब्रह्म प्रकाशनाच्या माध्यमातून वारकरी भजनी मालिका, संत एकनाथ महाराजांचे चरित्र मराठी, संस्कृत व इंग्रजी या भाषेत प्रकाशित करण्यात आले असून पुढे लवकरच आणखी काही ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. []

भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नासिक दौऱ्याचेवेळी त्यांची भेट घेऊन त्यांचा संप्रदायाचे वतीने सत्कार करून संत एकनाथ महाराजांची मूर्ती व श्रीएकनाथकृत भावार्थ रामायण ग्रंथाची प्रत भेट देण्यात आली. या कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील केवळ १४ महाराजांस आमंत्रित करण्यात आले होते. यात एकनाथ महाराजांचा प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

इ.स. २०२३ ते २०२४ हे वर्ष संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे ४२५ वे तसेच ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचे ४५० वे वर्ष असल्याने श्रीक्षेत्र पैठण याठिकाणी एका भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आपल्याद्वारे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांच्या सेवा याठिकाणी रुजू झाल्या. या सप्ताहात एक विश्वविक्रम करण्यात आला, श्री एकनाथी भागवताचे पारायण अवघ्या १.३१ मिनिटात करण्यात आले. तसेच सरसंघचालक श्री मोहनजी भागवत, पुरी पिठाचे शंकराचार्य श्री निश्चलानंदसरस्वती स्वामीमहाराज यांच्यासारखे विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सोशल मीडियाचा वापर हा संतवाङ्मयाच्या प्रसारासाठीही चांगल्यापद्धतीने होऊ शकतो हे जाणून दररोज नित्य 'श्री सार्थ एकनाथी भागवताच्या' काही ओव्या पोचवण्याचे कार्य सुरू आहे. हजारो वाचक याचा लाभ घेत आहेत. संत एकनाथमहाराजांचे, संतांचे विचार हे फक्त सांगण्यासाठी नसून त्याचे आचरणही व्हावे या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीएकनाथ षष्ठीच्या दिवशी स्वतःच्या वाड्यात त्यांनी 'वारकरी-वैष्णव पाद्य पूजनास' सुरुवात केली आहे. [१] Archived 2017-03-23 at the Wayback Machine. वृत्तपत्रीय स्तंभ लिखाण, टेलिव्हिजनच्या माध्यमातून कीर्तन आणि संतांच्या वाङ्मयाचा प्रसार ते करीत आहेत. श्रीसंत एकनाथमहाराजांच्या वाङ्मयाविषयी त्यांचे विशेष प्रेम दिसून येते. नाथ महाराजांच्या शांती आणि समतेचा विचार विश्वपटलावर नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2013-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-04 रोजी पाहिले.
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11467240.cms[permanent dead link] मटा संकेतस्थळ दि. १९ एप्रिल २०१३ रोजी दुपारी भाप्रवे १३.३६ वाजता जसे तपासले
  3. ^ "Sant Eknath Maharaj". santeknath.org. 2024-06-27 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन