१९०७चा जळगाव खटला संपादन

विष्णूबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले. गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या अमोघ वाणीने अस्सल देशी वाङ्‌मयाचा प्रचार आणि प्रसार केला. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी संतांना आणि संतवाङ्मयाला आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे कार्य ज्या काही महनीय व्यक्तींनी केले त्यात जोगमहाराजांचा सिंहाचा वाटा होता असे खटले आहे.

विष्णूबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. अशा या सत्यनिष्ठ आणि विशुद्ध आचरणाच्या जोगमहाराजांसारख्या सत्त्वशील माणसाला एका बदनामीच्या, अब्रनुकसानीच्या न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. १९०७ मध्ये हा खटला जळगाव कोर्टात भरण्यात आला होता.

बुवा गावोगाव कीर्तन-प्रवचन करत हिंडत असत आणि लोकही अत्यंत मानाने आणि आग्रहाने त्यांना बोलवत असत. खानदेश-विदर्भात महानुभावपंथीयांचे प्राबल्य होते. बुवा या भागात कीर्तनाला अथवा प्रवचनाला आले की साहजिकच महानुभावपंथाचा विषय निघत असे. बुवा वारकरी संप्रदायाचे आग्रही प्रचारक असल्याने, युक्तिवादाच्या जोरावर काही भाष्य बुवांकडून होत असे. त्यांच्या प्रवचनाला महानुभावपंथीय मंडळी कधी फारशी येत नसत. पण त्या काळातल्या जळगाव जिल्ह्यातल्या येनगाव इथे झालेल्या प्रवचनात दोन महानुभावी येऊन बसले होते.

तुकारामांचा
उजळावया आलों वाटा।
खरा खोटा निवाडा ॥...तुकारामगाथा (सरकारी प्रकाशन-गाथा क्र. ३१८)

हा अभंग बुवांनी घेतला होता. योगायोग म्हणा किंवा ' आयरनी ' म्हणा , ' खराखोटा निवाडा ' करण्याची वेळ बुवांवर या अभंगावरच्या प्रवचनामुळे आली.

अभंगनिरूपणाच्या निमित्ताने तुकाराम महाजांनी पाखंड्यांची जी वासलात लावली आहे (वेदबाह्य लंड बोले तो पाखण्ड। त्याचे काळे तोंड जगामध्ये।) ती उद्घृत करून बुवांनी चर्चा केली. प्रवचनाला आलेल्या दोन महानुभावपंथीयांना ती रुचली नाही. ते तिथून निघून गेले. त्यांनी बुवांची तक्रार आपल्या महंतांपाशी केली आणि त्या महंतांनी ती पंजाबमधल्या मुख्य मठात पाठवली. पंजाबातल्या महंतांनी बुवांच्या नावाने महानुभाव पंथाची ' बेइज्जत ' केल्याबद्दल फिर्याद दाखल केली आणि तातडीने बुवांच्या नावाने पुण्यात समन्सही निघाले.

बुवांवर एकूण चार आरोप होते. महानुभाव पंथाच्या उत्पत्तीविषयी बुवांनी खोटा आणि विकृत इतिहास सांगितला. त्या पंथातल्या लोकांना बुवांनी अस्पृश्य म्हटले. त्यांना कोणी भिक्षा घालू नये आणि जो कोणी महानुभाव पंथीयाला शिवेल त्याच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील, असेही म्हटले. या चार प्रकारच्या आरोपांबाबत बुवांना योग्य ती शिक्षा व्हावी, असे फिर्यादींचं म्हणणे होते. खटला इंग्रज न्यायाधीश ई. जे. बॉट्स यांच्यापुढे उभा राहिला.

पंजाबमधले कित्येक महानुभावीय महंत खटल्यासाठी जळगावात दाखल झाले. वारकरी संप्रदायामध्येही ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि बुवांचे निस्सीम चाहते जळगावात येऊन दाखल झाले. ही संख्या इतकी होती की बुवांबरोबर एकेका वेळेला दोन-दोनशे माणसे जेवायला असत. उत्तमोत्तम वकील आणि बॅरिस्टर उभे करण्याचा चंग या वारकऱ्यांनी बांधला आणि या वकील मंडळींनीसुद्धा एक पै न घेता खटला चालवला. म्हाळस वकील, बॅरिस्टर सावदेकर मोठ्या जिद्दीने कामाला लागले.

कोर्टात जोगमहाराजांनी महानुभावपंथाच्या उत्पत्तीविषयी केलेले विधान मान्य केले. पण इतर तीन आरोपांचा इन्कार केला. साक्षीपुराव्यात इतर तीन आरोप टिकलेही नाहीत. परंतु पहिल्या मोठ्या, आणि महानुभावपंथाच्या उत्पत्तीविषयी असलेल्या आणि स्वतः बुवांनीच मान्य केलेल्या आरोपाबाबत मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.

वकिलांनी अनेक ग्रंथ धुंडाळले, पण बुवांच्या विधानाला साधार माहिती त्यांना कुठेही सापडेना. या आरोपाबाबत मग न्यायाधीशांनीच फर्मान काढले की,’तीन दिवसांत या विधानाचा सबळ पुरावा कोर्टात सादर करावा, नाहीतर बुवांना दोषी मानण्यात येईल’.

त्या दिवशी कोर्टातून परत येताना सर्वांनाच चिंतेने घेरून टाकले होते. बुवांना खात्रीपूर्वक वाटत होते की, ही माहिती त्यांना कोणीतरी मोठ्या व्यक्तीने दिली आहे. पण ती मोठी व्यक्ती कोण, ते मात्र बुवांना काही केल्या स्मरेना. त्या रात्रीचे जेवण झाल्यावर रात्री दहा-अकरा वाजता बुवांनी ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार केला आणि आता तुम्हीच काय ते पाहा, असे विनवले. त्यानंतर ते आणि बरोबरची मंडळी झोपी गेली.

बारा वाजता बुवांना जाग आली तीच स्मरणाने. शेजारी झोपलेल्या नागोजीबुवांना त्यांनी उठवले आणि सांगितले की, ’ती माहिती मला लोकमान्य टिळकांनी दिली आहे’. त्याबरोबर इतरही सारी मंडळी जागी झाली. त्यांच्यासोबतच वकीलही झोपले होते, तेसुद्धा जागे झाले. सर्वांना पराकोटीचा आनंद झाला होता.

तेव्हा लोकमान्य टिळकांवर मुंबईत राजदोहाचा खटला चालू होता. रातोरात टिळकांना गाठायची योजना ठरली. जळगावात तेव्हा मुंबईला जाणारी गाडी रात्री एक वाजता येत असे. त्यावेळी १२.३० वाजले होते. सर्वांनी व्यवस्था केली आणि घाईगडबडीने वकील महाशयांना रात्री एक वाजता गाडीत बसवून दिले.

ती गाडी सकाळी ९.३० ते १० च्या सुमाराला बोरीबंदरला आली. लोकमान्यांना गाठायचे म्हणजे सरदारगृहात जायला हवे. वकील बाहेर आले. स्टेशनासमोरून ते सरदारगृहाकडे वळणार, तोच त्यांना समोर व्हिक्टोरियातून कोर्टाकडे जात असणारे लोकमान्य टिळक दिसले. वकीलसाहेबांचा क्षणभर स्वतःवर विश्वासच बसेना. धावत जाऊन त्यांनी लोकमान्यांना आपण विष्णूबुवांकडून आलो आहोत, असे सांगितले. विष्णूबुवांचे नाव ऐकताच, टिळकांनी व्हिक्टोरिया थांबवली. वकिलांना आत घेतले आणि सविस्तर माहिती विचारली.

काय घडले ते ऐकल्यावर, व्हिक्टोरिया कोर्टात नेण्याऐवजी टिळकांनी एशियाटिक लायब्ररीकडे गाडी घेण्यास सांगितले. लगबगीने एशियाटिकच्या पायऱ्या चढून ते आत गेले. तिथल्या क्युरेटरला त्यांनी विल्यम हंटर यांनी लिहिलेला भारतातल्या पंथांचा इतिहास पटकन काढून द्यायला सांगितले. क्युरेटरने शोधाशोध करून हवे असलेले पुस्तक हाती देताच टिळकांनी अचूक पान काढून त्यातला नेमका मजकूर वकीलसाहेबांना काढून दिला.

मजकूर तर हाती आला, पण आता प्रश्न असा निर्माण झाला की, पुस्तक जळगावला न्यायचे कसे ? त्यावेळी एशियाटिकचा असा नियम होता की, पुस्तक मुंबईबाहेर न्यायचे असेल तर कलेक्टरची परवानगी घ्यायला हवी.

लोकमान्य तसेच तिथून कलेक्टरकडे गेले. कलेक्टरची रीतसर परवानगी घेऊन त्यांनी पुस्तक वकिलांच्या ताब्यातही दिले. लगेच मिळेल ती गाडी पकडून वकील महाशय जळगावला आले. तेव्हा वाजले होते रात्रीचे अकरा.

साधार पुरावा हाती आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याच उत्साहात गावोगाव माणसे पाठवण्यात आली. सांगावे गेले. दहा वाजता सर्वांनी कोर्टात टाळ-मृदुंग-पताकांसह जमावे, असा निरोप गेला.

निरोपाप्रमाणे दोनेक हजार वारकरी दुतर्फा ओळ करून गजर करत उभे राहिले. जोगमहाराज दहा वाजता या गजरातून सर्वांना नमस्कार करत आणि नमस्कार घेत कोर्टात हजर झाले.

अकरा वाजता केसचा पुकारा झाला. बॅरिस्टर सावदेकरांनी हंटरचं पुस्तक कोर्टाला सादर केले. सरकारी प्रकाशन, अधिकृत मजकूर, लेखक इंग्रज आणि न्यायाधीशही इंग्रज. फिर्यादीच्या वकिलास सदर मजकूर दाखवण्यात आला. त्याला काहीच म्हणता येईना. तो फक्त एवढेच म्हणाला की, पुस्तक इंग्रजी आहे. त्याचा असे म्हणायचं होते की, जोगमहाराजांना इंग्रजी कुठे येते आहे?

हा मुद्दा वकिलांनी मांडल्याबरोबर जोग महाराज एकच वाक्य म्हाणाले , ' ढ्ढ द्मठ्ठश्ा२ द्यद्बह्लह्लद्यद्ग श्वठ्ठद्दद्यद्बह्यद्ध '. त्याबरोबर कोर्टात हशा पिकला. प्राचार्य सोनोपंतांनी असे म्हटलेलं आहे की , 'न्यायाधीश सोडून सर्वांना हे माहीत होते की, बुवांना एवढेच इंग्रजी वाक्य येत होते.'

निकाल बुवांच्या बाजूने लागला. न्यायाधीश बुवांना म्हणाले , 'तुम्ही फिर्यादी पक्षावर बेइज्जतीचा खटला दाखल करू शकता.' बुवांनी मात्र त्याला विनयपूर्वक नकार दिला. ते एवढेच म्हणाले की, माझे त्यांच्याशी शत्रुत्व नाही.

बाहेर जयघोष चालला होता. गजर, पताका मिरवत समूह उत्साहात होता. फुलांनी सजवलेली एक मोटार खास बुवांसाठी आणली होती. पण बुवा गाडीतून गेले नाहीत. चालतच दिंडीबरोबर मुक्कामी गेले. संध्याकाळी 'धर्माचे पालन' या विषयावर बुवांचे प्रवचन झाले. त्यानंतर ते पुण्याला गेले.

ज्या इंपीरियल गॅझेटियरचा दाखला बघून जोगमहाराज निर्दोष सुटले, त्या गॅझेटियरच्या नवीन आवृत्तीत डॉ. भांडारकरांच्या सांगण्यावरून पुढे दुरुस्तीही करण्यात आली. या दुरुस्तीला हा खटला कारणीभूत ठरला आणि अशी दुरुस्ती गॅझेटियरमध्ये व्हावी यासाठी महानुभावी महंतांनीच डॉ. भांडारकर यांच्याशी संपर्क साधला होता.

एका खटल्याने किती गोष्टींवर प्रकाश पडतो, याचे कोणालाही आश्चर्य वाटेल.

' आपण विधान केले आहे ', असं निर्धारपूर्वक म्हणणारे जोगमहाराज कुठे आणि आज सनसनाटी विधाने करूनच्या करून पुन्हा पत्रकारांना खोटं पाडणारे राजकरणी कुठे! वस्तुतः जोगबुवांना त्या विधानाबाबत इन्कार करता येणे शक्य होते. लोकमान्य टिळकांची स्मरणशक्ती किती अचाट होती याचे प्रत्यंतर इथे येतेच, पण आपला खटला बाजूला ठेवून इतरांना मदत करण्यासाठी तत्परता दाखवणाऱ्या एका मोठ्या नेत्याचे दर्शन इथे घडते. एशियाटिकच्या प्रथेवरही इथे भाष्य आहेच. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गॅझेटियरवर बंदी घाला, ते जाळा, पुरावेच नष्ट करा, असल्या प्रथा त्यावेळी फोफावल्या नव्हत्या. चुकीची दुरुस्ती, पुराव्यानुसार जर करायला लावली, तर विद्वानही त्याला सहकार्य करतात, हे डॉ. भांडारकर यांच्यावरून दिसून आले.[१]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स