विकिपीडिया:मासिक सदर/मे २०१५
भारत दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायस मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.
मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये रुपांतर झाले. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदिक काळ सुरू झाला. इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा सम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली.
भौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत (हिमालय), गंगेचे खोरे, वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे. भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व नैरुत्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ अशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूरचे पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनच्या पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे पर्वत आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालामुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे. भारताला एकूण ७,५१७ किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किमी इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे. भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.